दिल्लीच्या प्रसिद्ध चांदणी चौकाचं डिझाइन या मुघल राणीने केलं होतं..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पूर्वीच्या राण्या किंवा राजकन्या म्हटलं की, डोळ्यांसमोर चित्र येतं ते डोलीत बसलेल्या, चेहराही न दिसणार्या, जगाशी संपर्क नसलेल्या स्त्रिया. काही सांगायचं असलं तर पडद्याआडून त्या सांगत असाव्यात.
एकविसाव्या शतकात जेव्हा जग इतकं पुढं गेलं आहे, फॅशन मिनटा-मिनटाला बदलत आहे, स्त्रियांच्या पौषाखातही झपाट्याने वैविध्य येत असताना काही स्त्रिया बुरखा धारण करताना दिसतात तर पूर्वीच्या काळी किती कडक बंधनं त्यांच्यावर असतील याचा विचार न केलेलाच बरा.

तर सांगायचं तात्पर्य हे की त्याही काळात बुद्धिमान जहांरा बेगम या मुगल राजकुमारीने दिल्लीतील प्रसिद्ध बाजारपेठेत एका चौकाची अशी रचना करवून घेतले होते की, त्या चौकावरून त्या बाजारपेठेला ‘चांदणी चौक’ असे नाव पडले.
जिथे आज हजारो पर्यटक आणि ग्राहक भेट देतात. आहे ना आश्चर्य? तर आपण बघू कसं होतं या बेगमचं जीवन आणि ती हे कसं करू शकली?
१६१४ मध्ये हजरत निजामुद्दीन दरगाड येथे मुलग सम्राट शाहजहां आणि त्यांची प्रिय पत्नी मुमताज महल यांनी एका कन्या रत्नाला जन्म दिला. जहारा या मुगल राजकुमारीचा जन्म झाला.
या राजकुमारीने पारंपरिक भूमिकेबाहेर एक जीवन जगले. ती एक आदर्श वास्तुविशारद, अभियंता, कवी, लेखक आणि चित्रकार होती.
तिचे कर्तृत्व हे अधिक खास होते कारण त्या काळातील मुगल स्त्रियांचे जीवन हे घरातील चार भिंतीतच मर्यादित होते. १६३१ मध्ये म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षीच बेगम साहेबांचे निधन झाल्याने ती राजकन्या मातृसुखाला पारखी झाली. त्यानंतर ती तिच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागली.

‘‘ती सर्वांचीच आवडती होती आणि ती वैभवशाली अवस्थेत राहात होती.’’ हा तपशील ‘स्टोरी ऑफ द मुगल’ या पुस्तकातील आहे आणि हे पुस्तक निकोलो मनुकी या इटालियन लेखकाने लिहिले आहे.
हे पुस्तक शहाजाहान आणि नंतर औरंगजेब या काळातील मुघल दरबाराबद्दल विस्तृत माहिती देणारं पुस्तक आहे. जहाजाची मालकी असलेल्या काही मुगल स्त्रियांपैकी जहाराही एक होती. तिचे जहाज सहिबई, सूरतच्या बंदरावर डॉक केले गेले आणि डच आणि इंग्रजी व्यापार्यांबरोबर व्यापार केला.
‘‘या राजकुमारीकडे सूरतच्या बंदरच्या उत्पन्नाव्यतिरिक्त तीन दशलक्ष रुपये वार्षिक उत्पन्न होते. शिवाय, तिच्या वडिलांनी तिला अनेक मौल्यवान रत्ने आणि दागिने दिले होते.’’ असे मनुकीने लिहून ठेवले आहे.
जहाराच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वाचा फायदा दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्यामधील वैर मिटवण्यासाठी मात्र अजिबात झाला नाही.

आपल्या भावांतील भांडण मिटून त्यांनी एकत्र यावे असे तिला मनापासून वाटत होते. त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, पण ती त्यामध्ये मात्र अयशस्वी ठरली.
शेवटी औरंगजेबाने दारा शिकोह याला मारलं व शहाजहांला म्हणजे आपल्या वडिलांना नजरकैदेत ठेवले. वडिलांशी जहारा वडिलांशी एकनिष्ठ असल्याने, तिने सर्व ऐशोआरामी जीवन व आपला व्यापार सोडून तीसुद्धा शहाजहांबरोबर नजरकैदेत राहू लागली.
तिने आपल्या वडिलांची 8 वर्षं सेवा केली. औरंगजेबने शहाजहांच्या मृत्यूनंतर जहाराला ‘पदशाह बेगम’ अशी पदवी दिली, आमरण पेंशन दिली आणि एक वयस्क दासी तिच्याबराबेर दिली.
तसेच तिला आग्र्याच्या किल्ल्याच्या सीमेबाहेर तिच्या स्वत:च्या इमारतीत राहण्याची परवानगी देण्यात आली. या काळात जहाराने स्वत:चे छंद जोपासले. साहित्याची आवड तिला होतीच. तिने ‘साहित्याची प्रभावी महिला संरक्षक’ आणि कवियत्री अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली.

तिने दुर्मीळ पुस्तकं संग्रहित केली आणि ग्रंथालय तयार केले. ती धर्मासाठी पैसे दान करत असे. विशेषत: सुफी दारगाह आणि तक्रारदार तिच्याकडे भेटवस्तूंसह येत असत.’’ असे इरा मुखोटी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.
वयाच्या ६७ व्या वर्षी, १६८१ साली जहारा मरण पावली पण इतिहासात तिने आपले नाव अजरामर केले. मुगल साम्राज्यात अनेक वास्तुशिल्प, मशिदी, सरोवरे आणि सार्वजनिक बागांची तिने निर्मिती केली. पण सर्वांत आकर्षक ठरलेली तिची कलाकृती म्हणजे चांदणी चौक.
जुन्या दिल्लीच्या मोठा बाजार चांदणीचौक या नावाने आजही प्रसिद्ध आहे. या चौकाची निर्मिती जहाराने केली होती. तो चौक कसा होता ते आपण पाहू. चौक अष्टकोनी होता. त्याच्या बाजू शंभर यार्ड आहेत. विस्तीर्ण आवार. त्या चौकाच्या मध्यभागी एक तलाव होता. उत्तरेला जहारा यांनी एक धर्मशाळा बांधली.
तर दक्षिणेला एक बाग आणि स्नानगृह. काही विशिष्ट रात्री म्हणजे पौर्णिमा व त्याच्या आसपासच्या दिवशी चंद्राचे फिकट आणि चंदेरी प्रतिबिंब या मध्यभागाच्या तलावात दिसते. किती मनमोहक असं दृश्य दिसत असेल ना?

पौर्णिमेचा चंद्र किंवा चंंद्राची कोर, मुळातच चंद्र सर्वांनाच आवडतो. अगदी लहान मुलांसाठी चंद्र हा चंदोबामामा असतो, तर ह्याच चंद्राची उपमा तरुणपणात आपल्या प्रिय व्यक्तीला सुद्धा दिली जाते.
‘चंदा रे चंदा कभी तो जमीन पे आ’ किंवा ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा’ किंवा अगदी लहानपणाचं ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ अशा कितीतरी गाणी चंद्रावर आधारीत आहेत आणि ती सर्व लोकप्रिय आहेत.
तर अशा भुरळ पाडणार्या चंद्राचे आणि चांदण्यांचे प्रतिबिंब पाण्यात दिसत असे आणि म्हणूनच या ठिकाणाला चांदणी चौक असे नाव पडले. लाहोरी गट ते फतेहपुरी मस्जिदपर्यंत ‘चांदणी चौक’ हे नाव विस्थापित केले गेले.
खरंच कमाल आहे ना? केवढी बुद्धिमत्ता आणि कलात्मकता होती जहाराच्या अंगी. आज चांदणीचौकच्या अनेक प्राचीन इमारतींचा नाश झाला आहे, कारण नवीन-नवीन दुकाने होत आहेत, पण चांदणीचौक हे नाव मात्र चमकत आहे.

आणखीन एक गोष्ट म्हणजे जहाराच्या कबरीची जागा तिच्या स्वत:च्या आवडीप्रमाणे आहे. तिच्या आईवडिलांप्रमाणे तिचीही संगमरवरी कबर आहे आणि त्यावर पारशी भाषेत लिहिले आहे,
‘बागारे सुजा ना पोहसा केस माजार मार, (हरित गवत वगळता कोणालाही माझ्या कबरेत झाकून ठेवू नका) की कबर पोह्मभवन हामिन गेह बेस्ट-अस्ट (ही गरीबांसाठी कबरांसारखी गवताची जागा आहे)
“जुनं ते सोनं” असं म्हणतात ते काही उगाच नाही. पूर्वीच्या इमारती, त्यांचं भव्य बांधकाम पाहिलं की आजही डोळे दिपतात. त्यांची रचना, त्यांचं वैशिष्ट्य हे खरोखरंच अद्वितीय होतं. त्याप्रमाणेच हे एक “चांदणी चौक”. दिल्लीतील मोठी बाजारपेठ.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.