Site icon InMarathi

राजू परुळेकर यांचा ‘मी आणि सावरकर’ हा लेख आवर्जून वाचवा असा आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२८ मे २०१९ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंती दिनी ABP माझा ह्या वृत्तवाहिनीने ‘सावरकर नायक की खलनायक’, अश्या स्वरूपाच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

 

facebook

कार्यक्रमाच्या शीर्षकावर सावरकर प्रेमीनी आक्षेप घेत, ABP माझाचा निषेध करायला सुरुवात केली.

त्याचाच एक भाग म्हणून वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि निवेदक प्रसन्न जोशी ह्यांना समाज माध्यमांवर जाब विचारण्यात आला.

अनेकांनी त्यांचे संपर्क क्रमांक मिळवत, त्यांना दिलगीरी व्यक्त करा अश्या आशयाची मागणी करणारे फोन कॉल्स करायला सुरुवात केली.

परंतु ह्या सर्व गोंधळात कोणीतरी राजीव खांडेकरांच्या नावाने जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांचा संपर्क क्रमांक व्हायरल केला, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्सची सरबत्ती सुरु झाली आणि प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला.

त्या संपूर्ण झालेल्या त्रासाची व्यथा मांडणारा व सावरकरांवरची आपली भूमिका स्पष्ट करणारी राजू परुळेकरांची फेसबुक पोस्ट..

===

नुकताच मी वैयक्तिक कामासाठी अमेरिकेत गेलो होतो. २९ मे रोजी अमेरिकेहून मी भारतात परतणार होतो. तिथल्या २९ मे रोजी पहाटे साधारण एक वाजता माझ्या मोबाइलवर अक्षरश: टोळधाडीसारखे अनेक फोन कॉल्स येऊ लागले.

सुरुवातीला एवढे अज्ञात फोन मला का येताहेत, तेच मला काही समजेना कारण मी झोपेत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा तास बसने आणि २० तास विमानाने प्रवास करायचा होता. त्यामुळे थोडी तरी झोप घेणे मला आवश्यक होते.

परंतु फोन कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले आणि काही केल्या मला भारतातून येणारे हे फोन झोपू देईनात. शेवटी मी फोन उचलू लागलो. तर प्रचंड प्रमणात शिव्या, असंबद्ध बडबड आणि वेगवेगळ्या धमक्या मिळू लागल्या.

नेमका प्रकार काय हे कळायला मला वेळ लागला, कारण पलीकडून बोलणारी माणसे सुसंस्कृत आणि सुसंबद्ध बोलत नव्हती.

शेवटी दोन-तीन जणांच्या फोनवरून मल परिस्थितीची कल्पना आली, ती अशी होती की ‘एबीपी माझा’चे संपादक आणि माझे मित्र राजीव खांडेकर ह्यांनी त्यांच्या चॅनेलवर सावरकरांवर काही कार्यक्रम केला होता.

 

 

त्यामुळे पित्त खवळून शूळ उठलेल्या अनेक स्वयंघोषित सावरकरभक्तांनी माझा खाजगी नंबर राजीव खांडेकरांचा नंबर म्हणून व्हॉट्सअप ग्रूपवर पसरवून टाकला होता. असा एखाद्याचा खाजगी मोबाइल नंबर समाजमाध्यमांवर पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

ते सावरकरांच्या तत्त्वज्ञानात बसते की नाही, याबाबत मी अनभिज्ञ होतो.

परंतु मी दुसऱ्या दिवशी बसने विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानात बसून फोन ऑफ करेपर्यंत मी न केलेल्या आणि मला माहीतही नसलेल्या गोष्टीसाठी मला जवळपास ४५० हून अधिक फोन कॉल्स आले आणि त्यातल्या ६०-७० जणांच्या शिव्या मला खाव्या लागल्या.

हा व्हर्च्युअल मॉब लिंचिंगचाच प्रकार होता. यातला प्रत्येक नंबर मी जपून ठेवला आहे. याव्यतिरिक्त व्हॉटसअप आणि मेसेजच्या माध्यमातून स्वयंघोषित सावकरभक्तांनी मला सूचना केल्या, शिव्या घातल्या ते वेगळे.

शेवटी मी फेसबुक आणि ट्वीटरच्या माध्यमातून हा नंबर माझा आहे, राजीव खांडेकरांचा नाही असे आवाहन केले तरीही हा प्रकार थांबला नाही.फेसबुक आणि ट्वीटरवर मी आवाहन केल्यानंतर दोन प्रकारच्या सूचना मला भक्तांकडून आल्या.

 

एक म्हणजे हा नंबर जर तुमचा असेल तर राजीव खांडेकरांचा नंबर तुम्ही द्यावा. सूचना क्रमांक दोन म्हणजे एवीतेवी तुम्ही मोदींविरुद्ध लिहित असता, तर पुढेमागे सावरकरांवरही लिहालच.

त्यामुळे तुम्ही आधीच शिव्या खाल्ल्या तर त्यात काय गैर आहे? हा सारा भक्तठेवा मी जपून ठेवला आहे. त्याचे नावनंबरसह योग्य ते प्रदर्शन मी पुढे योग्य वेळ आल्यावर करेनच.

खरं तर मी व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तीकेंद्रित लिहित नाही. मग ते मोदी असोत, गांधी असोत किंवा सावरकर; मी कालसुसंगत लिहितो.

कारण प्रत्येक काळात व्यक्ती बदलत असते मग ती व्यक्ती छोटी असो किंवा मोठी, नेता असो किंवा लेखक. त्यामुळे मी कोणावरही पूर्वग्रहदूषित बोलत नाही किंवा लिहित नाही.

 

 

मी कालप्रसंगानुरुप व्यक्ती आणि इतिहासावर लिहितो, बोलतो. त्यामुळे कित्येकदा एखाद्या व्यक्तीवर किंवा प्रसंगावर मी आधी केलेल्या विधानाशी विसंगतही लिहितो आणि आजही ते योग्य आहे असे मला वाटते. माझे सर्वात ताजे मत हा माझा खरा निष्कर्ष असतो.

माझ्या झालेल्या व्हर्च्युअल मॉब लिंचिंगमुळे (तेही खांडेकरांमुळे!) मी परत एकदा सावरकरांबद्दल मोदी सरकारच्या निमित्ताने लिहायचे ठरवले.

माझ्या दृष्टीने सावरकरांचे इतिहासात जे स्थान आहे ते काय आहे यापेक्षा आता जो सावरकरांचा उदो उदो चालला आहे त्याबद्दल आधी थोडे समजून घेणे आवश्यक आहे.

आताचे देशातील सरकार, आताचे मोदीयुग, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांचा सावरकरांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही.

केवळ हिंदुत्व म्हटलं म्हणजे सावरकर नव्हे. सावरकर हे विज्ञाननिष्ठ हिंदुत्त्ववादी असल्याचा त्यांचाच दावा होता.

माझा स्वत:चा हिंदुत्ववाद अशा गोष्टींवर विश्वास नसला, तरी सावरकरांचाही गोमूत्र, गाड्या शेणाने सारवणे, भगवे कपडे घालून मंदिरात पूजा करणे, ढोंगी बुवाबावांना पदावर बसवणे, कोणालाही साधु-साध्वीची उपमा देणे ह्याचा तिटकारा होता.

 

Swarajya

गायीला तर सावरकरांनी कधीच माता मानलं नाही. अंधश्रद्धेने जखडलेल्या भारतीय सनातन धर्माला आणि चातुर्वणाला सावरकरांनी कधीच आपलंसं मानलं नाही.

सावरकरांची जेवढी उपेक्षा त्यांच्या हयातीत काँग्रेसने केली त्याहून अधिक उपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि तत्कालीन जनसंघाने केली.

गोमूत्र आणि गोशेणाचे सोहळे सावरकर खपवून घेणार नाहीत, ह्याची कल्पना असल्यामुळे सावरकरांना कायमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फायदा होईल एवढेच जवळ केले, बाकी दूरच ठेवले होते.

सावरकरांची जीवनविषयक मतं आणि तत्वज्ञान ह्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आताचा भाजप ह्यांचा काही संबंध नाही. ह्याची काही उदाहरणे :

सावरकरांचे मराठी भाषेवर प्रेम होते. ते मराठी भाषिक कवी आणि लेखक होते. त्यांनी मराठी भाषाशुद्धीसाठी कायमच प्रयत्न केले आणि त्यातले बरेचसे यशस्वी झाले. याउलट रा.स्व. संघ आताच्या नागपूर, महाराष्ट्रामध्ये जन्माला आला.

तेव्हा नागपूर मध्य भारतात येत असे. मातृभाषा मराठी असली, तरी संघाची परंपरा उगीचच हिंदीत बोलायची आहे, जी सावरकरांची कधीच नव्हती.

किंबहुना संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जेव्हा चालू होते तेव्हा दिल्लीमध्ये संयुक्त महाराष्ट्रवादींचा, मराठीवाद्यांचा एक मोर्चा गेला होता.

त्यात शाहीर अमर शेख, आचार्य अत्रे आघाडीवर होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सावरकरांनी हिंदु महासभेच्या कार्यालयात केली होती. याउलट, गोळवलकर गुरुजींनी गुजरातकेंद्री अशा पंडित नेहरु आणि सरदार पटेल यांच्या आखणीला पाठिंबा दिला होता.

सावरकर देव, धर्म मानत नसत. जेवढा संघटनेसाठी धर्माचा उपयोग होतो तेवढाच धर्म त्यांना मान्य होता. गायीला माता मानण्याला तर सावरकरांचा प्रखर विरोध होता.

सावरकरांनी सुरुवातीच्या काळात रा. स्व. संघाच्या शाखा प. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब आणि इतर ठिकाणी स्थापित होण्यास खूप मदत केली.

या बदल्यात रा.स्व.संघाने हिंदु महासभेची यूथ विंग (युवकसेना) म्हणून काम करावे अशी सावरकरांची अपेक्षा होती, जी रा.स्व.संघाने धुडकावून लावली.

सावरकरांनी सर्वात प्रथम द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, ज्याला मोकळेपणाने मान्यता देण्यास भाजप आणि संघ घाबरतो तर सावरकर संघाचे आणि भाजपचे कधी झाले?

आज भारतामध्ये किंबहुना संपूर्ण हिंदी पट्ट्यामध्ये हिंदू, हिंदीच्या नावाखाली जातीयवादाने थैमान माजवले आहे. उच्चवर्णीय हिंदू कनिष्ठ वर्गातील जातींचे दमन करून त्यांचे आरक्षण, त्यांचे हक्क आणि त्यांचे जगणे ह्यावर टाच आणू पाहत आहेत.

 

 

हे सावरकरांना अजिबात मान्य नव्हते. सावरकरांनी हिंदू धर्मातील जातीयवादाला ‘त्यांच्या पद्धतीने कृतीशील विरोध’ केला, ज्याची सुरुवात त्यांनी काळाराम मंदिरापासून केली. ह्याच्याशी संघाचा आणि भाजपचा काही संबंध नाही.

किंबहुना ३ मार्च १९४३ साली सावरकरांनी एस. एल. मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की हिंदु महासभेच्या लोकांशी रा.स्व.संघाच्या लोकांचे एवढे तीव्र मतभेद असतील, तर हिंदु महासभेने स्वत:ची युवासेना स्थापन करावी आणि पुढे त्याप्रमाणे हिंदु महासभेने स्वत:ची ‘रामसेना’ स्थापन केली.

उत्तरायुष्यात सावरकरांनी एकाकीपणे एका बाजूला काँग्रेसशी आणि दुसऱ्या बाजूला रा.स्व.संघ आणि जनसंघाशी सातत्याने संघर्ष केला. तो वैचारिक आणि मानसिक पातळीवरही होता.

याउलट रा.स्व.संघाने बंदीचे आलेले बालंट काँग्रेसने उठवल्यानंतर सावरकरांना दूर ठेवून काँग्रेसच्या कलाने जात राहणे पसंत केले. आजच्या भाजप पक्षाप्रमाणेच हा संधीसाधूपणा तेव्हाही रा.स्व. संघ आणि जनसंघात होता.

याउलट सावरकर हे आपल्या विज्ञाननिष्ठ हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसहीत फार एकीकीपणे जगले आणि एकाकीपणे गेले. त्यांच्या हयातीत त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्यावर काँग्रेसपेक्षा अधिक अन्याय त्यांचे सहोदर असलेल्या रा.स्व.संघ आणि जनसंघानेच केला.

 

 

रत्नागिरीला राहायला आल्यावर सावरकर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला थेट विरोध करत होते. गांधीहत्येनंतर काँग्रेस सरकार सावरकर व रा.स्व.संघ ह्यांच्या विरोधात जाणे साहजिकच होते. कारण ते एकमेकांचे प्रकट राजकीय विरोधक होते.

परंतु त्या काळात रा.स्व.संघ, गोळवलकर गुरुजी आणि जनसंघाने सावरकरांबाबत संधीसाधू, कपटी आणि कृतघ्नपणाची भूमिका बजावलेली आहे, जी रेष आजही भाजप चालवत आहे.

ती रेषा कोणती, तर सावरकर म्हणजे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान बाजूला ठेवून

सावरकरांच्या नावाचा उदो उदो करून संख्यात्मक हिंदू गोळा करायचे, त्यांना भक्त बनवायचे, त्यांना विज्ञानविरोधक बनवायचे म्हणजेच त्यांच्या नकळत त्यांना सावरकरविरोधी वागायला लावायचे आणि हाच सावरकरवाद आहे

अशी बेमालूम बतावणी समाजात निर्माण करायची आणि त्या बदल्यात सत्तेचे लोणी मटकवायचे.

खरे तर सावरकरांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर स्वत:ला सावरकरवादी म्हणवणारे लोक खरे सावरकरवादी नव्हते. सावरकरवादी फक्त सावरकर होते, इतके ते एकाकी होते.

सावरकर असे एकाकी का झाले, ह्याची चिकित्सा करताना त्यांच्या गुणांबरोबरच त्यांच्या दोषांचीही चिकित्सा करायला लागेल. पण स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी सावरकरांच्या व्यक्तित्वाविषयी अशी चिकित्सा होऊ दिली नाही.

मुळात अशी चिकित्सा होऊ न देणे हेच सावरकरविरोधी आहे. परंतु स्वत:चे पितळ उघडे पडेल, या भितीने स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी शारीरिक हिंसेचा वापर करत अशी चिकित्सा करू पाहणाऱ्यांना कायमच गप्प बसवले आहे.

 

Swarajya

प्र.के. अत्र्यांपासून ते विद्याधर पुंडलिकांपर्यंत अशी अनेक उदाहरणे देता येतील. विद्याधर पुंडलिक हे मराठी साहित्यातील मोठे नाव.

त्यांनी ‘सती’ नावाची एक कथा लिहिली, ती सावरकरांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेली आहे, अशी बोलवा होती ज्यामुळे सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी विद्याधर पुंडलिकांच्या चेहऱ्याला काळं फासलं, शिवाय ह्या कथेपायी अनेकदा कोर्टाचे खेटे त्यांना घालावे लागले ते वेगळेच.

आश्चर्य म्हणजे पुंडलिक हे स्वत: व्यक्तिगत आयुष्यात कट्टर सावरकरप्रेमी होते, पण त्यांनी सावरकरवाद्यांसमोर माघार घेतली नाही. त्यांची ती कथा आजही उपलब्ध आहे, त्यांच्या ‘देवचाफ़ा’ या कथासंग्रहात.

अशा सावरकरवाद्यांचे आता अंधभक्तांमध्ये रुपांतर होऊन त्यावर मठ्ठपणाची पुटे चढली आहेत.

त्यामुळे हा नंबर खांडेकरांचा आहे की परुळेकरांचा आहे ह्याची खात्रीही न करता आपली गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवणे आणि काल्पनिक सत्तेचा माज दाखवणे हे स्वाभाविकच आहे.

वर उल्लेखिलेल्या विद्याधर पुंडलिंकांच्या ‘सती’ या कथेतील महापुरुषाची पत्नी राधाबाई तिच्या मुलीला म्हणजे विभाला म्हणते, “विभे पूर्वीच्या काळी एखादी बाई सती जात असेल तर मोठमोठ्याने नगारे-ढोल वाजवले जायचे,

जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून, तुझ्या वडिलांच्या कीर्तीचे नगारे-ढोल आशेच आहेत ग, अग, इतके मोठे, इतके मोठे कि माझ्या किंकाळ्या माझे हुंदके कोणाला ऐकू गेले नाही आणि जाणारही नाहीत.”

 

Telegraph India

या कथेतील राधाबाईंसारखी गत आताच्या भारतातील बुद्धिवादी आणि चिकित्सक माणसांची अंधभक्त आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यासमोर झाली आहे.

त्यांच्या किंकाळ्या कुणालाही ऐकू जात नाहीत आणि जाणारही नाही, याची व्यवस्था अंधभक्त आणि स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी केली आहे.

या सावरकर प्रकरणात अखेरचा एक प्रश्न बाकी राहतो. तो म्हणजे मी सावरकरांना वीर मानतो की नाही?

जेवढी वर्षं सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत घालवली तेवढी किंवा त्याहून अधिक शिक्षा भोगणारी व्यक्तीच सावरकरांनी त्या काळात ब्रिटिशांकडे जी ‘मर्सी पिटीशन्स’ दाखल केली त्याचे विश्लेषण करू शकते.

सावरकरांनी आपल्या ‘मर्सी पिटिशन्स’द्वारे कुणाचाही विश्वासघात केलेला नव्हता. मात्र त्यांच्या उदात्ततेचे जे वलय त्यांच्या भोवती होते, त्या वलयाची आभा ‘मर्सी पिटिशन्स’मुळे कमी झाली, ह्यात शंका नाही!

अन्यथा पारतंत्र्यात सावरकरांच्या त्यागाचा उल्लेख भगतसिंगांच्या तोडीचा मानला जायचा. अर्थात, सावरकरांनी ते का केले, ह्याचे उत्तर सावरकरांव्यतिरिक्त कुणीही देऊ शकत नाही.

पण आज स्वातंत्र्यात सर्व सुखे उपभोगून केवळ लेखनाचे स्वातंत्र लाभले म्हणून सावरकरांची प्रतिमा मलीन करण्याचा मला तरी अधिकार नाही, असे मी मानतो. कारण त्यांच्या बुटात पाय घालून अंदमानात मी काय केले असते याचे कोणतेही उत्तर माझ्यापाशीही नाही.

आज अंधभक्त स्वतला सावरकरवादी म्हणवून जे काही करत आहेत, ते नि:संशय खलनायकी कृत्य आहे. त्याला सत्तेची साथ असली, तरी सत्याची नाही.

 

 

जर सावरकर किंवा कुणीही महापुरुष समजून घ्यायचा असेल, तर त्याची कठोर चिकित्सा व्हायलाच हवी!

२०१६ च्या नोटबंदीनंतर या देशात आजतागायत कठोर चिकित्सा बंद झालेली आहे. ती परत सुरू झाली, की मी सावरकरांवरील माझं पूर्ण लेखन सर्व चिकित्सेनिशी प्रसिद्ध करेन.

===

सावरकर प्रेमी नक्कीच राजू परुळेकरांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करतील, सावरकरांच्या चिकित्सेसाठी पोषक वातावरण तयार करण्यास पुढाकार घेत यापुढे विवेकाने आपलं म्हणणं मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version