मुंबईतल्या हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणाऱ्या ‘अभ्यास गल्ली’ बद्दल जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
काही गल्ल्यांची, रस्त्यांची नावे मजेशीर असतात. नि ती तशी का आहेत याची करणे देखील तेवढीच मजेशीर असतात.
तुम्हाला मुंबईचा ‘चोर बाजार’ ठाऊक आहे का जिथे तुम्हाला हवी असलेली कोणतीही वस्तू मिळतेच असे म्हटले जाते?
त्याचे नाव चोर बाजार का पडले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? पडला असेल तर त्याचे उत्तर देखील प्रश्नाइतकेच मजेशीर आहे.
या बाजाराचे खरे नाव ‘शोर बाजार’ होते. म्हणजे गडबड गोंधळ असलेला बाजार. पण ब्रिटीशलोकांना त्याचा उच्चार नीट न जमल्याने ते त्याला चोर बाजार म्हणत, कालांतराने तेच नाव रूढ झाले.
मुंबईत अशा अनेक गल्ल्या आणि अनेक बाजार आहेत, ज्यांची नावे तेथे काय व्यवसाय चालतो यावरून पडली आहेत. ‘ खाऊ गल्ली’ मध्ये अनेक खाद्यपदार्थ मिळतात.
खाऊ गल्लीत शिरला कि तोंडाला पाणी सुटेल अशी खात्री देणारे सुवास नाकात शिरतातच, पण पदार्थांचे रंग देखील डोळ्यांना सुखावणारे असतात.
‘ चप्पल गल्ली’ अशीच, विविध प्रकारच्या, फॅशनच्या, किमतीच्या चप्पल येथे मिळतात. आणि तुम्ही अभ्यास गल्ली नाव ऐकले आहे ?
नावावरून समजले असेल, त्या गल्लीत काय चालते ते, हो ना ? तुमचा तर्क अर्थात बरोबर आहे. येथे विद्यार्थी अभ्यास करायला येतात.
कोठे आहे ही अभ्यास गल्ली ? तिला हे नाव का पडले ? चला घेऊ या या प्रश्नांच्या उत्तराचा शोध.
वर्दळ असलेल्या वरळीनाक्याच्या समोरील , पोद्दार हॉस्पिटलच्या मागे असलेली ही गल्ली म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या रांगा, प्रखर प्रकाश देणारे हॅलोजनचे दिवे आणि बसण्यासाठी स्वच्छ बाक, हे वातावरण अभ्यासासाठी शांत वातावरण शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच पोषक आहे.
अभ्यास गल्ली म्हणून ओळखली जाणारी ही गल्ली मूलतः सुदाम काली अहिरे मार्गचा एक भाग आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने तेथे बसवलेले हॅलोजनचे दिवे संध्याकाळ होताच उजळू लागतात आणि हातात पुस्तके घेतलेले विद्यार्थी गल्लीच्या दिशेने निघतात.
अभ्यासाला हवी असणारी शांतता येथे मिळते.
सेल्फ स्टडीच नव्हे तर ग्रुप स्टडी सेशन्स साठी देखील हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे केलेल्या अभ्यासाने प्रगती झाल्याचे अनेक विद्यार्थी सांगतात.
पावन यादव आणि अमित बिरडे हे इलेक्ट्रॉनिक एन्जिनिअरिन्गचे विद्यार्थी गेली सहा वर्षे येथे येऊन अभ्यास करतात.
दोघेही आधी सेवन pointers होते, पण येथे अभ्यास करायला लागल्यानंतर ते nine pointers झाले असे ते सांगतात.
इथे अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या जागेशी असलेले नाते तोडावे वाटत नाही. ते येतात नि ज्युनिअर्संना मार्गदर्शन करतात.
स्वतःच्या घरी अभ्यास करण्याऐवजी असे रस्त्यावर अभ्यास करणे त्यांना का आवडते असे विचारले असता ते सांगतात तेथे येणाऱ्यापैकी प्रामुख्याने बरेच जन बीडीडी चाळीचे रहिवासी आहेत.
१२० स्क़्वेअर फुट च्या अरुंद खोल्यांमध्ये भोवताली भावंडे आणि घरातील मंडळींच्या गडबड गोंधळात अभ्यासाला हवे असणारे पोषक वातावरण, शांतता मिळणे अवघड असते.
रात्रीच्या वेळी वाचनालये बंद असतात. आणि वाचनालयात देखील येथील बाकांवर मिळते तशी ऐसपैस जागा कुठे मिळते. इथे हवा तितका वेळ बसता येते.
पण आता अभ्यास गल्ली म्हणून प्रसिद्धी पावल्यानंतर या गल्लीची लोकप्रियता वाढल्याने येथील गर्दी वाढू लागली आहे.
परिणामतः पूर्वीचा निवांतपणा संपू लागला आहे. परीक्षेच्या काळात तर संध्याकाळी ७ ते 10 या काळात येथे फार गर्दी होते. सध्या रस्त्याच्या एकाच बाजूला दिव्यांचे खांब उभारले असल्याने पलीकडील बाजू अंधारात असते.
तेथेही दिवे बसवल्यास तेथे बसायला जागा मिळून गर्दी कमी होईल असे बिरडे सांगतो.
या गल्लीला अभ्यास गल्ली नाव द्यावे हा प्रस्ताव घेऊन स्थानिक लोक स्थानिक कॉर्पोरेटर कडे गेले आणि त्यांची विनंती मान्य होऊन या ठिकाणाला अधिकृतरित्या अभ्यास गल्ली म्हणून ओळखले जाऊ लागले.
पण हल्ली ही गल्ली पूर्वीसारखी शांत राहिली नाही.
रस्त्याचा उपयोग रेस लावण्यासाठी करणारे काही मोटरसायकलस्वार येथील शांततेचा भंग करतात. त्यामुळे ही जागा अशांतच नव्हे तर असुरक्षित देखील वाटू लागली आहे.
काहीजण दारू आणि सिगारेट्स चा आस्वाद घेण्यासाठी इकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे गल्लीचे अभ्यासू रूप बदलत चालले आहे.
सिनिअर इन्स्पेक्टर गजानन देऊस्कर मात्र रेसच्या घटना घडत असल्याचे अमान्य करतात.
‘ आम्ही दररोज गस्त घालतो, त्यामुळे कोठेही बेकायदेशीर कृत्य होत आहे असे आढळले तर आम्ही अॅक्शन घेतो’. असे ते म्हणतात.
असे असले तरी इथे कोणी विद्यार्थिनी निर्भय मनाने येऊन अभ्यास करत बसली आहे असे दृश्य कोणीच अजून पहिले नाही.
संध्याकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी यायला सुरुवात होते, पहाटे तीन चार वाजेपर्यंत देखील मुलांचा अभ्यास चालतो, मात्र मुली तितक्या निःशंकपणे येत नाहीत.
तर असे हे ठिकाण, जिथे मुलांच्या भवितव्याला आकार मिळतो.
पुरेशा जागेच्या अभावी कोणीतरी सुरु केलेल्या अभ्यासाने मग इथे अभ्यासाला यायची परंपरा सुरु होऊन या जागेला चक्क ‘ अभ्यास गल्ली’ म्हणून ओळख मिळणे हे मजेशीर आहे.
लेट नाईट पार्ट्यात रमणारी हुल्लडबाज तरुणाई पुस्तक उघडून अभ्यासात रमली आहे हे दृश्य समाधानकारक नक्कीच आहे, नाही का ?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.