आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : डॉ. अंकेत केशवराव जाधव
२०१९: मृत्यूच्या दारी असलेला एक वयोवृद्ध रुग्ण दवाखान्यात दाखल केला जातो.
डॉक्टर काय पण परमात्म्याच्या पण हातात नसलेला त्याचा जीव जातो आणि भावनेच्या भरात सुमारे २०० जणांचा जमाव तेथील आंतरवासिता शिकाऊ डॉक्टरांना अमानुष मारहाण करतो! त्यात तो डॉक्टर गंभीर जखमी होऊन कोमात जातो.
२०२१: रुग्णाचे नातेवाईक : हं तुम्ही ट्रक मध्ये माणसं घेऊन समोर जा ,काठ्या वगैरे सोबत घ्या…आम्ही रुग्णाला घेऊन आलोच मागून..
उदाहरणं वाचून जर हास्याची छटा आपल्या तोंडावर असेल तर तर आपल्या इतके मूर्ख आणि निर्लज्ज आपणच आहोत!
खरं आहे हे…कोलकाता येथील डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठेवण्यात आलेल्या स्टेटस आणि पोस्ट वर अशीच काहीची भूमिका सध्या समाजाची आहे.
” आबे,बस करा न किती माणसं मारता अजून संप घ्या माग”
” यायल्हा आसाच दणका पाहिजे काही भारी भारी चे औषिद सांगून आम्हाला फसवता का.. घ्या मग आता दणका”
भरीस भर ममताबाई एवढ्या गंभीर मुद्द्यावर तोडगा काढण्याऐवजी आयत्या गरम झालेल्या तेलात राजकारणाचे भजे तळायला जिभल्या चाटीत पुढे सरसावल्या आहेत!
कोकात्यातील या अतिशय निंदनीय आणि अमानुष घटनेवर डॉक्टर म्हणून फक्त लिहिणे एकांगी वाटत असले तरीही डॉक्टर आणि रुग्ण संबंधात दिवसेंदिवस वाढत्या कटूतेच्या संदर्भात समाजातील प्रत्येकाला आज या विषयावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत. आणि आत्ताच म्हणजे सध्याच्या काळातच त्यांचं प्रमाण जास्त का वाढलं आहे?
१) वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रचंड प्रगती
यामुळे रुग्णाला कोणताही रोग झाला म्हणजे अगदी मृत्यू नैसर्गिक आणि साहजिक जरी असेल तरी डॉक्टर त्यांना वाचवू शकतो अशी रुग्णांची (आणि नातेवाइकांची) झालेली मानसिकता.
परिणामी डॉक्टरांनी कडून वाढलेला प्रचंड अपेक्षावाद! (आशावाद ठीक आहे)
२) वैद्यकीय सुविधेचं झालेलं भांडवलीकरण (corporatization)
आज बहुतांशी मोठे मल्टीस्पेशालिटी दवाखाना चालवणारे हे व्यावसायिक आहेत डॉक्टर नाहीत. आणि त्यांनी नफा कमावण्यासाठी रुग्णांच्या पिळवणूकीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे डॉक्टर्स म्हणजे लुटारू अश्या प्रकारचा समाज दिवसेंदिवस दृढ होतोय.
आणि याचाच परिणाम म्हणून एखाद्या दवाखान्यात एखाद्या शस्त्रक्रयेचे गरजेपेक्षा वाढीव शुल्क रुग्णावर आकारले तर रुग्णाचा राग डॉक्टर्स परावर्तित होत आहे. जो की तेथील व्यावसायिकाच्या हॉस्पिटल मध्ये एक कुशल कामगार म्हणून काम करतो!
३) रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची डॉक्टरांबद्दलची ढासळती सहिष्णुता आणि असंवेदशीलता.
आणि सातत्याने कटू होत चाललेले डॉक्टर आणि रुग्ण संबंध.
४) सर्वात महत्वाचं अतिशय डळमळीत आणि मरणासन्न झालेली आपली शासकीय आरोग्यव्यवस्था आणि याच्या कचाट्यात सापडलेला तेथील निवासी डॉक्टर.
बहुतांश डॉक्टारांवरील हल्ले हे शासकीय दवाखान्यातील डॉक्टर्स वरच का होत आहेत याचं उत्तर यातून मिळेल. आज भारतात एकूण जि.डी.पी. च्या केवळ १.०२ टक्केच खर्च आरोग्यावर केला जातो जे की जगात सर्वांत नीच्चांकी पैकी आहे!
राज्य सरकार प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी फक्त ६४० रुपये तर केंद्र सरकार ११०० रुपये खर्च करते. जे की भारतासारख्या एवढ्या लोकसंख्येने अवाढव्य असलेल्या देशात अत्यल्प आहे!
त्यामुळे शासकीय दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डॉक्टर्स आणि सुविधेची प्रचंड गैरसुविधा आहे. आज बऱ्याच सुविधा जसे की सोनोग्राफी MRI बऱ्याच शासकीय दवाखान्यात होतच नाहीत आणि होत असल्या तरीही प्रचंड वेटींग असते.
त्यामुळे आधीच आजारामुळे भावनिक आणि तणावग्रस्त असलेल्या रुग्णाला आणि नातेवाइकांना प्रचंड गैरसुविधेला सामोरे जावे लागते.
आज मोठ्या शहरातील शासकीय रुग्णालयात देखील पायाभूत सुविधांची वानवा आहे.
त्यामुळे डॉक्टर्स जरी इच्छा असली तरीही ती सुविधा तो रुग्णाला देऊ शकत नाही.
उदा. ICU मध्ये जर १० बेड असतील तर ११ रुग्ण कितीही क्रिटिकल परिस्थितीत असला तरीही आधीचा रुग्ण तो काढू शकत नाही. येथे डॉक्टर्स चा नाइलाज असतो.
थोडक्यात हा व्यवस्थेवरचा राग डॉक्टर्सवर परावर्तित होतो.
५) रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत पुरेश्या व्यवस्थेचा अभाव.
सुदैवाने महाराष्ट्र सरकारने यासाठी योजना केली असलेली तरीही काही ठिकाणी ती अपुरी आहे. आणि पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांत तर ती नाहीच. त्यामुळे अशी घटना घडली तरीही तो रोखण्यासाठी तेथे सुरक्षारक्षक नाहीत आणि असले तरीही अतिशय कमी आहेत!
सारांश हाच की हा व अशा प्रकारचा हल्ला आणि त्यावर डॉक्टरांनी पुकारलेला संप आणि सुरू झालेले राजकारण आणि समाज विरूद्ध डॉक्टर या सगळ्या घटनांपलीकडे आज सगळ्यांनाच वरील मुद्दे विशेतः ३ आणि ४ अतिशय गांभर्याने अभ्यासने गरजेचं आहे!
आणि सरकारने या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करणे अतिशय गरचेचे आहेत.
नाहीतर रुग्णांना आणि नातेवाइकांना वाटत असलेली डॉक्टरांची त्यांच्या बद्दलची असंवेदनशीलता;आणि परिणामी डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची रुग्णांप्रतीची अविश्वासाची आणि असुरक्षिततेची भावना ;
त्यामुळे दिवसेंदिवस खराब होत चाललेले डॉक्टर आणि रुग्ण संबंध हा तिढा सुटता सुटणार नाही!
सर्वात महत्वाचं संपाबाबत कोणताही गैरसमज करून न घेता तो कशा पद्धतीचा आहे हे आधी प्रत्येकाने समजून घ्यावं.
डॉक्टरांना बद्दल कोणतेही मत आपल्या मनात निर्माण करण्याआधी प्रत्येकाने या विषयावर सारासार विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.