आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मातृत्व ही किती सुंदर गोष्ट!!
मातृत्व हा स्त्रीचा हक्क!
मातृत्व म्हणजे सृजनाचा अविष्कार!
मातृत्व म्हणजे स्वर्गीय अनुभव!
मातृत्व म्हणजे एक जीव नऊ महिने आपल्याच उदरात आपल्याच रक्तावर पोसत त्याला या विश्वात सुखरुपपणे आणून त्याचे संगोपन करणे.
मातृत्व ही एक जबाबदारी.
पण हेच मातृत्व एखाद्या स्त्री कडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर?तिचा हक्क तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी दबाव आणला तर?
” मला आई व्हायचंय…आई होणं हा माझा हक्क आहे…तुम्ही मला अडवू शकत नाही.”राणी कळवळून तिच्या भोवतालच्या लोकांना सांगत होती.तिचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत होती.पण त्यांना तिचे विचार पटत नव्हते.तिला गर्भपात करण्याचा ते सल्ला देत होते.
एखादी स्त्री मातृत्वासाठी इतकी अधीर झालेली असताना का हा सल्ला दिला जात होता? का तिच्या भावनांचा चोळामोळा होत होता??
“तुझा हट्ट सोड, तुला नाही जमणार हे. आपल्या समाजात हे चालणार नाही. गर्भपात करून घे, ते तुझ्या हिताचे आहे.” का हा सल्ला वारंवार दिला जात होता?
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
“मला तुमचा सल्ला नकोय, मला आई व्हायचंय. मी वेश्या असले म्हणून काय झाले? वेश्यांना हक्क नसतो का आई बनायचा? आई होणे हा माझाही हक्क आहे.”राणी कळवळून सांगत होती.
होय राणी एक वेश्या होती. पुण्याच्या बुधवार पेठेतील दाणेआळी भागात ती वेश्या व्यवसाय करत होती.
ती काय खुषीने या व्यवसायात आली होती? खरंतर कोणीच स्वतःच्या मर्जीने या व्यवसायात येत नाही. इथं येतात त्या आपल्याच लोकांकडून फसवल्या गेलेल्या मुली. घरची गरिबी, अर्थार्जनाची निकड, कमी शिक्षण अशी परिस्थिती हेरून या मुलींना कामाचे आमिष दाखवले जाते.
शिक्षण कमी असल्याने कुठे नोकरी मिळत नसते. कुटुंबाला हातभार लावून पोटाची खळगी भरायची असते.
अशा कुटुंबांवर किंवा कोवळ्या वयातील मुलींवर या धंद्यातील एजंट नजर ठेवून असतात. ते मुद्दाम यांच्याशी ओळख वाढवतात. कधी वस्तू तर कधी पैशांची मदत करून कुटुंबाचा विश्वास संपादन केला जातो.
–
- मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा…
- पुण्याच्या वेश्यावस्तीत पहिल्यांदाच दिवाळीसह सक्षमीकरणाचा प्रकाश उजळविणारा रिअल ‘सिंघम’
–
थोड्याच दिवसात शहरात नोकरीचे आमिष दाखवले जाते आणि याच ओळखीच्या माणसांवर विश्वास टाकून मुलगी शहरात येते. आई बाप देखील चार पैसे मिळवून मुलगी घरची आर्थिक बाजू सावरेल या भ्रमात राहतात. त्यांना ही कल्पना देखील येत नाही की आपण फसवले जातोय.
कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, उत्तर पूर्व भारत, आंध्र इथून मोठ्या प्रमाणात मुलींना फसवून आणले जाते.
राणी अशीच एका “काका” बरोबर शहरात आली. शहरातील चकचकाट बघून तिचे डोळे दिपले. आसाम मधील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या राणीला शहराचे हे रूप खुप आवडले .
आपण इथे नोकरी करणार, चांगले कपडे घालणार, पैसे मिळाल्यावर गावाकडे पाठवणार ही स्वप्नं राणी बघू लागली. वय तरी कितीसं ?अवघं सोळावं तर लागलेलं.
राणीची फारच माफक स्वप्नं होती. कार बंगला असलं काही डोक्यात येणं शक्य देखील नव्हतं.
आई वडिलांना म्हातारपणी कष्ट व्हायला नकोत, धाकट्या भावाला शाळेत पाठवायचं एवढं साधं स्वप्न देखील या शहरात तिच्या कडून हिरावून घेतलं जाणारे हे कळण्याइतकं वय नव्हतंच ते.
पुढच्या दोन दिवसातच ती एका भडक रंगाचे पडदे असलेल्या एका कोठ्यात दाखल झाली. हे रंगीत पडदे छान दिसत होते.
आसाममधे घरी आईच्या फाटक्या पातळाचा आडोसा केलेला होता. किती वर्षात त्याला पाणी सुद्धा लागले नव्हते. इथले पडदे किती मस्त चकचकीत आहेत तिच्या मनात आले.
या रंगीत पडद्यामागील वास्तव त्याच रात्री तिच्या वाट्यास आले. तिचा आक्रोश दाबला गेला. वेदनांनी ती पुरती कोसळून गेली. सुरा गळ्याला लावून तिच्या विरोधाला तिथेच दबवून टाकले.
नंतर आलेली प्रत्येक रात्र तिच्या वेदनांचा कल्लोळ वाढवतच होती. तो तिला नोकरीचे स्वप्न दाखवून शहरात आणणारा काका केव्हाच पसार झाला होता.
“तुला बक्कळ पैसा मोजून मी खरेदी केलंय. आता माझे पैसे वसूल होई पर्यंत तुला इथंच राहायचंय. गडबड न करता राहिलीस तर तुला गावाकडे पाठवायला पैसे देईन, नाहीतर इथेच सडवेन मरेपर्यंत”. कोठ्याच्या मालकिणीने दमच भरला.
हातात पैसे नाहीत, शहराची काहीच माहिती नाही, कसे कुठे जायचे काहीच माहिती नाही. राणीने अखेर हार पत्करली. रात्रीचा देहविक्रय आता दिवसरात्रीचा झाला.नरकातून सुटका नव्हतीच. पण चार पैसे गावाकडे पाठवता येऊ लागले.
निदान आईवडील तरी सुखात रहातील, भाऊ शाळेत जाईल एवढाच विचार तिच्या जगण्याचे बळ वाढवत होता.
पाच वर्षात अनेक गिऱ्हाईक तिला भोगून गेले पण एक गिऱ्हाईक असा होता जो तिच्या प्रेमात पडला होता. ती हा व्यवसाय करत असूनही तिच्या विषयी त्याला सहानुभूती होती. अशातच सर्व काळजी घेऊनही तिला मातृत्वाची चाहूल लागली.
“आपण आई होणार या कल्पनेने मी आनंदित झाले. वेश्या असले तरी मी एक स्त्री होते. आपली कूस उजवणार याचा मला प्रचंड आनंद झाला होता. कधी एकदा आपलं गुपित मैत्रिणींना सांगेन असे झाले होते.”
३२ वर्षीय राणी आपलं मन मोकळं करत होती.
“पण मला वाटलं होतं तसा आनंद कोणालाच झाला नाही. उलट लवकर गर्भपात करून घे असेच सर्वजण सांगू लागले. मला कळतच नव्हते की माझं मूल मी का वाढवायचं नाही? का सर्वजण माझ्या आई होण्याच्या सुखापासून मला वंचित ठेवायचा प्रयत्न करत होते?”
राणीचा प्रश्न कोणालाही अस्वस्थ करणारा होता. “हळूहळू लक्षात आले की मी गर्भारपणात धंदा करू शकणार नाही आणि त्यांचे पैसे बुडतील ही त्यांना भीती वाटत होती.
“तू गर्भपात करून घे.उद्या तुला मुलगी झाली तर तिला याच धंद्यात यावे लागेल” अशी भीती घातली जात होती.हळूहळू आनंदाची जागा भीतीने घेतली.”
राणी हे सांगत असताना त्या भीतीदायक आठवणींनी शहारत होती. “पण जरी घाबरले होते तरी आई होण्याची इच्छा मनातून पुसली जात नव्हती.मला कोंडून घातले, उपाशी ठेवले पण मी एकच प्रश्न सगळ्यांना विचारत होते की वेश्या असले म्हणून काय झाले? आई होणे हा माझाही हक्क आहे.”
“अखेर माझ्या प्रियकराकडे मी धाव घेतली. त्याला खूपच आनंद झाला ही वार्ता ऐकून. सुदैवाने माझ्या मताशी तो देखील सहमत होता. ह्या धंद्यातून बाहेर येऊन आपण लग्न करूया आणि हे मूल वाढवूया असे त्याचे देखील मत पडले. पण हे सोपे नव्हते याची जाणीव दोघांनाही होती.”
राणीचे डोळे पाणावत होते हे सर्व आठवून. याच भागात वेश्यांसाठी काम करणाऱ्या कायाकल्प या संस्थेची दोघांनीही मदत घ्यायचे ठरवले.
कायाकल्प संस्था वेश्यांना कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याचे काम करत होती. त्यांच्यासाठी चालवलेल्या वैद्यकीय शिबिरामुळे संस्थेच्या संचालिका सीमा वाघमोडे यांच्याशी ओळख झाली होती.
–
- जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट
- स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१
–
“आम्ही सीमा मॅडमना अम्मा म्हणून ओळखायचो. मी अम्माकडे तब्बेत दाखवायच्या निमित्त्यानं पोचले. माझ्या बाळाचा पिता देखील तिकडे आला आणि आम्ही आमची कहाणी त्यांच्या कानावर घातली.
त्यांना देखील मी हेच सांगितले की वेश्या असले तरी आई होणे हा माझा हक्क आहे आणि हे मूल मला वाढवायचे आहे.
अम्मानी माझ्या जोडीदाराची पूर्ण चौकशी केली,तो पितृत्व निभावण्यास सक्षम आहे याची खात्री करून घेतली आणि आम्हाला मदतीचे आश्वासन दिले.”
राणीने एक आणखी आव्हान यशस्वीपणे स्वीकारले.कोठ्यात कोणाला काहीच कळू द्यायचे नव्हते. सीमा वाघमोडे यांनी पोलिसात तक्रार देऊन पोलिसांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि राणीची त्या नरकातून सुखरूप सुटका केली. राणीचा विवाह लावून दिला.
“माझे स्वप्न अम्मामुळे पूर्ण झाले. आम्ही लवकरच शहरातून बाहेर पडून आपला संसार थाटला. माझ्या पतीचे पूर्ण सहकार्य मला मिळाले.
लवकरच एक चिमुकले बाळ माझ्या संसारात आले. बाळाच्या आगमनाने आम्ही दोघेही खुप आनंदी झालो. माझ्या लढ्याला हे मोठे यश मिळाले. गेली दहा वर्षे मी सुखात संसार करत आहे”.
राणी आता आनंदाने आपल्या भावना प्रगट करत होती. आपल्या सुखी संसाराचे चित्र समोर मांडत होती.
” तुम्हाला सांगू का एक गंमत? माझा मुलगा रोज त्याच्या बाबांकडून दोन रुपये घेऊन त्याच्या गुल्लकमधे जमा करतो. एक दिवस मी त्याच्या बाबांकडे तक्रार करत होते की तुम्ही मला बाहेरगावी फिरायला नेत नाही म्हणून. आमच्या पिल्लाने ते ऐकले आणि गुल्लक घेऊन आला आणि म्हणतो कसा,
“आई चिंता नको करुस,आता माझ्याकडे खूप पैसे आहेत, आपण बाहेर जाऊया फिरायला.”
किती छान वाटतं ऐकताना! पूर्वी लोकांचे ऐकून किंवा भीतीपोटी गर्भपात केला असता तर हे सुख वाट्याला आलेच नसते.
सीमा अम्माने मार्ग दाखवला नसता तर आजही मी त्या नरकात अडकून पडले असते. पण त्यांचे प्रयत्न आणि जोडीदाराची साथ यामुळे त्या नरकातून बाहेर येऊन एक साधेसुधे कौटुंबिक जीवन मी जगत आहे”.
राणी सारख्या असंख्य मुली या व्यवसायात अडकल्या आहेत. कायाकल्प सारख्या संस्था त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत. पण लढाई खूप मोठी आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.