पुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरींना भारत-पाकिस्तान मॅचमुळे त्रास, पोस्ट व्हायरल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काल झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने विजय मिळवला असून विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला मात देण्याची विजयी परंपरा कायम ठेवली आहे. कालच्या सामन्यामुळे देश्भरात विजयोत्सव साजरा केला गेला आहे.
भारत पाकिस्तान सामन्याचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगला आणि जेव्हा भारताला अखेरीस विजय मिळाला तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला.
अर्थातच भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

एकवेळ विश्वचषक नाही जिंकला तरी चालेल पण पाकिस्तानला हरवलं हीच मोठी उपलब्धी इतका महत्वाचा हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी होता. त्यामुळे ह्या विजयाचा जल्लोषही तसाच असणार ह्यात शंकाच नव्ह्ती !
सोशल मिडीयावर ह्या सामन्याच्या निमित्ताने अक्षरश: पोस्ट्स, ट्विट आणि मिम्सच्या महापूर आला आहे.
परंतु ह्या सर्व वातावरणात जेष्ठ पुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरी यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

ह्या विजयोत्सवात त्यांना आलेला अनुभव त्यांनी मांडला आहे. त्यांना ह्या एकूण विजयोत्सवात झालेला त्रास आणि मनस्ताप त्यांनी ह्या फेसबुक पोस्टच्या माध्यामतून व्यक्त केला आहे. ती फेसबुक पोस्ट अशी….
===
रात्रीचा एक वाजत आला आहे. परभणीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून परततोय. दोन दिवसात हजारभर किमी प्रवास करून अक्षरशः कधी एकदा झोपतो असं झालंय. तरीही ही पोस्ट लिहीली पाहिजे.
रात्री पावणे बारा. नगर रोड. आत्तापर्यंत सुरळीत सुरु आहे चाललेलं नगर रोडचं ट्रॅफिक अचानक जाम झालं. समोर गाड्या , टू व्हीलर्स आणि त्यासमोर मोठे आकाशात उडणारे फटाके लावलेले.

त्याच्या ठिणग्या टू व्हीलरवाल्यांच्या अंगावर पडत आहेत. समोरच्या तरुणांच्या टोळक्याला घाबरून कोणी काही बोलत नाही.
एकदाचा शंभराचा बार संपतो, आमचा जथ्था मार्गस्थ. प्रवासात असल्यानं मॅच पाहिली नव्हती. या दारूकामावरून कळलं. भारतानं सामना जिंकलाय म्हणून..
बाराचा सुमारास, मी बालगंधर्व चौकात पोचलो. जंगली महाराज रस्ता बंद. झाशी राणी चौकात समोर फक्त भगवे ध्वज घेतलेले युवक. तिरंगा एकही नाही. फक्त भगवे ध्वज घेऊन नाचत आहेत. संपूर्ण रस्ता बंद. लोक हतबल होऊन फक्त गाडीतून पाहतात.

(मा. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे असलेल्या गृहखात्याची बालगंधर्व पोलीस चौकी इथं exactly समोर आहे, पण या जमावाला आवरायला ते हतबल असावेत)
रस्ता सुरू होत नाही म्हणल्यावर लोक घोले रोडला जाण्याच्या प्रयत्नात. मी ही गेलो. आपटे रोड क्राॅस केला. वैशालीच्या गल्लीतून गाडी आत घातली. एफ सी रोडवर जाम. भगवे झेंडे आणि कर्कश्य आवाज.
परत फिरलो. गरवारे पूलावरून एफसी रोडकडे वळलो अन समोर पुन्हा जाम! पुन्हा एक नवीन टोळकं. पंधरा वीस भगवे झेंडे.. इथं थोडा रूचिपालट म्हणून दोन तिरंगेही दिसले. बरं वाटलं.
आणखी एक इथं अॅड झालं ते म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पण होता एका गाडीवर ठेवलेला त्या मिरवणूकीत.
एकदम उजव्या बाजूला थोडी मोकळीक वाटली म्हणून गाडी पुढे केली तर गाडीच्या काचेवर जोरात खटखटीचा आवाज. मला ‘पुढे जायचं नाही’ असा बोटांनी इशारा. थांबलो. फुटपाथवरून दोन टू व्हीलर्स आल्या.
माझ्या गाडीच्या रस्त्यावर मध्यभागी त्या लावून त्यावर बसून आलेले चारही युवक समोर जाऊन नाचताहेत. मागे फुल्ल ट्रॅफिक जाम. मिरवणूकीतले तरूण भयंकर आक्रमक. इंडिया-इंडिया, भारत माता की जय वगैरे घोषणा चालू…

नाचून थकल्यावर त्या चार तरूणांनी त्यांच्या गाड्या सुरू केल्या. आम्ही आमच्या. अक्षरशः पाच मीटर गेले असतील नसतील तोच पुन्हा गाड्या लावून नाचायला गेले. पुन्हा मागे ट्रॅफिक.
(मा. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे असलेल्या गृहखात्याचं डेक्कन पोलीस स्टेशन इथून हाकेच्या अंतरावर आहे, पण या जमावाला आवरायला तिथले पोलीस हतबल असावेत)
आणखी एक नोंद. एरवी सिग्नल हिरवा झाला की हाॅर्न बडवणारे पुणेकर एकदम शांत. समोर एवढी आडवा-आडवी चाललेली पण हाॅर्न वाजवण्याची एकाची ही हिंमत नाही. कशी असेल?
पोलीसांची हिंमत नसेल तर सामान्य नागरिकांची कुठून असणार?
शेवटी त्या टोळक्यातील कोणाला तरी आमची दया आली. बेभान नाचणारांना कसंबसं बाजूला ढकलत त्यानं बिचार्यानं आमची सुटका केली.

शिवछत्रपतींच्या भगव्या ध्वजाची त्यांच्याच प्रजेला भिती वाटावी असा सगळा माहौल.
हा आहे भारताचा नव-उन्मादी राष्ट्रवाद! देशात रहायचं असेल तर निमूटपणे याची सवय करून घ्या.
– विश्वंभर चौधरी
===
अश्या प्रकारे विश्वंभर चौधरींची हि पोस्ट प्रचंड व्हायरल तर झालीच सोबतच ह्या पोस्टवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक, दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी नोंदवल्या आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.