आता ‘उरलेल्या’ काँग्रेसचं करायचं काय? वाचा अप्रतिम विश्लेषण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काल भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. या विजयानंतर भाजपाच्या गोटात उत्साहाचं वातावरण असलं तरी कॉंग्रेसच्या तंबूत नीरव शांतता पसरली आहे.
२०१४ ला मिळालेल्या जागांपेक्षा २० जागा भाजपाला ह्या निवडणुकीत जास्त मिळाल्या आहेत. यावरून भाजपविरोधी वातावरण निर्मिती करण्यात कॉंग्रेसला सपशेल अपयश आलं आहे, हे ठळकपणे दिसून आलं आहे.
कॉंग्रेस जो एकेकाळी भारतातला प्रमुख राजकिय पक्ष होता, ज्या पक्षाने एवढी वर्ष देशात सत्ता गाजवली, त्या पक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाताहत होण्याचं कारण काय ? कॉंग्रेस मध्ये अजून सुधारणा होण्याची शक्यता आहे का ?
यावर अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या फेसबुक पोस्ट शैलेंद्र कवाडे आणि हर्षद शामकांत बर्वे यांनी लिहल्या आहेत.
====
दीडशे वर्ष जुनं घर पाडून टाकायचं असतं, त्याची डागडुजी होऊ शकतं नाही.
काँग्रेस ही संघटना डागडुजीच्या पलीकडे गेली आहे. भारताला सबळ आणि केंद्रीय विरोधी पक्ष मिळण्यासाठी काँग्रेस संपणे अत्यंत आवश्यक आहे.
काँग्रेसी विचार वगैरे संकल्पना म्हणजे उच्च प्रतीचा भंपकपणा आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या पोटात वाढलेल्या काँग्रेसमध्ये गांधीजींच्या काळातही व्यक्तीकेंद्रित राजकारणच होते आणि नंतरही तेच राहिले.
वळचणीचे पाणी उताराच्या दिशेने वाहते तसे काँग्रेसचे (आणि कोणत्याही राजकीय पक्षांचे) विचार हे मतांच्या दिशेने वाहतात. जशी लोकमानसाची नाडी धडधडते त्याच रंगाचे राजकीय बॅनर हे पक्ष उभारतात.
काँग्रेसची संघटनात्मक वीण अशी आहे की गांधी नेहरू घराण्याशिवाय काँग्रेस एकत्र राहणार नाही, राहुल किंवा प्रियांका हे काँग्रेससाठी लोढणे नसून त्यांना बांधणारा आवश्यक धागा आहे परंतु तो धागा फार कमकुवत आहे.
दुसरं म्हणजे जे जहागीरदार काँग्रेसने मागच्या पन्नास वर्षात उभे केले होते, त्यांच्या जहागीऱ्या खाजगीकरण आणि कॉर्पोरेट कल्चरने खालसा केल्यात.
लोकांना नोकऱ्या देण्याची ह्या जहागीरदार लोकांची क्षमता संपलीय त्यामुळे आता त्यांच्या मतदार संघातही त्यांचा विजय निश्चित राहिलेला नाही.
ना नेतृत्व, ना जहागीरदार, कार्यकर्ते तर पन्नास वर्षांपूर्वीच संपलेत. अशा स्थितीत काँग्रेस हे एक मोठे पण रिकामे खोके आहे.
सुदृढ भारतीय लोकशाहीसाठी काँग्रेस विसर्जित होऊन नव्या काळाशी नाते सांगणारा एक विरोधी पक्ष निर्माण होणे फार गरजेचे आहे.
-शैलेंद्र कवाडे.
===
जो पर्यंत संपूर्ण मोडून आणि नवे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस उभी राहत नाही तोपर्यंत त्यांचा असाच आणि असाच दारुण पराभव होत राहणार. राजीव गांधी हे काँग्रेसचे शेवटचे गांधी पंतप्रधान होते हाच इतिहास आहे आणि तो तसाच राहील.
काँग्रेसमध्ये आता जे काही इंटेअॅकच्युअल्स उरले आहेत त्यांनी एकत्र येऊन राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पक्षाबाहेर काढावे किंवा स्वतः पक्षाबाहेर व्हावे.
लोकशाहीत सुदृढ आणि सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे आणि नेमक्या ह्या गराजेवर राहुलजींच्या नेतृत्वातली काँग्रेस कुऱ्हाडीचे घाव टाकते आहे.
भारतभर कनेक्ट असलेले भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष आहेत, हे नाकारता येणार नाही. यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळात सशक्त विरोधी पक्ष काय करू शकतो हे आपण बघितले आहे.
त्यामुळे संख्या काय आहे या पेक्षा विरोधी पक्ष सशक्त आहे की नाही हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
२०१९ ते २०२४ या काळात गांधीमुक्त काँग्रेसची बांधणी करणे किंवा २०२४ ला या पेक्षा मोठ्या पराभवाला सामोरे जाणे हे दोनच पर्याय आहेत काँग्रेसकडे.
मेक अ चॉईस, युअर टाईम स्टार्टस नाऊ !
© हर्षद शामकांत बर्वे, पुणे
===
कॉंग्रेस पक्ष जोवर स्वतहून उभा राहत नाही आणि सामान्य कार्याकार्त्याला नेतृत्व प्रदान करत नाही तोवर कॉंग्रेसला नव संजीवनी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण यासाठी कॉंग्रेसला आत्म परीक्षणाची गरज आहे.
राष्ट्रीय स्तरावर केंद्रित असलेलं नेतृत्व विकेंद्रित करण्याची गरज आहे. गांधी घराण्याच पारंपारिक नेतृत्व नाकारून नव्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर निर्माण करणे गरजेचे आहे.
जर कॉंग्रेस पक्ष आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कॉंग्रेसजन कठोर पावले उचलत नाहीत तोवर मात्र बदल घडण्याची व कॉंग्रेस पक्षाला पुन्हा मुसुंडी मारता येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.