सिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधू निवृत्ती जाहीर केली आहे. या बातमीनंतर युवराजच्या चाहत्यांनी त्याच्याबद्दलच्या अनेक अविस्मरणीय क्षणांना, आठवणींना उजाळा दिला.
युवराजच्या प्रत्येक चाहत्याला आजही त्याने T-20 विश्वचषकात ६ चेंडूत मारलेले ६ षटकार आठवतात.
एवढंच काय, ज्या इंग्लंडच्या ब्रॉडची त्याने धुलाई केली होती, त्याला देखील ते आजही स्वप्नात आठवतात म्हणे! फ्लींटॉपने दिलेल्या रागामुळे हा पंजाबचा पुत्तर खूपच भडकला आणि त्याने तो राग त्या ६ षटकारांनी ब्रॉड वर काढला होता.
२०११ च्या विश्वचषकाचा देखील युवराज हा हिरो होता. आपल्या कॅन्सरचा मुकाबला करत असताना ह्या योध्याने भारताला तब्ब्ल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्वचषक मिळून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
युवराजच्या अश्या असंख्य आठवणी आहेत, अश्याच आठवणींना उजाळा देणारी पोस्ट रणजित पराडकर यांनी फेसबुकवर लिहली आहे.
===
युवी रिटायर झाला.
खरं तर ह्यात काही आश्चर्य किंवा धक्कादायक नाहीच. तो संघात परतण्याच्या रस्त्यापासूनही किती तरी दूर, बऱ्याच काळापूर्वीच गेला होता. त्यामुळे त्याची निवृत्ती फक्त औपचारिकतेपुरतीच.
पण तरी.. धक्का बसला नसला तरी एक चिमटा मात्र बसलाच. तंद्री लागलेली असताना जशी एकदम कसल्याश्या आवाजाने जाग येते,
तसं आजच्या तुफान पॉवरहिटिंग आणि चौकार-षटकारांच्या आतिषबाजीत गुंग झालेल्या क्रिकेटीय जाणीवांना अचानक जाग आली आणि युवीच्या अनेक खेळ्या आठवल्या.
त्याने स्ट्यूअर्ट ब्रॉडला मारलेले ६ षटकार तर आठवलेच पण २०११ च्या वर्ल्ड कप जेतेपदासाठी त्याने दिलेलं योगदानही आठवलं.
धोनीने कुलशेखराला लॉंग ऑनवरून सिक्स मारली आणि भारताने फायनल जिंकली, त्यावेळी मंद हसणारा धोनी जितका लक्षात आहे,
तितकाच लक्षात आहे अत्यानंदाने ढसाढसा रडणारा युवी. सचिनच्या खांद्यावर, त्याच्या देवाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा भावना अनावर झालेला युवी आठवला.
त्याच्या अनेक खेळी आठवल्या, अगदी ती त्याच्या करियरचा पाया रचणारी सुप्रसिद्ध नॅटवेस्ट ट्रॉफी फायनलसुद्धा आठवली.
८७ धावांवर नाबाद राहिलेला मोहम्मद कैफ सामनावीर ठरला, ठरायला हवाच होता, पण हाताबाहेर गेलेला सामना आवाक्यात आणून ठेवला कैफ आणि युवीच्या भागीदारीनेच. युवीच्या ६९ धावासुद्धा अत्यंत महत्वाच्या होत्या.
मी मडगावला असताना भारत वि. इंग्लंड वनडे पाहायला गेलो होतो. युवीने त्यात सेंच्युरी ठोकली होती. ती खेळी आठवली.
आजकाल रांगड्या शक्तीच्या जोरावर मोठमोठे षटकार आपण पाहतो आणि तोंडात बोटं घालतो.
मात्र युवीच्या खेळात शक्ती जितकी होती, तितकीच नजाकतही.
खणखणीत ड्राईव्ह किंवा स्लॉग स्वीप मारून चेंडू प्रेक्षकांत २५ लाईन्स मागेपर्यंत फेकणारा युवी कव्हर्स आणि मिड ऑनकडे हलक्या हातांनी बॉल ढकलून फिल्डरच्या नाकाखालून १ रन चोरतानाही कधी कमी पडला नाही.
बॅकफूट पॉईन्टवर युवीने पकडलेले अनेक झेल आठवले. भारताचा जॉन्टी र्होड्सच होता तो. फक्त बॅकफूट पॉईन्टच नाही शॉर्ट फाईन लेगपासून बॅकफूट पॉईन्टपर्यंतच्या सगळ्या भागांत अनेकदा सूर मारून चेंडू अडवतानाचा युवी आठवला.
युवी, कैफ आणि रैना ह्यांनी अडवून ठेवलेला ऑफ साईडचा सगळा स्क्वेअर एरिया कसा जवळजवळ अभेद्य असायचा, ते आठवलं.
त्याची लॉलीपॉप टाकल्यासारखी डावखुरी फिरकीसुद्धा आठवली.
इंग्लंडच्या मास्करेन्हास नावाच्या एका पपलू प्लेयरने त्याला डावाच्या शेवटच्या षटकात ५ सिक्स मारले होते, ते आठवलं आणि आठवलं ब्रॉडला ६ सिक्स मारल्यावर युवीने दिलेलं स्टेटमेंट की, त्या ५ सिक्सेसची ही परतफेड होती !
त्याच्या लॉलीपॉप फिरकीने अनेकदा पार्टनरशिप तोडून देण्यापासून ते रन्सचा ओघ थांबवण्यापर्यंत केलेली महत्वाची कामगिरी आठवली.
हे सगळं आठवण्याबरोबरच आठवला, २०११ वर्ल्ड कपनंतर कॅन्सरचं निदान झालेला युवी. मग अमेरिकेला जाऊन उपचार करवून, त्यातून बाहेर येऊन एखाद्या लढवय्यासारखा पुन्हा मैदानात उतरलेला युवीसुद्धा आठवला.
तो पूर्वीइतका चपळ नव्हता, पण तरी अनेकांपेक्षा सरस होता. म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय संघापर्यंत तो गेला. त्याचं हे पुनरागमन एक जबरदस्त सक्सेस स्टोरी ठरलं होतं, हेही आठवलं.
त्यापाठोपाठ आठवला, पुनरागमन केल्यानंतरच्या काळात श्रीलंकेसोबतच्या वर्ल्ड टीट्वेंटी फायनलमध्ये बॉलला बॅट लावण्यासाठी झगडणारा युवी. कोहली आणि युवी क्रीझवर होते.
मलिंगा आणि कुलशेखरा ऑफ स्टंपच्या बाहेर अचूक यॉर्कर लेंग्थ बोलिंग करत होते आणि कोहली १-२ रन्स तरी काढत होता, मात्र युवीच्या बॅटची पोहोच कमीच पडत होती.
भारताला त्या फायनलमध्ये अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही आणि फायनल हरावी लागली. त्या एका इनिंगने सगळ्या सोशल मीडियाने युवीची केलेली ‘छी: थू’ सुद्धा आठवली.
तो तेव्हा संपला नव्हता, पण संपत आला होता. नंतर तो संघाबाहेरही गेला. आयपीएलमध्ये त्याने काही बऱ्या खेळी केल्या, पण पूर्वीचा युवी कुणालाच दिसत नव्हता. मलाही नाही.
असो.
महत्वाचं हे आहे की, आज युवी रिटायर झाल्याचं कळल्यावर मला फॉर्मसाठी झगडणारा युवी आधी आठवला नाही.
मला एका झटक्यात आठवला वर्ल्ड कप जिंकल्यावर आनंदाच्या भरात जोरात ओरडत धोनीकडे एखाद्या योद्ध्यासारखा चालत जाणारा युवी.
माझ्यासाठी तीच त्याची छबी आहे. एक योद्धा. ज्याने दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. तो कॅन्सरशी जिंकला. जो आज निवृत्त झाला.
Hat’s off, Champ..!!
Take a bow..!!
___/\___
===
अश्या प्रकारे आज आपल्या लाडक्या युवीने आपल्या क्रिकेट करियरला कायमचा अलविदा केला आहे. पण त्याचा देशभरातील चाहत्यांच्या मनात त्याच्या असंख्य आठवणी सदैव पिंगा घालत राहतील.
युवराज आता भावी आयुष्यात कोणता मार्ग चोखंदळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, पण तूर्तास तरी युवराज नामक पर्वाचा आज शेवट झुलाय हे मात्र नक्की !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.