मार्क झुकरबर्गच्या पोस्टवर भारतीयांनी केलेलं अश्लील ट्रोलिंग बघून शरमेने मान खाली झुकते…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखिका : मुक्ता कुलकर्णी
===
अश्लील शेरेबाजी करुन भारतीय लोकांनी आपल्या तथाकथित सुसंस्कृत पणाचा आपणच कसा फज्जा उडवून देतो याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.
काही महिन्यांपूर्वी आपण भारतीयांनी सर्व मर्यादा सोडून केलेल्या सोशल मिडिया वरील कमेंटस पाहून शरमेने मान खाली झुकते…
सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्यक्त करताना शब्द नीट वापरावेत ही गोष्ट भारतीय लोकांना कधी समजणार? एखाद्या व्यक्तीला ट्रोल करायला लागलं की बेभान होऊन उधळलेल्या घोड्यासारखे लोक चौखूर उधळतात.
वाट्टेल त्या कमेंट्स, अश्लील शेरेबाजी यांना ऊत येतो.
आणि आश्चर्याची गोष्ट अशी की सभ्य सुसंस्कृत कमेंट्स कमी पण अर्वाच्य भाषेत टाकलेल्या कमेंट्सना लाईक्स सुध्दा ढिगानं!!! यातून तुम्ही केवळ तुमचीच नव्हे तर देशाचीही प्रतिमा डागाळता.
सोशल मिडियावर व्यक्त होताना जरा जपून शब्द वापरावेत. कारण ते शब्द किती ज्ञात अज्ञात लोकांपर्यंत पोहोचत असतात. तुमची किंमत ठरवत असतात.
लोकांच्या आईबद्दल, बायकोबद्दल, बहिणीबद्दल बोलू लागले लोक की अशा थाटात बोलतात जसं काही स्वतः अगदी दूध के धुले आहेत. आपल्याही घरी आई आहे, आपल्याला सुध्दा बायको आहे, बहिण आहे हे विसरतात.
तिला जर असं ट्रोल करताना सोशल मीडियावर वेडंवाकडं बोललं तर आवडेल का तुम्हाला?
फेसबुकचा संस्थापक आणि सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यानं आपली बहीण रॅण्डी झुकरबर्ग हिच्या अभिनंदनाची पोस्ट फेसबुकवर टाकली. तिच्या ब्राॅडवे म्युझिकल्सला दोन बक्षिसं मिळाल्याबद्दल त्याने तिचे अभिनंदन करण्यात आलं होतं.
टोनी अॅवाॅर्ड …भारतीय जनता तिच्या नावाचं खास भारतीयीकरण करुन चौखूर उधळलेल्या घोड्यासारखी सज्ज.. इतक्या खालच्या थराला जाऊन सुरू केल्या कमेंट्स.
आपल्या बहीणीला मिळालेल्या यशामुळे आनंदी झालेल्या भावाचा आनंद या लोकांनी पार मातीला मिळवला.
तिनं मिळवलेल्या बक्षिसाबद्दल त्यानं अभिमानाने शेअर केलेल्या पोस्टरवर आपल्या लोकांनी यथेच्छ घाण केली आहे आणि त्याच्या आनंदावर विरजण लावून मोकळे झाले आहेत.
पोस्टनंतर तासाभरात २१ हजार कमेंट्स…काही जणांनी त्यावर असं बोलू नका असे सांगितले आहे. पण ऐकतो कोण?
येणाऱ्या कमेंट्स जास्तीत जास्त गलिच्छ आणि जास्तीत जास्त वैयक्तिक पातळीवर घाण करणाऱ्या होत्या.
पाश्चिमात्य देशांमधील लोकांना समजेना की रॅण्डी या नावाभोवती काय आहे? त्या नावावर चाललेल्या कमेंट्स वाचून त्यांचे डोळे विस्फारले गेले.
हे सारं करत असताना आपण असूरी आनंद घेण्याच्या नादात इतके का बहकतो की त्या पायात दुसऱ्या माणसाचा आनंद पार नासवून टाकतो!
त्यांना अशा घाणेरड्या कमेंट्स द्वारे प्रचंड लाजिरवाणं वाटेल याची पुरेपूर काळजी घेतो.
आपला जोक क्षणभराच्या हसण्यासाठी दुसऱ्या माणसाला जन्मभराच्या जखमा देत असेल याचा विचार क्षणभर तरी करतो का?
या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल. नव्हे तेच आहे उत्तर.
तर तुम्ही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहात का? काही जणांनी या घाणेरड्या कमेंट्सना विरोध केला आहे. पण एवढ्या मोठ्या रेट्यापुढे या कमेंट्स ना विचारतो कोण.
तुमच्याही घरी आई, बहीण, बायको मुलगी आहे. एक क्षण त्यांना कुणी छेडलं तर तुमचा राग सातव्या आसमानात पोचतो. का तर त्या तुमच्या आहेत म्हणून?
पण दुसऱ्यांच्या आया बहिणींची किंमत तुम्ही का ठेवावी? ठेवणीतले सगळे घाणेरडे शब्द. विचार..तलवार परजून हल्ला चढवायला तयार!!! का? तुमचं असं काय आहे की जगात तुम्ही कुणालाही कुठेही काहीही कसंही बोलू शकता?
दुसऱ्यांच्या आया बहिणींची इज्जत काढायला पुढे. का? तुमच्या घरातल्या बायकांची इज्जत इज्जत आहे..आणि बाकीच्यांची पाचोळा?
आम्हाला काय…आपली बहीण नाही ना ती? ज्याची आहे तो बघेल की. इथं सोशल मीडियावर कुणाला काय कळतं? फेक अकाउंट काढा..बाईच्या नांवावर चिखल उधळा..लाॅग आऊट व्हा..काय फरक पडतो ?
पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे आपण देतो तेच आपल्याकडं परत येतं.
रॅण्डी झुकरबर्गला गलिच्छ भाषेत ट्रोल करताना हे विसरलात ज्या फेसबुकवर तुम्ही इतका मोठा गदारोळ केला ते फेसबुक तिच्याच भावानं बनवून तुम्हाला एका मुलीवर अश्लील, अर्वाच्य गलिच्छ शेरेबाजी करायला एवढा मोठा प्लॅटफाॅर्म दिला आहे.
यातून बाकी काही नाही पण भारतीय लोकांची मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली. सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस, नरेंद्र मोदींचं कुटुंब यांना तुम्ही लोकांनी ट्रोल करताना विचार केला नाही.
तिथं कोण हा झुकरबर्ग नी कोण ती रॅण्डी? त्यांचा का विचार करावा? आमचं फुकट मनोरंजन होतंय. मनातली भडास बाहेर पडते आहे.. झालं की!!!
पण यामुळे ते लोक थोडेसे दुखावतील, दुखावले आहेतच.
त्यांच्या आनंदाच्या दुधात आपण लोकांनी मिठाचा खडा टाकला.
माणसाला विस्मरणाचं वरदान आहे. लोक विसरतील. पण भारतीय मानसिकतेवर जगाचं जे काही मत खराब होत आहे ते कसं पुसलं जाईल?
जागे व्हा आपले शब्द आपल्याला नाही आपल्या देशाला जगासमोर सादर करतात. ज्या संस्कृतीचे फुकट गोडवे गातात त्यानुसार जरा वागा.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.