“हो… माणसाच्या स्पर्शाने सुद्धा जीव जातो… मी अनुभवलंय…”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : प्रसाद राऊत
===
दिवसभराचा लेखाजोखा मांडत मी बिछान्यावर पहूडलोय. छताला लटकलेला पंखा गोलगोल फिरतोय. मी दिवसभरात झालेल्या घटना क्रमाक्रमाने डोळ्यापुढून सरकावतोय.
सकाळी ऑफिसमधील मिटिंग, सेल्स, टार्गेट, इन्क्रिमेंट, इन्सेन्टिव्ह.. मग ठरलेल्या अपॉइंटमेंटस. विरवानीमधील ती शेवटची मीटिंग.
ती आटोपून मी बाहेर आलो. पाऊस आणि वाऱ्यामुळे कंपाउंडमधील एका झाडाची फांदी तुटली होती. तिचा पसारा… आणि त्याखाली पडलेलं एक घरटं.
नशीब. ज्या पाखराने ते बांधलं होतं ते उडून गेलं होतं, किंवा ते पाखरू घरट्यात परतण्याआधीच घरटं फांदीसहित जमीनदोस्त झालं होतं. नाहीतर तो मुका जीवही हकनाक बळी गेला असता कदाचित.

मला आठवतंय… माझ्या एका अशाच चुकीमुळे एक जीव बळी गेला होता. तो प्रसंग आजही मला जसाच्या तसा आठवतोय. चौथी पाचवीला असेन मी. एकदा उन्हाळी सुट्टीत गावी गेलेलो मामाकडे.
मामाचा गोठा मोठा… त्याच्या जवळच भात मळणीचं आणि उन्हाळ्यात गवताच्या उंडी रचून ठेवण्यासाठी बनवलेलं खळ.
एकदा असंच सकाळी आजीच्या सोबतीने मी गोठ्यात गेलेलो. टिकली पाडी व्यायली होती. तिचं दूध काढायचं होतं. टिकली मारकुटी होती. लाथा झटकायची आजी सोडून दुसरं कोणी जवळ गेलं तर.
म्हणून आजीने मला खळ्याच्या कडेने लावलेल्या रातांबीच्या झाडाचे रतांबे पडले असतील तर ते निवडून आण असं सांगून टिकलीपासून लांब पाठवलं होतं.
मी खळ्यावर आलो. दोन्ही बाजूला असलेल्या गवताच्या उंड्यामधुन रातांबीच्या झाडाकडे जात होतो. अचानक मी दोन पाऊल दचकून मागे आलो. माझ्या अगदी जवळून एक पाखरू उडून गेलं होतं. पावश्या होता…
त्या रातांबीच्या झाडावर, खळ्यावर, मळणीच्या खांबावर अनेकदा त्याला पाहिलं होतं मी. माझ्या चाहुलीने तो बिचकून उडून गेला असावा. पण जाताना उंडीमध्ये बनवलेलं स्वतःचं घरटं मात्र पाडून गेला….

त्यात नुकतीच जन्मलेली पिल्लं होती. कोवळी, लाल नाजूक त्वचा. अजूनही न उघडलेले डोळे… मी ते घरटं अलगद उचललं. पिल्लं चोच उघडून ओरडत होती. त्यावेळच्या बालसुलभ बुद्धीने मला वाटलं, उंचावरून पाडल्यामुळे लागलं असावं.
म्हणून मी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत ते घरटं आजीला दाखवलं गोठ्यात जाऊन. त्या नवजात पिल्लाना पाहून आजीने पहिला प्रश्न विचारला… तू यांना हात तर नाही लावलास ना?
हात लावला असशील तर त्यांची आई आता त्यांना मारून टाकेल. मी घाबरून नाही म्हणून सांगितलं.
आजीला समजलं असावं की नाही माहित नाही. पण तिने जिथे ते घरटं होतं तिथेच पुन्हा ठेऊन यायला सांगितलं. मी सुद्धा घाबरून जिथे ते घरटं होतं तिथे ठेऊन परत गोठ्यात येऊन बसलो.
जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मुद्दाम ती पिल्लं सुखरूप आहेत ना ते पाहायला खळ्यावर गेलो. तर घरटं खाली पडलेलं होतं.. आणि ती नवजात पिल्लं जवळच मरून पडली होती.
माझ्या चाहुलीने शेवटची चोच मारून पुन्हा पावश्या उडून गेला होता. त्याने तसं का केलं असावं हा प्रश्न आजही पडलाय. खरंच माणसं इतकी वाईट असतात कि आपल्या नवजात पिल्लाना त्यांचा स्पर्शही झालेला चालत नाही पाखरांना?

आज जवळ जवळ वीसेक वर्ष होऊन गेली असतील त्या घटनेला. पण आपल्याच पिल्लांचा जीव घेताना ती शेवटची चोच मारून उडून जाणारा पावश्या नजरेसमोरून जात नाही.
कधीकधी आयुष्याच्या उलाढालींमध्ये विस्मृतीत गेलेली तो प्रसंग चोच मारून जिवंत करतो पावश्या. खरंच एवढी वाईट असतात का माणसं?
आणि मग आठवतात एकेक चेहरे. स्वार्थासाठी दगाफटका करणारे. स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे. टाईमपास म्हणून दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणारे. दुसऱ्याच्या मनाचा जराही विचार न करणारे.
हो खरंच माणसं वाईट असतात. त्यांचा स्पर्श झाला तर आपल्याही जमातीत त्यांच्यातील वाईट गुणांचा प्रादुर्भाव होईल याच भीतीने कदाचित माणसाचा स्पर्श होताच पाखरं मारत असणार आपल्याच नवजात पिल्लाना. हा विचार अधिक प्रबळ होत चाललाय.
तोच मला बाळग्या दिसला. डोक्यावर झालेल्या खोकीतून रक्त वाहत असलेला. शर्ट पॅन्ट घालून गावभर हिंडणारा बाळग्या. एक वेडा… हो… पूर्ण गावाच्या दृष्टीने वेडसर, आणि माझ्या दृष्टीने ठार वेडा.
कारण त्याला वास्तवाचं भान नव्हतं. प्रेमात आकंठ बुडालेला मूर्ख. नंतर त्याच प्रेयसीच्या भावांनी तुडवल्यावर डोक्यावर परिणाम होऊन वेडा झालेला बाळग्या.
उभ्या जिंदगीची माती करून घेतली प्रेमासाठी. आणि काय मिळवलं? रस्त्याच्या कडेला भर उन्हात बेवारश्यासारखा आलेला मृत्यू. आणि जिच्यासाठी आयुष्याची माती करून घेतली ती माती सावडायलाही आली नव्हती. मूर्ख साला…

पण…. पण तो माझ्याकडे बघून हसतोय. अगदी तसाच. जसं पहिल्यांदा भेटला होता तेव्हा हसला होता. त्याच्या हसण्याचा अर्थ लागत नाहीये.
कदाचित मी इकडे मनात त्याला शिव्या घालतोय हे त्याला समजलं असावं. म्हणून हसतोय वाटतं. त्याला शिव्या घालताना मी तरी काय केलंय? त्याने केलं तेच ना? तो सुटला. मी नाही सुटलोय अजून.
नाही… नाही… मला बाळग्या व्हायचं नाहीये. मला रस्त्याच्या कडेला आलेलं बेवारशी मरण नकोय. बाळग्याच्या हसण्याचा आवाज वाढत चाललाय. तो आवाज आता मला असह्य होतोय. मी कानावर हात ठेऊन ओरडून सांगतोय त्याला…
“नाही बाळग्या, मला दुसरा बाळग्या बनायचं नाहीये.. तू अडाणचोट होतास… जे त्या मुलीच्या प्रेमात स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीस..
मी तसली भिकारचोटगिरी करणार नाही. तू तुझ्या आईवडीलांना जिवंतपणी मरण भोगायला लावलंस. जन्माला येऊनही तू करंटाच ठरलास. तेही स्वतःच्या कर्माने. मी तसला मूर्खपणा करणार नाही. मला बाळग्या नाही व्हायचंय. मी पश्या आहे, आणि पश्याच राहणार..
बराच वेळ झालाय. बाळग्याच्या हसण्याचा आवाज येत नाहीये. मी कानावरून हात बाजूला काढलेत. बाळग्या आता हसत नाहीये. तो प्रसन्न दिसतोय.
मरेपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर कधीही न दिसलेलं समाधान मला दिसतंय. बाळग्या बोलतोय.. मरेपर्यंत कधीही न बोललेला बाळग्या आज बोलतोय! त्याचा आवाज दूर कुठेतरी वाहत असलेल्या नितळ झऱ्यासारखा ऐकू येतोय..

होय. मी अडाणचोट होतो रे. जीवनाचा फक्त एकच रंग मला वेड लावून गेला. प्रेमाचा तो गुलाबी रंग. त्या गुलाबी रंगापोटी मी वेडा झालो. आणि विसरून गेलो कि आयुष्याचे इतरही रंग असतात.
कर्तव्याचा रंग. कर्तृत्वाचा रंग. समाधानाचा रंग, सेवेचा रंग… माणूस म्हणून माणसाला ज्या जाणिवा असतात.. भावना असतात त्या प्रत्येक जाणिवेचा, भावनेचा एक रंग असतो. आणि या प्रत्येक रंगाने आयुष्याचं चित्र रंगवायचं असतं.
मी मात्र गुलाबी रंग फासायला निघालो आयुष्याला. आणि आयुष्याचं चित्र बरबाद करून टाकलं. तू असं करू नकोस.
मी विसरलो होतो… ती एक व्यक्ती आयुष्यात येण्याआधी आणि ती सोडून गेल्यानंतरही आयुष्यात साथ देणारी माणसं होती. त्या एका व्यक्तीपायी मी बाकीच्या सगळ्यांना दुःख दिलं.
आणि आता तू काही व्यक्तींमुळे सर्व मानवजात वाईट ठरवायला निघालायस. जी चूक मी केली ती तू करू नकोस. दुसरा बाळग्या बनू नकोस.
बाळग्याने हात जोडलेत… निरोप घ्यावा तसे…
बाळग्याच्या मागे आता मला एक हलकासा प्रकाश दिसतोय. तो प्रकाश वाढत जातोय. त्याचं एक वेगळं वलय तयार होतंय. त्यात बाळग्या ओढला जातोय. पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान मिश्रित हास्य आहे. त्रास नाहीये…. बाळग्या आज मुक्त झालाय….
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.