आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रसिद्ध रंगकर्मी, अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचा चाहतावर्ग मोठा आहे. बहुप्रतिभाशाली असणाऱ्या गिरीश कर्नाडांनी आपलं शिक्षण गणित, राज्यशास्त्र , संख्याशास्त्र, अर्थशास्त्र आणि दर्शन शास्त्रात केली होती.
गिरीश कर्नाड यांना बालपणीपासूनच रंगभूमीचा लळा लागला होता. त्यामुळे एवढं प्राविण्य मिळवून देखील शेवटी त्यांनी नाट्यलेखनाचा आपला जुना छंद जोपासत, पूर्णवेळ त्या क्षेत्रात कार्यारंभ केला.
गिरीश कर्नाड यांनि गणित व संख्याशास्त्रात पदवीपर्यँतचं शिक्षण कर्नाटकातील धारवाड येथील कर्नाटका आर्टस् कॉलेज मध्ये केलं. ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्वज्ञान , राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
यादरम्यानच १९६३ ला ते ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या स्टूडेंट युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. तिथे असताना देखील त्यांची रंगभूमीशी असलेली नाळ तशीच कायम होती. त्यांनी तब्बल सात वर्ष तिथे रंगभूमीवर काम केलं.
पुढे ते अमेरिकेला गेले. तेथील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये ते प्राध्यपक म्हणून कार्यरत झाले. परंतु अध्यापनात त्यांचं मन काही केल्या रमेना, मग शेवटी त्यांनी तेथील नोकरी त्यागली आणि भारतात परतले.
भारतात परतल्यावर त्यांनी चेन्नईच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस मध्ये नोकरी स्वीकारली, पुढे त्यांचा संबंध नाट्यक्षेत्राशी आला. त्यांनी नोकरी करताना आपले लेखन सुरु ठेवले आणि रंगभूमीशी असलेला आपला संपर्क कायम ठेवला.
पुढे गिरीश कर्नाड ह्यांनी ती देखील नोकरीसोडून स्वतःला पूर्णवेळ चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला वाहून दिले.
त्यांनी निर्माण केलेल्या यताति, तुघलक, हयदवान, अंजु मल्लिगे, अग्निमुते माले, नागमंडला आणि अग्नि और बरखा ह्या नाटकांना खूप यश व प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या नाटकांचा अनेक भाषेत अनुवाद करण्यात आला.
नाटका बरोबरच चित्रपट क्षेत्रात देखील गिरीश कर्नाड यांनी आपला ठसा उमटवला होता. अभिनेता म्हणून त्यांनी १९७० साली आलेल्या संस्कार ह्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.
ह्या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटात काम केलं आहे.
त्यांनी स्वतःला कधीच चित्रपटातील भूमिकांसाठी मर्यदित न ठेवता, अनेक मालिकांमध्ये देखील लहान मोठ्या भूमिका वठवल्या.
गिरीश यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध “मालगुडी डेज” ह्या मालिकेत देखील काम केले होते. त्यांनी ह्यात प्रमुख पात्र असलेल्या स्वातीच्या पित्याची भूमिका वठवली होती.
तसेच दूरदर्शनच्या विज्ञान कथेवर आधारित टर्निंग पॉईंट ह्या मालिकेत देखील त्यांनी भूमिका वठवली होती. कर्नाड यांनी अनेक हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.
निशांत, मंथन, पुकार, डोर, इकबाल आणि एक था टायगर ह्या प्रथितयश चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
गिरीश कर्नाड ह्यांचं नाट्य क्षेत्रातील व सिने क्षेत्रातील योगदान बघता, त्यांना अनेक सन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना भारत सरकारकडून पद्म, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गिरीश कर्नाड ह्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड तसेच फिल्म फेयर अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले.
गिरीश कर्नाड ह्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ह्यांच्या सुप्रसिद्ध “विंग्ज ऑफ फायर” ह्या पुस्तकाच्या ऑडिओबुक संस्करणाला आपला आवाज दिला आहे. गिरीश कर्नाड हे सर्वार्थाने प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व होते.
गिरीश कर्नाड मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय भूमिकेसाठी चर्चेत होते. त्यांनी मोदी सरकारवर अनेकदा तीक्ष्ण टीका केली होती.
शहरी माओवाद प्रकरणात त्यांनी भर सभेत आपल्या गळ्यात ‘मी देखील अरबन नक्षल’ अश्या आशयाची पाटी लावून हजेरी लावली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्यावर त्यामुळे मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती.
गिरीश कर्नाड हे डाव्या विचारसरणीचे खंदे समर्थक तसेच प्रखर सुधारणावादी होते. ते सदैव आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी हिंदू धर्माचे प्रखर शब्दात समीक्षण केले होते. अनेक धर्म परंपरांवर कठोर शब्दात टीका केली होती.
सुप्रसिद्ध कन्नड लेखिका गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर त्यांना देखील तत्सम प्रकारच्या असंख्य धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यांना पोलीस संरक्षण देखील प्रदान करण्यात आले होते.
कधी आपल्या परखड वक्तव्यांमुळे होणारा वाद तर कधी निर्भिड कृतीमुळे कर्नाड कायमच चर्चेत राहिले, अर्थात त्यांचा अनुभव, प्रतिभाशक्ती आणि सशक्त भुमिका यांच्यामुळे त्यांचे स्थानही अढळ राहिले यात शंका नाही.
गिरीश कर्नाड हे सदैव आपल्या अजरामर कलाकृती, बहुआयामी व्यक्तित्व तसेच प्रखर तत्वनिष्ठेसाठी सदैव संस्मरणात राहतील, हे मात्र निश्चितच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.