आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: संदेश सामंत
===
समाजमाध्यमांवर सध्या सावरकरांवर जी चर्चा सुरू आहे, त्याविषयी मनात खेद असला तरी आश्चर्य किंवा राग मुळीच नाही. कारण, त्यात नवीन काहीच नाही. कोण्या एका वाहिनीने किंवा कोण्या एका वेबसाईटवर सावरकरांविषयी काय लिहिलं गेलं, यात विशेष वाटावं असं काही नाही.
हे पालुपद अनेक दशकं म्हणजे अगदी सावरकर हयात असल्यापासून आजतागायत आणि पुढची अगणित दशकं सुरूच राहणार, याविषयी मनात शंका नाही.
सावरकरांवर असलेले ‘माफीनाम्याचे’, ब्रिटिशांकडून ‘पेन्शन’ घेतल्याचे, गांधींची हत्या केल्याचे आणि ब्रिटिशांचे हस्तक असल्याचे आरोप हे नेहमीच होतात. इतकंच काय, सावरकर ‘गे होते’ आणि अंदमानात त्यांचे इतर कैद्यांसोबत गे संबंध होते, हे सुद्धा मी वाचलंय.
एरवी स्वतःला पुरोगामी म्हणवणारी मंडळी या तथाकथित गे संबंधांची खूप चर्चा करतात, हे विशेष. त्यामुळे सावरकरांविषयी कोणाच्याही वॉल वर जाऊन उगाच तिथे त्यांची आणि त्यांच्या विचारांची वकिली न करण्याची भूमिका ही मला योग्य वाटते.
सावरकरद्वेषी मंडळींचा त्यांच्याविषयी असलेल्या द्वेषाला जातीय विद्वेषाचा गंध आहे, हे ज्यांना पॉलिटिकली इनकरेक्ट राहणं परवडू शकतं, त्यांनी मान्य करावं.
बाकीच्यांची जुनं पालुपद सुरू ठेवावं. नाहीतर जात्युच्छेदक निबंध लिहिणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे सावरकर अमान्य होण्यास काहीच कारण नव्हतं.
कोणत्याही धार्मिक गटाला विशेषाधिकार देण्यास विरोध करणारे सावरकर आम्हाला ‘कम्युनल’ वाटणं साहजिक आहे; कारण मुळातच आम्ही ‘सेक्युलर’ या शब्दाचं एक भाषांतर आमच्या भाषांमध्ये करू शकलेलो नाही, ही मोठी गोम आहे.
त्यामुळे कितीही पुरावे द्या, की तर्क द्या… सावरकर जिंकणार नाहीत.
पण, म्हणून सावरकरांचा विचार हरलेला आहे, असा त्याचा अर्थ मुळीच नाही. सावरकरांनी राष्ट्रवाद, सुरक्षा, जागतिक परिस्थिती, सामरिक नीती याविषयी केलेलं एकूण एक भाकीत आजवर खरं ठरलंय. अगदी इस्राएल पासून ते पाकिस्तान आणि चीन पर्यंत.
अंदमानाच्या बेटांपासून ते काश्मीर समस्येपर्यंत सावरकर काळाच्या कसोटीवर खरे ठरले. याचं कारण म्हणजे ते कधीच पॉलिटिकली करेक्ट राहिले नाहीत.
अशाच व्यक्तींच्या वाट्याला पराकोटीचा द्वेष येतो, जो त्यांच्याही वाट्याला आला. त्यात आश्चर्यजनक काहीच नाही. कारण सत्य मान्य करण्याची क्षमता सावरकरांच्या विरोधकांमध्ये मुळीच नाही.
खरं बोलणं हे विद्वेष आणि तेढ पसरवण्याचं काम करतात, असं मानणारा समाज हा देशाचे तुकडे होताना पाहण्यास पात्र ठरतो. भारताच्या आधुनिक इतिहासात तेच झालं. आणि पुढेही होत राहील. आपण ते पाहू. तरी पॉलिटिकली करेक्ट राहून सामाजिक सलोखा अबाधित ठेऊ.
सावरकरांच्या नावाने फक्त मतं मागून, सत्तेत येऊन, जयंती आणि आत्मार्पण दिनाला फक्त ट्विट करून त्यांना एनकॅश करणारेही फार काही करतात, अशातला भाग नाही. त्याने ना सावरकरांना फरक पडतो ना त्यांच्या विचारांना.
जातीय, मतपेट्यांच्या राजकारणात सावरकर जिंकणार नाहीत, हे सत्य आहे. सावरकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेने ते स्वीकारायला हवं.
वैयक्तिक पातळीवर जितकं शक्य होईल तितके त्यांचे विचार शास्त्रोक्त आणि विवेकी भाषेतून संयतपणे मांडत राहायला हवे. त्यांचं साहित्य, त्यातून मांडला गेलेला विचार आणि त्याची भूतकाळ आणि वर्तमानात काळानुरूप चिकित्सा लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे.
यात कोणत्याही पक्षाच्या सरकाराची मदत मिळेल, ही अपेक्षा मुळात सोडून दिली पाहिजे.
सावरकरांचे पुतळे उभारले जाणार नाहीत की कुठे त्यांचं नाव दिलं जाणार नाही, हे आपण मनाला समजावलं पाहिजे.
फक्त देश अखंड ठेवण्यासाठी आणि आपलं राष्ट्र सशक्त करण्यासाठी त्यांचा विचार आपण प्रामाणिकपणे मांडला पाहिजे. तसेही सावरकर ‘अनादि, अनंत आणि अवध्य’ आहेत. स्वतःचा मृत्यूही कधी यावा, याचा निर्णय त्यांचाच होता. आपण कोण त्यांना मारणारे आणि जगवणारे?
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.