' “आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्यावर बलात्कार तरी करणार नाहीत” – InMarathi

“आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्यावर बलात्कार तरी करणार नाहीत”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बलात्कार हा शब्द आता आपल्याला नवीन नाही.

वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल, सोशल मिडिया, रोज कुठे ना कुठे कोणावर तरी बलात्कार झाल्याचे आपण वाचतो, ऐकतो, हळहळतो, चर्चा करतो आणि नंतर विसरून जातो. रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने आता या गोष्टी आपले काळीज हलवून टाकत नाहीत.

असे किती भीषण बलात्कार वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आले, चर्चेचा विषय झाले नि विस्मृतीत गेले. निर्भया बलात्कारातील क्रौर्याने देश हादरवून टाकला, उलटसुलट मते प्रदर्शित झाली, मोर्चे निघाले, आंदोलने झाली.

पण दररोज कुठेतरी वेगळ्या ठिकाणची, वेगळ्या नावाची एक निर्भया या दरम्यान कोणाच्यातरी विकृतीचा बळी ठरत गेली.

 

rape 1 inmarathi

 

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आणि ‘स्त्री’ जमातीच्या एकूणच सुरक्षिततेवर आणि तिच्या समाजातील स्थानावर मोठ्ठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

जे काही घडले ते जसेच्या तसे घडले यावर विश्वास ठेवला तर असे म्हणता येईल की महाभारत घडून युगे लोटली, पण बाईचे शरीर, मन, अस्मिता, प्रतिष्ठा पणाला लागणे संपले नाही.

हापूर जिल्ह्यातील या स्त्रीच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीला सांगितलेल्या हकीकतीनुसार तिला तिच्या वडिलांनीच १० हजार रुपयांना विकले. ज्या मनुष्यास विकले त्याने इतर अनेक जणांकडून कर्ज घेतले होते.

ते फेडता यावे म्हणून हा मनुष्य हिला त्यांची घरकामे करण्यास पाठवत असे. तिच्या इच्छेविरुद्ध देहभोग घेणे हे देखील इतर घरकामांचा एक भाग असल्याप्रमाणे सर्वांनी जणू गृहित धरले नि तिच्यावर नेहमी बलात्कार होत राहिला.

केवळ १४ वर्षांचे वय असताना हिचे लग्न वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लावण्यात आले होते.

 

rape 2 inmarathi

त्याने काही महिन्यानंतर या स्त्रीला सोडून दिले. काही आठवड्यातच तिच्या वडलांनी बायकोसाठी काही खरेदी करता यावी म्हणून हिला विकले आणि दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले.

दुसरा नवरा देखील असाच निघाला. तो मित्रांकरवी तिच्यावर सातत्याने बलात्कार करवून आणत असे. हे समजल्यावर आसपासच्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला.

बलात्कार झाल्यावर संबंधित मुलीने भावना चाळवणारे तंग किंवा तोकडे कपडे परिधान केले म्हणून असे घडले असे म्हणणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षकांचा देश हा ! इथे काही झाले तरी स्त्रीलाच जबाबदार धरले जाते.

प्रत्यक्ष नवराच मित्रांना आपल्या बायकोशी शरीरसंबंध ठेवण्यास उत्तेजन देत आहे पाहून तिची प्रतिमा ‘ कोणालाही उपलब्ध असणारी एक छचोर स्त्री’ अशी झाली. सहनशक्तीचा अंत झाला तसे तिने कायद्याची मदत देखील मागितली.

 

UP police inmarathi

तिच्या म्हणण्यानुसार तिने वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी तिची दखल घेतली नाही. ‘ चौकशी सुरु आहे’ या ठराविक साच्याची उत्तरे तिला मिळत गेली आणि अखेर सहन न होऊन तिने स्वतःला पेटवून दिले.

दिल्ली महिला आयोगाच्या चेयर पर्सन स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या संदर्भात लक्ष घालून पीडीत महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. उच्चपदस्थांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने पोलीस खात्याची देखील पळापळ झाली आहे.

त्यांनी त्यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ काही विधाने केली आहेत ज्यानुसार त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती पण महिलेला खरे सिध्द करणारे पुरावे त्यांना चौकशीतून मिळाले नाहीत.

या सर्व प्रकारात तिच्या बाजूने उभी असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे ऋषभ, जो तिचा मित्र म्हणून पाठीशी ठाम उभा आहे. तिच्या आयुष्याच्या शोकांतिकेचा तो साक्षीदार आहे. जीवन मरणाच्या सीमेवर असलेली ती या युद्धात एकटी पडली आहे.

या शोकांतिकेला जबाबदार कोण याचा विचार करताना प्रश्न पडतात अनेक…

 

rape 3 inmarathi

तिचे वडील? ज्यांनी तिचे लग्न लावून दिले तिला न शोभणाऱ्या माणसाशी आणि त्याने सोडून दिल्यावर तिला सन्मानाने जगण्याची संधी देत तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी दुसऱ्या लग्नाचे नाव करत तिला केवळ दहा हजार रुपयांना विकले ?तिचा नवरा ? ज्याने तिला सोडून दिले?

दुसरा नवरा? ज्याने कर्ज फेडता यावे म्हणून तिचा वापर गुलाम म्हणून केला नि कर्जफेडीचा मार्ग म्हणून तिला तिचे शरीर देण्यास भाग पाडले? नवऱ्याचे मित्र?

विधवा, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका आणि विचारस्वातंत्र नसणाऱ्या एकूणच सर्व स्त्रिया यांना बेवारस प्रॉपर्टी सारखे समजत त्यावर हक्क सांगण्याची मानसिकता असणारे ? समाज? ज्याने सत्यासत्यता पडताळून न पाहता संस्कृती, परंपरेचे निकष लावून तिला चारित्र्यहीन ठरवले ?

पोलीस? ज्यांनी शक्य असून न्याय देण्यास विलंब केला ? की तिचे ‘बाई’ असणे ? पानात पडलेला पदार्थ आपल्या आवडीचा नसला तर नाक डोळे मुरडत तो नाकारण्याचे स्वातंत्र्य असते आपल्याला…

 

rape 4 inmarathi

इथे न आवडलेल्या माणसाशी शरीरसंग करताना त्या बाईला नकार देण्याची मुभा नाही ? बलात्कार फक्त शरीरावर होतो? ‘तुला आम्हाला विरोध करता येणार नाही’ हे कृतीतून तिला दर्शवले जाते.

तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या कपड्यांना हात घातला जातो तेव्हा तो तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर बलात्कार नसतो का ? वासनेच्या या खेळात एकानेच आनंद मिळवायचा, एकानेच तृप्त व्हायचे? बरे हा बलात्कार देखील एकदा नाही नि एका कडून नाही …

अनेकदा नि अनेकांकडून. प्रत्येक नात्यातून उपेक्षा नि एकटेपण मिळालेल्या एका दुर्दैवी जीवाला न्यायाची वाट पाहत अखेर स्वतःला विद्रूप करत मरणास कवटाळावे लागले हे किती भयंकर आहे ?

तिची दोन्ही लग्ने अपयशी ठरली, तिने सांगितलेल्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगी घडल्या आहेत.

‘आम्ही चौकशी केली पण तिच्या आरोपांना दुजोरा मिळेल, तिच्या म्हणण्याला व्हेरीफाय करू शकेल असे पुरावे चौकशीतून मिळाले नाहीत’ असे समर्थन करणाऱ्या पोलिसांना एक विचारावे वाटते की ही चौकशी एकतर्फी नाही का ?

समोरचे तसे घडले नाही हे सांगतात नि तुम्ही विश्वास ठेवता? तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी असेल? अगतिकतेचा, असहाय्यतेचा कडेलोट झाल्यावर एका हाडामांसाच्या बाईला जगण्यापेक्षा मरण सोपे वाटले याचा अर्थ काय होतो?

‘ आता माझ्या या जळालेल्या शरीरावर ते बलात्कार करू शकणार नाहीत’ असे ती म्हणते तेव्हा तिच्या जागी आपली आई, बहिण, बायको, लेक असू शकते या कल्पनेने तुमचा थरकाप उडत नाही ?

मग तुम्ही माणूस म्हणवून घेण्याच्याच लायकीचे नाही आहात.

काही शतके मागे, इतिहासात राजा राम मोहन रॉय नावाच्या भल्या माणसाने सतीची प्रथा बंद केली होती. संदर्भ वेगळे आहेत, पण आता म्हणावे वाटते, बाईचे स्वतःच्या ‘बाई’पणाच्या चितेवर रोज सती जाणे संपले नाही. ती जळते रोज….!

 

rape 6 inmarathi

तिचे शरीर, मन, विचार नि आनंदाने जगण्याचे अधिकार याला चूड लावली जाते बिनदिक्कत आणि त्याची बातमी होते फक्त लक्ष वेधून घेणारी, बातम्यातील पीडीतेचे, बलात्कारी पुरुषाचे नाव बदललेले असते.

आपण वाचणारे तेच षंढ असतो जे वाचून सुस्कारा टाकून ‘ इस रात की सुबह नही’ म्हणत स्वीकारतो सगळे…

खरेच पहाट होणार नाहीच का ?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?