ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष श्री. जॉन बेले यांची भारत भेट : गोष्ट छोटी पण डोंगराएवढी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : अजय घाटे
===
महाराष्ट्र सरकारचे पाहुणे म्हणून चार दिवसाच्या भेटीवर ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष श्री. जॉन बेले आणि ऑस्कर अकादमीच्या गव्हर्नर असलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती कॅरेल लिटिलटन भारत भेटीवर आले होते.
निमित्त होते २६ मे २०१९ रोजी साजरा होणारा “56वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा- वर्ष २०१९”
भेट छोटी होती पण भारतीय चित्रपट सृष्टीसाठी तितकीच महत्वाची.
एखाद्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळणे म्हणजे जागतिक सन्मानाचा विषय मानला जातो. नुसते नामांकन जरी प्राप्त झाले तरी पुरस्कार प्राप्ती झाल्याचा आनंद अनेकांना होतो.
तर अश्या या पुरस्काराची भुरळ आपल्या येथील होतकरू, दिग्गज चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांना देखील नेहमीच पडत आली आहे.
१९५७साली ऑस्करसाठी पाठविलेला भारताचा पहिला चित्रपट होता ‘मदर इंडिया’. या चित्रपटाने पहिल्याच खेपेत नॉमिनेशन मिळवल पण फेरीतल्या इतर निकषावरून बाद झालं.
त्यांनतर आजतागायत आपण अनेकदा परदेशी चित्रपटाच्या विभागातून ऑस्करचे दार दणदणीतपणे ठोठावण्याचा प्रयत्न केला. पण ऑस्करचा हा गोल्ड मॅन काही हाती लागला नाही.
१९८३ नंतर वैयक्तिक विभागवार पातळीवर चार ते पाच ऑस्करपुरस्कार आणि १४ नामांकनं मागील काही दशकात लाभली. यातूनच पुढे श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट या काही मराठी चित्रपटांनी देखील ऑस्करच्या दाराला धडक दिली.
मात्र ऑस्करचा हा गोल्ड मॅन हुलकावणी देत राहिला. भारतात जे चित्रपट कालान्तराने अभिजात म्हणून मानले गेलेले वा सिनेमागृहात प्रचंड लोकप्रिय झालेले सिनेमे देखील ऑस्करच्या मार्गावर डावलले गेले.
भारतासहित जगभरातून लोकांच्या पसंतीला उतरलेले अनेक चित्रपट ऑस्करकडे येतात परंतु त्यांचे नियम आणि निकषांमुळे काही ठराविकच चित्रपट ऑस्कर मिळवतात.
आपले चित्रपट त्या कसोटीची पातळीवर उतरत नसल्याने अनेकवर्षे ऑस्करवारी करून देखील पुरस्कार प्राप्ती होऊ शकली नाही.
दरवर्षी, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळणार ह्याकडे जगभरातल्या अनेकांचं लक्ष असते. अश्या या ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या अकादमीच्या अध्यक्षालाच महाराष्ट्र सरकारने पाहुणचाराला बोलावलं आणि ते आले. पण ही काही सहजासहजी घडणारी गोष्ट नाही.
यामागे अनामिक असलेल्या एका व्यक्तीचा हात होता, त्यांची प्रेरणा होती, जिद्द होती, कळकळ होती. ही अनामिक व्यक्ती म्हणजे श्री. उज्वल निरगुडकर.
दोन एक वर्षांपूर्वी या व्यक्तीची भेट झाली होती. अत्यंत निर्गवी, विनयशील आणि चित्रपटाच्या तांत्रिक बाबीबाबत विपुल माहिती असणारा व्यक्ती.
गेली अनेक वर्ष भारताच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे सल्लागार आणि ऑस्कर पुरस्काराचा ज्युरी मेंबर. असे असून देखील वागण्यात, बोलण्यात कुठेही बडेजावपणाचा लवलेश नाही.
पहिल्याच भेटीत बोलताना भारतीय चित्रपटांना ऑस्कर मिळावे याविषयीची तळमळ दिसून येत होती.
ते स्वतः जुरी मेंबर असल्याने ऑस्करसाठी निवडण्यात येणाऱ्या चित्रपटांचे सादरीकरण कश्याप्रकारे असावे याची इथंभूत माहिती देत होते.
त्यांची इच्छा होती की भारतातील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकासाठी अशी शिबिरे भरवावी की ज्यातून ऑस्कर, कांस या सारख्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करताना त्याच्या निर्मितिकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, कुठली खबरदारी घ्यायला हवी याचे मार्गदर्शन करता येईल.
अश्या एक ना अनेक कल्पना त्याच्याकडे होत्या. पण हे वास्तवात आणायला आर्थिक आणि शासकीय पॉवरफुल सपोर्ट असायला हवा हे मी जाणलं आणि त्या बाबत त्यांना कल्पना करून दिली.
कालांतराने त्यांच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने तो ही मार्ग दाखवला. मा. सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांच्यां संपर्कात आल्याने त्यांना पुढचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत हि गोष्ट गेल्यावर त्यानी या विषयाचे महत्व जाणले आणि तात्काळ दुजोरा दिला.
त्यांचे स्वीय सचिव भूषण गगराणी यांना पुढाकार घ्यायला सांगून विनाविलंब त्या दिशेने पाऊले उचलली गेली. ऑस्करचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेले, उज्वल निरगुडकरांचे सुपरिचित असल्याने, त्यांना भारत भेटी बाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत होकार कळविला.
लगेचच मा.सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जॉन बेले याना स्टेट गेस्ट म्हणून बोलवण्याची प्रक्रिया सांस्कृतिक कालसंचलनाय तर्फे पूर्ण करण्यात आली.
या सर्व प्रयत्नांमुळेच ऑस्कर अकादमीचा विद्यमान अध्यक्ष्यानी सपत्नीक महाराष्ट्र राज्याचा 56वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्याला आनंदाने हजेरी लावली.
मुंबईतल्या वास्तवात जॉन बेले आणि संकलक असलेल्या त्यांच्या पत्नी कॅरल लिटीलटन यांच्याशी संवाद साधण्यासाठी “मास्टरक्लास” सेशनचे आयोजन नरिमन पॉईंट येथील आयनोक्स थिएटर मध्ये करण्यात आले होते.
या सेशन मध्ये त्यांनी सिनेमोटोग्राफी करत असतानाच त्यांचा प्रवास उलगडवला आणि ऑस्करच्या चित्रपट पुरस्कारासाठी लीडरशिप करण्याबाबतचे धडे दिले.
सेशनच्या समारोपाला आठवणीतला ठेवा म्हणून मुंबईतील चित्रपट सृष्टीच्या वतीने “भारतीय चित्रपटाचे जनक स्व. दादासाहेब फाळके” यांची फोटो प्रतिमा भेट देण्यात आली.
‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे’ अध्यक्ष गोरक्ष धोत्रे आणि ‘ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे’ सरचिटणीस अजय घाटे यांच्या हस्ते ऑस्कर अकादमीला हि प्रतिमा भेट देण्यात आली.
या प्रसंगी सुप्रसिद्ध सिनेमोटोग्राफेर महेश लिमये, संजय मेमाणे, फिल्म एडिटर असो.(AFVE)चे संकलक राज सुर्वे, भक्ती मायाळू, राजेंद्र महापात्रा, आणि सिने वर्कर्सचे राजेंद्र दळवी, ओंकार वैद्य, संतोष गायकवाड, शिवा जोशी, चित्रपट महामंडळाच्या संचालिका चैत्राली डोंगरे, विवेकानंद युथ कनेक्ट फौंडेशनचे डॉ. राजेश सर्वद्न्य आदी हजर होते.
या मास्टरक्लाससाठी समन्वय म्हणून रिमा अमरापूरकर यांनी काम पहिले.
एकूणच हि दोन दिवसाची भेट भारतातील चित्रपट विश्वासाठी मोलाची ठरली आहे. जॉन बेले याच्या भारत भेटीमुळे आता ऑस्करचा मार्ग सुकर झाला असे मुळीच नाही मात्र भावी काळासाठी योग्य दिशा नक्कीच मिळेल.
ऑस्कर अकादमीच्या अध्यक्षांच्या भेटीमुळे त्यांना इथली संस्कृती, परंपरा, भाषा, कला, जीवनशैली जी भारतीय चित्रपटातुन डोकावते त्याची तोंडओळख झाली.
या भेटी दरम्यान जॉन बेले यांनी महाराष्ट्राचे मा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी पुढील बाबीवर तत्वतः घेवाण देवाण केली. याचे सूतोवाच त्यांनी पुरस्कार सोहळा दरम्यान देखील केली.
◆ऑस्कर पुरस्काराच्या परदेशीं चित्रपट विभागामध्ये निवड समितीत भारतातले १२०/१५० जुरी मेंबर विविध विभागासाठी घेण्यात येतील व त्यांना तसे प्रशिक्षण ही देण्यात येईल याचे सूतोवाच त्यांनी केले व तशी यादी देखील पाठविण्यास सांगितले.
◆ऑस्कर अकादमीचे लंडन आणि न्यूयॉर्क इथे ऑफिस असून तिसरे ऑफिस मुंबई येथे करण्यास त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली. हे ऑफिस आशियाई चित्रपट उद्योगाला हातभार लावेल.
◆अकादमीची क्षमता हॉलीवूड पुरती मर्यादित न करता त्याला विस्तारित करण्यासाठी भारतातील चित्रपट उद्योगातील लोकांना अकादमीचे सभासदत्व देण्यात येईल.
◆लॉस एंजल्स येथे तीन लाख चौरस फुटांवर ऑस्कर अकादमीचे फिल्म अर्काइव्ह सेंटर उभारले जाणार आहे त्यात भारतीय चित्रपटांना देखील स्थान देण्यात येईल त्याचबरोबर त्या ठिकाणी दादासाहेब फाळके याचे शिल्प देखील उभारले जाईल याची ग्वाही दिली.
===
–
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.