' जीव द्यायला निघालेल्या शेकडो जणांना वाचवणारा “खरा हिरो”! – InMarathi

जीव द्यायला निघालेल्या शेकडो जणांना वाचवणारा “खरा हिरो”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुणी तरी जीवनाचा वीट आलेला एक निराश पथिक आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारतो. निव्वळ त्या त्रयस्थ व्यक्तीला वाचवण्यासाठी म्हणून; जीवावर उदार होऊन तलावात उडी ठोकणं म्हणजे काही पोरखेळ नाही.

तेही अशा तलावात जिथे अनेक वर्षे शहरातील घरगुती मैला, औद्योगिक, रासायनिक सांडपाणी आणि इतर विषारी द्रव्ये सोडली जातात.

अशा तलावात, स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यासाठी उडी ठोकण्याचं धाडस करण्यासाठी खूप मोठी हिम्मत लागते. कुणातरी त्रयस्थाच्या जीवासाठी एवढा स्वतःच्या जीवावर कोण बरे उदार होईल?

 

shiva 1 inmarathi
thebetterindia

हे काम एखाद्या चित्रपटातील डमी हिरोच करू जाणे. परंतु हैद्राबादमध्ये एक असा रिअल टाईम हिरो आहे, ज्याने असे आपल्या जीवावर उदार होऊन शेकडो लोकांचे प्राण वाचवलेत.

इतकेच नाही तर तलावात बुडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे कामही या हिरोने केलेले आहे.

अशा हजारो मृतदेहांना तलावातून बाहेर काढून पोलिसांना तपासासाठी सहाय्य देखील केलेले आहे. कोण आहे हा खराखुरा जिगरबाज बाहुबली? अर्थातच शिवा…! हो या खर्याखुर्या बाहुबलीचं नाव देखील शिवाच आहे…!

हैद्राबाद मधील हुसैन सागर तलाव हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

नेकलेस प्रमाणे अर्धगोलाकार असणारी त्याची रचना आणि त्याच्या काठावर अखंड दगडात कोरलेले भव्य बुध्द शिल्प पाहून कुणीही या तलावाच्या प्रेमात पडू शकतं.

 

husain sagar inmarathi
Asianet Newsable

पण या देखण्या निसर्ग सौंदर्याला एक शाप देखील आहे. हा तलाव एका नकोशा गोष्टीसाठी देखील खूपच प्रसिद्ध आहे. ती म्हणजे; आत्महत्या…!

दर वर्षी शेकडो लोक या तलावात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करतात अशी दप्तरीनोंद आहे.

अशा गोष्टीना पायबंद घालणे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे जिकीरीचे काम पोलिसांसाठी आणि आपत्ती बचाव दलालासाठी देखील अशक्यप्राय बनले आहे.

अशाप्रसंगी, शिवा सारखी निस्वार्थ सेवा देणारी माणसेच उपयोगी ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

गेल्या दशकभरात या व्यक्तीने हजारो मृतदेह या विषारी पाण्यात उतरून स्वतःच्या हातांनी बाहेर काढली आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो लोकांचे प्राण वाचवून त्यांना नवे आयुष्य दिले आहे.

 

shiva 2 inmarathi
thebetterindia

शिवाचे वय सध्या तिशीच्या आसपास आहे. तो या कामाकडे कसा वळला याची कथा फारच चित्तथरारक आहे.

“लहानपणी, माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले होते. असाच एक दिवस शाळेतून हॉस्टेलमध्ये परतत असताना वाटेत काही लोक धार्मिक मिरवणुकीत काही अघोरी कृत्ये करत असलेले मी पहिले.

त्या दृश्याने मी घाबरून गेलो. माझ्या मनावर इतका आघात झाला की मी तिथून पळत सुटलो…

आणि नंतर मी हॉस्टेलकडे जाण्याचा रस्ताच विसरून गेलो. अशा पद्धतीने माझ्या जुन्या आयुष्याला पूर्णविराम मिळाला. मी एका दुकानाच्या बाहेर उभा राहून भिक मागत होतो, तेंव्हा मला माझी ही दुसरी आई भेटली..

तीने आपल्या मायेची सावली माझ्या शिरावरदेखील धरली. माझ्यात आणि तिच्या मुलांमध्ये तिने कधीच फरक केला नाही.” शिवा सद्गदित होऊन सांगत होता.

shiva 3 inmarathi
thebetterindia

“माझ्या सख्या आईने माझ्यावर जितकं प्रेम केलं असतं तितकंच प्रेम तिने देखील दिलं. आयुष्य असंच सरत होतं आणि आमच्या आयुष्यात तो दुर्दैवी दिवस उजाडला.

याच तलावात जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाला तरी वाचवण्यासाठी म्हणून माझ्या भावाने उडी मारली.

परंतु, दुर्दैवाने त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. जिने सदैव दुसर्याला प्रेमाचा आणि मायेचा आधार दिला अशा माझ्या आईवर इतका दुर्धर प्रसंग का ओढवावा याचेच मला आश्चर्य वाटत होते.

त्यानंतर मी ठरवले की हुसेन सागर तलावात यानंतर कोणाचाही बुडून मृत्यू होणार नाही. माझ्या डोळ्यांसमोर तरी अजिबात नाही.” शिवा भावूक होऊन म्हणाला.

 

shiva 4 inmarathi
thebetterindia

यानंतर जे कोणी जीव देण्यासाठी या तलावात उडी मारेल त्यांना वाचवण्यासाठी शिवाचे प्रयत्न सुरु झाले. कधी कधी त्याला अपयश येते, तेंव्हा हे मृतदेह बाहेर काढण्याचं कामही तोच करतो.

अनेक वर्षापासून तो तलाव सुरक्षा पोलीस दलासोबत काम करत आहे. गरज लागेल तेंव्हा पोलीस देखील त्याची मदत घेतात.

“माझ्या माहितीप्रमाणे शिवा गेली पंधरा वर्षे हे काम करत आहे. या पोलीसस्टेशनमध्ये हजर होऊन मला एक-दीड वर्षच झाले आहे. परंतु, मी सांगतो, त्याने या तलावातून शंभरहून जास्त मृतदेह बाहेर काढले आहेत.

त्याबदल्यात तो आमच्या कडून कसल्याही बक्षिसाची अपेक्षा करत नाही. परंतु, त्याची पार्श्वभूमी ऐकल्यानंतर आम्हाला अक्षरशः धक्का बसला. आम्ही बक्षीस म्हणून जी रक्कम देऊ करू ती तो नम्रतेने स्वीकारतो,” रामगोपालपेठ पोलीस स्टेशनचे, सब इन्स्पेक्टर, के प्रठाप रेड्डी सांगत होते.

 

shiva 5 inmarathi
thebetterindia.com

“जेंव्हा केंव्हा मी एखाद्या असहाय्य आणि दुबळ्या अवस्थेतील व्यक्तींना भेटतो तेंव्हा त्यांची मदत करण्यासाठी मी काहीही करू शकतो…. कारण आयुष्यात एकेकाळी माझीही अवस्था अशीच होती, तेंव्हा कुणीतरी इतरांनी माझ्यावरही दया केली होती,” शिवा सांगतो.

माझ्याकडे स्थिर असा आर्थिक स्त्रोत नाही किंवा मी पुरेसे पैसे देखील कमवत नाही. परंतु, गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी हरेक प्रकारचे प्रयत्न करतो.

मी असेही मृतदेह बाहेर काढले आहेत, ज्यांना कोणीच स्वीकारत नाही, अशावेळी मीच त्यांचे दफन करतो. माझ्या आयुष्यातील एका क्रूर वळणावर देवाने मला आई दिली जिने माझा प्रेमाने सांभाळ केला.

याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. याची परतफेड म्हणून मी समाजासाठी काहीतरी करू इच्छितो,” शिवा सांगतो.

वर्षानुवर्षे ज्या तलावात शहरातील सांडपाणी, कारखान्याचा मैला किंवा विषारी रसायने सोडली जातात, अशा पाण्यात उतरून इतरांचा जीव वाचवणे किंवा मृतदेह बाहेर काढणे हे त्याच्या जीवासाठी किती घातक आहे हे शिवाला चांगलच ठावूक आहे.

पण अगदी अथकपणे आणि आनंदाने तो हे काम करतोय.

 

shiva 8 inmarathi
.thebetterindia.com

एकट्या शिवाने हजारो मृतदेह त्या तलावातून बाहेर काढून देखील आणि शेकडो आत्महत्या करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करून देखील समाजात त्याला कोणीही फारसं ओळखत नाही.

याबदल्यात त्याला सरकारकडून कसलाही पाठींबा किंवा प्रोत्साहन मिळत नाही.

अशा या खऱ्या- खुऱ्या  हिरोला आमचा दिलसे सलाम! नक्कीच एक दिवस त्याच्या या निस्वार्थ प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल; अशी अशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?