' चक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”! – InMarathi

चक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या बर्गर आणि पोटॅटो फ्राईज साठी जगभर प्रसिद्ध असलेल्या आणि जगभर आपल्या शाखांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार केलेल्या मॅक डोनाल्डने एक नवीन गोष्ट बाजारात आणलीय.

 

mcd inmarathi
Reader’s Digest

काही कल्पना येतेय? बर्गरचा नवीन प्रकार असेल??  पोटॅटो फ्राईमध्ये काही नवीन ??? नाही. यापैकी काहीच नाही.

मग??

मॅकडोनाल्ड ने या वेळेस आपली शाखा उघडलीय पण ती नेहमीच्या गिऱ्हाईकांसाठी नाही. या वेळेस त्यांचे खास गिऱ्हाईक आहे मधमाशा.

हो चक्क मधमाशा!!

मॅकडोनाल्डने आता चक्क मधमाशांसाठी सुरू केलंय जगातील सर्वात छोटं “मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट”.

मॅकडोनाल्डने या चिमुकल्या आणि अनोख्या रेस्टॉरंट चे नाव ठेवलंय McHive. हे नुसतं शोभेचं रेस्टॉरंट नाही तर पूर्ण कार्यक्षम असे “BeeHive” म्हणजेच मधमाशांचे घर आहे.

 

mchive inmarathi
Hypebeast

आहे ना एकदम वेगळेच?

याची रचना देखील केलीय ती एखाद्या रेस्टॉरंट सारखी. चौकोनी आकाराच्या या रेस्टोरंटच्या बाहेरील बाजूस बसण्याची छान व्यवस्था आहे.

अगदी नाजूकशी लाकडी दारं आहेत आणि छोट्याशा खिडक्या देखील. चिमुकल्या दारातून फक्त त्या घराची मालकिणबाईच जाऊ शकते बरं का. खिडक्यांवर मॅकडोनाल्डची जाहिरात केलेली आहे.

या रेस्टॉरंटमध्ये फक्त बाहेरचे इंटिरिअर छान आहे असे नाहीतर आतील पण छान आहे. आतील बाजूस मधमाशांसाठी एक पोळे (हनीकोम्ब) तयार केलेले आहे. एकदा मधमाशा आत आल्या की त्या तेथे राहू शकतील.

आता ही कल्पना कशी काय सुचली असेल?

तर Earth day network ” या स्वीडनमधील निसर्गाचा आणि मधमाशा तसेच जंगली माशा यांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या संशोधनातून असे दिसून आले होते की गेल्या दहा वर्षात मधमाशांसह चार ते पाच प्रकारच्या माशांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

शेतांवर व झाडांवर फवारणीसाठी वापरण्यात येणारी रसायने, वाढते प्रदूषण जागतिक हवामानातील बदल,अशा अनेक कारणांनी माशा कमी होऊ लागल्या आहेत.

मग या गोष्टीवर काय इलाज ? तर माशांचे संवर्धन करणे. संवर्धन एवढयासाठी करायचे की या माशा म्हणजे निसर्गचक्राचा एक महत्वाचा दुवा आहेत. मधमाशा केवळ मधाची निर्मिती करतात असे नाही तर परागीभवनाचे महत्वाचे काम करत असतात.

 

mchive 2 inmarathi
Food & Wine Magazine

आपण आपला बगीचा बहरलेला असावा, त्यातील फळझाडांवर छान फळे लगडलेली असावीत असा विचार करत असतो. पण परागीभवन झाल्याशिवाय फळधारणा होत नाही हा निसर्गाचा नियम आहे.

बहुतेक वेलवर्गीय भाज्या तसेच फळभाज्या,सर्व प्रकारची फळे यांच्या बाबतीत नर आणि मादी फुले झाडांवर अथवा वेलींवर येतात. या नर फुलांमधील पुंकेसर मादी फुलांतील परागकणांवर पडल्यावरच परागीभवन होऊन तिथं फळधारणा होते.

निसर्गातील कीटक अथवा माशा फुलांमधील मध/नेक्टर गोळा करायला फुलांवर येत असतात.

त्यांच्या पंखांना तसेच सोंडेला परागकण चिकटतात आणि ह्याच माशा अथवा कीटक दुसऱ्या फुलांवर बसतात तेव्हा त्यांनी पंखांवर वाहून आणलेले परागकण या दुसऱ्या फुलांवर पडतात. इथून आणखी दुसऱ्या फुलांवर अशा साखळी पद्धतीने पराग सिंचन होत रहाते.

निसर्गाची ही अद्भुत किमया आपल्याला सर्वतोपरी मदतच करत असते.

परागीभवन हे एक महान कार्य आहे यात शंकाच नाही. कॅलिफोर्नियाला फळांचा देश म्हटले जाते. तिथे व्यापारी पद्धतीवर मोठ्या मोठ्या फळबागा असतात. तशाच जगभरात इतरत्रही फळबागा असतात.

 

Mchive 3 inmarathi
Adweek

इथे पराग सिंचन अतिशय महत्वाचे असते.मधमाशांचे प्रमाण कमी झाल्यास फलधारणेचे प्रमाण देखील कमी होते. परिणामी फलोत्पादन कमी होऊन बाजारभाव वाढतात.

याचाच अर्थ असा की अर्थचक्र देखील बिघडते.अमेरिके बरोबरच युरोपियन देशात मधाचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या खाण्यात तसेच खाद्यपदार्थ व मिठाईमध्ये साखरे ऐवजी मधाचा वापर मोठ्या प्रमाणात असतो.मधमाशांचे घटते प्रमाण त्यांची चिंता वाढवणारे ठरते.

स्वीडनच्या मॅकडोनाल्ड च्या इमारतीच्या छपरावर मधमाशांची बरीच पोळी लटकलेली दिसायची.

त्यांची संख्या कमी कमी होत चाललेली दिसताच त्यांच्या संवर्धनासाठी मॅकडोनाल्डने स्वीडनच्याच NORD _DDB या निर्मिती संस्थेची मदत या कामी घेतली.

NORD DDB कंपनीने पाहणी करून मधमाशांसाठी खास घराची निर्मिती करण्याचे ठरवून डिझाइन तयार केले. मॅकडोनाल्डची देशोदेशी रेस्टोरंट असल्याने मधमाशांसाठी एक चिमुकले रेस्टोरंट बांधायचे ठरवले.

 

mchive 4 inmarathi
Bored Panda

डिझाइन प्रमाणे हे रेस्टोरंट तयार झाल्यावर ते अंगणात ठेवले. आजूबाजूला माशांना आकर्षित करून घेण्यासाठी हिरवळ आणि बरीच आकर्षक फुलझाडे लावली. याचा परिणाम म्हणून मधमाशा जमा होऊ लागल्या.

या मॅक हाईव्हज च्या आतील बाजूस मधाच्या पोळ्याच्या आकाराच्या नुसत्या फ्रेम्स लावण्यापेक्षा हजारो माशा तेथे राहू शकतील असे विचारात घेऊन एखाद्या मधाच्या पोळ्यासारखी त्याची रचना केलेली आहे.

मधमाशा या जेव्हा मध गोळा करतात तेव्हा तो मध साठवण्यासाठी त्या मेणाच्या साह्याने विशिष्ट अशी षटकोनी कप्याची निर्मिती करतात. असे हजारो कप्पे एकमेकांना जोडून त्याचे एक घर तयार करतात. त्यात एकच राणी माशी असते व हजारो कामकरी माशा असतात.

 

alpha bee inmarathi

राणी माशी प्रजोत्पादन करते तर कामकरी माशा मध गोळा करून घराचे कप्पे मधाने भरून ठेवतात.पहिले घर मधाने भरल्यावर दुसरे घर तयार करतात.

भारतात मधुमक्षिका पालन हा मोठा व्यवसाय आहे आणि त्यातून दर्जेदार मध निर्मिती होत असते.

मॅकडोनाल्ड निर्मित अशा छोटेखानी मॅकहाईव्हज म्हणजे कल्पक असे मधमाशी पालन केंद्रच आहे. या योजनेतून मोठे मार्केटिंग देखील साध्य होईल

शिवाय मॅक डोनाल्डच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा काहीतरी वेगळे सामाजिक काम केल्याचे श्रेय देखील त्यांना लाटता येईल. शिवाय या मॅक हाईव्ह च्या खिडक्यांवर मॅक डोनाल्डने जाहिरात देखील केलेली आहे.

एकुणातच मधमाशी संवर्धन,सामाजिक कार्य,आणि जाहिरात असा तिहेरी फायदा मॅक डोनाल्डला होणार आहे.

मॅक हाईव्हजची उपयुक्तता लक्षात आल्यावर त्यांची मागणी खूप वाढली आहे.अनेकांनी त्याची फ्रांचाईझी घेण्याची तयारी दर्शविली आहे.

आणखी थोड्या दिवसात साधारण रेस्टोरंट च्या जोडीला ही मधमाशांसाठीची रेस्टोरंट सर्वत्र दिसू लागतील यात शंकाच नाही. यात कुठल्याही प्रकारचे बर्गर्स अथवा फ्राईज मिळणार नाहीत,अथवा सोबत फुकट मिळणारी शीतपेये पण दिली जाणार नाहीत.

 

mchive 5 inmarathi
Just something (creative)

हे मॅक हाईव्ह म्हणजे पोटॅटो फ्राईजचे मशीन असणार नाही किंवा सॉसची फॅक्टरी असणार नाही. इथे मधमाशांची मधाची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला भरपूर फुलझाडे असतील. मॅक डोनाल्ड याची मोठी जाहिरात कल्पकतेने करत राहणार हे नक्की.

मग करताय ना बुक एक चिमुकलं रेस्टोरंट तुमच्या अंगणात ठेवण्यासाठी?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?