महिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अलीकडच्या काळात महिला सक्षमीकरणाचे वारे वेगाने वाहते आहे. स्त्रिया देखील चाकोरी बाहेर पडून स्वतःला सिद्ध करून यशाचे एकेक शिखर गाठत आहेत. प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवण्याकडे त्यांचा जास्त कल दिसून येतो आहे.
त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे तिला घरून याकरिता पाठिंबा मिळतो आहे. हे चित्र फार आश्वासक आहे.
शिवाय आणखी एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आता महिलांच्या ह्या प्रगतिच्या वाटचालीत महिलांना आणखी सशक्त करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत,
त्यातलेच एक महत्वाचे पाऊल म्हणजे खास महिलांना डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना आखल्या आहेत आणि एवढ्या वरच न थांबता, त्या योजना नीट राबवल्याही जात आहेत.
त्यामुळे महिलांना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी मोलाची मदत झाली आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “विकास प्रक्रियेत महिलांची संपूर्ण भागीदारी नसेल तर कोणताही देश प्रगती करू शकत नाही.” म्हणूनच महिला सशक्तीकरण आणि सुरक्षेसाठी भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत.
भारतात बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्टँड अप इंडिया, मिशन इंद्रधनुष आणि इतर अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे आणि येणार्या प्रत्येक दिवसागणिक ह्यात अधिकाधिक महिला उद्योजिकांचा समावेश होतो आहे.
हे केवळ शहारांपुरते मर्यादित नसून ह्याचा प्रचार प्रसार लहानमोठ्या गावांतुनही झालेला आपल्याला पहायला मिळतो.
भारतातील स्टार्टअप-अप इकोसिस्टीममध्ये महिला उद्योजक सर्वत्र दिसू लागल्या आहेत. घरांच्या चार भिंतींतून बाहेर पडून भारतातील उद्योग क्षेत्रात सामील होताना दिसत आहेत.
ह्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे विविध बँका महिला उद्योजकांना देत असलेले भांडवल. बँकेकडून खास महिलांसाठी अशा विशेष कर्ज योजना आहेत ज्यात तारण, व्याज दर इ. बाबतीत अटी व शर्तीं थोड्या शिथिल आणि लवचिक ठेवण्यात आलेल्या आहेत.
अशाच काही योजनांची माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर बघूया काय आहेत ह्या योजना.
मुद्रा योजना
ब्युटी पार्लर, ट्यूशन सेंटर, टेलिरिंग युनिट इत्यादीसारख्या लहान उद्योगाची सुरुवात करणार्या महिलांसाठी ही सामान्य सरकारी योजना लागू आहे. ज्या महिला एकत्रितपणे प्रारंभ करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही योजना उपयुक्त आहे.
या योजनेअंतर्गत ५०,००० रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाऊ शकते. ह्यात कर्जाची रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असेल तरच तारण आणि गॅरंटरची आवश्यकता असते.
या योजने अंतर्गत तीन योजना आहेत: शिशु योजना (नवीन व्यवसायांसाठी ५०,००० पर्यंत कर्ज), किशोर योजना (५०,००० ते ५ लाखांमधील चांगल्या संस्थांसाठी कर्ज), तरूण योजना ( ५ लाख ते १० लाख रुपयांदरम्यान कर्ज व्यवसाय विस्तारासाठी).
ट्रेड (व्यापार संबंधित उद्योजकता सहाय्य आणि विकास) योजना
या योजनेचा उद्देश स्त्रियांनी चालवलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, विशिष्ट प्रशिक्षण व सल्ला देणे आणि त्यासंबंधित गरजा पूर्ण करणे असा आहे. त्यासाठी महिलांना योग्य ती माहिती पुरविली जाते.
ह्यासाठी महिलांना कर्ज देणार्या संस्थांना त्यांनी कोट केलेल्या (मूल्यांकित केलेल्या) एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के पर्यंत रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते. इतर ७० टक्के वित्तपुरवठा संस्थेकडून केला जातो.
महिला उद्योग निधी योजना
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (एसआयडीबीआय) द्वारा देऊ केली गेलेली ही योजना नवीन लघुउद्योग स्थापित करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते.
ह्या योजने अंतर्गत विद्यमान प्रकल्पांचे उन्नतीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी देखील मदत केली जाते. कर्जाची परतफेड 10 वर्षांत करावी लागते आणि यात पाच वर्षांचा अधिस्थगन कालावधी देखील असतो.
याशिवाय, या कर्जावरील व्याज दर बाजाराच्या दरानुसार बदलू शकतात.
अन्नपूर्णा योजना
ही योजना स्टेट बँक ऑफ म्हैसूर कडून पुरविण्यात आलेली आहे. ज्या महिलांचा पॅक केलेले जेवण, स्नॅक्स इत्यादी विकणे अशा प्रकारचा उद्योग आहे त्यांना या योजने अंतर्गत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही रक्कम कर्ज म्हणून मंजूर केली जाते.
त्यात जागा, स्वयंपाकघरात वापरले जाणार्या वस्तु, साधने व उपकरणे ह्यांची खरेदी ह्या सारख्या गोष्टींचा समावेश आहे. या कर्जासाठी तारण सुरक्षा म्हणून संबंधित मालमत्तेच्या मालकीसह गॅरंटर आवश्यक आहे.
याशिवाय दिली जाणारी जास्तीत जास्त रक्कम ५०,००० आहे. ही रक्कम ३६ महिन्यांत सुलभ मासिक हप्त्यामध्ये भरणे आवश्यक आहे, तथापि, कर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जावर पहिल्या महिन्यासाठी ईएमआय भरावा लागणार नाही.
महिला उद्योजकांसाठी स्त्री शक्ती पॅकेज
हे लहान व्यवसायात बहुसंख्य मालकी (५० टक्क्यांहून अधिक) स्त्रियांना दिले जाते. महिलांना त्यांच्या संबंधित राज्य एजन्सीद्वारे आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) मध्ये नामांकन करण्याची गरज आहे.
या योजनेअंतर्गत 2 लाखांपेक्षा जास्त कर्जावरील ०.०५ टक्के व्याज सवलत मिळू शकते.
भारतीय महिला व्यवसाय बँक कर्जयोजना
या योजनेमध्ये उत्पादन उपक्रमांच्या महिला व्यावसायिक मालकांसाठी २० कोटी रुपयांचा कर्जाचा समावेश आहे.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट अंतर्गत, १ कोटी रुपयांपर्यंत कर्जासाठी तारण करण्याची गरज नाही. या बँकेच्या कर्जाच्या योजने अंतर्गत कर्जाची परतफेड सात वर्षांत करावी लागेल.
या योजनेची अंमलबजावणी भारतीय महिला बँकेने केली होती ही बँक नंतर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली.
देना शक्ती योजना
शेती, उत्पादन, सूक्ष्म पत, किरकोळ मालाची दुकाने किंवा तत्सम लघु उद्योगांमध्ये महिला उद्योजकांसाठी ही योजना रुपये ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते.
व्याज दरात ०.२५ टक्के सवलत दिली गेलेली आहे.
उद्योगिनी योजना
१८ ते ४५ वयोगटातील महिला उद्योजक, शेती, किरकोळ आणि अशा प्रकारच्या लघु उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्जाची सोय केली गेलेली आहे.
ह्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४५,००० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच,विधवा, निराधार किंवा अक्षम महिलांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा ठरवण्यात आलेली नाही.
अनुसूचित जाति जमातींमधील विधवा, निराधार किंवा अपंग महिलांसाठी, कर्जाच्या ३० टक्के अनुदान दिले जाते जे १०,००० रूपये पर्यंत असू शकते.
सेंट कल्याणी योजना
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेली ही योजना महिला व्यवसाय मालकांसाठी शेती कार्य किंवा किरकोळ व्यापार यासारख्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले जाऊ शकते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे तारण किंवा गॅरंटरची आवश्यकता नाही. ह्या कर्जावरील व्याजदर बाजारातील भिन्न दरांवर अवलंबून असतात.
तर ह्या होत्या भारत सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना ज्या खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि महिला सक्षमीकरणांत मोलाचा वाटा उचलत आहेत.
तुमच्या ओळखीत, माहितीत जर अशा कोणी महिला असतील ज्या या योजनेचा लाभ घेऊ शकत असतील तर ही माहिती त्यांच्या पर्यन्त जरूर पोहोचवा आणि महिला सबलीकरणांत आपला खारीचा वाटा उचला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.