साध्या गावातील विद्यार्थ्यांनी जे करून दाखवलंय, ते आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सर्वसाधारण शाळांमध्ये काय चित्र दिसतं? सगळी मुलं शाळा सुटण्याची वाट बघत असतात आणि शाळेची शेवटची घंटा झाली रे झाली की पाठीवर दप्तरं अडकवून घरी किंवा खेळायला जाण्यासाठी धूम ठोकतात.
पण ह्या खास शाळेतली मुलं मात्र शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी पळत नाहीत तर हे विद्यार्थी शाळेनंतर कम्युनिटी सेंटरला जाण्यासाठी गर्दी करतात.
ह्या कम्युनिटी सेंटरमध्ये त्यांना कुठले खेळ वगैरे शिकवत नाहीत तर महत्वाच्या लाईफ स्किल्स शिकवल्या जातात.
ह्या ठिकाणी ह्या उद्याच्या पिढीला सेंद्रिय शेतीचे धडे दिले जातात. ही मुले खऱ्याखुऱ्या शेतात घाम गाळून, मेहनत करून सेंद्रिय शेती करीत आहेत आणि लोकांपुढे एक नवा आदर्श निर्माण करीत आहेत.
त्यांच्या शेतात झेंडू, सदाफुली, जास्वंद ह्यासारखी फुले, वांगी, टोमॅटो ह्या भाज्या पिकवल्या जातात. वय वर्षे ६ ते १४ वयाची मुले मेहनत करून शेती करीत आहेत आणि समाजापुढे एक चांगले उदाहरण प्रस्थापित करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील ढाकळे आणि गोलीवणे ह्या दोन गावांत हा स्त्युत्य उपक्रम राबवला जात आहे.
हरितक्रांती करण्याचा हा प्रयत्न सुरुवातीला हातकलंगणे तालुक्याजवळील एका लहानश्या जमिनीच्या तुकड्यावर सुरु झाला पण आता मात्र ह्यापासून प्रेरणा घेऊन ह्या भागातील अनेक लोक सेंद्रिय शेतीद्वारे हरितक्रांती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ह्या लहान मुलांवर लहानपणापासूनच शेतीचे संस्कार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील इनसाईट वॉक ही एनजीओ करीत आहे.
इनसाईट वॉकचे सहसंस्थापक सुबोध जैन ह्यांनी द बेटर इंडिया ह्या वेबसाईटला मुलाखत दिली.
त्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ह्या गावांमध्ये प्रामुख्याने विस्थापित समुदाय वास्तव्याला आहेत. हे लोक परंपरागत शेतकरी आहेत पण काही कारणांमुळे त्यांची शेतजमीन त्यांच्यापासून हिरावली गेली आहे.”
“ह्यामुळे ह्या लोकांच्या उपजिविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ह्यातील बहुतांश लोकांनी शेती सोडून देऊन मजुरी करणे सुरु केले. ह्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर ह्याचा गंभीर परिणाम तर झालाच शिवाय गावकऱ्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक स्थैर्य बिघडले आहे.”
“आम्हाला त्यांच्या ह्या मूळ समस्येचे निराकरण करण्याची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. “
ही संस्था ह्या समुदायातील स्त्रिया व लहान मुलांचे पुनर्वसन व सशक्तीकरण करण्याचा तसेच ह्या समुदायातील तरुण पिढीच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
कम्युनिटी हॉलच्या परिसरात ह्या मुलांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी आपापल्या विचारांना सुंदर चालना देऊन विविध कल्पना मांडल्या.
त्यातील एका मुलाने तर टाइम मशीन बनवून भूतकाळात जाऊन हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला हे बघता आलं तर बरं होईल असा विचार मांडून प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा सल्ला दिला. हा कम्युनिटी हॉल म्हणजे ह्या मुलांसाठी नवनव्या गोष्टी शिकण्याची जागा आहे.
त्यांना फारश्या सुविधा आणि साधने उपलब्ध नसली तरी त्यांची कल्पनाशक्ती आणि हुशारी अफाट आहे शिवाय मेहनत करण्याची तयारी देखील आहे.
हे लोक परंपरागत शेतकरी असले तरीही मधल्या काळात त्यांनी पारंपरिक पद्धती सोडून देऊन अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते व कीटनाशकांचा वापर केला.
पण ह्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आणि कस कमी झाला. त्यामुळे शेतीमध्ये त्यांचे नुकसान होऊ लागले. ह्यामुळे अनेकांनी शेती करणेच सोडून दिले.
परंतु सुदैवाने आता ह्या समुदायातील ज्येष्ठ आणि जुन्या – जाणत्या मंडळींनी लहान मुलांना पारंपरिक शेतीची गोडी लावली आणि सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देत त्यांना शेतीकडे वळवले.
“सुरुवातीला ह्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचे हे शेतीचे वेड एक गंमत म्हणून बघितले आणि ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु ह्या लहान मुलांनी गावातील आजी आजोबा मंडळींकडून धडे घेत आपले प्रयत्न सुरूच ठेवले.”
“शेतीच्या लोप पावत चाललेल्या नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती त्यांना नव्याने गवसल्या. त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नात देखील येणार नाही अश्या पद्धतींचा अवलंब करून त्यांनी यशस्वीपणे शेती करून दाखवली”, असे सुबोध सांगतात.
समुदायातील जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी सेंद्रिय शेतीच्या पद्धतींसाठी प्रोत्साहन दिल्यानंतर ह्या लहान मुलांनी कम्युनिटी सेंटरजवळील मोकळ्या जागेवर शेतीची कामे करणे सुरु केले. त्यांनी त्यांची रोजची शाळा झाल्यानंतर तिथल्या जमिनीची शेतीसाठी मशागत केली आणि नंतर तिथे पेरणी केली.
घरातल्या रोजच्या ओल्या कचऱ्यापासून त्यांनी नैसर्गिक खत सुद्धा तयार केले. त्यामुळे पिकांचे व जमिनीचे योग्य पोषण झाले. अशा रीतीने रासायनिक उत्पादनांशिवाय त्यांनी यशस्वीपणे भरघोस उत्पादन करून दाखवण्यात यश मिळवले.
त्यांनी लावलेल्या कष्टाच्या रोपाला इतके भरघोस फळ आले की त्यांच्या शेतातील भाज्या व फळे शाळेच्या माध्यान्यभोजनासाठी वापरली जावीत अशी त्यांनी विनंती केली.
सुबोध सांगतात की, “जरी ह्या मुलांच्या कष्टाला यशाचे फळ मिळाले असले तरीही त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्या अपयशातून सुद्धा ही मुले शिकली. त्यांनी हार मानली नाही आणि प्रयत्न सुरु ठेवले. कधी कधी त्यांनी लावलेली रोपे तग धरू शकली नाहीत”
“कधी कीटक किंवा रोगांमुळे रोपे दगावली आणि आमच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. लहान मुलेच ती! असे काही झाले की ती उदास होत असत आणि त्यांचे आईवडील त्यांना रासायनिक कीटनाशक फवारण्याचा सल्ला देत असत. पण आमची मुले डगमगली नाहीत”
“त्यांनी अजिबात रासायनिक उत्पादने वापरणार नाही हे पक्के ठरवूनच टाकले होते. अपयश आले तरीही चालेल पण पारंपरिक, नैसर्गिक पद्धतीनेच शेती करू असा ठाम विचार त्यांच्या मनात होता.”
“त्यांनी सहनशीलता, दृढनिश्चय ठेवला आणि प्रेमाने त्यांच्या रोपांची काळजी घेतली. त्यांच्या ह्या दृढनिश्चयामुळे त्यांनी मोठ्यांच्या विचारांमध्येच मोठे परिवर्तन घडवून आणले. तसेच रासायनिक उत्पादनांचा वापर न केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये देखील सकारात्मक सुधारणा झाली.”
रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे.
अनेकांना ह्यात दैवी कोप आहे असे वाटते पण काही तरुणांनी ह्याच्या मुळाशी जात कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की रासायनिक उत्पादनांचा अतिवापर केल्याने कर्करोगाचे प्रमाण भयावहरित्या वाढले आहे.
त्यामुळे रासायनिक उत्पादने वापरणे पूर्णपणे बंद करणे हाच त्यावरील उपाय आहे असे त्यांना वाटून त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे सुरु केले आहे.
ह्या प्रकल्पाच्या यशासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ह्याबाबतीत जागरुकता पसरविणे आवश्यक आहे.
“समाजाचा दृष्टिकोन बदलणे इतके सोपे नाही. पण ह्या मुलांनी मात्र ते आव्हान स्वीकारले. त्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे विविध गट तयार केले. ज्या मुलांना पत्रकारितेमध्ये रस आहे अश्या मुलांनी गावांतील शेतांवर जाऊन सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.”
“ज्या मुलांना विज्ञानात रस होता त्यांनी पर्यावरणात होणाऱ्या बदलांसाठी काय करता येईल ह्यावर अभ्यास करून आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलांना कलेत रस आहे त्यांनी चित्रांचे एक पुस्तक तयार केले.”
“गावातील भिंतींवर वारली चित्रे काढली आणि ८ फूट लांब कापडावर त्यांच्या सेंद्रिय शेतीचा प्रवास चितारला. जनजागृतीसाठी ही मुले अशी झटली. काहींनी ह्या विषयावर गाणी, कविता रचल्या, लहान लहान नाटुकली बसवून त्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला”, असे सुबोध ह्यांनी सांगितले.
गावाचा कायापालट करण्यासाठी ह्या मुलांनी शाळा सुटल्यानंतर खूप मेहनत घेतली तसेच त्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुद्धा ह्याच कामात व्यतीत केली. ह्या मुलांच्या मेहनतीला अखेर यश आले आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा नैसर्गिक आणि सस्टेनेबल जीवनशैलीचा अवलंब केला.
अखेर हे लोक आता परत शेतीकडे वळू लागले आहेत. त्यांच्या घराच्या आसपासच्या जमिनीवर शेती करू लागले आहेत.
हळूहळू त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटू लागले आहे आणि तो दिवस सुद्धा लवकरच येईल जेव्हा संपूर्ण गावच पूर्वीप्रमाणे सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करू लागेल.
लहान मुले आशा कधीही सोडत नाहीत आणि त्यांच्याकडील निरागस व सकारात्मक दृष्टिकोनामुळे खूप सकारात्मक बदल घडू शकतात. ह्या गावांमधील ह्या छोट्या दोस्तांनी गावात इतका छान बदल घडवून आणला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.