' जागतिक दहशतवादी घोषित झाल्यामुळे मसूद अझहरच्या कारवाया खरच थांबतील ? – InMarathi

जागतिक दहशतवादी घोषित झाल्यामुळे मसूद अझहरच्या कारवाया खरच थांबतील ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : स्वप्नील श्रोत्री

===

जागतिक दहशतवादी घोषित झाल्यामुळे मसूद अझहरच्या कारवाया खरच थांबतील ?

” मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताची अंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतिष्ठा नक्कीच उंचावली आहे. परंतु, भारताला त्यातून काय साध्य झाले हाच कळीचा मुद्दा आहे. ”

 

masood azhar inmarathi
Pakistan Today

स. न २००१ सालच्या संसदेवरील हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने केलेल्या मुत्सद्देगिरीला मोठे यश मिळाले आहे.

बुधवार दि. १ मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यु. एन. एस. सी) मसूद अझहरला अंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले, हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा ( स. न २००१, स. न २००७, स. न २०१३ व स. न २०१९ ) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता.

तत्पूर्वी चीनने ३ वेळा आपल्या नकाराधिकाराचा ( विटो ) वापर करत या प्रस्तावाला विरोध केला होता.

यंदा मात्र पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. परिणामी भारतीय मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईची भूमिका घ्यावी लागली.

त्यामुळे पाकला कायम पाठिंबा देणाऱ्या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला जोरदार दणका बसला.

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताची अंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतिष्ठा नक्कीच उंचावली आहे. परंतु, भारताला त्यातून काय साध्य झाले हाच कळीचा मुद्दा आहे.

 

united nations inmarathi
Wikipedia

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मसूद अझहरला काळ्या यादीत टाकल्यामुळे ( जागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे ) त्याच्यावर संयुक्त राष्ट्रांचे काही निर्बंध लागले आहेत …

१) मसूद अझहरला यापुढे विमान प्रवास करता येणार नाही. त्याचे परपत्र ( पासपोर्ट ) पाकिस्तान सरकारला तो पाकिस्तानचा नागरिक असल्यामुळे जप्त करणे बंधनकारक असेल. तसेच संयुक्त राष्ट्रांचे कोणतेही सदस्य राष्ट्र अझहरला आपल्या देशात प्रवेश देणार नाही.

परंतु, मसूदचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गेल्या २० वर्षात तो कधीही पाकिस्तानच्या बाहेर गेलेला नाही. त्याने आपल्या सर्व दहशतवादी कारवाया पाकिस्तानात बसून पाक लष्कर व आय. एस. आय च्या मदतीेने चालविल्या आहेत.

त्यामुळे त्याच्या अंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लावून विशेष असे काही साध्य होईल असे समजण्याचे काही कारण नाही.

२) मसूद अझहर ची मालमत्ता जप्त करणे व त्याची सर्व बँकांमधील खाती जप्त करणे यांसंबंधीचे निर्बंध सुद्धा बिनबुडाचे आहेत.कोणताही दहशतवादी किंवा कोणतीही दहशतवादी संघटना आपले आर्थिक व्यवहार सर्वसामान्य माणसासारखे कधीच करीत नसतात.

 

isi inmarathi
YouTube

त्यांच्याकडे येणारा आर्थिक स्त्रोत व पैसा हा दहशतवादाला खतपाणी घालणारी काही ठराविक राष्ट्रे व त्यांच्या हस्तकांकडून काळ्या बाजाराच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे मसूद अझहरच्या आर्थिक नाड्या आवळल्यामुळे त्याची दहशतवादी कृत्ये कमी होतील किंवा थांबतील असे म्हणणे मूर्खपणाचे होईल.

३) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मसूदच्या शस्त्र खरेदीवर निर्बंध लावताा त्याला कोणत्याही राष्ट्राने शस्त्र पुरवठा करू नये असे निर्देश दिले आहेत. परंतु या निर्बंधांचा सुद्धा काही उपयोग होईल असे वाटत नाही.

दहशतवादी संस्था ह्या कधीही राष्ट्राच्या अधिकृत लष्करासारखी शस्त्र खरेदी करित नसतात. त्यांचे शस्त्रांसंबंधीचे सर्व व्यवहार हे तस्करीच्या माध्यमातून होत असतात.

त्यामुळे वरील निर्बंधामुळे जैश किंवा मसूद अझहर यांना शस्त्रास्त्रांची कमतरता जाणवेल असेही काही नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश आले असले तरीही त्याचा जैशच्या दहशतवादी कारवायांवर कोणताही परिणाम होणार नाही.

 

ibrahim kaskar inmarathi
Times Now

स.न १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम कासकर याला स. न २००३ मध्ये अंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. परंतु, त्याच्या दाऊदच्या हालचालींवर किंवा त्याच्या दहशतवादी कृत्यांवर खरचं काही परिणाम झाला का ?

तर दु:दैवाने याचे उत्तर निश्चित नाही असेच आहे. मग मसूद अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर करून भारत सरकारल काय साध्य करायचे होते ?

भारत सरकारने मसूदला काळ्या यादीत टाकण्यासाठी करण्यासाठी आपले सर्व शक्ती पणाला लावण्यापेक्षा तीच शक्ती जर पाकिस्तानवर मसूदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लावली असती तर त्याचा जास्त ठळक परिणाम झाला असता.

भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार अस्तित्वात नाही. त्यामुळे भारतात गुन्हे करून अनेक गुन्हेगार व दहशतवादी पाकिस्तानात पळून जातात.

 

modi imran khan inmarathi
Oneindia

परंतु पाकिस्तानच्या सध्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था व संयुक्त राष्ट्रातील आपले राजकीय वजन वापरून भारत मसूद अझहरला पाकिस्तानवर भारताच्या ताब्यात देण्यासाठी दबाव टाकू शकला असता, व त्याचे दोन परिणाम झाले असते.

एक म्हणजे मसूद अजहर भारताच्या ताब्यात आला असता, आणि दुसरा म्हणजे भारतातून गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भारताचा वचक निर्माण झाला असता.

(पूर्वप्रसिद्धि : दैनिक प्रभात)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?