Site icon InMarathi

काँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)

modi-manmohan-singh-marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पहिल्या भागाची लिंक: मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)

मनमोहन सिंह हे दुसर्यांदा पूर्वीपेक्षा जास्त खासदारांचे पाठबळ घेऊन पंतप्रधान झालेले असले तरी ते सरकारचे प्रमुख होते. पण संघटना पूर्णपणे गांधींच्या नियंत्रणाखाली होती. राहूल व सोनिया हेच याबाबतीत अंतिम निर्णयकर्ते होते. आणि याचाच फटका मनमोहन सिंह यांना बलोचिस्तानचा उल्लेख संयुक्त निवेदनात करण्यास मान्यता दिली म्हणून बसला. काँग्रेस ने आपले हात वर केल्यानंतर त्यांना त्यापासून मागे हटावे लागले. बलोचिस्तानचा उल्लेख ही कुटनितीक घोडचूक असली तरी एकदा संयुक्त निवेदनात मान्य केल्यावर त्यावरून मागे हटणे ही त्याहूनही मोठी घोडचूक होती. कारण यामुळे जगात भारताच्या याबाबतीत असलेल्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागले होते.

यावरून त्यावेळी विरोधात असणारी भाजपा आणि तिच्या नेत्यांनी मात्र या चुकीचा पूरेपूर लाभ घेऊन जनमत सरकार विरोधात तापवले होते. “भारत – पाकिस्तान यांच्यातील जे काही प्रश्न असतील ते चर्चा करून सोडविण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही आणि त्यामुळे जे काही प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक ही दोघांनाही आपापसात बसून बोलूनच करावी लागणार आहे” या सर्व वास्तवाची पूर्णपणे कल्पना असूनही भाजपने तेव्हा निव्वळ राजकीय लाभासाठी पाकिस्तान विरोधी भुमिका घेतली होती. ही भूमिका इतकी ताठर होती की मनमोहन सिंह आणि काँग्रेस पक्षही त्या दबावास पूर्णपणे बळी पडला आणि यानंतर मग त्यांनी शांतता चर्चेसाठी फारशी उत्सुकता कधीही दर्शवली नाही.

कश्मीरात दहशतवादी यांचे सैन्यावर हल्ले होतच राहीले. जे की भारतीय आधुनिक राज्य निर्मितीपासूनच सुरू आहेत आणि त्याला विशिष्ट राजकीय, सामाजिक, धार्मिक व भौगोलिक संदर्भही आहेत. आणि कुणीही आला तरी ते थांबणार नाहीत. (हे आता तेव्हा मनमोहन सिंह यांना दोष देणाऱ्यांच्या देखील लक्षात आलेच असेल.) मनमोहन सिंह याबाबतीत “काहीच न करु शकल्यामुळे” नाकर्ते व दुर्बल ठरवले गेले. पण वास्तविकता अशी नव्हती.

2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रीपदावर पी.चिंदबरम यांच्यासारखा कार्यक्षम माणूस आणून अंतर्गत सुरक्षा मजबुत करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली होती. 2008 नंतरच्या सात वर्षात म्हणजे 2014 पर्यंत आणि तेथून आजपर्यंत तरी भारतात हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे. काही तुरळक हल्ले वगळता मोठा दहशतवादी हल्ला याकाळात भारताच्या मुख्यभूमीवर झालेला नव्हता. पण 2008 पूर्वी मात्र दर दिड दोन वर्षांनी भारताचा अंतर्गत भाग साखळी बाँम्बस्फोटांनी हादरत असे. पाकिस्तानी दहशतवादी असे हल्ले यशस्वीपणे आणि सहजपणे घडवून आणत असत. त्याला या सात वर्षात चांगलाच आळा बसला होता. पण याच सुमारास पाकिस्तानातील जनरल कयानी या सैन्य नेतृत्वाने भारतविरोधी भुमिका स्विकारली आणि कश्मीरातील नियंत्रण रेषेवर मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वारंवार घडू लागल्या – ज्यात आपले सैनिकही मृत्यूमुखी पडू लागले.

वाहीन्यावरील त्यांची शवे बघून जनमत आधिकाधिक पाकिस्तानी विरोधी होऊ लागले होते. पाकिस्तानवर हल्ला करावा, युद्ध करून एकदाच काय ते सोक्षमोक्ष लावावा, एका शिराच्या बदल्यात दहा शिर कापून आणावेत असले उपाय म्हणजे मजबुत व जोरदार उत्तर म्हणून वाहिन्यांनी व विरोधी पक्ष असलेल्या भाजपांनी लोकांच्या मनावर ठसवून टाकले. खुद्द काँग्रेसपक्ष देखील यास बळी पडला आणि त्याने सुद्धा या उन्मादात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन आपले पाकिस्तानी धोरण अधिकच कठोर केले…! केंद्रीय मंत्री ,काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते पाकिस्तान विरोधी वक्तवे देवू लागले होते पण तोपर्यंत जनमत बदलले होते.

याच सुमारास एकापाठोपाठ एक घोटाळे उघड होण्यास सुरू झाले आणि काँग्रेस सरकारची प्रतिमा जनमाणसात अधिकच खालावली.

स्रोत

 

लोकांनी सरकार बदलण्याचा निर्णय केला होता. आणि याच वेळी नरेन्द्र मोदी यांनीही पाकिस्तानविषयी ठाम आणि कठोर भुमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडण्यास सुरूवात केली होती. विरोधात असताना बोलताना मर्यादा येत नसतात याचाच लाभ घेत मोदी यांनी मनमोहन सिंग यांना या आघाडीवर निष्प्रभ करून टाकले होते. यासाठी गुजरात दंगली नंतर काँग्रेस वा तिच्या सहकारी लोकांनी मोदींची मुसलमानांचा शत्रू, दंगलखोर, हिंदू कट्टरवादी अशी प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण केली होती तिचाही लाभ मोदीना भरपूर मिळाला. पाकिस्तानला धडा मोदीच शिकवू शकतात असा विश्वास आता लोकांना वाटू लागला होता. आता याबाबतीत त्यांच्या आकांक्षा मोदीभोवती केंद्रित होऊ लागल्या होत्या.

आणि अपेक्षेप्रमाणे मोदी मोठ्या बहूमताने पंतप्रधान पदी आरुढही झाले. पण शपथ घेत असतानाच त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान यांना बोलावून सर्व भारतीयांना जोरदार धक्का दिला.

मोदी सरकारच्या पाकिस्तान विषयक भुमिकेची समिक्षा करण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मूलभूत समस्या काय आहेत? त्यावरील त्यांचे कशाप्रकारचे मतभेद आहेत? या मतभेदांचे स्वरुप बघता ह्या समस्या खरंच सुटतील काय? समस्या सोडविण्यासाठी दोन्ही देशांना सर्वप्रथम काय काय करावे? या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास धुंडाळावी लागतील. भारत व पाकिस्तान यांच शत्रूत्व हे त्यांच्या निर्मितीतच दडलेले आहे. फाळणीनंतर दोन्ही बाजूकडून झालेला रक्तपात हा याच शत्रूत्वाची दृष्य परिणिती होती. कश्मीरमध्ये झालेल्या सैन्य झडपेने त्यात अजूनच भर घातली होती.

पुढील भागात यातील एक एक समस्या व त्यांच्या सोडवणूकीतील अडचणी यांचा उहापोह आपण करणार आहोत.

पुढील भागाची लिंक: कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version