Site icon InMarathi

हिटलरशाहीच्या प्रचंड नरसंहाराची ही साक्षीदार इतिहासाचे वास्तववादी चित्र मांडते

Ann Frank Feature Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ऍडॉल्फ हिटलर! ह्याचे नुसते नाव काढले तरी आठवतो त्याने घडवलेला ज्यूंचा नृशंस नरसंहार आणि त्याचा वर्णभेदाचा अतिरेक! मानवी इतिहासात घडलेल्या भयानक नरसंहाराच्या घटनांमध्ये हिटलरने ज्यूंचा नरसंहाराचा क्रमांक लागतोच.

 

phys.org

हा नरसंहार इतका भयानक होता की आजही त्याबद्दलची वर्णने वाचून सुद्धा अंगावर काटा उभा राहतो.

हिटलरच्या मनात ज्यू लोकांविषयी इतका पराकोटीचा राग होता की त्याने ज्यूंचा निर्वंश करण्यासाठी एक सैन्यच तयार केले होते. ह्या नाझी सैनिकांनी ज्यूंची गावेच्या गावे एका रात्रीत नष्ट करून टाकली होती.

ह्या नरसंहारात ह्या क्रूर लोकांनी लहान बाळांना आणि वृद्ध माणसांनाही सोडले नाही. ह्यामुळे अनेक ज्यू लोक जीव वाचवण्यासाठी अनेक वर्ष भूमिगत होऊन राहिले होते.

ऍन फ्रॅंक आणि तिचे कुटुंब सुद्धा असेच दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू लोकांवर होणाऱ्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी एका घरात लपून राहिले होते. ऍन फ्रॅंक त्यावेळी तेरा चौदा वर्षांची एक मुलगी होती.

त्या काळात तिने लिहिलेली डायरी पुढे “द डायरी ऑफ अ यंग गर्ल” ह्या नावाने प्रसिद्ध झाली होती.

 

 

१९४५ साली, मार्च महिन्यात वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हिटलरच्या बर्गन-बेल्सन छळछावणीत तिचा मृत्यू झाला आणि तिच्या मरणोत्तर तिची ही डायरी प्रसिद्ध झाली. ह्या डायरीत एका पौगंडावस्थेतील कोवळ्या मनाच्या मुलीचे विचार वाचायला मिळतात.

१२ जून १९२९ रोजी ऍन फ्रॅंक वर्ग ऍनेलीस मारी फ्रॅंक हीच फ्रँकफर्ट आम माईन, वाईमार प्रजासत्ताक, जर्मनी येथे जन्म झाला होता. पण तिच्या आयुष्यातील बरीच वर्षे तिने ऍमस्टरडॅम, नेदर्लंड्स येथे गेली.

ती जन्माने जर्मन असून देखील नाझी जर्मनीत त्याकाळी ज्यूद्वेषी अनेक कायदे लागू झाले असल्याने तिचे व तिच्या कुटुंबाचे न्यूनबर्ग कायद्यानुसार जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकण्यात आले.

१९३३ साली नाझी पक्षाने जर्मनीत सत्ता काबीज केली आणि त्याच वर्षी फ्रॅंक कुटुंब ऍमस्टरडॅमला स्थायिक झाले. पण १९४० सालापर्यंत नाझी सैन्याने नेदरलँड्सवर सुद्धा ताबा मिळवला आणि त्यामुळे फ्रॅंक कुटुंब नेदरलँड्समध्येच अडकून पडले.

हिटलरच्या अत्याचारांना घाबरून ते लोक तिथून बाहेर पडू शकत नव्हते. जुलै १९४२ पासून तर नाझी सैनिकांचा ज्यूंवर होणारा अत्याचार तर अधिकच वाढला.

तसेच ज्यू लोकांना सरळसरळ मारून टाकण्याचा धोरणामुळे फ्रॅंक त्यामुळे फ्रॅंक कुटुंब कुटुंबाला जीव वाचवण्यासाठी भूमिगत होण्यावाचून काहीच पर्याय उरला नाही.

त्यामुळे ऍनच्या वडिलांच्या ऑफिसच्या इमारतीत असलेल्या गुप्त खोल्यांमध्ये फ्रॅंक कुटुंब गुप्ततेत राहू लागले.

त्यातच ऍनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही सापडली आणि त्यातच तिने तिची दैनंदिनी लिहिणे सुरु केले. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंतची दैनंदिनी ह्यात तिने लिहिली.

ह्या दोन वर्षात तिच्या वाट्याला आलेले अस्वस्थ, अस्थिर आणि जीव घुसमटून टाकणारे जीवन तसेच त्यावर तिचे विचार तिने ह्या डायरीत नोंदवले.

सतत बंद दारांआड राहणे, अजिबात आवाज न करता राहणे, रात्री कुणाला संशय येऊ नये म्हणून पूर्ण अंधारात राहणे असे तिचे दोन वर्षांचे जीवन होते. हा जवळजवळ तुरुंगवासच तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या वाट्याला आला होता.

ह्यात तिची सोबत तिच्या ह्या डायरीने केली. आपले सगळे विचार ती त्या डायरीत लिहीत असे. तिची सुखदुःखे, तिची भीती, आपण ह्यातून बाहेर पडू शकणार की नाही ही अस्वस्थता, कधीतरी नक्की दिवस बदलतील ही आशा ह्या डायरीत वाचायला मिळते.

 

खरं तर ऍन अगदी स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख व्यक्तिमत्वाची मुलगी होती. त्यामुळे ह्या सक्तीच्या तुरुंगवासामुळे तिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला ह्यात काहीच शंका नाही.

तिच्या ह्या डायरीत तिने २० जून १९४२ रोजीच्या नोंदीत डच ज्यू लोकांवर लादल्या गेलेल्या बंधनांची यादी लिहिली आहे. त्यातच तिच्या आजीचे निधन झाल्यामुळे झालेल्या दुःखाचे वर्णन केले आहे.

ऍनचे वडील ऑटो फ्रॅंक ह्यांचे विश्वासू सहकारी मित्र व्हिक्टर कुग्लर, योहान्स क्लिमन, मीप खीस आणि बेप वोस्कुइल ह्यांनी त्यांच्या गुप्त वास्तव्यात फ्रॅंक कुटुंबाला खूप मदत केली. त्यांनी त्यांच्या सर्व गरज पुरवल्या.

त्यांना वेळोवेळी अन्न पुरवले. त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली. ऍनने तिच्या ह्या डायरीत ह्या चौघांच्या निष्ठेबद्दल उल्लेख केला आहे, तसेच वेळोवेळी ह्यांनी फ्रॅंक कुटुंबाचे खचलेले मनोधैर्य वाढवले ह्याचाही उल्लेख केला आहे.

ऍनच्या कुटुंबाने इतकी काळजी घेऊन सुद्धा कुणीतरी त्यांच्याविषयी नाझी सैनिकांना कल्पना दिली आणि ४ ऑगस्ट १९४४ च्या सकाळी अचानक फ्रॅंक कुटुंबीय वास्तव्याला होते त्या आख्तरहाएस ह्या इमारतीवर जर्मन पोलिसांनी छापा घातला.

त्यानंतर फ्रॅंक कुटुंब, तसेच त्यांच्याबरोबर तिथे राहत असलेले व्हॅन पेल्स कुटुंब आणि फ्रिट्झ फेफरे ह्यांना ताब्यात घेऊन गेस्टापो येथे नेण्यात आले. तिथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

त्यानंतर त्यांना वेटरिंगस्खान्स येथील ह्युस व्हान बेवारिंग ह्या तुरुंगात टाकण्यात आले. ह्या तुरुंगात आधीपासूनच खच्चून गर्दी झालेली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना वेस्टरबॉर्क संक्रमण छावणीत पाठवले.

हे लोक जर्मन पोलिसांपासून लपून बसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगार असा ठपका ठेवण्यात आला. आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आणि त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बराकींमध्ये त्यांची रवानगी झाली.

 

Smithsonian Magazine

मीप खीस व बेप वोस्कुइज ह्या ऑटो फ्रॅंक ह्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली नाही त्यामुळे ते लगेच आख्तरहाएसमध्ये परत आले तेव्हा त्यांना ऍनची डायरी सापडली.

ऍन परत आल्यावर तिला तिची डायरी परत करायची म्हणून मीप ह्यांनी ती डायरी त्यांच्याकडे सांभाळून ठेवली.

३ सप्टेंबर १९४४ रोजी फ्रॅंक कुटुंबियांची रवानगी वेस्टरबॉर्कहून आउश्वित्झ छळछावणीत झाली. आउश्वित्झ येथे पोचल्यावर लोकांना पुरुषांना व स्त्रियांना व मुलांना बळजबरीने वेगळे केले गेले.

त्यात ऑटो फ्रॅंक देखील त्यांच्या कुटुंबापासून वेगळे झाले. त्यानंतर ५४९ लोकांना तडक गॅस चेम्बर मध्ये टाकून मारून टाकण्यात आले. त्यात १५ वर्षांपेक्षा लहान मुलांचा समावेश होता.

 

Holocaust Education & Archive Research Team

ऍन नुकतीच १५ वर्षांची झालेली असल्याने ह्यातून ती वाचली. तिला कत्तलीबद्दल कळले तेव्हा आपले वडील सुद्धा आता ह्या कत्तलीत ठार झाले असावेत तिचा समज झाला होता. पण आख्तरहाएसमध्ये वास्तव्यास असणारे सर्वच लोक ह्या कत्तलीपासून वाचले होते.

वाचलेल्या सर्व स्त्रियांना नग्न करून निर्जंतुक करण्यात येत असे. त्यात ऍन सुद्धा होती. तिचे सर्व केस कापून टाकण्यात आले आणि तिच्या हातावर ओळखक्रमांक गोंदवण्यात आला.

दिवसा स्त्रियांकडून गुलामगिरी करून घेण्यात येत असे आणि रात्री त्यांना दाटीवाटीने बराकींमध्ये झोपावे लागत असे. ऍनला दगड वाहून नेण्याचे काम करावे लागत असे. छावणीत त्यावेळी अनेक रोग पसरले होते.

त्या रोगाची लागण ऍनला सुद्धा झाली आणि तिला व तिच्या बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात अंधार व उंदरांचे साम्राज्य होते.

ऑक्टोबर १९४४ साली ऍन व तिच्या बहिणीची इतर काही स्त्रियांबरोबर बर्गन-बेलसन छळछावणीत रवानगी झाली. तिथेही कैद्यांची दाटीवाटी असल्याने रोगराई पसरली होती.

शेवटच्या दिवसांत उपासमारी, सश्रम कारावासाचे आयुष्य ह्यामुळे ऍन खूप कृश झाली होती. त्यावेळी ऍनची बहीण मार्गो आजाराने बिछान्याला खिळली होती. ऍनच्या मते तिचे आईवडील सुद्धा मरण पावले असल्याने तिची सुद्धा जगण्याची इच्छा संपली होती.

 

washington.edu

मार्च १९४५ मध्ये छळछावणीत टायफस फिवरची साथ आली आणि त्यात १७००० कैदी मरण पावले. पाणी त्यातच ऍनचा सुद्धा मृत्यू झाला. मार्गो सुद्धा आजारपणामुळे बिछान्यावरून खाली पडली आणि त्यात तिचाही मृत्यू झाला.

ऍन आणि मार्गो ह्यांना सामूहिक कबरींमध्ये पुरण्यात आले पण ती जागा अजूनही अज्ञात आहे.

ऍनचे वडील ऑटो फ्रॅंक ह्या आउश्वित्झच्या कैदेतून बचावले. ते ऍमस्टरडॅमला परतले आणि त्यांना मीपने आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी त्यांच्या परिवाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळले की त्यांचे संपूर्ण कुटुंबच ह्या छळछावणीत मरण पावले आहे.

ऍनची डायरी त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. १९४७ साली ही डायरी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आणि तिचे १९५२ रोजी इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. त्यानंतर जगभरात अनेक भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित करण्यात आले.

 

ilmessaggeroitaliano.it

ऍन फ्रॅंकला चाईल्ड होलोकॉस्टचा चेहेरा मानण्यात येते. इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा माणुसकीवरचा तिचा न ढळलेला विश्वास तिच्या डायरीतून दिसून येतो. तिचा असामान्य आशावाद दिसून येतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version