Site icon InMarathi

अवघ्या १९ व्या वर्षी निधड्या छातीने फाशीला सामोरं जाणाऱ्या भारतीय क्रांतिकारकाची कथा

hemu inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एकोणीस वर्ष वयाच्या मुलांचा विचार केला तर त्यांना नुकतेच पंख फुटलेले असतात. तारुण्याच्या मस्तीमध्ये अगदी मनाला वाटेल तसं स्वच्छंद बागडण्याचे हे वय असते.

ह्याच वयात बरेचजण आपल्या पहिल्या प्रेमाच्या मागे असतात किंवा आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपली कर्तव्य विसरून फक्त कामापाठीमागे धावत असतात.

मात्र आज आपण एका अशा तरुणाची कथा जाणून घेणार आहोत ज्याने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या प्रिय मातृभूमीसाठी आपला जीव अर्पण केला.

त्या तरुण क्रांतिकारकाचे नाव आहे हेमू कलानी.

 

thesongbirdonmyshoulder.blogspot.com

हेमू कलानी जेव्हा लहान होते तेव्हा ते आपल्या हातात तिरंगा घेऊन गावभर घावत असायचे, कधी कधी तर ते फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवून क्रांतीकारकांची आठवण काढायचे.

आजूबाजूचे लोक एवढ्या कमी वयातले त्यांचे ते विचित्र वागणे बघून त्यांना असं वागण्याचे कारण विचारायचे त्यावर हेमू कलानी उत्तर द्यायचे की,

“मला भगत सिंग ह्यांच्या सारखे माझ्या देशासाठी हसत हसत फासावर लटकायचे आहे.”

वयाच्या फक्त एकोणिसाव्या वर्षी ज्यांना ब्रिटीश सरकारने अमानुषपणे फासावर लटकावले होते. अशा सिंध प्रांताचे भगत सिंग म्हणून ओळखले जाणारे हेमू कलानी ह्याच्या जीवनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत..

 

Business Standard

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात :-

हेमू कलानी ह्यांचा जन्म २३ मार्च १९२३ साली सिंध प्रांतातील सक्खर ह्या ठिकाणी झाला होता. भगतसिंग ह्यांन ज्या तारखेला अजून आठ वर्षांनी फाशी देण्यात येणार होती नेमक्या त्याचं तारखेला म्हणजे २३ मार्चला हेमू कलानी ह्यांचा जन्म होणे हा सुद्धा एक विचित्र योगायोग होता.

त्याच्या वडिलांचे नाव पेसुमल कलानी तर आईचे नाव जेठीबाई होते. त्यांचे कुटुंब एक अत्यंत प्रतिष्टीत कुटुंब होते आणि इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांचा आदर करायचे. त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय म्हणजे विटांची भट्टी.

हेमू ह्यांच्या घरातच देशभक्तीच वातावरण ठासून भरलं होतं त्यामुळे साहजिकच त्याचं बालपण स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी ऐकण्यात गेलं आणि ह्याचमुळे अगदी लहान वयात त्यांच्यात देशाबद्दल प्रेम निर्माण झाले.

लहानपणापासूनच हेमू अत्यंत हुशार होते. वयाच्या अवघ्या पाचव्याच वर्षी त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा झाला होता परंतु त्यांच्या गावातल्या शाळेत फक्त चौथीपर्यंतचेच वर्ग असल्याने पुढच्या शिक्षणासाठी त्यांना सक्खरच्या तिलक हायस्कूलमध्ये घालण्यात आलं.

अभ्यासाबरोबरच हेमू यांना कुस्तीची देखील आवड होती. ते कुस्तीमध्ये इतके पारंगत होते की बऱ्याच वेळा त्यांनी इंग्रजी पैलवानांना सुद्धा कुस्तीत हरवलं होतं.

ह्या व्यतिरिक्त त्यांना कबड्डी, खो-खो, वालीबाल, क्रिकेट आणि फुटबालची देखील आवड होती.

 

Pinterest

ह्या सगळ्यापेक्षा ही अचंबित करून सोडणारी गोष्ट म्हणजे केवळ सात वर्षांचे असतानाच हेमू यांनी आपल्या काही मित्रांना घेऊन एक क्रांतिकारी दल सुरु केला होता.

हेमू व त्यांचे मित्र त्यांच्या गावातल्या गल्यांमधून तिरंगा घेऊन फिरत व देशाबद्दल प्रेम व्यक्त करणारी गाणी गात, नारे बाजी करत असत.

कोणाची पर्वा न करता वडिलांच्या प्रेमापोटी बंदूक हातात घेतली:

त्यांच्या गावात बऱ्याचदा इंग्रज आपल्या सैन्याला घेऊन येत असत. त्यावेळेला गावातली लोकं घाबरून आपल्या घराच्या खिडक्या, दारं व आपली दुकानं बंदच ठेवत असत. पण हेमू यांनी लहानपणापासुनच कोणाची भीती बाळगली नाही.

 

Impro Guns

इंग्रजांसमोर ही ते गावात खुलेआम फिरत असत, आपल्या मित्रांना घेऊन गाणी म्हणत असत,

जान देना देश प्र, यह वीर का काम है!

मौत की परवाह न कर, जिसका हकीकत नाम है!!’

एकदा हेमू बाहेरून घरी आले तर त्यांची आई रडत बसलेली त्यांना दिसली. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर त्यांना कळल की त्यांच्या वडिलांना इंग्रज शिपायांनी पकडून नेलं आहे.

 

Kung Fu Tea

त्याचवेळेला त्यांनी वडिलांना सुखरूप सोडवून आणायची शप्पत घेतली आणि आपल्या एका मित्राला सोबत घेऊन बंदुकीसह वडिलांना सोडवायला निघाले. त्यावेळेला त्यांना त्यांच्या एका शिक्षिकेने सांगितले की असे एकट्याने जाणे बरोबर नाही.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जोवर आपण समूहाने जाणार नाही तोवर काहीच करू शकणार नाही. हेमूंना आपल्या शिक्षिकेच म्हणण पटलं व ते त्याचवेळेला स्वराज्य सेना मंडळ दलाला जोडले गेले. ते आपल्या मित्रांना घेऊन विदेशी कपड्यांची होळी करण्याचे काम करत असत.

अशा ह्या निडर तरुणाच केवळ एकच स्वप्न होत की शहीद भगत सिंग सारखं देशासाठी फाशीवर जायचं!

बऱ्याचदा इंग्रजी शिपायांबरोबर झालेली चकमक!:

एकदा हेमू यांच्या काही मित्रांना अटक झाली आणि त्यांनी खूप संख्येने एकत्र लोकं जमा करून निर्दोश लोकांची सुटका होण्यासाठी नारेबाजी सुरु केली.

प्रचंड संख्येने लोकं पाहून इंग्रजांना दरदरून घाम फुटला आणि शेवटी त्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून लोकांना घाबरवणे सुरु केले.

 

Rediff.com

ह्या सगळ्या गदारोळातून हेमू ह्यांची कशीतरी सुटका झाली पण घटनेबद्दल त्यांच्या मनात कायमचा द्वेष निर्माण झाला होता कारण ह्यात अनेक निर्दोष लोकांचा बळी गेला होता.

ह्या घटनेनंतर काही दिवसांनीच हेमू यांनी तुरुंगावर बॉम्ब फोडून आपल्या मित्रांना बाहेर काढायचा प्रयत्न केला व बाहेर काढल्यावर ते इंग्रजांच्या नजरेतून वाचून तिकडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

एकदा त्यांनी इंग्रजांबरोबर झालेल्या चकमकीत जवळजवळ चाळीस सैनिकांना मृत्यूमुखी पाडलं होत. ह्या घटनेत त्यांचे बरेच मित्र ही शहीद झाले होते.

अटक झालीच :-

हेमू कलानी हे इंग्रज सरकारच्या विरुध्द गनिमीकाव्याने लढणारे एक क्रांतिकारी म्हणून आता प्रसिद्ध होऊ लागले होते. तेवढ्यात देशात १९४२ चा भारत छोडो आंदोलन सुरु झाले. हेमू कलानी ह्यांनी आपल्या साथीदारांसोबत ह्या आंदोलनात उडी घेतली.

गांधीजींना अटक झाल्यावर ह्या आंदोलनाची आग अजून जास्त वाढली.

हेमू कलानी ह्यांनी ऑक्टोबर १९४२ साली इंग्रजांची हत्यारे घेऊन जाणारी एक रेल्वे लुटायचे ठरवले आणि ह्यासाठी ते रेल्वेचा मार्ग उखडत होते मात्र तेवढ्यात त्यांना इंग्रजांनी घेरले.

 

Outlook India

मात्र शूर अशा हेमू कलानी ह्यांनी तिथून न पळता आपल्या सगळ्या साथीदारांना पळून जायला वेळ मिळावा म्हणून एकट्याने इंग्रजांशी लढा दिला. त्याच्या ह्या लढ्यामुळे त्याच्या साथीदारांचे प्राण वाचेल मात्र हेमू कलानी ह्यावेळी इंग्रजांच्या तावडीत सापडले.

इच्छा पूर्ण झालीच :-

हेमू कलानी ह्यांनी केलेल्या सगळ्या कारवाया इंग्रजांना माहित होत्या त्यामुळे त्या सर्व आरोपांवर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

एका एकोणीस वर्षाच्या तरुणाला फाशी होणार म्हणून ऐकणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पाणी होते मात्र हेमू कलानी ह्यांच्या डोळ्यात मात्र आनंद होता.

ह्याचे कारण म्हणजे त्यांनी लहानपणी ठरवल्या प्रमाणे त्यांना भगतसिंग ह्यांच्यासारखे आपल्या देशासाठी फासावर जायची संधी मिळाली होती.

 

shacune.blogspot.com

अखेर २३ जानेवारी १९४३ साली अवघ्या एकोणीस वर्षांच्या हेमू कलानी ह्यांना फाशी देण्यात आली.

तर असे होते लहानपणापासून देशासाठी आपला जीव देण्याचे स्वप्न बघणारे आणि ते स्वप्न पूर्ण करणारे महान क्रांतिकारी हेमू कलानी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version