जगभरात फक्त सौदीच्या राजकुमारकडे असणाऱ्या या खास पेंटिंगची किंमत पाहूनच डोळे विस्फारतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काही कलाकार हे फक्त हयातीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात असे नाही तर, कालोत्तरही त्यांच्या कलेचा प्रभाव जनमानसावर पडत असतो.
कालोत्तर प्रसिद्धी मिळण्याचं भाग्य प्रत्येक कलाकारच्या नशिबी येत नाही पण, लिओनार्डो दा विंची हा असाच एक कलाकार जो कालोत्तर ही रसिकांच्या मनावरअधिराज्य गाजवत आहे. त्याच्या अनेक कलाकृतींची मोहिनी रसिकांच्या मनावर आजही आहेच.
१५ व्या शतकात युरोपमध्ये जी पुनर्ज्जीवनवादी चळवळ सुरु झाली, त्यामध्ये लिओनार्डोने कलेच्या माध्यमातून आपले योगदान दिले हे जगजाहीर आहेच.
चित्रकलेसोबतच लिओनार्डोला संशोधन, शिल्पकला, वास्तुकला, विज्ञान, संगीत, गणित, साहित्य, शरीरशास्त्र, अवकाश, इतिहास अश्या अनेक क्षेत्रात रस असणारा व्यासंगी कलाकार होता.
“सॅल्व्हाटोर मुंडी” ही लिओनार्डो दा विंचीची अशीच एक अजरामर कलाकृती आहे. इ.स. १५०० मध्ये लिओनार्डोने हे पेंटिंग काढले होते. असे मानले जाते की, लिओनार्डोने हे चित्र फ्रान्सचा राजा लुईस १२ वा आणि त्याची राणी अॅने ऑफ ब्रीटानी यांच्यासाठी बनवले होते.
लिओनार्डोच्या या पेंटींगचे त्याच्या अनेक शिष्यांनी पुन्हा पुन्हा कॉपी केले आहे. त्याच्या पेंटींग्ज पैकी सर्वात जास्त कॉपी झालेले हे पेंटिंग आहे.
लिओनार्डोने ज्या मोजक्याच २० पेंटींग्ज केल्या आहेत, त्यातीलच हे देखील एक प्रसिद्ध पेंटिंग आहे. या अप्रतिम कलाकृतीचा प्रचंड मोठ्या रकमेने लिलाव झाल्यानंतर ते नेमकी कुणाच्या ताब्यात आहे हे कलाजगतातील एक रहस्यच होते.
लिलावानंतर ही कलाकृती गायब असल्याची चर्चा देखील कलाविश्वात सुरु होती. सन १७६३ पासून सन १९०० पर्यंत, सर चार्ल्स रॉबिन्सन यांनी हे चित्र लिओनार्डोचा शिष्य बर्नार्डिनो लुनी याचे असल्याचे सांगितले तोपर्यत हे चित्र गायब होते.
काहीजण अशी ही चर्चा करत की हे चित्र नष्ट करण्यात आले आहे. लंडनमधील आर्ट डीलर केनी शाक्टर , यांनी एका वेबसाईट साठी लिहिलेल्या लेखात हे पेटिंग कुठे आहे, कुणाच्या ताब्यात आहे याबबत अधिक प्रकाश टाकला आहे.
जगातील सर्वात किमती असे हे पेंटिंग सध्या सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमानच्या महाकाय यॉटवर सध्या अस्तित्वात आहे.
१५ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या लिलावात हे पेंटिंग जवळजवळ ४५० कोटी अमेरिकी डॉलरला राजकुमार बद्र बिन अब्दुल्लाह याला विकले गेले होते.
या अवाढव्य किमतीमुळे जगातील हे सर्वात महागडे पेंटिंग ठरले आहे. याच्या आधीचे सर्वात महागडे पेंटिंग होते पाब्लो पिकासोचे जे १७० कोटी डॉलर्सना विकले गेले.
अबुधाबीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाच्या वतीने बेकायदेशीररित्या त्याने हे पेंटिंग खरेदी केले होते. या पेंटिंग मध्ये येशू ख्रिस्त अंधारातून येऊन जगाला आशीर्वाद देताना दिसतात, तर त्यांचा दुसर्या हातात एक पारदर्शी गोल आहे.
या चित्रातील ख्रिस्त हा रेनेसांस चळवळीला अभिप्रेत असणारा ख्रिस्त आहे. ज्याला आकाशातील बाप्पाने जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर पाठवले आहे असा समज होता.
या पेंटिंगमधील ख्रिस्ताची नजर चित्र पाहणाऱ्या प्रेक्षकांवर खिळलेली आहे. “सॅल्व्हाटोर मुंडी”चा लॅटिन भाषेतील अर्थ आहे “जगाचा तारणहार”.
यापूर्वी देखील कधी हे पेंटिंग जाहीर कलाप्रदर्शनात मांडले गेले नव्हते. त्यामुळे हे पेंटिंग सध्या नेमके कोणाच्या ताब्यात आहे किंवा त्याच्या बद्दलची कोणतीही अधिकृत माहिती मिळवणे दुरापास्त झाले होते.
अनेक कला तज्ञांच्या मते हे पेंटिंग नेमकं कुणाचं आहे याबाबत दुमत आहे. हे पेंटिंग लिओनार्डो दा विंचीने स्वतः बनवलेले नसून हे त्याने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेतील पेंटिंग असल्याचा देखील दावा केला जातो.
वॉलस्ट्रीट जर्नलने पहिल्यांदा प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,हे पेंटिंग सौदीचे राजकुमार बद्र बिन अब्दुल्लाह याने सौदी अरब चे युवराज ज्यांना एमबीएस या नावानेही ओळखले जात असे, त्यांच्याकडून खरेदी केले होते.
परंतु, सौदी अरेबियाने आजपर्यंत कधीही या वृत्ताला दुजोरा दिला नाही किंवा याचे खंडन देखील केले नाही.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ते केली शाक्टर यांच्या लेखाची पुष्टी करू शकत नाहीत. कलाकृतींच्या अंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार मुळातच पारदर्शी नसतात, त्यामुळे त्याबद्दल कोणताही ठोस दावा करता येत नाही असं त्यांचं मत आहे.
तो लिहितो, “मध्य पूर्वेच्या अंधुक वातावरणात काहीही स्पष्ट सांगता येण्यासारखे नाही.”
परंतु, शाक्टर यांनी पेंटिंगच्या खरेदीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या दोन व्यक्तींचा आणि अनेक स्त्रोत्रांचा उल्लेख आपल्या लेखामध्ये केला आहे.
शाक्टर यांचा असा दावा आहे की, एमबीएस यांच्या खाजगी विमानातून हे पेंटिंग मध्यरात्रीच्या सुमारास नेण्यात आले आणि त्यांच्या सिरीन नावाच्या यॉटवर ते लावण्यात आले.
” सिरीन यॉट हे काही साधेसुधे यॉट नाही. पूर्वी हे यॉट रशियाच्या प्रसिद्ध वोडका व्यापारी युरी शेफ्लर याच्या मालकीचे होते. बिल गेट देखील या यॉटसाठी आठवड्याला ५ मिलियन डॉलर इतकी किंमत मोजत होते.
शाक्टर यांनी या लेखात असाही दावा केला आहे की, विकले जाण्यापूर्वी हे पेंटिंग अतिशय खराब झाले होते, म्हणून त्याची पुन्हा डागडुजी करण्यात आली. हे पेंटिंग इतक्या खराब अवस्थेत होते की त्याचे तुकडे झाले होते, जे पुन्हा एकमेकांना चिकटवून जुळवण्यात आले.
त्यानंतर त्यांनी असाही प्रश्न विचारला की, “कधी कधी उडणार्या समुद्राच्या खारट पाण्यामुळे पेंटिंग वर काही परिणाम होऊ शकतो का?”
सौदी अरेबिया अल-उल गव्हर्नरेट हे सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणात आहे.
जोपर्यंत याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे पेंटिंग राजकुमारच्या यॉटवरच राहील असेही शाक्टर यांनी या लेखात लिहिले आहे. एकदा हे पेंटिंग अबुधाबीच्या पर्यटन स्थळावरील संग्रहालयात लावल्यानंतर ते सर्वसामान्य पर्यटकांना पाहण्यासाठी खुले राहील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.