आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
२०१९ सालच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीचे कवित्व अजून चालू आहेच. मोदींना एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक ते बहुमत मिळाले आहे.
कौंग्रेसचा सुपडा साफ करुन भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तारुढ होईल. इतकी रणधुमाळी माजली… एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करुन नाना कुरघोड्या करून प्रचाराचा धुरळा उडवला होता.
यावेळी प्रचाराची पातळी घसरली होतीच पण त्याचबरोबर फेसबुक, व्हाॅट्सऍपसुध्दा यातून सुटले नव्हते.प्रत्येकाचे आपले आपले अंदाज..आपले आपले नेते, आपले पक्ष यांनी देश ढवळून निघाला होता.
फेसबुक, व्हाॅट्सऍप, टि्वटर यांची रणभूमी झाली होती. मतमतांचा गलबला. न्यूज चॅनलवर विविध पक्षांच्या सदस्यांनी, प्रवक्त्यांनी केलेल्या चर्चेत निवडणूक म्हणजे झुंज झाली होती.
सात टप्प्यात पार पडलेली निवडणूक, नंतर एक्झिट पोलने सादर केलेले अंदाज आणि त्या अंदाजानाही मागं टाकून समोर आलेले वेगळे निकाल.
हे इतकं चक्रावून टाकणारं होतं की एक महीन्याचा काळसुध्दा निकालाच्या दृष्टीने फार जास्त होता. याचा ताण लोकांना फार मोठा वाटला.
आलेले निकाल इतके धक्कादायक होते की, त्या निकालाने काही ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त सुध्दा आले. कौंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,या जुन्या पक्षातील दिग्गज नेते यावेळी अकल्पित पणे पराभूत झाले.
बेंगळुरूमध्ये नवोदित उमेदवार निवडून आला. राहूल गांधींच्या अमेठीत त्यांना हार पत्करावी लागली. जसा हा धक्कादायक निकाल समोर आला आहे तशा अजूनही काही मजेदार गोष्टी समोर आल्या आहेत.
ज्या केवळ याच निवडणुकीत नव्हे तर आजवरच्या निवडणुकांच्या इतिहासात काही उमेदवार विक्रमी मताधिक्य मिळवून जिंकले तर काहींनी निसटता विजय मिळवला. कोण आहेत ते उमेदवार?
मताधिक्याची कमाल-
यावेळी मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवाराची मतसंख्या काही हजार…एखादा लाख, दोन लाख आहे? नाही!
यावेळी एका उमेदवाराने तब्बल ६ लाख ८९ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे.
कोण आहे हा उमेदवार? ते आहेत-गुजरात मधील नवसारी मतदार संघातील भाजपचे उमेदवार श्री. सी.आर.पाटील! ज्यांनी हा विक्रम केला आहे.
यापूर्वी हा विक्रम बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी २०१४ मधील पोटनिवडणूक ६ लाख ९६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.
ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मिक मृत्यूनंतर तेथील जागा त्यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी लढवली होती आणि प्रचंड मताधिक्याने जिंकली होती.
अजून एका मतदार संघात असंच काहीसं घडलं आहे हरियाणा मतदार संघातील कर्नालचे उमेदवार श्री. संजय भाटिया हे आपल्या विरोधी उमेदवाराविरुध्द ६ लाख ५६ हजार मतांनी निवडून आले आहेत.
तर फरीदाबाद येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. कृष्णपाल गुर्जर हे ६ लाख ३८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
निसटते विजय-
राजकारण फार विचित्र खेळ आहे. कधी काय होईल याचा अंदाजच येत नाही. कुठंतरी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत तर कुठे निसटता विजय मिळवला आहे.
यामध्ये सुध्दा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तरप्रदेश मधील मच्छली शहरातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. भोलानाथ केवळ १८१ मतांनी विजयी झाले आहेत.
बहुजन समाज पार्टीचे उमेदवार श्री. त्रिभुवन राम हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. आणि गंमतीशीर गोष्ट अशी की या मतदारसंघात या निवडणुकीत १०८३० लोकांनी नोटाचा वापर केला आहे.
ही निसटत्या विजयाची काही पहीलीच घटना नाही. आजवरच्या इतिहासात निवडणुकीत १९८९ मध्ये आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली मतदार संघातील कौंग्रेसच्या रामकृष्ण यांनी केवळ ९ मतांनी निवडणूक जिंकली होती.
१९९८ साली बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार सोम मरांडी यांनीही ९ मतांनी विजय मिळवला होता.
तर १९९६ साली बडोद्यातील कौंग्रेसचे उमेदवार श्री.सत्यजित सिंह गायकवाड यांनी केवळ १७ मतांनी निवडणूक जिंकली होती. वरील निकाल पाहता जनता कोणत्या उमेदवाराला किती मताधिक्य देईन हे सांगणे कठीण असत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.