इस्त्राईलचं राष्ट्राध्यक्षपद आईन्स्टाईनकडे चालून आलं होतं, पण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
अल्बर्ट आईन्स्टाईन, हे भौतिकशास्त्रातील, जागतिक कीर्तीचे, विद्वान शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या शोधांमुळे त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे. त्यांनी सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला होता.
विज्ञानाच्या क्षेत्रात आईन्स्टाईन यांचं योगदान, हा अनेक संशोधकांसाठी आधारस्तंभ आहे.

जन्माने जर्मन असलेल्या या शास्त्रज्ञाने, E=mc2 या सुप्रसिद्ध सूत्राचा शोध लावून, जगात फार मोठा बदल घडवला. त्यांनी फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट आणि क्वांटम थिअरी सुद्धा मांडली.
त्यांच्या संशोधनामुळे संपूर्ण विज्ञान जगतात त्यांना विद्वत्तेचा मानदंड असं मानलं जातं. अल्बर्ट आईन्स्टाईन सापेक्षतावादाचे जनक मानले जातात.
अतिशय हुशार असलेले आईन्स्टाईन हे प्रचंड नम्र सुद्धा होते. विद्वत्तेचा जराही गर्व नसलेल्या आईन्स्टाईन यांच्या नावापुढे अजून एक बिरुद लागणार होतं; ‘इस्राईलचे दुसरे अध्यक्ष!’
आज अल्बर्ट आईन्स्टाईन यांची शास्त्रज्ञ आणि इस्राईलचे अध्यक्ष, अशी दुहेरी ओळख असती. इस्त्राईलचे दुसरे अध्यक्ष होण्याची संधी आईन्स्टाईन यांना मिळणार होती, तुम्हाला हे माहीत आहे का?
आश्चर्य वाटलं असेल ना? मग हा लेख वाचा; म्हणजे सारी कहाणी समजेल. तर झालं असं की,
इस्राईलचे पहिले अध्यक्ष चाईम विझमन यांचा ९ नोव्हेंबर १९५२ रोजी मृत्यू झाला. खुद्द चाईम विझमन यांना अल्बर्ट आईन्स्टाईन हे इस्राईलचे दुसरे अध्यक्ष व्हावेत असं मनापासून वाटत होतं.
हा महान ज्यू वंशीय शास्त्रज्ञ, अध्यक्ष होण्यासाठी योग्य मनुष्य आहे असं त्यांचं मत होतं.

या महान माणसाला ज्यू वंशाचा बहुमान म्हणून इस्राईलचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची इस्राईल सरकारने विनंती केली होती. इस्राईलच्या दूतावासाने १७ नोव्हेंबर रोजी, तशी विनंती करणारं अधिकृत पत्र आईन्स्टाईन यांना पाठवलं होतं.
अर्थात, त्याकरिता आईन्स्टाईन यांना इस्राईलमध्ये स्थलांतरित व्हावे लागणार होते.
पंतप्रधान डेव्हिड बेन गॅरीऑन यांच्या सांगण्यावरून, इस्त्राईलचे राजदूत अब्बा एबान यांनी आईन्स्टाईन यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात, त्यांनी इस्राईलचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती त्यांना करण्यात आली होती.

‘आईन्स्टाईन यांना इस्राईलचे नागरीकत्व स्वीकारावे लागेल. त्यांना इस्राईलच्या अध्यक्षपदी निवडण्यात आल्यानंतर, त्यांच्यावर कसलाही बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.
कामामध्ये आमचे प्रतिनिधी श्री. गुटेन तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करतील. तुम्हाला अध्यक्षपद देणे हा त्या पदाचाच सन्मान असेल. इस्राईल हे आकाराने छोटे राष्ट्र आहे; आपण या पदावर विराजमान झाल्यानंतर हे राष्ट्र उच्च स्तरावर पोहोचेल.
तसेच एक ज्यू वंशीय एवढ्या उच्चपदावर विराजमान झाल्यामुळे, ज्यूंचे आत्मबल वाढेल. एकंदरीत ज्यूंच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल.
संशोधन कार्यात कसलेही अडथळे, बंधनं असणार नाहीत याची हमी त्यांना देण्यात आली होती. त्यांचं उच्चकोटीचं संशोधन कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी, इस्राईल सरकार त्याचा सर्व खर्च करायला तयार होतं.

–
- आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय!
- आईन्स्टाईनची अशीही बाजू : पत्नीवरची अनिर्बंध दडपशाही…
त्या संशोधनासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, पण आईन्स्टाईन यांनी इस्त्राईलचे अध्यक्ष होण्यास होकार द्यावा’
अशा आशयाचं पत्र त्यांना इस्राईल सरकार तर्फे पाठवलं होतं.
त्यावेळी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं वय होतं ७३ वर्षं! जन्माने जर्मन असलेले आईन्स्टाईन, हिटलरच्या वंशवादाविरोधात, अमेरिकेत विस्थापित झालेला ज्यूंच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या शांततामय जीवनासाठी, एक वकील म्हणून काम करत होते.
त्याचवेळी झिओनिझम ही चळवळ उभी राहिली होती. त्यामाध्यमातून ज्यूंचे पुनर्वसन व्हावे अशी अपेक्षा होती. ज्यूंच्या अस्तित्वासाठी या चळवळीमार्फत प्रयत्न सुरु होते.
‘मँचेस्टर गार्डीयन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, आईन्स्टाईन म्हणाले होते की, ‘ज्यूंच्या आत्मिक बळासाठी व त्यांच्या धार्मिक परंपरांचे जतन करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली आहे.’
ज्यू वंशीय लोकांचे अस्तित्व टिकवणे आणि विकास यासाठी ही चळवळ उभी राहिली होती.

ती चळवळ अतिशय नेटाने सुरू होती. ज्यू वंश संपवण्याच्या हिटलरच्या प्रतिज्ञेने जो संहार घडवला, त्यामुळे ज्यूंच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती.
त्याचे भयंकर पडसाद जगभर उमटले होते. ज्यूंचे पुनर्वसन होणे फारच गरजेचे होते. आईन्स्टाईन त्यासाठीच काम करत होते. खुद्द इस्राईलचे अध्यक्ष चाइम विझमन, झिओनिझम चळवळीतील मोठे नेते होते.
आईन्स्टाईन यांच्या बुध्दीमत्तेचीच नव्हे तर ते ज्यू लोकांसाठी करत असलेल्या मदतकार्याचीही त्यांना जाणीव होती. म्हणूनच दुसऱ्या अध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी म्हणून ते आग्रही होते.
याशिवाय, हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेमच्या विकासासाठी आईन्स्टाईन स्वेच्छेने प्रयत्न करत होते. त्यांचं वकील आणि गणितज्ज्ञ असणं हे जेरूसलेमच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत होतं.

“आईन्स्टाईन उत्तम गणितज्ज्ञ आहेत त्यामुळं आमच्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करु शकतील” असे मत एका संख्याशास्त्रज्ञाने टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नोंदवले होते.
आईन्स्टाईन यांनी त्यांच्या पत्रातून विनम्रपणे नकार कळवला.
विद्वत्तेचा महामेरू, असणाऱ्या या माणसाने नम्रपणे ती संधी नाकारली. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.
“मी या कामासाठी योग्य नाही. अशा कामामाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव आवश्यक असतो. तो माझ्याकडे नाही. माझं वयदेखील अधिक आहे. देशातील नागरिकांना, योग्य तऱ्हेनं सांभाळण्याचं, हाताळण्याचं कौशल्य माझ्याकडं नाही.
माझं आजवरचं आयुष्य भौतिकशास्त्र हाताळण्यात गेलं आहे. मानवी व्यवस्थापन करणे मला जमेल असे वाटत नाही. या पदासाठी, अधिक योग्य माणूस शोधण्यात यावा.” असं मत त्यांनी मांडलं.

आपल्या भूमिकेवर आईन्स्टाईन ठाम होते. ज्यू वंशीय लोकांशी असलेलं घट्ट नातं, या निर्णयामुळे बिघडणार नाही याची खात्री त्यांना होती.
एका देशाचं सर्वोच्च पद मिळू शकत असताना, ते नाकारणारे अल्बर्ट आईन्स्टाईन, हे माणूस म्हणूनही महान होते!!!
–
- विद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते
- आईनस्टाईनने भारतीयांबद्दल केलेले हे वक्तव्य ऐकून तुम्हाला चीड येईल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.