नजरेची भाषा शिकवणाऱ्या या अजरामर प्रेमकहाणीचा दुःखद शेवट वाचून आजही डोळे पाणावतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बॉलीवुडची ‘अधुरी प्रेमकहाणी’ म्हंटल की, खूप नावं डोळ्यांसमोर येतात. अमिताभ-रेखा, सलमान खान-ऐश्वर्या रॉय, शाहीदकपूर-करीना कपूर या आणि अशा आणखीन पण गाजलेल्या प्रेमकहाण्या आहेत.
पण आपल्याला माहीत नसलेली, जास्त चर्चा न झालेली, अनोखी अशी प्रेमकहाणी म्हणजे गीतकार साहिर लुधियानवी आणि कवयित्री अमृता प्रीतम!
‘आगे भी जाने ना तू’ ‘ओ मेरी जहरजोफी’
‘तुम अगर साथ देने का वादा करो’
अशी एकसो एक रचना करणार्या साहिर लुधियानवीच्या आयुष्यात अशी दर्दभरी प्रेम कहाणी असेल असं कुणालाही वाटणार नाही किंवा गाण्यातून तो दर्द (दु:ख म्हंटलं की अर्थ प्रेरित होईल की नाही माहीत नाही म्हणून दर्द हा शब्दच तिथे योग्य आहे.) डोकावत असावा.
तसंच अमृता प्रितम ही सुद्धा नावाजलेली कवयित्री होती. ‘खाली’ ही एक त्यांनी लिहिलेली कविता
‘खाली कागज भी
साफ दिल जैसा हाता है
जिस पर लिख सकते है
अपनी जान किसी के नाम…’
शेरो-शायरी सुद्धा त्या उत्तम करत –
‘ख्यालों की भीड में सरकता हुआ वक्त
तेरे ख्यालों के सामने थम जाता है.’
तर असं हे अतुलनीय शब्द सामर्थ्य दोघांच्यातही होतं. खरे कलाकार होते दोघं. यांची प्रेमकहाणी ही एकतर्फी नव्हती तरीही शब्दातून व्यक्त न झाल्याने अधुरीच राहिली.
कोणाच्या प्रेमाची काय आठवण असेल सांगता येत नाही. समुद्रावर अचानक झालेली भेट, अगदी रस्त्यावर अचानकरित्या दिसलेला चेहरा, पडलेला रुमाल, एखादी विसरलेली वस्तू.
साहिरच्या आणि अमृता प्रितमच्या प्रेमाची कहाणीत आहे चहाचा न धुतलेला कप, अर्धी सिगारेट अशा आठवणी!
ही प्रेमकथा अशी आहे की याची भुरळ बॉलिवुडला नाही पडली तरच नवल! अशी माहिती ऐकिवात आहे की, ही प्रेमकथा रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असून साहिरच्या व्यक्तिरेखेसाठी नावाजलेला अभिनेता इरफान खान याला निश्चित केले आहे.
१९४४ मधील ही प्रेमकहाणी आहे. अमृता आणि उदयोन्मुख गीतकार साहिर लुधियानिवी प्रथम लाहोर आणि दिल्ली दरम्यान प्रीतनगर या गावात एका ‘मुशायरा’ (कविता वाचनाच्या) कार्यक्रमात भेटले.
अमृताच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या शब्दांनांही चमक होती. साहिर आणि अमृता यांची त्या हॉलमधील अंधुक प्रकाशात डोळ्यांनीच मूक भेट झाली. डोळ्यांतून त्यांचं एकमेकांवरील प्रेम व्यक्त झालं असावं. खर्या कलाकाराला दुसरा खरा कलाकारच ओळखू शकतो.
कार्यक्रम उशीरा संपला. सगळी लोकं एकमेकांचा निरोप घेऊ लागले. दुसर्या दिवशी त्या सर्वांना पुढच्या कार्यक्रमासाठी लोपोकी या शहरात जावे लागणार होते. तिथून त्यांना लाहोरला आणण्यासाठी बस होती.
परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं. रात्री पाऊस पडला आणि लोपोकीला जाण्यासाठी ज्या रस्त्याने जायचं होतं तिथं गाडीने जाणं धोक्याचं झालं. त्यामुळे सर्वांनी चालत जाणंच पसंत केलं.
त्या रात्रीच्या पावसाचे वर्णन करताना अमृता म्हणते, ‘रात्री जेव्हा मी पावसाकडे पाहात होते तेव्हा मला असं वाटत होतं की, नियतीनं माझ्या हृदयात प्रेमाचे बीजच पेरले होते आणि निसर्गानं त्याला प्रेमानं पावसाच्या रूपात पाणी घालून ते वाढवलं होतं.’
थोडं अंतर ठेवून चालताना जेव्हा साहिरच्या सावलीत अमृताची सावली मिसळून गेली होती.
तेव्हा अमृता म्हणते, ‘‘मला माहीत नव्हतं की, मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे त्याच्या सावलीत घालवू शकेन का? किंवा थकून जाऊन मी माझंच स्वत:च्या शब्दांत समाधान करू शकेन.’’ अशा आशयाची कविता अमृताने साहिरच्या प्रेमात रंगून लिहिली;
परंतु त्याच्या मागची प्रेरणा कधीच उघड केली नाही.
जेव्हा ते दोघे पहिल्यांदा भेटले तेव्हा अमृताचं लग्नं झालेलं होतं. हे लग्न अमृता लहान असतानाच प्रितम सिंग नावाच्या माणसाशी झालं. पण ती आपल्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हती.
खरं तर साहिरने पहिल्यांदा अमृताला पाहिलं तेव्हा आईला ते म्हणाले, ‘‘वो अमृता प्रीतम है, वो आपकी बहू बन सकती थी।’’ ‘अ पीपल्स पोएटचे लेखक’ अक्षय मानवानी म्हणतात की,
साहिरने हे मान्य केलं होतं की, अमृता प्रीतम हीच एक अशी व्यक्ती आहे की जिने कधीही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडलं नसतं.
अशा अनेक मुशैरास उपस्थित राहिल्यामुळे साहिरशी तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण ते सर्वश्रुत झाले नाही कारण ते दोघे कधीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलले नाहीत. त्यांचे पत्रव्यवहार सुरू झाले.
तो लाहोरमध्ये होता आणि ती दिल्लीत. तिच्या पत्रांमधून हे स्पष्ट होत होतं की, ती साहिरच्या प्रेमात होती. तिने त्याचा उल्लेख, ‘मेरा शायर’, ‘मेरा मेहबूब’, मेरा खुदा आणि ‘मेरा देवता’ असा केला होता.
तरीही त्याने तिला कधी वचन दिले नाही. कदाचित प्रेमबंधनात राहाणं त्यांना पसंत नसावं किंवा तिचं लग्न झालेलं असल्यामुळे ते व्यक्त करणं उचित वाटत नसावं.
ते दोघं एकमेकांना भेटण्यापेक्षा प्रेमपत्रच लिहायचे आणि जरी कधी भेटले तरी खूप बोलण्यापेक्षा शांत राहाणंच पसंत करायचे. असं गूढ प्रेम होतं.
‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं।’ असं शब्दात मांडणारा गीतकार खरी प्रेमिका जवळ असल्यावर मात्र निशब्द होत असे
किंवा त्यांच्या मनात काय चाललंय हे समजणारी व्यक्ती जवळ असल्याने न बोलताही सारं काही तिला उमगत आहे अशी कल्पना दोघांनीही करून घेतली असावी.
अमृता म्हणते, ‘आमच्यात दोन मुख्य अडथळे होते, एक शांतता, जी कायमस्वरूपी राहिली आणि दुसरी भाषा. ती पंजाबी भाषेत कविता लिहायची तर साहिर उर्दूमध्ये.’
‘मैं पल दोपल का शायर हूँ, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है।’
किती श्रीमंती होती शब्दांत. साहिरचं शब्दांबद्दलचं सामर्थ्य शब्दांतीत आहे. या शब्दांनीच जर त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं असतं तर… तर कदाचित त्याला हवी तशी साथ आयुष्यात मिळाली असती.
पण या जर-तर मुळेच तर सगळा गोंधळ होतो किंवा अमृताही नावाजलेली कवयित्री होती. तिने आपल्या ‘एक मुलाकत’, ‘खाली जगह’, ‘एक पत्र’, ‘सिगरेट’या कवितांमधून आपल्या मनातील गोष्टी कागदावर उतरवल्या आहेत, पण तेच शब्द साहिरसमोर ती बोलली नाही.
अमृताच्या ‘रसेदि टिककत’ (महसूल मुद्रांक) या आत्मचरित्रातही अमृताने साहिरच्या शांततेचं वर्णन अतिशय दु:खानं केल्याचं जाणवतं.
ती म्हणते,
‘जेव्हा साहिर मला भेटायला लाहोरला आला, तेव्हा मला असं वाटतलं की आमच्यातील शांततेनं जणू शेजारची खुर्चीच पकडलीय.’
तिने आणखीन एक कथा सांगितली. साहिर सिगारेट पेटवत होता आणि अर्धी सिगारेट संपल्यावर ती विझवून पुन्हा नवीन सिगारेट पेटवीत होता आणि पहिली अर्धी सिगारेट तशीच ठेवत होता. जेव्हा तो त्या खोलीतून निघून जात असे तेव्हा सगळी खोली धुराने भरलेली होती.
मग तिने त्यातली एक अर्धी सिगारेट उचलली आणि ती पेटवली तेव्हा ती सिगारेट ओढत असताना तिला असा भास झाला की, साहिर आपल्या जवळच आहे आणि तेव्हापासून तिला सिगारेटची सवय लागली.
तिने त्या आत्मचरित्रात साहिरची पण कथा सांगितली आहे, साहिरने तिला सांगितलं होतं,
‘जेव्हा ती दोघं लाहोरमध्ये होती तेव्हा तो नेहमी तिच्या घराजवळ यायचा. तिथे कॉर्नरच्या एका दुकानात पान किंवा सिगारेट किंवा सोड्याचा ग्लास घेऊन तासन्तास तुझ्या घराच्या रस्त्याच्या बाजूला असणार्या खिडकीकडे पाहात बसायचो.’’
नंतर जेव्हा फाळणी झाली अमृता तिच्या नवर्यासह दिल्लीला गेली. आणि आपल्याला माहीतच आहे की, फाळणीनंतर थोड्याच वर्षांत साहिर मुंबईत नावारूपाला आला. म्हणजे जेव्हा ती दिल्लीत आली तेव्हा तो मुंबईतच स्थायिक झाला असावा.
हेही कारण असावं दोघांमधील प्रेमसंबंध न वाढण्याचं.
तरीसुद्धा अमृताने प्रयत्न सोडले नाहीत. तिने आपल्या साहित्याद्वारे साहिरबरोबरचे अनुभव लिहिण्यास सुरुवात केली. ‘इक सी अनीता’ नावाच्या कवितासंग्रहातून, ‘दिल्ली दिया गलीयां’ नावाच्या कादंबरीतून तिने आपले अनुभव लिहिले.
‘आखरी आहट’ नावाचा कथासंग्रह पण तिने लिहिला. तिच्या ‘सुनहरे’ या कवितासंग्रहाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ १९५६ मध्ये मिळाला. जो कवितासंग्रह तिने साहिरसाठीच लिहिला होता.
‘आखरी खत’ ही लघुकथा मालिका १९५५ साली एका साप्ताहिक उर्दू पत्रकातून सुरू करण्यात आली होती. जेव्हा अमृताला या मालिकेसाठी लिहिण्यास सांगण्यात आले तेव्हा तिने ‘साहिरबरोबरची पहिली भेट’ ही कथा लिहीली.
ते छापून पण आलं, पण तिच्या अपेक्षेभंग झाला. साहिरचं काहीच उत्तर आलं नाही.
मग एके दिवशी तीच साहिरकडे त्याला भेटायला गेली. तेव्हा त्याने सांगितलं,
‘जेव्हा मी ‘आखरी खत’ वाचलं तेव्हा मी खूप आनंदी झालो. मी माझ्या प्रत्येक मित्राकडे ते मॅगझिन घेऊन गेलो या विचाराने की त्यांना ते दाखवावं की हे माझ्यासाठी लिहिलंय, पण ते माझी चेष्टा करतील या भीतीनं मी गप्प राहिलो.’
अमृताची जशी सिगारेटची आठवण होती तशी साहिरच्या घरात टेबलावर एक कप होता. तो खूप दिवस तिथेच पडून असल्याचं जाणवत होतं, जेव्हा त्याचा मित्र तो कप उचलू लागला तेव्हा साहिरने त्याला तो उचलू दिला नाही कारण त्या कपात अमृता चहा प्यायली होती.
म्हणून त्यांची प्रेमकहाणीचं प्रतीक हे आहे.
तर अशी ही मूक प्रेम कहाणी. खरंच किती अनाकलनीय आहे ना? शब्दसामर्थ्यांने भारलेले दोन्ही प्रतिभावान माणसं. एक एक शायर, तर एक कवियत्री, पण एकमेकांसमोर आले की मात्र मूक राहात होते.
त्यांच्या भावना मांडायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांची सर्व शब्दसंपत्ती जणू त्यांनी इतरांसाठी राखून ठेवली होती. आजही जी गाणी ऐकल्यावर आपण अंतर्मुख होऊन जातो अशी गाणी आहेत गीतकार साहिरची.
‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है।
की जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए।’
असं एकदा तरी म्हणून बघायला हवं होतं, किंवा तेजाबमधील गीताप्रमाणे अमृताने तरी एकदा म्हणायला हवं होतं, ‘कुछ मेरी सुनो, कुछ अपनी कहो, हो पास तो ऐसे चूप ना रहो’
असं झालं असतं तर चटका लावणारी ही प्रेमकहाणी वेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळाली असती. वाईट एवढंच वाटतं की, ही कहाणी एकतर्फी प्रेमाची नव्हती, तरीही असफल अशी नाही पण अव्यक्त राहिली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.