आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात आपल्यापैकी सर्वांनी ‘रामप्रसाद बिस्मिल’ हे नाव वाचले असणार.
पण ते एक क्रांतिकारक होते, काकोरी कटात सहभाग घेतल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा फर्मावली होती या व्यतिरिक्त रामप्रसाद बिस्मिल हे एक संवेदनशील कवी होते हे किती जणांना ठाऊक आहे?
केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला हा युवक कविता, शायरी करत असे, तीस वर्षांचा होईपर्यंत त्याने अनेक पुस्तके लिहिली होती.
लेखांतून इंग्रज सरकारविरुद्ध भाष्य करून त्यांच्या सत्तेचा पाया डळमळीत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते जे साध्यदेखील झाले. त्याने अनेक देशभक्तीपर गीते लिहिली ज्यामुळे कित्येकांना गुलामगिरीची जाणीव होऊन याविरुद्ध लढले पाहिजे हे भान आले.
त्याने केवळ लिहून भारतीयांच्या मनात क्रांतीची बीजे रुजवली नाहीत, तर क्रांतीला आर्थिक पाठबळ हवे हा व्यावहारिक विचार लक्षात घेऊन आपण लिहिलेली पुस्तके विकून पैसा उभा केला.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी आजकाल तरुण शस्त्रे बाळगतात, रामप्रसादने देशावरील परकीय शक्तींचे वर्चस्व झुगारण्यासाठी शस्त्र हाती घेतले.
मोबाईल विकत घेता यावा म्हणून, किंवा इतर चैनीसाठी अभ्यासाची पुस्तके विकणारे महाभाग आपल्याला आढळतील, पण क्रांतीकार्याला लागणारा पैसा उभा करता यावा म्हणून आपण लिहिलेली पुस्तके विकणारा असा क्रांतिकारी विरळाच !
काकोरी कट आणि रामप्रसाद बिस्मिल हे एकमेकांशी अविभाज्यपणे जोडले गेले असले तरी आधी‘ मैनपुरी’ कटात देखील रामप्रसादने मुख्य भूमिका निभावली.
‘ मातृदेवी’ संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन यांनी ओरेय्याचे प्रसिद्ध क्रांतिकारक पंडित गेंदालाल दीक्षित यांच्या बरोबर काही सशस्त्र सैनिक आणि घोडेस्वार घेऊन इंग्रजांवर जो हल्ला केला त्यात ५० ब्रिटीश सैनिक मारले गेले.
या कार्यासाठी रामप्रसाद आणि दीक्षित यांनी मैनपुरी, आग्रा, इटावा आणि शाहजहानपुर इथे इंग्रजांविरुद्ध गुप्त प्रचार करून अनेक युवकांना एकत्रित येऊन सशस्त्र उत्तर देण्यासाठी आवाहन केले.
याच काळात त्याने ‘ मैनपुरी कि प्रतिज्ञा’ ही कविता लिहून देशवासियांना एक संदेश देण्यासाठी एक पँम्फलेट देखील प्रकाशित केले. पण कोणीतरी विश्वासघात केला आणि बिस्मिल दोन वर्षांसाठी भूमिगत झाले.
दोन वर्षे यशस्वीरित्या पोलिसांना चुकवत राहिले, पण १९१८ च्या दिल्ली येथे आयोजित कॉंग्रेसच्या अधिवेशनात क्रांतिकारी साहित्य विकायला आले असता ब्रिटीश पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले.
बिस्मिलने पहिल्यांदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण बचावाचा अन्य मार्ग दिसला नाही तेव्हा त्यांनी यमुनेच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले. डुबक्या घेत, पोहत ते आता जे ठिकाण ‘ग्रेटर नोइडा’ नावाने ओळखले जाते तिथे पोहचले.
–
- पुस्तकांचा खजिना लुटा, भारतातील या सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’मध्ये!
- “पुस्तकांची फाळणी” : १९४७ च्या दुःखद आठवणींचा असाही एक कोलाज
–
तिथे रामपूर जागीर नावाच्या छोट्याशा गावात राहून त्यांनी ‘ बोल्शेविकोंकी करतुत’ नावाची कादंबरी लिहिली. याच दरम्यान ब्रिटीश सरकारने त्यांना ‘ फरार’ घोषित करून शिक्षा सुनावली.
पुढे १९२० मध्ये त्यांना सोडण्यात आले तेव्हा बिस्मिल शाहजहानपुरला परतले आणि १९२० कोलकता आणि १९२१ मध्यव अह्म्दाबाद येथे झालेल्या अधिवेशनात भाग घेतला.
अहमदाबाद मधील अधिवेशनात त्यांनी ‘पूर्ण स्वराज्य’ चा जो प्रस्ताव मांडण्यात आला त्याला त्यांनी पाठींबा दिला नि तो संमत करून घेण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. पुढे असहकार आंदोलनात भाग घेतला.
परंतु चौरीचौरा येथे घडलेल्या हिंसक घटनेमुळे हे आंदोलन परत घेण्यात आले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसक मार्गाने जाऊन फायदा नाही हा विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला.
त्याचाचा परिणाम म्हणून चंद्रशेखर आझाद नेतृत्व करत असलेल्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोशिएशनला ते मिळाले आणि एका नव्या सशस्त्र क्रांतीच्या पर्वाची घोषणा झाली.
क्रांतीसाठी लागणाऱ्या शस्त्रांना पैसा कुठून आणायचा? याचे उत्तर म्हणून काकोरी कटाची योजना आखण्यात आली.
रामप्रसाद बिस्मिल नाव उच्चारले की अपरिहार्यपणे ‘ काकोरी कटाचा उल्लेख येतोच.
लपून छपून इंग्रजविरोधी वातावरण निर्माण करणे, त्यांच्याविरुद्ध असंतोष पसरवणे हे काम करत असताना लागणारा पैसा कमी पडत असताना त्यांचाच पैसा त्यांच्याच विरोधात का वापरू नये
या कल्पनेतून ‘ काकोरी’ कटाने जन्म घेतला. सरकारी खजिना घेऊन जाणारी ट्रेन त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी काकोरी येथे अडवून लुटली. परंतु हे उघडकीस आल्यानंतर यात सहभागी असलेल्या ४० जणांना सरकारने अटक केले.
या कटातील मुख्य आरोपी म्हणून स्वरण सिंग ( भगतसिंगचे काका ), रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी, दुर्गा भाभी ( दुर्गा भगवती चंद्रा वोहरा ) रोशांसिंग, सचिंद्र बक्षी,
चंद्रशेखर आझाद, विष्णू शरण दब्लीश, केशव चक्रवर्ती, बनवारी लाल, सचिंद्रनाथ सन्याल, मन्मथनाथ गुप्ता अशी कित्येक नावे पुढे आली.
काहींना अटक झाली, काहींना स्थानबद्ध ख़ाञूआट आले. स्वरणसिंग, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्लाह खान, राजेंद्र लाहिरी, रोषन सिंग यांना फाशीची सजा सुनावण्यात आली.
१९ डिसेम्बर ही त्यांना फाशी देण्याची तारीख निश्चित झाली. बिस्मिल यांची आई मुलरानी त्यांना भेटायला गोरखपूर जेलमध्ये गेली असताना त्यांना पाहताच बिस्मिल्चे डोळे भरून आले.
त्यावर ती वीरमाता म्हणाली, “ मला तर वाटले माझा मुलगा खूप बहादूर आहे. इंग्रज त्याचे नाव घेतले कि थरथर कापतात. मला माहितच नव्हते कि तोच मुलगा मृत्यूला इतका घाबरतो. असे रडत रडत फाशी जायचे होते तर क्रांतीच्या मार्गावर गेलासच का?”
आपले डोळे पुसत त्या क्रांतीकारकाने उत्तर दिले, “ तुझ्यासारख्या बहादूर आईचा विरह होणार या कल्पनेने हे अश्रू आलेत डोळ्यात”.
आपल्या मुलाने सर्वच कलात पारंगत व्हावे म्हणून त्याला वेगवेगळ्या क्लासला लावून त्याचे बालपण संपवू पाहणाऱ्या आयांना पाहिले की वाटते, मुल्ररानी सारखी आई शतकातून एकदाच जन्म घेते काय?
आणि बिस्मिल…!
खोऱ्याने पैसा ओढणे, गर्लफ्रेंड्स मिळवणे, पार्ट्या करणे, मौजमजा करणे यात रमलेला बिस्मिलच्या वयाचा आजचा तरुण..
त्याला बिस्मिलचा त्याग समजणार आहे? वयाच्या तिशीत मधुमेह, रक्तदाब, हार्ट अॅटॅकने तारुण्य कमकुवत बनवलेल्या या मुलांना फाशीवर चढताना बिस्मिलने गायलेल्या
‘ सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है,
देखना है जोर कितना ..
बाजू ए कातिलमें है,
या ओळी ऐकताना अंगावर शहारे येतील?
खरे तर ही बिस्मिल अझिमाबादी’ची कविता! ती गाऊन या क्रांतिकारकाने त्या कवीला आणि स्वतःच्या मरणाला देखील अजरामर केले. त्याच्या इतकी धडाडी नाही आपल्यापाशी, पण निदान त्याच्या आठवणींपुढे नतमस्तक तरी होऊ या!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.