Site icon InMarathi

एका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही

yuvraj featured inmarathi

wisden

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : अनुपम कांबळी

===

युवराजची सगळ्यात आवडती खेळी कोणती….? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचे अनेक चाहते स्टुअर्ट ब्रोंडला त्याने ६ चेंडूत ६ षटकार मारले त्या खेळीचा उल्लेख करतात.

 

Cricket Addictor

 

अँड्रू फ्लिंटोफने १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूदरम्यान युवीला डिवचला आणि पुढच्याच षटकात ब्रिटीशांनी महादेवाचे तांडवनृत्य नेमके काय असते ते ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले.

युवराजच्या सर्वोत्तम खेळीपैकी ती एक खेळी होती. मात्र मला युवराज भावला तो त्याच्या २०११ विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीसाठी…!

विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये दिनांक २४ मार्च २०११ रोजी अहमदाबादमध्ये भारताची गाठ जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाशी पडली होती.

दोन संघांपैकी एकच संघ सेमीफायनलमध्ये जाणार होता आणि दुस-याचे आव्हान त्याच दिवशी संपुष्टात येणार होते.

 

Sportskeeda

 

ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्याअगोदर सलग तीन वेळा विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचा भीमपराक्रम केला होता. त्यामुळे म्हणायला क्वार्टर फायनल असली तरी या सामन्याचे महत्व फायनलपेक्षाही कितीतरी पटीने अधिक होते.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २६० धावांचा डोंगर उभारला.

युवराजने दोन बळी घेऊन गोलंदाजीत आपले बहुमूल्य योगदान दिले. आता ब्रेट ली, शॉन टेट, मिचेल जोन्सन अशा गोलंदाजांचा नेटाने सामना करून हे लक्ष्य पार करायचे होते. सेहवाग स्वस्तात माघारी परतला.

सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर या दोघांनीही अर्धशतक केले पण सामना शेवटपर्यंत खेचण्यात ते अयशस्वी ठरले. ३३ व्या ओव्हरमध्ये गंभीर रन आऊट झाला तेव्हा भारताचे ४ गडी १६८ धावांमध्ये माघारी परतले होते.

१७ षटकात ९३ धावांची गरज होती आणि धोनी-युवराज ही शेवटचीच जोडी मैदानात होती.

त्यानंतर सुरेश रैनाचा नंबर असला तरी विश्वचषकात त्याचा पहिल्यांदाच संघात समावेश करण्यात आला होता.

त्यामुळे सगळी जबाबदारी कर्णधार धोनी आणि युवराज या दोघांच्या खांद्यावर येऊन पडली होती. ‘

यापैकी कुणाचीही एक चूक २८ वर्षांनंतर भारताचे विश्वचषक हातात घेण्याचे स्वप्न संपुष्टात आणण्यासाठी पुरेशी होती. समोरून ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आग ओकत होते…

 

Scroll.in

 

क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर ब्रेट लीच्या डोळ्याच्या शेजारी चेंडू आदळला तरीही तो रक्तबंबाळ होऊन मैदानात गोलंदाजी करत होता. हा सामना नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावर खेळले जात असलेले युद्ध होते.

धोनी आणि युवराज या दोघांवरही प्रचंड दबाव होता. त्यातच ३७ व्या षटकात ब्रेट लीच्या एका चेंडूने धोनीला चकमा दिला आणि क्लार्ककडे झेल देऊन तो बाद झाला.

सगळ्या स्टेडीयममध्ये एकाएकी शांतता पसरली.

भारताच्या विश्वचषक मोहिमेची अखेर धोनीच्या त्या विकेटसोबत अनेकांना दिसू लागली होती.

कोणत्याही परिस्थीतीत शांत राहणारा कॅप्टन कुल धोनी देखील त्यादिवशी आपल्या भावना काबूत ठेवू शकला नाही.

त्याच्या धीरगंभीर डोळ्यात अश्रुचे तरळलेले दोन थेंब कॅमे-याने अचूक टिपले. माहीच्या त्या पाणावलेल्या डोळ्यात अनेक क्रिकेटवेड्या प्रेक्षकांना भारताच्या पराभवाची चाहूल दिसली.

मैदानात व टीव्ही स्क्रीनसमोर त्याक्षणी अनेक आसवे गळाली.

खेळपट्टीच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवराजकडे धोनीने त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी एक कटाक्ष टाकला.

कदाचित ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ असाच काहीसा संदेश त्याने नजरेतल्या नजरेतून युवराजला दिला असावा.

भारताचा निम्मा संघ १८७ धावांमध्ये तंबूत परतला होता… युवराज क्रीजवर होता… आणि रैनाच्या सोबतीने त्याला उरलेल्या १३ षटकात ७४ धावा काढायच्या होत्या.

 

Zimbio

 

त्यादिवशी पावनखिंडीतल्या बाजी प्रभू देशपांडेंप्रमाणे युवराज एकटाच कांगारूंच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने भारतासाठी विजय अक्षरशः वाघाच्या जबड्यातून खेचून आणला.

विजयी धाव घेतल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने डरकाळी फोडली ती खूप काही सांगून जात होती. आजही २०११ विश्वचषकाच्या आठवणी सांगताना धोनीची फायनलमधील श्रीलंकेविरूद्धची ९१ धावांची खेळी आठवते…

सचिन तेंडुलकरची सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरूद्धची ८५ धावांची खेळी नजरेसमोर येते… अगदी फायनलमध्ये ९७ धावा काढणारा गंभीर देखील लक्षात राहतो.

मात्र क्वार्टर फायनलमधील युवराजच्या नाबाद ५७ धावांच्या या छोटेखानी खेळीचा अनेकदा विसर पडतो.

प्रचंड दबाव आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली युवराज सिंगने खेळलेली आपल्या कारकीर्दीतील ती एक सर्वोत्कृष्ट खेळी होती.

ती एक खेळी युवीने खेळली नसती तर तेंडुलकर, गंभीर व धोनीच्या सेमीफायनल आणि फायनलमधील खेळी कधी जन्मालाच आल्या नसत्या…

 

IBtimes india

 

ती एक खेळी युवीने खेळली नसती तर २८ वर्षांनंतर विश्वचषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न कधीच साकार झाले नसते…

ती एक खेळी युवीने खेळली नसती तर क्रिकेटच्या देवाच्या देव्हा-यात वर्ल्ड कपची ट्रॉफी कधीच दिसली नसती… एवढे त्या खेळीचे महत्व वादातीत आहे…!

आपण स्वप्न पाहतो, ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी धडपडतो आणि प्रयत्नांती त्यात यशस्वी देखील होतो. युवराज सिंग त्याला अपवाद होता.

सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.

एवढा धडपडला की आपली क्रिकेटमधील प्रेरणा व आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरला विश्वचषकाची ती ट्रॉफी मिळवून देण्यासाठी त्याने आपले सर्वस्व पणाला लावले.

 

Zee News

 

अगदी युवराजने स्वतःचे प्राण देखील पणाला लावले पण क्रिकेटच्या देवाचा देव्हारा त्याने विश्वचषकाच्या ट्रॉफीशिवाय रीता ठेवू दिला नाही.

विश्वचषकानंतर युवराजच्या कर्करोगाचे निदान झाले आणि ही बातमी ऐकून कित्येकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला संस्मरणीय विजय मिळवून देणारी ही खेळी युवराज जेव्हा साकारत होता, तेव्हा कॅन्सर त्याचे शरीर पोखरत होता.

त्याने मैदानावर रक्ताच्या उलट्या केल्या पण आपल्या वेदना तो कोणापाशीही बोलला नाही.

विश्वचषकाच्या फायनलमध्ये विजयी धाव काढल्यानंतर सचिन तेंडुलकरला कडकडून मिठी मारत युवराज एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडला…

इतके दिवस तुंबलेल्या भावनांना त्याने आपल्या अश्रुंद्वारे वाट मोकळी करून दिली… त्या अश्रुंमध्ये आनंद होता, वेदना होत्या, समाधान होते, जिद्द होती, अगदी सर्व-सर्व काही होते.

 

 

युवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय आणि काय पणाला लावले ते सांगण्यासाठी जगातल्या कोणत्याही शब्दकोषात शब्दच सापडले नसते.

त्यासाठी सचिनच्या मिठीतले ते अश्रुच पुरेसे होते. जिद्दीचे दुसरे नाव म्हणजे युवराज सिंग…!

एखाद्या खेळाडूप्रमाणे नव्हे तर योद्ध्याप्रमाणे त्याची कारकीर्द होती. आता त्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे, पण शेवटी आयडॉल कधी रिटायर्ड होत नसतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version