Site icon InMarathi

१२ व्या शतकातील पुरोगामी, सेक्युलर सम्राट: चंगेज खान – भाग ३

changez khan featured2 inmarathi

war history online

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : सूरज उदगीरकर

===

ह्या आधीच भाग वाचा: जगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २

===

‘खान’ हे एक टिपिकल मुस्लिम नाव आहे तसेच “मोगल” हा “मंगोल” ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्यामुळे चंगेज खान मुस्लिम वाटणे साहजिक आहे.

वास्तविक चंगेज हा देखील एक अपभ्रत शब्द आहे. तिमूजीनला कर्तबगारीची बळावर मंगोलियामध्ये ‘चिंगीस हान’ म्हणवलं जात होतं.

पारंपरिक मँगोलीअन उघियुर भाषेत चिंगीस म्हणजे सर्वशक्तीशाली आणि हान म्हणजे राजा!

पुढे ह्यांचे उच्चार बदलले, आपण म्हणतो चंगेज खान आणि जग म्हणतं गेंघिस खान. इस्लाममधील खान हे नाव देखील ‘हान’चा अपभ्रंश आहे.

मंगोल मध्य आशियात गेले, इस्लाम स्वीकारला आणि ‘हान’चं ‘खान’ झालं!

 

झहिरुद्दीन मोहम्मद बाबर स्वतःला मोगल म्हणवून घेत असे कारण बाबर मुळात मंगोलिअन होताच. मोगल हा शब्द भारत-पाकिस्तानात ‘मुघल’ बनला.

बाबर हा अमीर तैमूर(मूळ तुर्की शब्द तमीर. उच्चार : तेम्’येर), ज्याला इंग्रजीत टॅमरलेन म्हणतात आणि आपल्याकडे सर्रास तैमूरलंग म्हणतात त्याचा थेट वंशज.

खापर-खापर पणतू. तैमूर स्वतःला चंगेजचा वंशज म्हणत असे, तसा तो दुरून होता देखील आणि बाबरची आई हि चंगेजच्या चगताई ह्या मुलाकडून थेट दहावी वंशज.

साहजिक मुघल बारीक डोळ्यांचे सडपातळ गोरे गोरे मंगोलीअन होते. पण मुस्लिम.

चंगेज खान मुस्लिम नव्हता. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला मुस्लिम आणि इस्लाम कशाशी खातात हे देखील ठाऊक नव्हतं. तो मंगोलीअन टोळीवाला होता.

हे लोक आभाळाला देव मानत आणि आभाळाला उघियुर भाषेत ‘टेंग्री’ म्हणतात. तात्पर्य चंगेज हा एक टेंग्रीस्ट होता.

हे सगळं सांगण्याचं कारण असं की बहुतांश लोक चंगेज मुस्लिम असल्याचं समजून ह्या एकमेव कारणास्तव एकतर त्याच्याशी टोकाची नफरत करतात किंवा प्रचंड स्तुती करतात.

चंगेज खान म्हणजे एक क्रूर मुस्लिम आक्रमक इतकीच त्याची ओळख बनून राहिलीय. जी अर्धी चूक आहे!

चंगेजच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत.

स्वतःच्या बायकोला पळवणाऱ्या माणसाला क्रूरपणे खतम करणाऱ्या चंगेजने बायकोचं मूल मात्र त्या माणसाचं असू शकेल हे माहित असून त्याला बापाचं प्रेम दिलं!

ही बाराव्या शतकातली गोष्ट आहे म्हणून विशेष आहे. चंगेज खान मध्य आशियायी सुलतानांप्रमाणे धार्मिक उन्मादी नव्हता.

अमीर तैमूर, बाबर, घियासुद्दीन तुघलक, मोहम्मद घौरी, मोहम्मद बिन कासीम इत्यादी आक्रमकांसारखा तो धर्माची झालर डोक्यावर मिरवत नसे.

उलट चंगेज चक्क सर्वधर्म समभाव मानत असे. अर्थात चंगेज खान ह्या सर्वांपेक्षा क्रूर आणि तुलनेने जास्त मोठा आक्रमक होता. पण त्याच्या आक्रमकतेमध्ये धर्म कुठेच नव्हता.

 

 

चंगेज खानाच्या फौजांनी धर्मांतरे कधीच घडवून आणली नाहीत. उलट मध्य आशियात आक्रमक बनून गेलेल्या मंगोल सरदारांनी आणि चंगेजच्या वंशजांनी पुढे जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला.

उझबेगिस्तानच्या फारघना प्रांतातील बाबर, आणि समरकंदमध्ये दफन होणारा अमीर तैमूर ही उदाहरणे. मंगोलीयाचे बोर्जीगीन आणि तुर्क एकत्र येऊन बरलास नावाचा जो वंश बनला, त्यातलेच हे दोघे.

सुरुवातीला ख्रिश्चन आणि मुसलमानांना ‘गुलाम’ म्हणून संबोधणाऱ्या चंगेजने पुढे बुद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरु दरबारी बसवले आणि त्यांच्याकडून तो प्रत्येक धर्माच्या शिकवणी शिकला.

चंगेजच्या राज्यात प्रत्येकाला हवा तो धर्म स्वीकारायची मुभा होती. कुठलाही टॅक्स न भरता!

जमुखा ह्या प्राणप्रिय मित्रा सोबत चंगेजने वाकडं घेतलं होतं, का तर आपल्या सैन्यात लोकांना बढती किंवा पदे जन्मनियाह उच्च-नीचते मिळण्यापेक्षा कामगिरीचा निकष असावा असा त्याचा आग्रह होता.

साधारण इसवी सन ११९०-१२०० चा काळ हा. हि अशी विचारसरणी आपल्याकडे २०१६ मध्येदेखील विरळ आहे!

तोच जमुखा जेंव्हा दगाबाज निघाला तेंव्हा चंगेज त्याला मोठ्या मनाने माफ करायला तयार होता. जमुखाला पकडून देणाऱ्या त्याच्या सरदारांना त्याने वेळ आल्यावर धोका देणारे दगाबाज म्हणून मृत्यूची शिक्षा देखील दिली.

 

 

चंगेज अशिक्षित होता. त्याला लिहिता वाचता येत नसे.

राज्याचा विस्तार करायचा असेल आणि काळाच्या सोबत चालायचं असेल तर शिक्षणावर भर असला पाहिजे हे ओळखून त्याने उघियुर आणि पारंपरिक मंगोल भाषेची लिपी बनवून घेतली.

उघियुर-मंगोल भाषा उभी लिहितात, डावी कडून उजवीकडे किंवा उर्दूप्रमाणे उजवीकडून डावीकडे नाही तर वरून खाली. चंगेज कलाकारांना आणि साहित्यिकांना मारायचा नाही.

युद्धकैदी बनवायचा नाही. तो त्यांचा वापर मंगोल लोकांच्या प्रगतीसाठी करून घेत असे.

चीनमधल्या जुरचेन राजवटीशी लढताना पकडलेल्या चिनी शास्त्रज्ञाकडून तो दारुगोळा वापरायला शिकला, औषधांचा वापर शिकला.

मंगोल टोळीवाले व्यापार कधीही करत नसत. ते व्यापाऱ्यांना लुटत. चंगेजच्या नेतृत्वाखाली मंगोल एक झाले, समाज बनले. आणि त्यांनी व्यापार सुरु केला.

पूर्व आशियामधून युरोप आणि माध्यशियात व्यापार करण्यासाठी चिन्यांनी जो सिल्क रूट बनवला त्याचा चंगेजने पुरेपूर उपयोग केला. व्यापार आणि लष्करी कारवाया दोहोंसाठी!

त्याकाळी स्त्रियांना फक्त जयदाद समजले जात असे. फारसे हक्क स्त्रियांना नसायचे. चंगेजने स्त्रियांना पुरुषांना घटस्फोट द्यायची मुभा दिली. शिक्षणाचे अधिकार दिले.

शिवाय दुसरे लग्न करण्याची देखील सूट दिली.

घोडेस्वार तिरंदाज ही चंगेजची आणि मंगोल सैन्याची ओळख होती. शत्रूला मारायचे असेल तर शक्यतो त्याला जवळ येऊ द्यायचे नाही ही त्यामागची दृष्टी होती.

 

 

अशीच दूरदृष्टी चंगेजने अजून बऱ्याच गोष्टीत दाखवली, आश्चर्य वाटेल पण जगातली सर्वात पहिली टपाल आणि कुरिअर व्यवस्था ही चंगेजची देण आहे!

मोठे राज्य सांभाळायचे झाले तर निरोप आणि सामान कमीत कमी वेळेत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले पाहिजेत हे जाणून चंगेजने पूर्ण राज्यभरात टपालव्यवस्था चालू केली होती.

जागोजाग त्याने लहानसे तळ बनवून तिथे घोडेस्वार नेमले होते.

निरोप घेऊन निघालेला घोडेस्वार तुफान दौडत एका तळावर पोचला की थांबत असे आणि नवा ताज्या दमाचा घोडेस्वार पुन्हा तुफान वेगात निरोप घेऊन पुढच्या तळाकडे निघे.

सन १२००!!! चंगेजला मध्येच अमरत्व मिळवण्याचे वेध लागले होते.

त्याच्या चिनी गुरुला त्याने ही गोष्ट बोलून दाखवली तेंव्हा त्याने चंगेजला एक विचित्र सल्ला दिला की तू भरपूर लग्न कर, अनेक स्त्रियांशी रत हो. तुझा वंश जितका वाढेल तितका तू इतिहासात अमर होशील.

त्याचा परिणाम म्हणजे आज जगात प्रत्येक २०० पैकी एक माणूस हा थेट चंगेजचे गुणसूत्र घेऊन वावरतोय!

हे प्रमाण आशियात दुप्पट होते. चंगेजने अनेक लग्ने केली पण त्याची राणी नेहमी बोर्ते खातूनच राहिली!

४० लाख लोकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जीव घेणारा, पूर्व आणि मध्य अशियातली भली भली राज्ये आणि राजे धुळीत मिळवणारा, तुर्की-पारशी आणि अफगाणी इस्लामी राजवटी पालथ्या घालणारा,

एका ५० – १००  लोकांच्या टोळीपासून सुरु करून पुढे पूर्वेला जपानपासून ते पश्चिमेला पोलंडपर्यंत पसरलेल्या(मृत्यूनंतर ह्याचाही दुप्पट),

राज्याचा जगातला सर्वात ताकदवान, सर्वशक्तीशाली, महत्वाकांक्षी चंगेज दिसायला कसा होता ते मात्र कोणालाच माहित नाही!

 

 

कसलेहि पुरावे उपलब्ध नाहीत. ऑगस्ट १२२७ मध्ये चंगेज मृत्यूपंथाला लागला. कोणी म्हणतात लढाईत जखमी झाला, कोणी म्हणतात घोड्यावरून पडला, कोणी म्हणतात आजार झाला.

इजिप्तचे राजे पिरॅमिड बनवायचे, इस्लामी राजे मोठमोठे थडगे बांधायचे, आपल्याकडे समाध्या असतात!

पण जेव्हा चंगेज मृत्यूशय्येवर होता तेंव्हा त्याने कठोर शब्दात बजावले होते की तो कुठे गाडला जातोय हे कोणालाही कळता कामा नये. त्याला आता कायमचं झोपायचं आहे!

कुठली समाधी नको, थडगे नको, खाणा-खुणा नकोत! ह्या त्याच्या इच्छे नुसार चंगेजला मंगोलियाच्या खेन्ती पर्वत रांगांत कुठ्ल्याशा कोपऱ्यात दफन करण्यात आलंय.

नेमकं कुठे? माहित नाही…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version