३१ ऑस्कर नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा अस्सल मुंबईकर चेहरा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
साधारण सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट.. एक तेरा वर्षांचा मुंबईतील एका मुस्लिम खानदानातील मुलगा त्या वेळच्या प्रख्यात अभिनेत्री “निम्मी” बरोबर एका फिल्मी सोहळ्याला जातो काय आणि परत येतो तो फिल्मी दुनियेत करिअर करायचे असे ठरवूनच.
त्याला ती दुनिया इतकी मोहवून टाकते की वडिलांचा कपड्यांचा व्यापार पुढे चालवायचाय हे सुद्धा त्याच्या डोक्यातून पार निघून गेलेलं असतं.
दिवसरात्र फिल्म मेकिंग हेच डोक्यात घट्ट घुसलेलं. आणि मग त्याच दिशेने त्याचा प्रवास सुरु होतो. म्हणतात ना तुमची नियती तुमचं स्वप्न पुर्ण करायला मदत करत असते..तसंच काहीसं याच्या बाबतीत घडलं.
१९ व्या वर्षी सुरू झालेल्या ह्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात त्याला जागतिक कीर्तीचा ऑस्कर पुरस्कार एकदा नाही तर चक्क ६ वेळा मिळाला आणि ३१ वेळा त्याच्या फिल्म्स ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमीनेट झाल्या.
कोण आहे हा बंबईका छोरा?
ऑस्कर हे फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते. फार कमीजण या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्यात यशस्वी होतात आणि त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारेच हा पुरस्कार प्राप्त करतात.
पण ह्या मुंबईच्या छोऱ्याने मात्र आपल्या स्वप्नाला गवसणी घातलीच.
हा “बंबईका छोरा” म्हणजे इस्माईल मर्चंट. मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शनचे एक भागीदार. त्यांचे दुसरे भागीदार म्हणजे जेम्स आयव्हरी. आणखी एक तिसरी व्यक्ती जी प्रत्यक्ष भागीदार नव्हती पण या मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शनची एक भाग होती, ती म्हणजे रूथ प्रवर झाबवाला.
–
हे ही वाचा – लिओनार्डोने ‘ऑस्कर पुरस्कार’ परत दिला होता, कारण वाचून तुम्हीही त्याची प्रशंसा कराल
–
या त्रिकुटाने जवळपास २० चित्रपट एकत्र केले आणि त्यांना ऑस्करचे यश मिळाले. या प्रॉडक्शनचे एकूण ५० चित्रपट आले.
मंडळी, इस्माईल मर्चंट नावातील मर्चंट हे त्यांच्या घराण्याचे आडनाव नाहीय. त्या नावाची कहाणी वेगळीच आहे. इस्माईल यांचे मूळ नाव इस्माईल नूर मोहमद अब्दुल रेहमान.
त्यांचे वडील नूर मोहम्मद रेहमान हे कपड्यांचे व्यापारी होते.ते गुजराथी असल्याने घरीच गुजराथी आणि उर्दूचे धडे इस्माईल यांना मिळाले. शाळेत इंग्रजी माध्यम घेतल्याने इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होतेच, शिवाय हिंदीची हि जाण असल्याने, म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भरच पडत गेली.
अभिनेत्री “निम्मी” बरोबर सिनेसृष्टीतील सोहळ्यास जाताना त्यांच्या कारवर झालेला पुष्पवर्षाव त्यांना अचंबीत करून गेला. सोहळ्यातील चमकधमक बघून ते चांगलेच प्रभावित झाले. आणि त्यांनी हीच आपली करिअर असे ठरवले.
करिअरची प्रत्यक्ष सुरवात करायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपले लांबलचक नाव बदलून “मर्चंट” हे सुटसुटीत नाव घेतले.
मुळातच व्यापारी कुटुंबातील असल्याने मर्चंट म्हणजे व्यापारी हे व्यावसायिक नाव आडनाव म्हणून धारण केले. तसेही सिनेसृष्टीत ते एक स्वप्नांचे सौदागर म्हणूनच पाय रोवणार होते.
१९६० साली अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी आपली पहिली शॉर्ट फिल्म “क्रिएशन ऑफ वुमन” बनवली. थोडेसे झोलझाल करत ही फिल्म ब्रिटनमध्ये पाठवली आणि नंतर ही फिल्म इतकी गाजली की कान्स फिल्म महोत्सवात ती पाठवली गेली. पदार्पणातच हे खुपच मोठे यश त्यांना लाभले होते.
इस्माईल कान्समधे पोचले ते या निमित्याने आणखी काही नवीन शिकायला मिळेल म्हणून. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला.
सत्यजित रे, इंगमर बर्गमन, फेडरिको फेलिनी, व्हीटोरिओ दि सिका यांच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित झाले. आपणही यांच्या सारखी कारकीर्द घडवायची हे त्यांनी मनाशी पक्के केले.
याच महोत्सवात त्यांची शॉर्टफिल्म इतकी गाजली की ऑस्कर साठी या फिल्मला नॉमिनेशन मिळाले.
बरं का मंडळी,पदार्पणातच केवळ एवढे यश मिळाले असे नाही तर याहीपेक्षा आणखी काही त्यांना या कान्सने दिले. ज्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांना ऑस्कर मिळवून दिले त्या प्रॉडक्शन हाऊसचे दुसरे भागीदार जेम्स आयव्हरी यांची भेट इथेच झाली.
जेम्स आयव्हरी यांची The Sword and the Flute ही फिल्म कान्समधे प्रदर्शित झाली होती.
ही फिल्म बघून ते प्रभावित झाले आणि ते जेम्स आयव्हरी यांना भेटले. या भेटीत त्यांनी जेम्सना भागीदारीमधे फिल्म बनवण्याचे सुचवले. त्यांना भारतात इंग्रजी भाषेत फिल्म बनवून त्या इंटरनॅशनल फिल्म मार्केटमध्ये वितरित करायच्या होत्या.
भारतीय फिल्म जागतिक स्तरावर पोचावी ही त्यांची इच्छा होती. जेम्स आयव्हरी याना हा प्रस्ताव आवडला, परंतु त्यांनी अट घातली की ते फिल्मचे डायरेक्शनचे काम बघतील पण प्रॉडक्शन, फायनान्स, कास्टिंग डिस्ट्रिब्युशन ही कामे इस्माईल यांनी बघावीत.
इस्माईल यांनी लगेच मंजुरी दिली. आणि इथेच मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शनची मुहूर्तमेढ रोवली गेली. एका मैत्रीपर्वाची ही सुरवात झाली, जी पुढे आयुष्यभराची पार्टनरशिप बनली.
व्यावसायिक पातळीवरच नाहीतर वैयक्तिक पातळीवर देखील ते जिवाभावाचे मित्र बनले.
याच दरम्यान त्यांची ओळख झाली ती मॅगी स्मिथ, लीला नायडू, मधुर जाफरी, ह्यू ग्रांट, शशीकपूर, जेनिफर कँडल, रुपार्ट ग्रेव्ह्ज, अंतही हॉपकिन्स, एम्मा थॉम्पसन, नताशा रिचर्डसन, अपर्णा सेन, व्हेनेसा रेडग्रेव्ह, उमा थर्मन या कलाकार मंडळींशी.
नुसती ओळख नाही तर घट्ट मैत्री जुळली. मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शनच्या फिल्ममधे ते काम करायला तयारही होते.
ह्या दोघांना आणखी एक व्यक्ती येऊन मिळाली ती म्हणजे रूथ. रूथ जर्मन ज्यू वंशाची… तिने भारतीय वंशाच्या प्रवर झाबवाला यांच्याशी लग्न केल्याने ती भारतात राहण्यासाठी आली आणि लेखिका म्हणून या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सामील झाली.
रुथच्या येण्याने इस्माईलच्या स्वप्नांना बळकटी मिळाली. या तिघांच्या “ड्रीम टीम”ने त्यांची पहिलीवहिली फिल्म बनवली १९६३ मध्ये नाव होते “हाऊसहोल्डर”.
हाऊसहोल्डर ही रूथ झाबवाला हिच्या कादंबरीवरून तिनेच पटकथा लिहिली होती. शशिकपूर आणि लीला नायडू यांना घेऊन ही फिल्म निर्मिली होती. या फिल्मला सत्यजित रॉय यांनी संगीत दिले होते.
ही पहिलीच फिल्म प्रचंड गाजली. जागतिक स्तरावर या फिल्मचा चांगलाच बोलबाला झाला.
नंतर आलेल्या “महात्मा अँड बॅड बॉय”, ब्रिटनच्या चॅनेल 4 साठी बनवलेली एक फिचर फिल्म या त्यांनी डायरेक्ट केलेल्या शॉर्ट फिल्म्स देखील वाखाणल्या गेल्या.
१९८५ मध्ये त्यांची फिल्म आली A room with a view. या फिल्मने मर्चंटना त्यांचे पहिले ऑस्कर अवॉर्ड मिळवून दिले. “निम्मी” बरोबर जाताना कारवर पुष्प वर्षाव झाल्याने ते भारावले होते.. आणि ऑस्करने ते सुखावले. आपण आणखी चांगल्या फिल्म्स बनवू शकू हा आत्मविश्वास दुणावला.
फिल्म मेकिंग चालूच होते..त्यांच्या फिल्मसना ऑस्कर नॉमिनेशन मिळू लागले. Howard’s End ही फिल्म आली आणि इतिहासच घडला.
–
हे ही वाचा – ….म्हणून मार्लन ब्रांडो ने प्रतिष्ठित “ऑस्कर” पुरस्कार नाकारला होता!
–
अँथनी हॉपकिन्स, एमा थॉम्पसन आणि हेलेना बॉनहॅम यांच्या भूमिका असलेल्या या फिल्मने ३ ऑस्कर पुरस्कार मिळवले.
बेस्ट स्क्रीनप्ले – रूथ झाबवाला.
बेस्ट ऐक्ट्रेस – एमा थॉम्पसन
आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर
असे तीन पुरस्कार मिळाले.
The remains of the day- १९९३ मधील या फिल्मने पुन्हा एकदा ८ ऑस्कर नॉमीनेशन्स मिळवून दिली. यातही ड्रीम टीम म्हणजे मर्चंट, रूथ, आणि जेम्स आयव्हरी या त्रिकुटाने चांगलीच मजल मारली होती.
इस्माईलनी एकूण ७ सिनेमे दिग्दर्शित केले तर बाकी सर्व सिनेमांचं प्रॉडक्शन आणि इतर बाबी त्यांनी बघितल्या. पण त्या दोघांमध्ये कधीच बेबनाव झाला नाही की साधी कुरबुर सुद्धा झाली नाही. याचे कारण इस्माईल मर्चंट यांच्या मृत्यूनंतर उघड झाले.
मर्चंट आयव्हरी जोडीचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये “Longest independent partnership in cinema history” या विभागात नोंदले गेलेय.
२००५ मध्ये इस्माईल मर्चंट यांचे अल्सरच्या ऑपरेशन दरम्यान निधन झाले आणि त्यांची ४४ वर्षांची भागीदारी संपली. पण गेल्यावर्षी जेम्स आयव्हरी यांना “Call me by your name” फिल्मसाठीं ऑस्कर मिळाले तेव्हा त्यांनी वयाच्या ८९ व्या फिल्म मधील गे रिलेशनशिप बद्दल बोलताना आपल्या इस्माईल बरोबर असलेल्या संबंधांची कबुली दिली.
ते म्हणाले,
“आम्ही कधीच या बद्दल वाच्यता केली नाही कारण इस्माईल कट्टर मुस्लिम खानदानातील होता आणि त्यातून भारतात मुंबईत रहात होतात. आमचे संबंध कोणालाच पसंत पडले नसते”.
या संबंधांबद्दल कुजबुज नेहमीच होत आली होती परंतु कोणीच त्या बद्दल त्यांना विचारले नाही. आणि त्या दोघांनीही कधीच कोणतीही गोष्ट उघड केली नाही.
मर्चंट जितके कलासक्त होते तितकेच खाण्याच्या आणि जेवण बनवायच्या बाबतीत चोखंदळ होते. या विषयावर त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत.
इस्माईल मर्चंट्स इंडियन कुझीन,
इस्माईल मर्चंट्स फ्लोरेन्स
इस्माईल मर्चंट्स पॅशनेट मिल्स,
फिल्मीन्ग अँड फेस्टिंग इन फ्रान्स,
ही खाण्यावरील पुस्तके लिहिली. तर “My passage from India ..Film making from Bombay to Hollywood” हे आत्मचरित्र लिहिले.
मंडळी इस्माईल मर्चंट आज आपल्यात नाहीत पण त्यांनी बनवलेले ऑस्कर सन्मानित सिनेमे त्यांची आठवण ताजी करून देतील. मरीनलाईन्सच्या बडा लेन मधील कबरस्तानात ते आपल्या नातलगांसह चिरविश्रांती घेत आहेत.
पण ३१ नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा हा अस्सल मुंबईकर चेहरा विसरणे अशक्यच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com |आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.