Site icon InMarathi

हा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही

howrah-bridge-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मेरा नाम चीन-चीन-चु, चीन-चीन-चु बाबा चीन-चीन-चु’… हे गाणं ऐकलं आणि जुन्या तारा छेडल्या गेल्या नाहीत असं होऊच शकत नाही. १९५८ साली आलेल्या ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील हे गाणं आजही ऐकायला तितकंच गोड वाटतं.

एक मिनिट… इतक्या जुन्या चित्रपटाबद्दल आज अचानक लिहिण्याचं का बरं स्फुरावं? तर आजचा हा लेख चित्रपटाबद्दल नसून ‘हावडा ब्रिजबाबत’ आहे.

कलकत्ता किंवा एकूणातच बंगाल म्हंटलं की ‘रॉशोगुल्ला’, ‘रवींद्रनाथ टागोर’, ‘शांतिनिकेतन’, ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या बरोबरीने डोळ्यांसमोर ज्या काही ठराविक गोष्टी प्रामुख्याने येतात त्यांपैकी एक म्हणजे ‘हावडा ब्रिज’.

ब्रिटिश काळात हुगळी नदीवर बांधला गेलेला हा पूल खरंतर कुठच्याही राष्ट्रीय स्मारकापेक्षा कमी नाही.

 

 

आजकाल शहरांत ‘फ्लाय-ओव्हर’ बांधण्यावरून आणि त्याहीपेक्षा त्यांच्या उदघाटनांवरून राजकीय देखावे आणि शक्ती प्रदर्शने पाहण्याची सवय लागलेल्या जनतेला हे वाचून आश्चर्य वाटेल की ‘हावडा ब्रिजचे’ आजतागायत उद्घाटन झालेले नाही.

१८६२ सालीच कलकत्ता आणि हावडा ही दोन शहरे जोडण्यासाठी हुगळी नदीवर पूल बांधायची योजना आकार घेत होती. त्याकाळी भारतावर ब्रिटिशांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनीने’ चांगलीच पकड घेतली होती. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हा पूल बांधण्याची योजना आखली गेली.

त्याकाळच्या ‘ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीला’ विचारणा झाली. मुळात त्याकाळी सिमित तंत्रज्ञानाच्या कक्षेत एवढ्या मोठया नदीवर पूल बांधायचा हे खरंतर आव्हानात्मक काम होतं.

पूल बांधायच्या शक्या-शक्यतेबद्दल ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीने अहवाल तयार करायला घेतला खरा, पण काही कारणांनी तो पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. त्यानंतर हुगळी नदीवर तरंगत्या पुलाची कल्पना मांडली गेली.

 

 

परंतु, बंगाल आणि सभोवतालच्या परिसरात येणारी वादळे, वातावरणातील अनिश्चितता यांमुळे ही कल्पना कागदावरच राहिली.

अर्थात, असा तरंगता पूल जरी बांधला गेला असता तरी भविष्यकालीन जड वाहतुकीसाठी त्याचा किती उपयोग झाला असता हे सांगणे कठीणच आहे.

मधल्या काळात पूल बांधायच्या अनेक योजना आल्या आणि गेल्या तरीही पूल काही बांधून होईना. अखेरीस, अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर, १९३७ साली हा पूल बांधायचा मुहूर्त लागला.

‘ब्रेथवाईट बर्न आणि जेसप कंस्ट्रक्शन’ कंपनीला सरतेशेवटी हावडा ब्रिज बांधायचे कंत्राट मिळाले.

१९४२ साली बांधून पूर्ण झालेल्या या पुलाची खासियत अशी की या पुलाच्या बांधणीत एकही नट-बोल्ट वापरला गेलेला नाही. तसेच या पुलाला नदीपात्रात एकही खांब नाही. नदीच्या दोन्ही तटांवर ‘कँटीलिव्हर’ पद्धतीने या पुलाची उभारणी केली गेलेली आहे.

पुलाच्या बांधणीसाठी त्याकाळी जमशेटजी टाटांच्या ‘टाटा स्टीलने’ लोखंडाचा पुरवठा केला होता.

जवळपास २६.५ हजार टन लोखंड वापरून उभारलेल्या या पुलाची लांबी १५२८ फूट तर रुंदी ६२ फूट आहे. नदी पात्रात जवळपास २८२ फूट उंचीवर विराजमान हा पूल त्याकाळातील जगातला तिसऱ्या क्रमांकाचा पूल होता.

 

 

आजही लांबीच्या बाबतीत हावडा ब्रिज जगात सहावा क्रमांक राखून आहे. संपूर्णतः लोखंडी खिळ्यांनी बनलेला हा पूल आजही इतका मजबूत आहे की दररोज जवळपास सव्वा लाख वाहने आणि पाच लाख पादचारी या पुलाचा नियमित वापर करतात.

इतकेच नव्हे तर कलकत्त्यातील सुप्रसिद्ध ‘ट्राम’ देखील या पुलावरून धावली आहे. १९९३ मध्ये अतिरीक्त वजन आणि रहदारीच्या कारणास्तव ट्रामच्या पुलावरील फेऱ्या बंद करण्यात आल्या.

अनेक ऐतिहाससिक घटनांचा आणि क्षणांचा हा पूल साक्षीदार आहे. १९४२ मध्ये पूल बांधून पूर्ण झाला तेंव्हा दुसरे महायुद्ध जोरावर होते. याच कारणास्तव ‘हावडा ब्रिजचे’ कधीही औपचारिकरीत्या उदघाटन झाले नाही.

युद्धाच्या रणधुमाळीत जपानच्या बॉम्बफेकी विमानांनी टाकलेले काही बॉम्ब्स या पुलाजवळ नदीपात्रात पडले.

सुदैवाने, पुलाचे काहीच नुकसान झाले नाही. भारताचा स्वातंत्र्य संग्राम तसेच बंगालचा महाभयंकर दुष्काळ यांचाही हा पूल एक मूक साक्षीदार आहे.

महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर, ४ फेब्रुवारी १९४८ ला, गांधीजींना स्मृतीसुमने वाहण्यासाठी याच पुलावर प्रचंड जनसमुदाय जमला होता. या पुलाचा उल्लेख आणि चित्रिकरण अनेक माहितीपटांत आणि चित्रपटांत झाले आहे.

 

 

सत्यजित रे, रिचर्ड अटेन्बरो, मणिरत्नम या आणि अश्या कितीतरी दिग्गज देशी-विदेशी दिग्दर्शकांना या पुलाने भुरळ घातली आहे. ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये पुलाच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त एका खास स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आज या पुलाच्या देखभालीची संपूर्ण व्यवस्था ‘कलकत्ता पोर्ट ट्रस्ट’ कडे आहे.

१९६५ साली बंगाल सरकारने रवींद्रनाथ टागोरांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुलाचे ‘रवींद्र सेतू’ असे नामकरण केले. तरीही जनमानसात तो आजही ‘हावडा ब्रिज’ या नावानेच ओळखला जातो.

एक प्रेक्षणीय ठिकाण या नात्याने दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून या पुलाला भेट देतात. देशातलं सर्वात जुने म्हणून नावारूपाला आलेले ‘हावडा जंक्शन’ जोडणारा पूल म्हणूनही या पुलाचे प्रचंड महत्व आहे.

पुलाच्या कलकत्त्याच्या बाजूला असणारे ‘मालिक घाट’ हे फूल मार्केट आजही तिथे चालणाऱ्या फुलांच्या व्यापाराकरता प्रसिद्ध आहे. वाहतुकीचा प्रचंड बोजा सहन करत हा पूल आजही दिमाखात उभा आहे.

 

 

ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात…

तरीही ऊन, वारा, पाऊस, वादळे यांची पर्वा न करता, मुकाटपणे वाहने आणि लोकांना ऐलतीरावरून पैलतीरावर नेण्याचे काम हावडा ब्रिज अविरतपणे करतो आहे…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version