मराठी माणसाने १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेली कंपनी आज आहे तब्बल ७० देशात अग्रेसर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
एकेकाळी मराठी माणूस म्हणजे चाकरमानी वर्ग होता. नोकरी करून आयुष्य जगणारा. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय किंवा उद्योगाच्या फंदात न पडता मिळेल ती भाजी-भाकरी खाणारा.
त्यामुळे व्यवसाय व उद्योग हे गुजराती/मारवाडी लोकांचे काम समजणारा मराठी माणूस. परंतु, आता काळ बदलला आहे. मराठी माणूस ९ ते ५ नोकरीच्या संकल्पनेतून बाहेर पडला.
नोकरीसोबत छोटा का होईना एक जोडधंदा असावा आणि या दिशेने त्याने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक मराठी उद्योजकांनी आपले वेगळे उद्योगधंदे थाटले.
जेव्हा एक मराठी माणूस उद्योजकतेकडे वळतो आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगभर आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवतो, तेव्हा त्याच्या विषयी प्रचंड अभिमान वाटतो.
तोच अभिमान द्विगुणित होतो जेव्हा आपण भारतातल्या पहिल्या मराठी उद्योजकाबद्दल बोलतो. असे हे बहुचर्चित व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे हेन्री फोर्ड, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक म्हणजेच लक्ष्मणराव किर्लोस्कर!
हे ही वाचा –
===
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसुर या गावी झाला. धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना दोन गोष्टींची खूप आवड होती.
एक चित्रकला आणि दुसरे यंत्रसामग्री. त्यामुळे १८८५ मध्ये मोठा भाऊ रामन्ना यांच्या मदतीने लक्ष्मणरावांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर थोड्याशा रंगांधळेपणामुळे चित्रकलेतून त्यांना माघार घ्यावी लागली.
परंतु तिथेच त्यांनी मॅकेनिकल ड्रॉफ्ट्समन शिकायला सुरुवात केली. त्यांच्या या शिक्षणाच्या आधारावर ते व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीजेटीआय) सहप्राध्यापक म्हणून महिना पंचेचाळीस रुपये पगारावर शिकवू लागले.
इथेच त्यांना अमेरिकन मेकॅनिकल इंडस्ट्रीविषयी वाचनाची आवड लागली. इन्स्टिट्यूटमध्ये मशीन कसे हाताळावे, दुरुस्ती कशी करावी, नव्याने मशीन तयार कसे करावे या अश्या वेगवेळ्या गोष्टींचा अभ्यास ते करू लागले.
मशीनच्या दुरुस्तीची कामे घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि लवकरच ते प्रोफेसर किर्लोस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
लक्ष्मणरावांचे मोठे बंधू रामन्ना बेळगाव येथे सायकलचा व्यवसाय करायचे. त्यांच्या या व्यवसायात साधारण १८८७ पासून लक्ष्मणराव देखील सहकार्य करत होते. ते मुंबईहून सायकली बेळगावला विक्री साठी पाठवत.
बरेच वर्षं हे असेच चालू होते. पण १८७ मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांचे मन नोकरीमध्ये रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्हीजेटीआयची नोकरी सोडून बेळगावला सायकल विक्रीच्या उद्योगात प्रवेश केला.
व्यावसायिक क्षेत्रात हे त्यांचे पाहिले पाऊल ठरले. ते नुसती सायकल विकत नसत तर ज्यांना सायकल चालवायला जमत नसे त्यांच्याकडून अल्प मोबदला घेऊन त्यांना सायकल चालवायलाही शिकवत.
जसजसा त्यांचा हा व्यवसाय वाढत गेला तसं त्यांनी इंग्लंडच्या कंपनीशी थेट करार केला. आणि ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ नावाने स्वत:ची सायकल एजन्सी स्थापन केली. त्यातच त्यांनी पवनचक्की ची विक्री देखील चालू केली.
सॅमसन कंपनीची डिलरशीप घेतली. वर्षभरात मोठ्या प्रमाणात पवनचक्कीची विक्री केली.
पण मूळच्या यांत्रिकी क्षेत्रात आवड असणाºया लक्ष्मणरावांना नुसते विक्री व्यवसायावर अवलंबून राहणे आवडत नव्हते. शिवाय त्यांची चौफेर नजर व शेतकऱ्यांविषयी विशेष आत्मीयता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याचे त्यांनी ठरवले.
–
हे ही वाचा –
===
शेतकरी जनावरांना कडबा घालत. त्यात धान्याची पाती व फांद्याचे तुकडे असत. जनावरे ते खात नसत. ते तुकडे तसेच बाहेर टाकत त्यामुळे जनावरांनाही त्रास होत असे.
लक्ष्मणरावांनी अमेरिकेतील एका मासिकात कापणी यंत्र पाहिले होते. या कापणी यंत्राचा इथल्या जनावरांसाठी उपयोग होईल हे विचार करून आपल्याकडेही असे यंत्र बनविण्याचे ठरविले.
मुंबईहून यंत्रसामग्री आणून चारा कापणी यंत्र बनवण्यास त्यांनी सुरुवात केली. १९०१ मध्ये बनवलेले किर्लोस्करांचे हे पहिले उत्पादन. त्यांनी हे यंत्र खेड्यापाड्यात जाऊन चालवून दाखवले. लोकांना ते पसंत देखील पडले. जनावरांचाही त्रास कमी झाला.
मात्र गुरांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता शेतक-यात नव्हती. कारण रानात चा-याचा तुटवडा नव्हता. त्यामुळे चारा कापण्याचे ह्या यंत्राचा प्रयोग तसा फेल ठरला.
हा प्रयोग फेल झाल्यावर त्यांनी विचार केला की, शेतक-यांना आवश्यक असणारी वस्तू बनविली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचे लक्ष नांगराकडे वळले. पारंपरिक नांगर खोलवर शेत नांगरत नव्हते.
त्यामुळे पिक चांगले जोम धरत नसायचे म्हणून त्यांनी अधिक लोखंड घालून मजबूत नांगर बनविला. मात्र नवा नांगर आपल्या जमिनीत घालावा ही मानसिकता शेतक-यांची नव्हती. पण लक्ष्मणरावांना नांगर चालेल असा विश्वास होता.
अनेकांनी तो नांगर नाकारला. शेतकी खात्याने त्यांच्या नावाची शिफारस न करता त्यात चुका काढल्या. लक्ष्मणरावांनी ते आव्हान स्वीकारले त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. परदेशी नांगराचा अभ्यास करून आपल्या नांगरात सुधारणा केल्या.
मात्र तरीही त्याची किंमत त्याकाळी ४० रु. होती. सामान्य नांगर ६ रु. ला पडत होता. ही मोठी अडचण होती. मात्र येणारे पिक जोम धरल्यास हा खर्च सहज परवडणारा होता. म्हणून किर्लोस्करांना विश्वास वाटत होता.
त्यांच्या नांगराची माहिती मिळाल्यावर काही शेतकरी आले व त्यांनी मोठी ऑर्डर दिली. त्यातून त्यांना उत्साह वाढला. नांगर हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर मात्र सरकारच्या शिफारसीत किर्लोस्कर नांगराचा समावेश झाला.
अनेक व्यापा-यांनी ते खरेदी केले व इतर शेतक-यांना ते भाड्याने वापरण्यास दिले. अशाप्रकारे व्यवसाय वाढत गेला.
एकीकडे व्यवसायात वृद्धी होत होती पण अपुºया जागेमुळे उत्पादनाचा वेग वाढत नव्हता. त्या दरम्यान त्यांनी एका मित्राला औंध येथे सभागृह बांधकामात मदत केल्यामुळे त्या मित्राने लक्ष्मणरावांना कारखान्यासाठी पडीक जमीन दिली.
त्या जमिनीत साप, विंचू होते. रेल्वेस्थानक ही दूर होते. काही सुविधा नव्हत्या. रस्ते चांगले नव्हते.
पण त्या पडीक जमिनीवर कारखाना उभारण्याचे आव्हान स्वीकारले. बेळगावहून रेल्वेने यंत्रसामग्री आणली आणि १० मार्च १९१० रोजी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाची सुरूवात झाली.
‘स्वदेशीचा पुरस्कार‘ स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग होता. त्या दरम्यान लक्ष्मणरावांनी इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेल्या औद्योगिक वसाहतींबद्दल वाचले होते. तसा प्रयत्न आपल्या देशात करण्याची त्यांची इच्छा होती.
–
हे ही वाचा –
===
त्यासाठी सुनियोजित पद्धतीने कारखान्याची उभारणी केली. त्या काळात सगळ्यांना वेगळे वाटेल असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण केली. कारखान्यात काम करणाºया कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली.
खेळण्यासाठी क्रीडांगण, मोठे रस्ते, स्वतंत्र पोस्ट ऑफिसदेखील सुरू केले. हा कारखाना एवढा वाढला की, ही जमीन म्हणजे प्रसिद्ध औद्योगिक वसाहत किर्लोस्कर वाडी या नावाने ओळखली जाऊ लागली.
अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्कर वाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तिथे राहू लागले. परिणामी उद्योगाची उत्तरोत्तर भरभराट होऊ लागली.
किर्लोसकरांनी त्यांच्या उत्पादनांचा पसारा पुढे वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाºया पंपाबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनांसाठी लागणाºया यंत्रांचीही निर्मिती तेथे सुरू झाली.
त्याचबरोबर ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पडण्याचे यंत्र, हातपंप यासह लहान मोठी चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. इंग्लंडच्या आॅइल कंपनीबरोबर करार करणारी ही पहिली भारतीय कंपनी होती.
त्यातून आॅइल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या, विशेषत: मराठी माणसाच्या हृदयावर कोरले गेले.
लक्ष्मणरावांना औंध संस्थांनचे दिवाण म्हणून १९३५ मध्ये नेमण्यात आले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने १९६९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. त्यांनी उभारलेली कंपनी जगातील ७० देशात योगदान देत आहे.
शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या या उद्योजकाचे २६ सप्टेंबर १९५६ रोजी निधन झाले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.