आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतात स्त्रियांच्या सौभाग्याला असाधारण महत्व दिले गेले आहे. एखाद्या पुरुषाची बायको अकाली गेली तर त्याला लगेच दुसरे लग्न करण्याची मुभा आहे. त्याचे आयुष्य परत मार्गी लावायला सगळेच त्याला मदत करतात.
त्याने दुसरे लग्न करतो म्हटले की लोक त्याच्यावर टीका न करता त्याला सहानुभूती देऊन त्याचे परत लग्न लावून देण्यासाठी एका पायावर तयार असतात. समाज विधुर पुरुषावर कसलीही बंधने घालत नाही. त्याला भेदभावपूर्ण वागणूक देत नाही.
त्याला अशुभ किंवा पांढऱ्या पायाचा म्हणून त्याला शुभ कार्यात बोलावण्याचे टाळत नाही. पण हेच सगळे स्त्रीच्या बाबतीत मात्र उलट घडताना दिसते.नवरा गेल्यावर जणू स्त्रीने मागे राहणे हा गुन्हाच असल्यासारखी तिला वागणूक मिळते .
लोक तिच्याबरोबर भेदभाव करतात. तिला शुभकार्यात बोलावत नाहीत. तिला एकटीने कुठलेही मंगल कार्य करण्याची मुभा नसते. आता तरी परिस्थिती थोडी बदलली आहे.
नाहीतर पूर्वी तर नवरा गेल्यानंतर स्त्रीने जगून काय करायचे म्हणून तिला त्याच्याच चितेवर जाळून मारून टाकत असत आणि ह्या प्रथेला सती जाणे असे उदात्त नाव दिले होते. जिथे सती प्रथा नाही तिथे स्त्रीचे सगळे केस कापून टाकून तिला विद्रुप करून टाकले जात असे.
तिला आयुष्यभर चार भिंतींच्या आत डांबून टाकले जात असे. कपड्यांपासून तर खाण्यापिण्यापर्यंत तिचे सगळे आयुष्य निर्जीव ,नीरस करून टाकले जात असे.
नवरा आधी जाणे हा जणू तिचाच गुन्हा असल्यासारखे तिला आयुष्यभर शिक्षा भोगत मरणाची वाट बघत दिवस ढकलावे लागत असत.
हळूहळू परिस्थिती बदलली. स्त्रिया शिकू लागल्या. नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या. पण अजूनही काही सन्माननीय अपवाद सोडल्यास जर नवरा गेल्यानंतर स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नसेल तर तिचे हाल कुत्रा खात नाही.
तिला अजूनही भेदभावपूर्णच वागणूक मिळते. ज्या विधवा स्त्री कडे शिक्षण नसेल , आर्थिक पाठबळ नसेल त्या स्त्रीचे आयुष्यच कठीण होते.
तिला एकतर स्वतःच्या उपजीविकेसाठी काहीतरी मार्ग शोधावा लागतो ,धडपडत ,खाचखळगे पार पाडत तिला सक्षम व्हावे लागते, स्वतःच्या पायावर उभे राहावे लागते.
त्यात जर मुलांची जबाबदारी असली तर तिची अवस्था आणखीनच कठीण होते. तिला उपजीविकेचा मार्ग सापडला तर ठीक, नाहीतर एकटीने लढत पुढे जाणे अवघड होऊन बसते.
एकतर स्वतः खस्ता खा नाहीतर दुसऱ्याच्या उपकारांवर आश्रिताचे आयुष्य जगा हे दोनच मार्ग तिच्याकडे असतात. तुम्हाला माहितेय का २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतात जवळपास ४२ दशलक्ष विधवा आहेत आणि जगात जवळजवळ २५४ दशलक्ष विधवा आहेत. विधवांचे इतके जास्त प्रमाण असून देखील विधवांच्या प्रश्नांविषयी लोक उदासीनच असलेलेच दिसतात.
विधवांचे हेच प्रश्न जवळून बघितलेला हा तरुण मात्र आपल्या आईला जो त्रास भोगावा लागला तसा त्रास इतर विधवा माताभगिनींना भोगायला लागू नये म्हणून खूप मोलाचे कार्य करतोय.
अमित जैनचे वडील तो तीन वर्षांचा असतानाच देवाघरी गेले. त्याच्या आईला खूप लहान वयात वैधव्य आले आणि एकटीने अमितची व घराची जबाबदारी निभावून नेताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
आपल्या आईचे दुःख अमितने लहानपणापासूनच खूप जवळून बघितले.
केवळ नवरा नाही म्हणून अमितच्या आईला स्वतःच्याच मुलाच्या (अमितच्या भावाच्या) लग्नातील काही विधींमध्ये भाग घेता आला नाही कारण त्या एक विधवा आहेत.
आपला समाज विधवांना शुभकार्यात विधी करण्याची, त्यात भाग घेण्याची परवानगी देत नाही. हाच समाज मात्र विधुरांवर कसलेही बंधन घालत नाही.
आपल्या आईने जे दुःख भोगले ते इतर विधवा माता भगिनींना भोगावे लागू नये म्हणून अमितने “मिट्टी के रंग” नावाची एक संस्था स्थापन केली. ह्या संस्थेचे सहसंस्थापक साकेत देशमुख ह्यांनी द बेटर इंडियाला एक मुलाखत दिली.
त्या मुलाखतीत त्यांनी “मिट्टी के रंग” ह्या संस्थेबद्दल माहिती दिली तसेच भविष्यात ह्या संस्थेद्वारे काय कार्य करता येईल ह्याबद्दल सुद्धा ते बोलले.
अमितचे हे ध्येय होते की समाजातील युवांना काहीतरी चांगले करण्यास प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी उपयोगी काम केले पाहिजे.
साकेत म्हणतात की ,”आम्हाला कुठेही गरिबीची जाहिरात करून, गरिबीचा बाऊ करून आमचा फायदा करून घ्यायचा नाही. ज्यांना मदतीची,
साहाय्याची खरंच गरज आहे आणि जे ती मदत करण्यास सक्षम आहेत अश्या लोकांना एकमेकांशी जोडणे हाच आमचा उद्देश आहे.”
“मिट्टी के रंग” ह्या संस्थेची सुरुवात २०१४ साली पुण्यात झाली. तेव्हा ह्या संस्थेचा उद्देश गरजू विधवा महिलांना शिक्षण देऊन,
त्यांचे पुनर्वसन करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनवणे तसेच ज्या महिलांवर अत्याचार होतात, कौटुंबिक हिंसाचार होतो त्यांना त्याविरोधात आवाज उठवण्यास सक्षम बनवणे हा होता.
त्यादृष्टीने त्यांनी काम करणे सुरु केले. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना नोकरी,व्यवसायात मदत करणे हे सुद्धा त्यांनी सुरू केले.
तसेच ज्यांना कायदेशीर प्रक्रियांच्या बाबतीत तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याबाबतीत काही समस्या असतील तर त्यांना साहाय्य करणे सुद्धा त्यांनी सुरु केले.
आता ही संस्था विधवा महिलांच्या आर्थिक., शारीरिक व मानसिक सक्षमीकरणासाठी कार्य करते, त्यांना मदत करते. साकेत ह्यांनी सांगितले की पूर्वी फक्त विधवा महिलांसाठी काम करत असलेली ही संस्था आता सर्वच महिलांसाठी काम करते.
विधवा महिला किंवा कुठलीही महिला आधी घर व तिच्या मुलांनाच प्राधान्य देते आणि म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना सोडून बाहेर जाऊन काम करू शकत नाही.
म्हणूनच घरातूनच काम करून मुलं व घर सांभाळून काही उत्पन्नाचे साधन मिळाले तर ह्या महिलांना बरे पडते. महिलांच्या ह्याच समस्येवर उपाय म्हणून “मिट्टी के रंग” ह्या महिलांच्या मुलांच्या अभ्यासात साहाय्य करते.
त्यांचा अभ्यास व शिक्षण चांगले व्हावे म्हणून त्यांनी ह्या मुलांसाठी अनेक प्रकारचे स्किल एन्हान्समेंट प्रोग्रॅम तयार केले आहेत. त्यामुळे मुले ह्या प्रोग्रॅममध्ये अभ्यास करतात व त्यांच्या माता आपले काम अगदी शांतपणे कसलीही काळजी न करता पूर्ण करू शकतात.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे म्हणून मिट्टी के रंग द्वारे अनेक गोष्टी राबवण्यात येतात.
सध्या त्यांनी ऑर्किड हॉटेलबरोबर टाय अप केले आहे आणि त्यांच्या पुण्यातील सेंटरमध्ये त्यांनी ह्या महिलांनी तयार केलेल्या ४००० बॅग विकून त्यांना आर्थिक साहाय्य केले.
सुरुवातीला ह्या संस्थेद्वारे कपडे गोळा करून ते गरजूंना दिले जात असत. पण आता ही संस्था विधवांना व गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या ह्या संस्थेद्वारे १६ महिलांना साहाय्य केले जात आहे. ह्या महिला कापड्याच्या पिशव्या व कागदी पिशव्या तयार करतात. कापडी बॅग ३०० रुपयांना तर कागदी पिशवी ७ रुपयांना विकली जाते.
अश्या प्रकारे निधी जमवून आजपर्यंत सहा महिलांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. आणि २५ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आले आहे.
साकेत व अमित ह्यांची भविष्यात पुण्यात आणखी तीन सेंटर्स सुरु करण्याची योजना आहे. त्यांना ह्या संस्थेद्वारे अधिकाधिक महिलांना मदत करण्याची इच्छा आहे.
ह्या महिलांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना आजच्या मोबाईल-इंटरनेटशी जोडण्याचा त्यांचा मानस आहे. ह्यामुळे ह्या महिला जी उत्पादने कुशलतेने तयार करतात ती उत्पादने विविध प्लॅटफॉर्म्सवर विक्री करण्यास त्यांना मदत होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.
विधवा महिलांविषयी इतका कळवळा वाटून,त्यांच्यात आपली आई बघून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या साकेत देशमुख आणि अमित जैन सारख्या तरुणांची आज समाजाला गरज आहे.
त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. ह्या दोन्ही तरुणांना त्यांच्या उदात्त कार्यासाठी सॅल्यूट आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.