' १००० फ्रॅक्चर्स, तरीही आयएएस होण्याचं स्वप्नं, तुमच्यामध्ये, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आहे का अशी जिद्द? – InMarathi

१००० फ्रॅक्चर्स, तरीही आयएएस होण्याचं स्वप्नं, तुमच्यामध्ये, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आहे का अशी जिद्द?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयएएस होण्याचं स्वप्नं अनेक तरुण बघतात. त्यासाठी जीव तोडून मेहतन घेतात. पण आयएएस होणे इतके सोपे नाही. त्यासाठी मेहनत आणि कष्ट तर लागतातच शिवाय अंगात चिकाटी लागते आणि सगळ्यात महत्वाची असते ती तुमची जिद्द.

ह्या जिद्दीमुळेच अशक्य गोष्टी शक्य करून दाखवता येतात. केरळच्या ह्या तरुणीकडे बघितले की जिद्द कशी असावी हे आपल्याला कळते.

लथीशा अन्सारी ही केरळमध्ये राहणारी तरुणी २ जून २०१९ रोजी पटापट आपली रोजची कामे आटोपून आत्मविश्वासाने थिरुवनंतरपूरमला जाण्यास निघाली. तिची त्या दिवशी प्रिलिमिनरी सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा होती.

ही परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे (यूपीएससी) घेण्यात येते.

 

upsc inmarathi

 

तिच्या चेहेऱ्यावर थोडे टेन्शन असल्यासारखे वाटत होते पण तिला भीती परीक्षेची नव्हती. परीक्षा लिहिताना ऑक्सिजन कमी पडून तिला चक्कर येऊ नये किंवा लिहिता लिहिता तिचे एखादे हाड फ्रॅक्चर होऊ नये ह्याचे तिला टेन्शन होते.

तर लथीशाच्या आईवडिलांना वेगळेच टेन्शन होते. कोट्टायममधील इरुमेली ह्या त्यांच्या गावापासून ते तिरुवनंतपूरमचा १३५ किलोमीटरचा प्रवास लथीशाला झेपेल ना ,त्यात तिच्या प्रकृतीला काही गंभीर तर होणार नाही ना ह्याची त्यांना चिंता होती.

पण लथीशाच्या जिद्दीपुढे सर्व संकटांनी नमते घेतले. यूपीएससी उत्तीर्ण करण्याच्या तिच्या जिद्दीपुढे तिने सर्व संकटांवर मात केली आणि तिची परीक्षा अगदी व्यवस्थित पार पडली. दोन ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या बाजूला ठेवून तिने पेपर लिहिला.

द बेटर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत लथीशा म्हणते ,”परीक्षा काही फार अवघड नव्हती. गणिताचे कमी प्रश्न होते त्यामुळे मला फार अवघड गेले नाही. मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न केले आहेत. आता मला आशा आहे की ह्या परीक्षेत मी नक्कीच पास होईन.”

सिव्हिल सर्व्हिसेसच्या ह्या परीक्षेसाठी इतर उमेदवारांप्रमाणेच लथीशाने सुद्धा अगदी जीव ओतून मेहनत घेतली होती. परंतु तिच्या शारीरिक अवस्थेमुळे तिचा लढा इतरांपेक्षा जरा जास्तच अवघड होता.

 

Latheesha-ansari-inmarathi
The Better India

लथीशाला ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा किंवा ब्रिटल बोन डिसीज हा आजार आहे. हा एक दुर्मिळ जेनेटिक आजार आहे. ह्या आजारात माणसाची हाडे अतिशय नाजूक आणि कमकुवत होतात आणि अगदी सहज तुटू शकतात.

लथीशाची शारीरिक अवस्था म्हणूनच फारशी बरी नाही. तिचे रोजचे आयुष्य सुद्धा खूप अवघड आहे. अगदी साध्या साध्या हालचाली सुद्धा तिच्यासाठी घातक ठरू शकतात.

साध्या हॅन्डशेकने किंवा नुसते पलंगावर बसता बसता तिच्या कुठल्याही हाडांना फ्रॅक्चर होऊ शकते. असे होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.

तिचे कुठले हाड कधी मोडेल ह्याचा काहीच अंदाज लावता येत नसल्यामुळे हे टाळता येणे कठीण आहे. हा आजार बरा सुद्धा होऊ शकत नाही.

आजवर लथीशाला कमीत कमी १००० वेळा फ्रॅक्चरचे दुखणे सहन करावे लागले आहे.ह्या ही परिस्थितीत तिने शिक्षणाची कास सोडली नाही. मागच्याच वर्षी प्रिलिमिनरी परीक्षेच्या थोडेच दिवस आधी लथीशा पल्मनरी हायपरटेन्शन ह्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदान झाले.

 

Latheesha-Ansari-1 inmarathi
The Better India

ह्या आजारामुळेच तिला कायम ऑक्सिजन सिलिंडर आपल्याबरोबरच बाळगावे लागते. त्याच्याशिवाय ती व्यवस्थित श्वासोच्छवास करू शकत नाही. त्यामुळे मागच्या वर्षी दुर्दैवाने तिची खूप इच्छा असून देखील तिला परीक्षेला बसता आले नाही.

सव्वीस वर्षीय लथीशा म्हणते, “माझे हॉल तिकीट सुद्धा माझ्याकडे होते आणि मी परीक्षेसाठी अभ्यास सुद्धा केला होता. पण माझ्या श्वसनाच्या समस्येमुळे मला परीक्षा देता आली नाही.”

“ह्यामुळे आता ह्यावर्षी कसेही करून परीक्षेला बसायचेच आणि परीक्षा उत्तीर्ण व्हायचीच असे मी मनाशी पक्के ठरवले. माझी परीक्षा उत्तीर्ण करण्याची जिद्द आणखी मजबूत झाली. ह्या वर्षी परीक्षा देण्यासाठी मी आणखी जास्त मेहनत केली.”

तिची ही जिद्द बघून कोट्टायमचे जिल्हाधिकारी पी आर सुधीर बाबू ह्यांनी लथीशासाठी परीक्षा केंद्रावर तिच्या वर्गात र्पोर्टेबल ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले. ह्या ऑक्सिजन काँसंट्रेटरची किंमत जवळजवळ तीन लाख आहे.

इतके सगळे फ्रॅक्चर्स आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना सहन करून सुद्धा लथीशाला ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचे आहे. कारण तिला देशातील दिव्यांग लोकांसाठी काहीतरी भरीव कार्य करण्याची इच्छा आहे.

जर ती यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली तर नेमके काय करायचे हे तिने अजून ठरवले नाही.

पण दिव्यांग जनांसाठी देशात हिंडणे फिरणे सोपे जावे आणि त्यांना सगळीकडे सामावून घेतले जावे ह्यासाठी काही धोरणांमध्ये बदल घडवून आणण्याची तिची इच्छा आहे आणि जिद्द आहे. हेच तिचे एकमेव स्वप्न आहे.

“स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन दिव्यांग जनतेचे जीवन सोपे व्हावे ,हे करण्यासाठी माझ्यापुढे कुठलेही संकट उभे राहिले किंवा कितीही आव्हाने आली तरी मी थांबणार नाही.

कष्ट आणि मेहनत घेतल्यावर मध्येच सगळे सोडून देऊन थांबण्याचा प्रश्नच येत नाही. सतत पुढे चालत राहणे हेच माझे ध्येय आहे”, असे लथीशा म्हणते.

१९९३ साली जेव्हा लथीशाचा जन्म झाला तेव्हा ती खूप जास्त रडत होती. कारण जन्मतःच तिचे हाड फ्रॅक्चर झाले होते. तिचा जन्म होताच डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना तिच्या आजाराविषयी सांगितले.

हॉस्पिटलमधल्या लोकांनी तिच्या आईवडिलांना लथीशाची कशी काळजी घ्यायची ह्याच्या सूचना आणि ट्रेनिंग दिले. तिची हाडे अगदी सहज तुटू शकतात त्यामुळे तिला डोळ्यात तेल घालून जपण्याचे ट्रेनिंग तिच्या आईवडिलांनी घेतले.

जेव्हा काही कारणाने लथीशाचे हाड फ्रॅक्चर होते तेव्हा तिचे आईवडील तिला बँडेज बांधून ते बरे होईपर्यन्त काळजी घेतात. गेली दोन दशके लथीशाचे आयुष्य असेच आहे.

जरी लथीशाला तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे आणि इतर लहान मुलांप्रमाणे मुक्त बालपण अनुभवता आले नाही तरीही तिच्या आईवडिलांनी तिला शक्य तितके स्वातंत्र्य उपभोगू दिले आणि तिचे आयुष्य सोपे होईल ह्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले.

 

Latheesha-Ansari-4 inmarathi
The Better India

काही शाळांनी तर रिस्क नको म्हणून तिला प्रवेश देण्याचेच नाकारले. पण लथीशाला शिक्षणाची खूप आवड होती आणि तिच्यात शिकण्याची जिद्द होती. आपल्या मोठ्या ताईच्याच शाळेत जाऊन शिकण्याची तिची इच्छा होती.

अखेर खूप शोधाशोध केल्यानंतर लथीशाला एका शाळेत प्रवेश मिळाला.परंतु त्यांनी एक अट ठेवली की लथीशाबरोबर तिचे वडील रोज तिच्याबरोबर शाळेत थांबतील.

तिच्या वडिलांनी त्यांचा छोटासा व्यवसाय आणि लथीशाची शाळा ह्यात समतोल साधत दहा वर्ष लथीशाला शाळेत सोबत केली.

सुरुवातीपासूनच लथीशा अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिच्या शाळेने तिला अभ्यासात सहकार्य केले आणि तिच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण होतील ह्याची काळजी घेतली. शाळा संपल्यानंतर तिने कॉमर्समध्ये पदवी घेतली आणि त्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केले.

हे सर्व शिक्षण घेताना तिला व्हीलचेअर किंवा रॅम्प वगैरे सुद्धा उपलब्ध नव्हते. परंतु तिचे आईवडील, शिक्षक आणि वर्गमित्रांच्या सहकार्याने लथीशाने अशक्य ते शक्य करून दाखवले.

तिला नोट्स देणे, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात उचलून नेणे आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कायम प्रेरणा देणे हे सगळे तिच्या शिक्षक आणि वर्गमित्रांनी केले. तिच्या यशाचे श्रेय ती तिच्या आईवडील, शिक्षक व वर्गमित्रांना देखील देते.

 

Latheesha-Ansari-5 inmarathi
The Better India

एम कॉम केल्यानंतर तिने युपीएससी परीक्षा देण्यासाठी कोचिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला पण ती रोजचा सहा तासांचा प्रवास करू शकत नसल्याने ती रोज क्लासला बसू शकत नव्हती.

आठवड्यातून दोन वेळा ती क्लासला जायची आणि इतर दिवशी ती घरीच अभ्यास करायची. संपूर्ण वर्षभर तिने असा अभ्यास केला.

ती इतके प्रयत्न करत असून देखील तिच्यावरची संकटे काही कमी होण्याचे नाव घेत नव्हती. तिच्या पोटात एक गाठ असल्याचे डॉक्टरांनी निदान केले आणि तिच्या उपचारांचा खर्च आणखी वाढला. आणि तिच्या तब्येतीमुळे तिला अभ्यासातून ब्रेक घ्यावा लागला.

 

Latheesha-Ansari-3 inmarathi
The Better India

परंतु तिने नेटाने अभ्यास परत सुरु केला आणि जून मध्ये परीक्षा देखील दिली. तिच्या ह्या आजारामुळे होणाऱ्या वेदनांपासून लांब जाण्यासाठी लथीशा पेंटिंग, कीबोर्ड वाजवणे आणि मोटिव्हेशनल भाषणे देणे ह्या अवांतर आवडी देखील जोपासते.

तिच्या ह्या आजारामुळे तिला बाहेर जात येत नाही. घरात कोंडल्यासारखे झाल्यामुळे मानसिक अवस्था खराब होऊ शकते. परंतु मनात वाईट विचार येऊ नये म्हणून लथीशा छंद सुद्धा जोपासते.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून कीबोर्ड वाजवते. आणि पेंटिंगची तिला मनापासून आवड आहे.

लथीशाच्या ह्या जिद्दीमुळे तिला कॉमेडी उत्सवम ह्या मल्याळी टीव्ही कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. त्यातून मिळालेल्या मानधनातून तिने दहा दिव्यांग मुलांच्या शिक्षणात मदत केली.

 

Latheesha-Ansari-6 inmarathi
Dailyhunt

लथीशाच्या ह्या प्रवासात तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिच्या इतकीच जिद्द दाखवून तिला सर्व प्रकारचे साहाय्य केले आणि वेळोवेळी तिला प्रेरणा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्यच त्यांनी लथीशाच्या ध्येयासाठी वाहून घेतले आहे.

जरी त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसले तरीही त्यांनी लथीशाच्या उपचारांत काहीही कसूर केली नाही. म्हणूनच लथीशा स्वतःला भाग्यवान मानते कारण तिला असे आईवडील मिळाले आहेत.

 

Latheesha-Ansari-2 inmarathi
The Better India

ती म्हणते तिच्या आईवडिलांसारखे जगात दुसरे कोणीच नाही आणि आईवडील सुद्धा लथीशाला एक ओझे न समजता तिला परमेश्वराचा आशीर्वाद मानतात आणि त्यांना शक्य होईल त्या सगळ्या गोष्टी लथीशासाठी करतात.

लथीशाचा प्रवास खूप खडतर आहे. पण तिची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आयुष्यात सगळे संपले असे मानून हार मानणाऱ्यांसाठी तर लथीशा एक आदर्श आहे. तिचा नेव्हर से डाय ऍटिट्यूड तिला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल ह्यात शंका नाही.

लथीशाला पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?