' हॉस्टेल लाईफ एंजॉय करायलाच हवं. फक्त ही काळजी घेऊन… – InMarathi

हॉस्टेल लाईफ एंजॉय करायलाच हवं. फक्त ही काळजी घेऊन…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुशांत सिंग राजपूतचा “छिछोरे” हा चित्रपट बघितला आहात का? इंजिनिअरिंग करणाऱ्या धमाल पोरांच्या हॉस्टेल लाईफवर हा चित्रपट आहे.

हॉस्टेल लाईफचा असाच फील आपल्याला “3 इडियट्स” सुद्धा देतो. हे चित्रपट पाहून आपल्याला पण हॉस्टेल लाईफ एन्जॉय करावं असा वाटत असेल, पण खरंच हॉस्टेल लाईफ तितकं छान असतं का?

शाळा संपल्यानंतर घर सोडून मित्रांसोबत राहावं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. चित्रपटांमुळे आपल्या डोळ्यांसमोर हॉस्टेल लाईफ म्हणजे धमाल, मज्जा-मस्ती असं समीकरण तयार झालंय, पण प्रत्यक्षात मात्र थोडं वेगळंच चित्र असतं.

एखादा मुलगा जेव्हा स्वतःचं घर सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलला वास्तव्यास जातो तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी असतात. सर्वात प्रमुख अडचण असते ती खाण्या पिण्याची..!

घरी असल्यावर दिवसातून तीन ते चार वेळा आईच्या हातचं गरमा गरम खायला मिळणाऱ्या मुलाला जेव्हा हॉस्टेलला गेल्यावर एकवेळच्या चांगल्या जेवणाची भ्रांत निर्माण होते, तेव्हा त्या मुलाला होणारा त्रास तो मुलगाच जाणतो.

मेसमधल्या जेवणाने समाधानी होणारा मुलगा शोधून सापडणार नाही, मेसच्या जेवणाचा कंटाळा काही दिवसांतच येऊ लागतो.

अशावेळी त्या मुलाला सहारा उरतो तो इंस्टट मिक्स फूडचा, घरी असल्यावर किचनमध्ये न जाणाऱ्या मुलाला ज्यावेळी स्वतच्या हाताने जेवण बनवावं लागतं, त्यावेळी त्या मुलाला खऱ्या अग्निदिव्याचा सामना करावा लागतो, मग भले ते काम मॅगी बनवण्याचं का असेना..!

 

hostel life inmarathi

 

अनेकांना हॉस्टेलला गेल्यावर स्वतचे कपडे धुणं, इस्त्री करणं देखील जमत नाही. अनेकांना होम सिकनेसचा त्रास पण उद्भवतो, काहींना सर्वच अडचणी उद्भवतात!

अर्थातच याला देखील काही अपवाद असतात, पण ह्या अडचणीचा सामना  बहुतांश मुलां- मुलींना करावा लागत असतो. अशाच नव्याने हॉस्टेलला गेलेल्यांना मार्गदर्शन करणारी अजिंक्य रहाळकर यांची फेसबुक पोस्ट ..

===

आत्ताच मॅगीची जाहिरात पाहिली, आई मुलाला फोनवरून मॅगी करायला शिकवते, घराखाली असूनसुद्धा. काय तर म्हणे हॉस्टेलची तयारी. मॅगी आली आणि तो पोरगा झाला तयार हॉस्टेलला रहाण्यासाठी..!

हा मार्केटींगचा फंडा जबरदस्त आणि उपयोगी असला तरी फक्त मॅगी आली म्हणजे सगळं झालं असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका.

मॅगी ही फक्त वेळ मारून नेण्यासाठी म्हणून खायची असते. हॉस्टेलला असताना आणि महिनाअखेरीस अगदीच कमी पैसे असताना पोटभरीचा ऑप्शन म्हणून आहेच.

हॉस्टेलला रहात असताना पोट बिघडवण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर किमान खिचडी, पोहे, उपमा हे तीन पदार्थ आणि साध्या फोडणीच्या भाज्या जसं की बटाटा, कोबी, फ्लॉवर या आल्याचं पाहिजेत.

नंतर तुमची expertise लेव्हल वाढली की, वेगवेगळे पदार्थ तुम्हाला आरामात करता येतील.

 

kota factory inmarathi

 

पोळ्या बनवायचा उरक आणि इच्छा असेल तरच शिका नाहीतर हल्ली बऱ्याच ठिकाणी पोळ्या चांगल्या मिळतात. याला हलक्यात घेऊ नका नाहीतर मग खिसा हलका होतो आणि नंतर पोट नको तेव्हा हलकं व्हायला लागतं.

उबर इट्स, स्वीगी, झोमॅटो ह्या जेवण मागवण्याच्या ऍप्सच्या जंजाळात आणि शेकडो हॉटेल्सच्या महासागरात आपल्या खिशाला परवडतील आणि जिभेला रुचतील अशी हॉटेल्स शोधायची प्रॅक्टिस चांगली करून ठेवावी.

कारण अचानक जेवण मागवायला लागलं आणि अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आलेलं जेवण जर अत्यंत बकवास असेल तर संताप होतो.

सतत मिळणारे discounts, ऑफर्स यांचा लाभ घ्यायला अजिबात काचकूच करू नका, नंतर त्याचा उपयोग होतो.

चांगले चांगले डायनिंग हॉल कुठे आहेत हे शोधून ठेवा. जेव्हा घरचं आणि चारीठाव खायची प्रचंड ईच्छा होते तेंव्हा हे डायनिंग हॉल मदतीला येतात.

 

hostel boys food inmarathi

 

स्वीट असलंच पाहिजे असा आग्रह धरून स्वीट नसलेले डायनिंग हॉल reject करू नका, बाकीचं जेवण अत्यंत रुचकर असू शकतं.

मेसचं जेवण शक्यतो टाळा. मेसच्या जेवणात भरपूर सोडा वापरतात त्यामुळे आपण कितीही खाल्लं तरी पोट जड पडतं नंतर पचनाच्या तक्रारी सुरू होऊन भयानक पित्ताचा त्रास सुरू होऊ शकतो.

भलेही बाकीच्या अवाजवी आणि फालतू खर्चांना फाटा द्यायला लागला तरी चालेल पण चांगलं आणि स्वतःला आवडेल ते अन्न पोटात जाईल याची काळजी घ्या. फक्त मेसच परवडत असेल तर मग घरी बनवून खा साधारण तितकेच पैसे लागतात, यासाठी पुन्हा तिसरा परिच्छेद वाचा.

 

hostel mess inmarathi

 

अगदी गरजेच्या वस्तू जसं की कपड्याचे-भांड्याचे, अंघोळीचे साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, Inner wears, कॉलेजचं साहित्य, गाडी असेल पेट्रोल सोडून शॉपिंग करण्याचा मोहं शक्यतो टाळा ते पैसे चांगलं खायला आणि इमर्जन्सीत वापरता येऊ शकतात.

शक्यतो सगळे कायदे पाळा, हेल्मेटचा होणारा दंड खिशाला फार मोठं भोक पाडू शकतो.

कुणाशीही नडण्याआधी आपल्या किती ओळखी आहेत आणि आपण किती पैसे देऊ शकतो याचा विचार करून नडा नाहीतर ही नडानडी महागात पडू शकते.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांच्या नादी लागून सट्टे लावणं, कुठेही पैसे गुंतवणं, माहिती नसताना शेयर्स विकत घेण्याचे मोहं टाळा. नको तिथे पैसे गुंतवल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागलेली मुलं मी स्वतः पाहिलेली आहेत.

 

satta inmarathi

 

हॉस्टेलला कसं रहायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपला attitudeच उदास आणि रडका असेल तर हॉस्टेल म्हणजे फक्त स्ट्रगल एवढीच आठवण तुमच्या मनात राहू शकते. त्यामुळे हॉस्टेल डेज एन्जॉय करा, भरपूर-चांगलं खा आणि स्वस्थ रहा.

कारण हॉस्टेलला राहिलं म्हणजे वजन कमी झालंच पाहिजे हा काही नियम नाही आपण असल्या नियमांचे गुलामही नाही…!

-अजिंक्य रहाळकर

===

 

hostel life inmarathi

 

अशाप्रकारे, अजिंक्य राहाळकर यांनी आपल्या पोस्टच्या माध्यामातून हॉस्टेलला जाणाऱ्या आणि हॉस्टेलवासी असलेल्या मुलांना खाण्या पिण्याच्या चॉईस बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले असून, पाळायच्या अशा काही निवडक महत्वपूर्ण सूचना देखील दिल्या आहेत.

जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल अथवा आधी हॉस्टेलला राहिले असाल, तर अजिंक्य यांच्या पोस्टमध्ये अंतर्भूत नसलेल्या, पण तुम्ही जाणता अशा सूचना नक्की कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?