अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्याला जर एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर वेळेचं आणि वयाचं बंधन नसतं हेच खरं. तसंच त्यामध्ये लिंगभेदही नसतो.
म्हणजे ठरवणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष जर आपल्या मताशी ठाम असेल तर त्यात त्यांना यश हे हमखास मिळतंच.
खरं तर महिला या जास्त महत्त्वाकांक्षी असतात. अशाच एका महत्त्वाकांक्षी क्रांतिकारी महिलेची ही कथा आहे.
सुनीती चौधरी यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी इंग्रज अधिकार्यावर गोळीबार केला.
देशप्रेमामुळे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय झालेल्या त्या छोट्या मुलीने तब्बल सात वर्ष तुरुंगवास भोगला. त्यांची कथा अशी –
सुनीती चौधरी यांचा जन्म २२ मे १९१७ रोजी त्रिपुरा इब्राहमपूर येथे झाला होता. तो काळच असा होता की सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता.
इंग्रजांच्या अमानुष छळाला भारतीय कंटाळले होते आणि इंग्रजांनी आपला देश सोडून जावा म्हणून अनेक क्रांतिकारी चळवळी सुरू होत्या.
सुनीती चौधरी यांचे दोन मोठे भाऊ आधिच क्रांतीकारी चळवळीत कार्यरत होते.
त्यांच्या घरातील वातावरणामुळे त्यांना बाळकडूच तसे मिळाले की, त्यांच्याही मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली व आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी प्रखर इच्छा निर्माण झाली.
घरातील पोषक वातावरण आणि उलसकर दत्ता ज्यांनी कलकत्त्यामधील कॉलेजमध्ये असताना ब्रिटीश ऑफिसर रसेलनी बंगालींविरुद्ध काहीतरी कमेंट केली होती तेव्हा प्रोफेसर दत्ता यांनी त्यांना मारहाण केली होती.
त्यामुळे दत्ता यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. त्याचा बदला म्हणून त्यांनी बाँब तयार केले होते. त्यांचा प्रभाव ही सुनीती चौधरीवर होताच.
शालेय जीवनातच ती विद्यार्थिनी संघटनेची प्रमुख बनली. प्रफुल्ला, सुनीती चौधरी आणि शांतीसुधा घोष या परेड करत होत्या.
जेव्हा स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न प्रफुल्लाने नेताजी सुभाषचंद्र बोसना विचारला तेव्हा त्यांनी क्षणात उत्तर दिले,
‘तुम्हाला पहिल्या रांगेत पाहून मला आनंद होईल.’
दरम्यान ‘छत्री संघ’ ही महिला शाखा युगांतरशी संबंधित होती. तरुण मुलींना प्रशिक्षण देत होती, तर क्रांतिकारकांच्या प्रशिक्षणार्थी, माहितीपत्रक, शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि पैसा अशी सर्व बाजू ही संस्था सांभाळत होती.
या मुलींनी मुलांच्या बरोबरीने आपल्यावरही काही जबाबदार्या देण्यात याव्या अशी मागणी केली.
किती ते धाडस तेव्हा त्यांच्यातील गुण हेरून युगांतर संस्थेतर्फे त्यांना कट्यार आणि बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
त्रिपुरा स्टुडंटस् ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अखिल चंद्र नंदी यांच्या देखरेखीखाली त्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण सुरू झाले.
त्यांनी शाळा सोडली आणि गावापासून दूर असलेल्या घनदाट जंगलात त्यांचे नेमबाजीचे शिक्षण सुरू झाले.
खेळण्या-बागडण्याच्या वयात देशाची जबाबदारी डोक्यावर घेतली.
मुख्य आवाहन गोल मारणे नव्हे तर बंदुकीची पाठीमागची किक व्यवस्थित बसणे. सुनीतीची लहानशी-कोवळी बोटं ती, योग्यरित्या ट्रिंगरवर पोहोचू शकत नव्हती, पण तिच्यातील जिद्दीने हार मानली नाही.
त्यासाठी तिने आपल्या लांब मधल्या बोटाचा वापर केला. तिच्यातील आत्मविश्वास आणि धैर्य तसेच अचूक नेमबाजी हे गुण हेरून तिची लगेचच एका मोहिमेसाठी निवड झाली.
तिच्याबरोबर शांतीसुधा घोष सुद्धा होती.
जेव्हा काही वरिष्ठ नेत्यांनी या छोट्या मुली त्यांच्यावर दिलेली जबाबदारी नीट पार पाडतील का? अशी शंका व्यक्त केली
तेव्हा सुनीतीने विचारले, ‘‘जर आपण खर्या कृतीपासून दूर राहिलो तर घेतलेल्या शिक्षणात तरबेज झालो आहोत का नाही हे कसे कळणार?’’
असा अस्खलित प्रश्न विचारून तिने अधिकार्यांची तोंडं बंद केली.
अखेरीस फरार असलेल्या नेत्यांपैकी एक, बिरेन भट्टाचार्य यांनी गुप्तपणे मुलींची मुलाखत घेतली आणि त्यांनी त्या दोघींची या मोहिमेसाठी निवड केली. अशा कर्तृत्ववान मुलींना खरंच सलाम.
इतक्या लहान वयात वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दाखविणे, नुसती ‘बोलाचीच कढी नी, बोलाचाच भात’ असं वर्तन न करता देशासाठी प्राण पणाला लावण्यासाठी सज्ज होणे केवढे ते धैर्य.
खरंच स्वातंत्र्यापूर्वीची ही लोक स्वातंत्र्य मिळण्यासाठी पेटून उठली होती.
अवघ्या १४ व्या वर्षी बंदूक चालवणे, शिकून घेणे आणि त्या कार्यासाठी निवड होणे आणि मुख्य म्हणजे आपल्यावर आलेली जबाबदारी चोख बजावणे.
हे आश्चर्य नाहीतर दुसरे काय? याला काय म्हणता येईल? देशप्रेम? आत्मविश्वास? धडाडी? का चमत्कार?
हा दैवी चमत्कारच म्हणायला हवा.
१४ डिसेंबर १९३१ रोजी रात्री १० वाजता जिल्हा दंडाधिकारीच्या बंगल्यासमोर गाडी थांबली.
दोन किशोरवयीन मुली त्यातून उतरल्या. त्यांनी साडी नेसली होती आणि बंदुकीला संरक्षण म्हणून जाकीट घातलं होतं त्यांनी उत्साहाने उडी मारली.
इंग्रज सरकारने सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था केली होती त्यामुळे हे काम काही सोपे नव्हते. त्यामुळे सुनीती चौधरी आणि शांती घोष यांना एक प्लान आखून दिला होता.
मिस्टर स्टीव्हन हे एका जलतरण तलावाचे डिस्ट्रिक मॅजिस्ट्रेट होते. जलतरण तलावाच्या मॅजिस्ट्रेटची सही घेण्याच्या निमित्ताने इला सेन आणि मीरा देवी ही नावं धारण करून त्या तिथे आल्या होत्या.
त्यांनी वापरलेल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीमुळे त्यांच्यावर कुणी संशय घेतला नाही. इलाने तर आपण पोलीस अधिकार्याची मुलगी असल्याचे सांगितले.
स्टीव्हन सही देण्यासाठी जेव्हा सुनीती चौधरीसमोर आले तेव्हा त्याच क्षणाला तिने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
या छोट्या मुलींकडून आपल्याला धोका आहे हे कळायच्या आतच त्यांच्यावर गोळीबार झाला होता. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी या क्रांतिकारक महिलेने इंग्रज अधिकार्याला गोळी घातली.
या बहादूर मुलींवर नंतर इंग्रज सरकारने कारवाई केली आणि त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास!
अरेरे! जेव्हा मखमली आयुष्याची स्वप्नं पाहण्यात मुलं-मुली रममाण असतात, तेव्हा या मुली मात्र देशासाठी सोनेरी स्वप्नं पाहात होत्या. खरंच असं काही आठवलं की खरंच म्हणावंसं वाटतं,
ए मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी।
जो शहीद हुऐ है उनकी, जरा याद करो कुरबानी ॥
तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही सुनीतीने क्रांतिकारी सोडली नाही. ती तिच्या क्रांतीकारक भावाला मदत करत असे. त्याबराबेरच तिने आपले शिक्षण सुरू ठेवले.
१९४४ मध्ये सुनीती चौधरी शिक्षण पूर्ण करून त्या डॉक्टर झाल्या. दयाळू आणि समर्पणाची तिच्या वृत्तीमुळे लोकांनी त्यांना प्रेमाने ‘लेडी माँ’ असे नाव दिले.
१९५१ – ५२ मध्ये त्यांना काँग्रेसपक्षातर्फे निवडणूक लढवण्याची पण संधी मिळाली होती. तर अशा या बहादूर महिला क्रांतिकारकाला मानाचा मुजरा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.