आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
रुटीनचा कंटाळा आलाय ?
गर्दी, घाम, ऑफिसमधील कामाचा लोड, घरच्या त्याच त्या समस्यांचे प्रेशर, ट्राफिक जाम, तापलेल्या डांबरी सडका, कार्बनडायओक्साईडचा धूर भकाभक अंगावर सोडणारी वाहने, धूळ….
या सगळ्यांपासून काही काळ दूर जाण्यासाठी मस्तपैकी हॉलिडे टूर आयोजित करायची? चला तर मग, उघडा फोन आणि गुगल सर्च करा. सहलीला कुठे जायचे म्हणून नव्हे हो, तशी तर शंभर ठिकाणे आहेत !
पण तुम्ही तन मन अंतर्बाह्य ताजातवाना करून टाकणारा विसावा शोधत आहात, तो तुमच्या खिशालाही परवडणारा हवा ना ?
तुम्हाला काय खुणावते आहे, आकाश साद घालते आहे की गिरिशिखरे की समुद्र याचाही कौल घ्यायला हवा ना? समुद्र सफर करायची असेल तर आम्ही तुमच्या नियोजनात तुम्हाला काही मदत करु शकतो ठिकाण ठरवण्यासाठी.
भारतात अनेकोत्तम प्रेक्षणीय सौंदर्यस्थळे आहेत. चला तर , माहिती घेऊ या भारतातील सर्वात स्वस्त जहाजसफरींची आणि मस्तपैकी एक ट्रीप आयोजित करू –
१) द गोल्डन ट्रिअँगल क्रुज –
सांस्कृतिक सहलीसाठी हा दिल्ली आग्रा आणि जयपूरवरून जाणारा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. कारण या रूटवरून जाताना केवळ मौज मस्ती धमालच होत नाही, तर देशातील स्थापत्यशास्त्रातील, वास्तुरचनेतील चमत्कार म्हणता येईल अशा ठिकाणाची ओळख होते.
हा प्रवास काळाचे दाट, जाड पडदे बाजूला सारत तुम्हाला मध्ययुगाची सफर घडवून आणतो. किलोमीटर्सच्या अंतराच्या हिशोबात जवळ वाटणारी, पण स्वतःची अशी खास, भिन्न खाद्यसंस्कृती असणाऱ्या ठिकाणांच्या पदार्थांचा स्वाद ही त्या ठिकाणाची ओळख असते.
या प्रवासात अशा अनेक ‘ चवदार’ ओळखी होतात. दिल्लीचा आधुनिकपणा, आग्र्याची अद्भुतरम्यता आणि जयपूरची शाही भव्यता एकाच प्रवासात अनुभवायची असेल तर द गोल्डन ट्रिअँगल क्रुज ला पर्याय नाही.
सात रात्री ‘on board, आणि ६ रात्री जमिनींवर असे पॅकेज ओबेरॉय हॉटेल देत आहे. जलप्रवासाची आवड असणारांना सर्व अर्थांनी समृद्ध करणाऱ्या अशा सहलीची ऑफर म्हणजे पर्वणीच आहे असे म्हणायला हरकत नाही.
२) अंदमान आयलंड्स ग्लास बॉटम क्रूज –
समुद्राच्या भव्य आणि अथांग अशा देखण्या रूपाच्या प्रेमात असणारांसाठी अंदमान आयलंड्स ग्लास बॉटम क्रूज म्हणजे स्वर्गच.
सर्वोत्तम, विस्मयकारक स्थळांच्या आमच्या यादीतील हे दुसऱ्या क्रमांकाचे ठिकाण.
जॉली बॉय नि नील आयलंड्स सारख्या बेटांवर निसर्गाने केलेल्या सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण पाहून हा अनुभव आपल्या प्रियजनांनी देखील घ्यावा असे वाटल्यावाचून राहत नाही.
आतुरतेने तुमच्या भेटीला येत आहेत असे वाटायला लावणाऱ्या सरसरत येणाऱ्या लाटा नि भोवतालची रंगीबेरंगी प्रवाळे पाहतानाच तुम्ही ग्लास बॉटम क्रूज बुक करण्याचा विचार पक्का न केला तर नवलच.
३) चिलिका लेक क्रूज –
पक्षी प्रेमी आहात? मग चिलिका लेक क्रूज तुमच्यासाठी अत्यंत आदर्श ठिकाण ! बंगालच्या उपसागरातील हे स्थळ म्हणजे निसर्गसौंदर्याच्या श्रीमंतीचा अस्सल नमुना.
पुरीपासून साधारण ६० किलोमीटर्स अंतरावर पक्षीप्रेमींसाठी एक सुंदर स्पॉट आहे.
आकाशाचे प्रतिबिंब पडून आकाशी निळसर दिसणाऱ्या पाण्यातून बोट संथपणे पुढे सरकत असताना हेरॉन, फाल्कन, स्पॉटबिल्ड पेलिकन यांसारखे अनेक स्थलांतरित पक्षी नजरेस पडतात.
राजहंस बीचवर तर तुम्हाला डॉल्फिनदेखील भेटतात. झाली ना इच्छा सुट्टीत चिलिका सफर आयोजित करायची ?
४) कोची क्रूज –
जहाज सफरीसाठी भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण.
चकाकणाऱ्या लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या मंद झुळूकीबरोबर हलके हलके पुढे ढकलले गेल्याचा अनुभव घ्यायचा आहे ? मग चला कोचीला.
वर्षभर अगदी हवे तसे हवामान असल्याने कोची कायम पर्यटकांनी गजबजलेले असते. शिवाय तुम्हाला सुट्टीचा किती काळ तेथे व्यतीत करायचं आहे आणि तुमचे बजेट किती आहे यानुसार कोचीच्या वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त खवय्यांसाठी देखील मेजवानी म्हणून डोळे, नाक आणि रसना या इंद्रियांना तृप्त करणारे खास पारंपारिक पदार्थ देखील आहेत. हा सर्व आनंद तनामनात भिनवायला घाई घाईत येऊन उपयोगाचे नाही.
निवांत सुट्टीचा आनंद घायचा असेल तर कोची मस्तच !
५) गोवा क्रूज –
नदी किंवा समुद्रात प्रवास करण्यासाठी गोवा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रणयरम्य सहल हवी असेल तर तुमच्या जोडीदाराला घेऊन अवश्य गोव्याला या!
सांस्कृतिक कार्यक्रम, बीअर, बुफेमधील रुचकर पदार्थ यासह झुआरी बे कडे घेऊन जाणारा मांडवी नदीतील प्रवास, नजरेला सुखावणारा गार सूर्यास्त, सूर्यास्ताच्या शांत प्रकाशाने चकाकणारे पाणी आणि पाठोपाठ तुम्हाला चंदेरी प्रकाशात न्हाऊ घालणारा चंद्र!
हे सगळे चित्तवृत्ती फुलवणारे वातावरण तरुण जोड्यांना स्वागतार्ह असेच आहे.
चला तर, आपल्या जोडीदारासाठी बुक करा गोवा क्रूज पटकन.
६) दिब्रु सैखोवा रिव्हर क्रूज –
तुम्ही निसर्गप्रेमी आहात आणि एक गोष्ट ठरवली की त्यावर दुसऱ्यांदा विचार करायला तुम्हाला आवडत नसेल तर या ठिकाणी सुट्टीचा प्लॅन नक्की करा.
पाण्याच्या खोल तळाशी दडलेली निसर्गाची गूढ रहस्ये तुम्हाला मोहवत असतील तर निसर्गाची ती हाक कान देऊन ऐका नि तिला प्रतिसाद द्या.
दिब्रु सैखोवा रिव्हर क्रूज हे पांढरे पंख असलेली बदके, उठावदार रंगांचे घोडे, स्लो लॉरीस यांसारख्या अनेक दुर्मिळ प्रजातीच्या पक्षी आणि प्राण्यांचे माहेरघर आहे.
७) ब्रह्मपुत्रा रिव्हर क्रूज–
ब्रह्मपुत्रा रिव्हर क्रूज म्हणजे एका अविस्मरणीय जलप्रवासाची हमी !
ब्रह्मपुत्रेच्या भव्य नि अथांग प्रवाहावर विहरणाऱ्या या बोटीवर पाय ठेवताच तुम्हाला जाणीव होते की हे पाऊल एका स्वर्गीय आनंदाच्या दिशेने नेणारे पहिले पाउल आहे.
मोहवून टाकणारा हिरवागार निसर्ग, आधुनिकतेचा स्पर्श न झालेली, म्हणूनच अस्सल साधेपणा अंगाखांद्यावर मिरवणारी आसपासची खेडी, तिथले सुंदर पक्षीजीवन आणि अधूनमधून भेट देणारे डॉल्फिन्स या गोष्टी पुरेशा आहेत तुम्हाला या ठिकाणच्या प्रेमात पडायला.
आणि या सुखद अनुभवात भर म्हणून ज्याला ‘ चेरी ऑन द केक’ म्हणता येईल असे स्वादिष्ट, रुचकर जेवण ! मग वाट कसली बघता ?
८) सुंदरबन बोट क्रूज-
तुम्ही नुसतेच निसर्गप्रेमी नाही आहात, तर तुम्हाला साहसाची देखील आवड आहे ? मग ‘क्रूज शिप टूर इन इंडिया’ तुमच्यासाठी परफेक्ट निवड आहे.
दाट मँग्रोवचे जंगल आणि सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशातील वळणे घेत वाहत जाणाऱ्या नद्या याकडे घेऊन जाणारा हा अद्भुत प्रवास सिंदबादच्या सफरीची आठवण करून देणारा नक्कीच असेल.
तेथील वाघांसाठी राखीव जंगलांचे सौंदर्य तर श्वास रोखून धरायला लावणारे !
सुंदरबन म्हणजे नदीने दिलेले अभूतपूर्व वरदानच ! आताच बुक करा आणि तुमच्या लाडक्याबरोबर सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटा.
९) केरळ बॅकवॉटर क्रूज –
भारतातील क्रूज सहलींबद्दल बोलायचे आणि केरला बॅकवॉटर क्रूजचा उल्लेख करायचा नाही असे कसे होऊ शकते ? केरळ अशा सहलींकरता इतके लोकप्रिय आहे की ते अपरिहार्य बनले आहे.
इथल्या सौंदर्याला स्वर्गीय स्पर्श असल्याचा भास होतो, म्हणूनच ते देवी देवतांचे नंदनवन आहे की काय असे वाटते.
पारंपारिक भात शेती करणारी सुंदर नि शांत खेडी, खास अस्सल दाक्षिणात्य चवींचे पदार्थ, नदीकाठची अद्भुत हिरवाई, किंगफिशर, टर्टल, मडस्कीपर, बेडके यांच्या आवाजांनी वातावरणाला मिळत जाणारे नैसर्गिक संगीत…!
स्वर्ग असाच दिसत असेल ना? मग संधी सोडू नका पृथ्वीवरचा स्वर्ग अनुभवायची.
गँगेज रिव्हर क्रूज :
कोलकाता आणि फराक्का यांच्या मधून गंगेच्या पवित्र पाण्यातील हा प्रवास म्हणजे नैसर्गिक सौंदर्याच्या इतिहासाची भव्यता अनुभवण्याची एक संधी.
सौंदर्याने नटलेल्या या खेड्यांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी तुम्हाला स्मारके आढळतात.त्यामुळे इथल्या सौंदर्याला इतिहास आहे किंवा इतिहासाने हे ठिकाण सुंदर बनवले आहे असे म्हणता येईल.
आपल्या कुटुंबियांना घेऊन येथे येणार असाल तर निर्भेळ आनंदाची हमी निश्चित मिळेल.
अश्याप्रकारे जर तुम्ही एखादी चांगली सहल प्लान करत असाल तर नक्की ह्या क्रुझ सफारीना नक्की विचारात घ्या, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल हे मात्र नक्की !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.