आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या आजूबाजूला आपण अनेक कलाकार बघतो. यातले बरेचसे कलाकार त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर व्यक्त होताना आपल्या कलेच्याच माध्यमातून व्यक्त होतात.
म्हणजे कवी एखाद्या घटनेवर कविता लिहितात, लेखक लेख-कथा लिहितात आणि चित्रकार असतील तर चित्र काढतात.
हळव्या मनाचे कलाकार अशाप्रकारे आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देतात. कधीकधी ह्यातून काही अजरामर कलाकृती निर्माण होतात तर कधी ह्यातून मोठमोठे वाद सुद्धा निर्माण होतात.
आज आपण अशाच एका घटनेचा आढावा घेऊया.
मागच्याच वर्षी न्यूझीलंड ह्या शांत आणि सुंदर देशात एक अत्यंत वाईट घटना घडली होती. न्यूझीलंडमधल्या एका शहरात असलेल्या दोन मशिदीत मुस्लीम बांधव आपली प्रार्थना करत होते.
नेमक्या त्याचवेळी एका ऑस्ट्रेलियन माथेफिरूने त्या दोन्ही मशिदींवर क्रमाक्रमाने हल्ला केला आणि तिकडे अंधाधुंद गोळीबार केला गेला!
ह्या पूर्ण घटनेचे त्याने स्वतःच व्हिडीओ चित्रीकरण केले आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याने हा सगळा प्रकार पूर्ण जगासमोर आणला. अत्यंत अमानुष अशा ह्या हल्यात पन्नास नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले होते.
ह्या घटनेनंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न त्या हल्याच्या ठिकाणी गेल्या आणि हल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला होता!
त्यांच्या ह्या भेटीदरम्यानचे एक छायाचित्र फार प्रसिद्ध झाले ज्यामध्ये त्या एका हिजाब घातलेल्या मुस्लीम बाईला मिठी मारून तिचे सांत्वन करत आहेत.
जगभरातल्या अनेक वृत्तपत्रांनी ह्या छायाचित्राला आपल्या वृत्तपत्रात जागा दिली एवढे ते छायाचित्र बोलके होते.
नेमके हेच छायाचित्र ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न ह्या शहरात राहणाऱ्या एका जगप्रसिद्ध भित्तीचित्र कलाकाराला दिसले. तिचे नाव होते लोरेत्ता लिझीओ. जिच्या भित्तीचित्रांचे पूर्ण जग प्रशंसक आहे अशा ह्या कलाकाराला तो फोटू बघून आपल्या पुढच्या चित्राची कल्पना सुचली.
हल्यामुळे पूर्ण जगात राग, चीड ह्याचा प्रसार होत असतानाच जेसिंडा आर्डर्न ह्यांचे हे छायाचित्र सगळीकडे प्रेम पसरवण्याचा संदेश देऊ शकते ही गोष्ट लोरेत्ता लिझीओ हिच्या लक्षात आली.
तिने त्या छायाचित्राचेच चित्र एका मोठ्या भिंतीवर काढायचे ठरवले आणि ह्यासाठी तिने चक्क ७५ फुट उंच भिंत निवडली. मात्र आता पुढचा प्रश्न होता ह्या चित्रासाठी येणारा खर्च.
एवढ मोठ चित्र एखाद्या भिंतीवर काढण्यासाठी येणारा खर्च सुद्धा तेवढाच असणार होता. मात्र इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते काही खोटे नाही.
गोफंडमी नावाच्या समाजसेवी संस्थेने ह्या चित्रासाठी येणारा खर्च म्हणून ११००० डॉलर ची रक्कम जगभरातून जमा केली आणि ती ह्या कलाकाराला सुपूर्द केली.
मेलबर्नच्या एका प्रसिद्ध भागातल्या भिंतीवर हे चित्र दिमाखात विराजमान झाले.
फक्त मेलबर्न किंवा ऑस्ट्रेलियाच नाही तर जगभरातल्या कलेच्या चाहत्यांनी ह्या अप्रतिम कलाकृतीचे कौतुक केले गेले. लोरेत्ता लिझीओ ह्यांच्यासाठी तर हे चित्र म्हणजे आयुष्यातले एक महत्वाचे चित्र होते.
त्या म्हणाल्या की ह्यापूर्वी त्याच्या कुठल्याच चित्रावर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यक्त झाले नव्हते, काही लोकांना तर हे चित्र बघून त्यांचे अश्रू रोखण सुद्धा कठीण होऊन जायचं.
अनेकजण हे चित्र बघून त्याच्या कलाकाराला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचे.
मात्र जगात सगळ्यांना आवडणारी कुठलीच गोष्ट नसते हेच खर. ही एवढी अप्रतिम कलाकृती सुद्धा न आवडणारे अनेकजण होते. हळूहळू ते बाहेर येऊ लागले होते, त्यांचा सुद्धा आवाज मोठा होऊ लागला.
बघता बघता ह्या विरोध करणाऱ्या लोकांची संख्या पंधरा हजारावर गेली आणि ह्या पंधरा हजार लोकांनी संघटीत होऊन सरकारकडे हे चित्र काढून टाकण्याची मागणी केली.
हे चित्र न आवडण्यामागे किंवा हे चित्र काढून टाकायच्या मागणी मागे त्यांची अनेक कारणे होते.
सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे हा हल्ला जर न्यूझीलंड मध्ये झाला असेल तर त्याचा ऑस्ट्रेलियाशी काय संबंध ? ऑस्ट्रेलियाच्या एका माथेफिरूने हा हल्ला केल्यामुळे आधीच ऑस्ट्रेलियाची जगात नाचक्की झालेली आहे.
त्यात असे चित्र एका प्रमुख शहरात मोक्याच्या जागी असणाऱ्या भिंतीवर लाऊन आपण त्याचे प्रदर्शन का करतो आहोत असा ह्या विरोध करणाऱ्यांचा सवाल होता.
काही जणांना हा पैशाचा अपव्यय वाटत होता. तेच ११००० डॉलर ह्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या लोकांना किंवा हल्यात मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दिले असते तर ह्या पैशाचा योग्य वापर झाला असता असे मत ह्या विरोध करणाऱ्या काहीजणांचे होते.
अजून काहीजणांनी फक्त ह्याच हल्याच्या वेळी आपण असे का करतोय असा प्रश्न विचारला.
श्रीलंकेत सुद्धा ह्यापेक्षा कितीतरी भीषण हल्ला झाला होता त्यावेळी आपण असल काहीच केल नव्हत मग आताच आपण अस का करतोय असा प्रश्न काहीजणांनी विचारला आहे.
काहीजणांनी तर त्याही पुढे जाऊन असे म्हटले आहे की दरवेळी हल्लेखोर हा मुस्लीम समाजातील असतो तेव्हा आपण गप्प बसतो आणि आता हल्ला मुस्लीम समाजावर झाला आहे तर आपण त्याला एवढ महत्व देतो आहोत.
अशा अनेक मतमतांतरात हे चित्र मेलबर्नमध्ये एका ७५ फुट उंच भिंतीवर विराजमान आहे आणि जगभरातल्या लोकाचे हे आकर्षण बनले आहे.
हे पाहून दुबईमधल्या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीला म्हणजे बुर्ज खलिफाला सुद्धा ह्याची नक्कल करायची इच्छा दूर करता आली नाही.
हेच छायाचित्र बुर्ज खलिफा ह्या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीवर प्रोजेक्टरच्या सहाय्याने काही वेळासाठी का होईना पण विराजमान झाले होते.
ह्या दुर्दैवी घटनेचा सूत्रधार सध्या न्यूझीलंड पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यूझीलंडमधील सगळ्यात कडक शिक्षा म्हणजेच जन्मठेप होण्यासाठी तिकडचे पोलीस प्रयत्नशील आहेत.
तर असे हे कुणाला आवडणारे तर कुणाला न आवडणारे ७५ फुट उंच भिंतीवर असणारे एक चित्र.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.