आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मराठीत एक म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार…ही म्हण ऐकायला जरी छान वाटली तरी मधुमेहींच्या पोटात मात्र भीतीचा गोळा आणते. मधुमेह, म्हणजेच डायबिटीस हा असा रोग आहे ज्याने भल्या-भल्यांना जेरीस आणलंय.
बरेचदा, वैद्यकशास्त्रात ज्याला “सायलेंट किलर” असे म्हंटले जाते तो हा मधुमेह सर्वात कुणाची गोची करत असेल तर ती म्हणजे अस्सल खवय्यांची!
पंचपक्वान्नाने भरलेले ताट समोर आहे पण स्पर्श सुद्धा करता येत नाही, अशी अवस्था अनेक मधुमेहींची असते. वर्षानुवर्षे गोडापासून वंचित राहिलेले लोक “…अशी अवस्था वैऱ्यावर पण येऊ देऊ नकोस रे देवा” अशी प्रार्थना करतात.
मधुमेहाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. अति गोड खाल्ल्याने मधुमेह होतो, हा जसा एक प्रचलित समज आहे तसेच फक्त साखर खाऊनच मधुमेह वाढतो असाही एक प्रचलित समज ऐकायला मिळतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : रमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण?
==
आजच्या लेखात आपण या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत. जाणून घेऊया मधुमेह नक्की असतो तरी काय!
मधुमेहाची सुरुवात चयापचयाच्या प्रक्रियेतल्या बिघाडाने होते. आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचे एक हार्मोन असते. इन्सुलिनचे काम चयापचयाच्या प्रक्रियेत अन्नावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा तयार करणे असते.
हेच इन्सुलिन रक्तातील शर्करेचे प्रमाण देखील नियंत्रणात ठेवते.
शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियांमध्ये इन्सुलिन न पोहोचल्यामुळे, रक्तातील शर्करेची अर्थात साखरेची पातळी वाढते. यालाच ‘मधुमेह’ असे म्हणतात.
रक्तातील अतिरिक्त शर्करेमुळे डोळे, हृदय, किडनी यांवर विपरीत परिणाम होतो. जर मधुमेहाची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपाय नाही केले तर अत्यंत जटील विकारांना सामोरे जावे लागू शकते, किंवा प्रसंगी मृत्यूदेखील ओढवू शकतो.
मधुमेहाची दोन प्रकारांत विभागणी होते. पहिल्या प्रकारात (टाईप १) मोडणारा मधुमेह हा वांशिक असतो तर दुसऱ्या प्रकारात (टाईप २) मोडणारा मधुमेह हा अनियमित आणि चुकीच्या जीवनशैलीच्या आचरणामुळे जडतो.
शहरीकरणामुळे आणि बाजारात उपलब्ध ‘फास्ट फूड’ मुळे आजकाल परंपरागत खाण्याच्या सवयींपासून आपण सगळेच दुरावत चाललो आहोत. त्यातच संगणकीकरणामुळे शारीरिक श्रम कमी झाले आहेत.
परिणामी, वाढणारे वजन, कृत्रिम आणि हानिकारक अन्न-पदार्थांचे सेवन, अपुरी झोप मधुमेहाला निमंत्रण ठरत आहेत. मधुमेह जडला की तो बरा होणे तसे जवळपास दुरापास्त असते.
पण तरीही योग्य आणि पुरेसा व्यायाम, पुरेशी झोप आणि सर्वात महत्वाचं योग्य आहाराच्या सेवनाने तो नियंत्रणात नक्की ठेवता येतो.
मधुमेहाची लक्षणे जसे – अति तहान लागणे, सतत लघवीला लागणे, दृष्टी अधू होणे, चिडचिड होणे, जखम भरायला वेळ लागणे इ. दिसू लागताच रक्तातील शर्करेची तपासणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार आणि विहार सर्वप्रथम नियमित करावा.
औषधोपचारांची जोड देऊन, रक्तशर्करेवर नियंत्रण मिळवणे तसेच इतर तपासण्या करून डोळे, हृदय आणि प्रामुख्याने किडन्यांवर मधुमेहाचा परिणाम कितपत झाला आहे याची तपासणी करावी.
शक्य असल्यास आहारतज्ज्ञांच्या मदतीने आहाराची आखणी करावी.
बऱ्याच वेळा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे खर्चिक वाटते; अनेक वेळा ते परवडले तरीही जाता-येता कुठचा पदार्थ खावा किंवा खाऊ नये हे विचारणे शक्य नसते. आंब्याच्या मोसमात तर मधुमेहींची अवस्था अजूनच बिकट होते.
आंब्यासारखे ठराविक हंगामात होणारे फळ खाता येऊ नये, किंवा आमरसावर ताव मारता येऊ नये यासारखे दुःख नाही.
त्यामुळेच, आंब्याच्या मोसमात काय केले म्हणजे तुम्हाला आंबे खाण्याचा आनंद लुटता येईल आणि मधुमेहावर नियंत्रणही ठेवता येईल ते जाणून घेऊ.
१. आंबा, मधुमेह आणि भ्रम
बऱ्याच लोकांचा असा भ्रम असतो की आंब्यासारख्या फळात नैसर्गिक शर्करा असते, ज्यामुळे मधुमेह वाढत नाही. साफ चूक! तुम्ही जर अशाच एखाद्या भ्रमात वावरत असाल तर सर्वप्रथम हा गैरसमज दूर करा.
आंबा किंवा कुठच्याही शर्करायुक्त फळांचे अतिसेवन रक्तशर्करेचे प्रमाण वाढवतेच. आंब्यामधील पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट) रक्तशर्करा वाढवतात. तसेच आंब्यामध्ये उष्मांकाचे (कॅलरी) प्रमाणही जास्त असते.
वापर न झालेले उष्मांक शरीरात चरबीच्या (फॅट) स्वरूपात साठून राहतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका दुप्पट होतो. प्रत्येक पदार्थाला एक “ग्लायसेमिक इंडेक्स” असतो जो तो पदार्थ सेवन केल्यापासून किती वेळात त्याचे पचन होऊन शर्करेत रूपांतर होईल याची माहिती देतो.
मधुमेहींना पंचावन्न (५५) किंवा त्यापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खायला सांगितले जातात. ज्यामुळे पचनाची, चयापचयाची आणि एकूणच कार्बोहायड्रेटचे शर्करेत रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावेल.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स एकावन्न (५१) असतो. त्यामुळे, आंबा खाणे मधुमेहींसाठी म्हंटलं तर धोकादायक नाही.
कारण, आंब्यातील तंतूमय भाग (फायबर) रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.
परंतु बऱ्याचदा, घरी किंवा दुकानात मिळणाऱ्या आमरसात, तसेच मिल्कशेकमध्ये गोडी वाढविण्यासाठी वरून अतिरिक्त साखर घातली जाते, ज्यामुळे धोक्याची पातळी अधिक वाढते. सारांश, आंबा खा पण एकदम प्रमाणात!
२. अति तेथे माती…
एखाद्या पदार्थाचे अतिसेवन हेही विषकारक असते असे आयुर्वेद सांगते. त्यामुळे एकाच वेळी भरमसाठ आंबे खाण्यापेक्षा दोन दिवसातून एक आंबा खाणे श्रेयस्कर!
==
हे ही वाचा : “डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
==
त्यातही, वर म्हंटल्याप्रमाणे आमरस, मिल्कशेक सेवन करताना त्यात वरून साखर घातलेली नाही ना, याची खात्री करावी. तसेच बदामी किंवा कर्नाटकचा आंबा किंचित आंबट असतो.
आंबा जितका आंबट तितका त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी. तसेच अति पिकलेला आंबा टाळावा, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स त्याच्या पिकण्याबरोबर वाढत असतो.
३. वैद्यकीय सल्ला…मधुमेहाशी मैत्री
म्हंटलं तर मधुमेह अत्यंत धोकादायक वळण घेऊ शकतो आणि प्रसंगी स्वर्गाचे दारही दाखवू शकतो. त्यामुळे आंबाच नाही तर कुठच्याही पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी त्याची माहिती असू द्या.
प्रत्येक वेळी, प्रत्येक माणूस कॅलरींचे प्रमाण, कार्बोहायड्रेटचे प्रमाण, ग्लायसेमिक इंडेक्स इ. तांत्रिक बाबी लक्षात ठेवून जगू शकत नाही. पण मग म्हंटल्याप्रमाणे अतिशयोक्ती टाळा.
शक्य असल्यास वैद्यकीय किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहाराची आखणी करा.
लक्षात ठेवा, मधुमेह जडलाय हे सत्य पचवले आणि त्याच्याशी मैत्री केलीत तर आयुष्य अगदी निवांतपणे जगता येईल.
तेंव्हा आहार-विहाराची पथ्यं पाळा, औषधे आणि त्यांच्या मात्रा चुकवू नका, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या, मग आंबाच काय तर मधुमेहही “आंबट” वाटणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : कोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”…? हे वाचा – गैरसमज दूर करा…!
==
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.