Site icon InMarathi

अकरावी प्रवेश – ही आहेत आवश्यक असणारी, महत्वाची १० कागदपत्रे!

Admission Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

दहावीच्या परीक्षा झाल्याकी सगळ्यांना वेध लागतात ते सुट्टीचे. इंटरनेट उघडून वेगवेगळे पर्याय शोधले जातात आणि एखादे छानसे ठिकाण पसंत करून निवांतपणे सुट्टी घालवली जाते.

दहावीच्या वर्षात केलेला खूप अभ्यास आणि परीक्षेचा ताण यावर मात करण्यासाठीच तर सुट्टीचे आयोजन केले जाते.

यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे ना वर्षभर शाळेचे वर्ग भरले ना परिक्षा घेण्यात आली. शेवटपर्यंत परिक्षा होणार की नाही या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी परिक्षेविनाच दहावीची गुणपत्रिका हाती देण्यात आली.

याचाच परिणाम म्हणजे अकरावी प्रवेशाचे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दहावीचा निकाल हाती आल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे.

कोणाला सायन्स तर कोणाला कॉमर्सला, तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग जाण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. विविध कोर्सेस साठी पण त्याच वेळेस प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

 

Jagran Josh

 

यासाठी सर्वात महत्वाची असतात ती वेगवेगळी कागदपत्रे.

सर्वात प्रथम हे विचारात घेणे आवश्यक आहे की तुम्ही खुल्या वर्गातून प्रवेश घेणार आहात की कोणत्याही प्रकारच्या आरक्षित कोट्यातून?

भारतीय संविधान आणि राज्यसरकार यांनी काही वर्गासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. जसे काही जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, इत्यादी. यांना कायद्याने काही टक्के आरक्षण दिलेले आहे.

तसेच दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सेनानी व्यक्तींचे पाल्य, खेळाडू यांच्यासाठी सुद्धा काही जागा आरक्षित असतात. आरक्षित जागांसाठी काही जास्त कागदपत्रांची जरुरी असते.

सायन्स, विज्ञान आणि कलाशाखा इथे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१) जन्म दाखला

नगर अथवा महानगरपालिकेचा जन्म दाखला.

२) शाळा सोडल्याचा दाखला.  : (शाळेतून मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असलेला दाखला.)

३) शिधापत्रिका

४) वीजबिल

५) ओळखपत्र फोटोसहित

६) आधार कार्ड

७) १० वीचे सर्टिफिकेट

८ ) १० ची मार्कलिस्ट : (ओरिजिनल मार्कलिस्ट आणि साक्षांकित प्रत)

९) विहित नमुन्यातील अर्ज

१०) ओरिजिनल हॉल तिकीट

 

 

मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जर जागा शिल्लक असतील तर तेथे बिगर महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रातील असेल तर खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

१) जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट

२) विद्यार्थी १८ वर्षे वय पूर्ण न केलेला असल्यास वडिलांचे डोमीसाईल सर्टिफिकेट (अधिवासाचा दाखला)आवश्यक.

३) वीजबिल/फोटोसहित ओळखपत्र/शिधापत्रिका/प्रतिज्ञापत्र.

विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रातील नसेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१) जन्मदाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट/

२) शिधापत्रिका/वीजबिल/ओळखपत्र/प्रतिज्ञापत्र.

३) विद्यार्थी १८ वर्षाच्या आतील असेल तर वडिलांचे डोमीसाईल सर्टिफिकेट.

४) सलग १० वर्षे महाराष्ट्रात वास्तवास असल्याचा पुरावा. यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

(१): सलग दहा वर्षांचे बँक पासबुक ओरिजिनल आणि झेरॉक्स.

(२): सलग दहा वर्षांचे वीजबिल

(३): सलग दहा वर्षांची विद्यार्थ्याची शाळेतील गुणपत्रिका.

 

New Indian Express

 

उत्पन्नाचा दाखला

विविध अभ्यासक्रमासाठी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी योजनेतून काही आर्थिक सवलती मिळतात.

यासाठी चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून आणणे. उत्पन्न दाखला अतिशय महत्वाचा असतो. हा दाखला मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो. ह्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात.

(१) शिधापत्रिका/वीजबिल/पॅनकार्ड/मतदार ओळखपत्र/प्रतिज्ञापत्र.

(२) विद्यार्थी शिकत असेल तर शाळेतून बोनाफाईड सर्टिफिकेट आणणे.

(३) विद्यार्थी नोकरी करत असेल तर फॉर्म १६ आवश्यक आहे.

(४) विद्यार्थी स्वयंरोजगार करीत असेल आणि इन्कमटॅक्स रिटर्न भरत नसेल तर तर स्थानिक नगरसेवकाकडून उत्पन्नाचा दाखला घेणे तसेच अर्जावर तीन साक्षीदारांच्या सह्या व त्यांच्या रेशनकार्डाची झेरॉक्स जोडणे आवश्यक.

 

blog.ipleaders.in

 

जात प्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र

काही जाती आणि जमाती यांना सरकारकडून शैक्षणिक आरक्षण मिळते.

यासाठी विहित नमुन्यात अर्ज करून तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रावरून हा दाखल घेण्यात येतो. या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला व वास्तव्याचा दाखल जोडावा लागतो.

हा अर्ज वर्षभरात केव्हाही मिळतो. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आधीच काढून ठेवणे जात सोयीचे ठरते.

जातप्रमाणपत्र मिळाल्यावर त्याची पडताळणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सरकारने १५ जातपडताळणी समित्या नेमल्या आहेत. या समितीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो.

या अर्जा सोबत मूळ जात प्रमाणपत्र व त्याची साक्षांकित प्रत तसेच शाळा सोडल्याचा दाखला आणि वडील/आजोबा/काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र ही कागदपत्रे जोडावी लागतात.

अर्जदाराची मुलाखत घेऊन सणवार, चालीरीती, भाषा इत्यादीबद्दल प्रश्न विचारून खात्री केली जाते. एकंदरीत जात प्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र हे आधीच घेऊन ठेवले तर धावपळ आणि वेळ वाचेल.

 

DNA India

 

अनुसूचित जमाती

विद्यार्थी अनुसूचित जमातीतील असेल तर ते प्रमाणपत्र त्याला आदिवासी विभागातील यंत्रणेकडून मिळवता येते. राज्यात ६ विभागीय समित्या कार्यरत आहेत.

हे प्रमाणपत्र आधीच घेऊन ठेवणे श्रेयस्कर. याशिवाय खेळाडूंसाठी राखीव कोटा असतो.

खेळाडू जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय, झोनल किंवा नॅशनल लेव्हलवर खेळलेला असेल आणि त्याने प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळवला असेल तर ते सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे तसेच ते सर्टिफिकेट District sports officer किंवा Deputy director sports यांच्याकडून साक्षांकित करून घ्यावे लागते.

कला विभागात आरक्षित जागा असेल तर अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची परीक्षा/स्पर्धा उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागेल.

विद्यार्थी दिव्यांग असेल तर तसे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जनकडून घ्यावे लागेल.

 

Deccan Herald

अकरावी प्रवेशासाठी लागणारी इतक्याप्रकारची कागदपत्रे दहावीची परीक्षा संपताच मिळवायला सुरवात केली तर ऐनवेळेस धावपळ होणार नाही.

काही प्रमाणपत्रांसाठी सरकारी कार्यालयात किंवा तहसीलदार कचेरीत खूप खेटे मारावे लागतात. ऐनवेळी प्रमाणपत्र मिळाले नाहीतर मनस्ताप होतो आणि प्रवेशप्रक्रिया रखडते.

तेव्हा सर्व कागदपत्रे वेळेतच जमा करून त्याची स्वतंत्र फाईल बनवून ठेवणे केव्हाही योग्य व कमी त्रासाचे आहे. शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version