Site icon InMarathi

येथे शाळेची फी म्हणून चक्क प्लास्टिक कचरा स्वीकारला जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

शाळेची फी म्हणून निरूपयोगी प्लास्टिक द्या

हे ऐकायला जरा विचित्र वाटत असले तरी ही संकल्पना सत्यात राबवली आहे गुवाहाटी मधील अक्षर स्कुल मधे, जिथे विद्यार्थ्यांना मिळतात सर्वांगीण शिक्षणा बरोबर सामाजिक शिक्षण व जबाबदारीचे धडे!

प्रत्येक व्यक्तीला  स्वऋण,कौटुंबिक ऋण आणि सामाजिक ऋण या तीन ऋणांची बांधिलकी असते.

अक्षर स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षण व संस्कारामुळे हे विद्यार्थी निश्चितच भविष्यात या तिनही ऋणांना उत्तम रितीने फेडुन एक चांगला नागरिक म्हणून तयार होतील यात शंका नाही.

कारण या शाळेत शिकणारे विद्यार्थी स्वतःचा विकास त्याच बरोबर कौटुंबिक विकास आणि सामाजिक विकास साधणारे शिक्षण घेत आहेत.

 

www.searchguwahati.com

अक्षर स्कूलचे संस्थापक मजीन मुख्तार व परीमीत शर्मा हे आहेत. हे दांपत्य आपल्या शाळेची माहिती व वैशिष्ट्ये सांगताना म्हणतात की  आमची शाळा इतर पारंपरिक शाळांपेक्षा बऱ्याच अर्थाने वेगळी आहे.

आमच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलं आहेत म्हणून आमच्या शाळेतील अभ्यासक्रम हा त्यांना मानसिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षम बनवेल असाच आहे.

त्यांना रोज गणित,विज्ञान, इतिहास,भूगोल सारख्या विषयांचे धडे तर दिले जातातच पण त्याचबरोबर व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडे पण दिले जातात जे त्यांना भविष्यकाळात निश्चितच उपयोगी ठरतील.

अक्षर स्कुलचे संस्थापक मजीन हे न्यूयॉर्क मधे राहात असत पण एका चांगल्या आणि वेगळ्या शाळेचे स्वप्न व उद्दिष्ट घेऊन ते आसाममधे आले.

सुरूवातीला ते लखीमपूर येथे एका शाळेच्या प्रकल्पावर काम करत होते नंतर त्यांनी गुवाहाटी येथील पामोही या ठिकाणी परमिता यांच्या साहाय्याने २०१६ मधे अक्षर स्कूलची सुरूवात केली.

 

Time8

परमिता या आसामच्याच रहिवासी .या दोघांची उद्दिष्ट,ध्येय एकच असल्याने योगायोगाने हे दोघे भेटले.परमिता यांनी मजीन यांना आसामच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देण्यात मदत केली.

मजीन आणि परमिता हे दोघेही उच्चशिक्षित असून चांगल्या नोकरी मधे होते . अक्षर स्कुलचे काम एकत्र करतानाच २०१८  साली हे दोघेही एकमेकांशी विवाह बध्द झाले.

शाळेतील बहुतांशी मुलांना केवळ शिक्षण देण्याची परिस्थिती नसल्याने शाळा सोडावी लागली असेच होते आणि कुटुंबाची गरज म्हणून मग आसपास परिसरात जाऊन काम करून ही मुलं पैसे कमवून आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवत होते.

या सगळ्यांना वैयक्तिक भेटुन शिक्षणाचे महत्त्व पटवून प्रोत्साहन देऊन त्यांची मानसिक तयारी करून या मुलांना शाळेत आणले गेले.

हे सगळे करत असतानाच संस्थेच्या निरीक्षणात हे ही आले की इथे प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात होतो आहे. थंडीत प्लास्टिक जाळले जाते तसेच यामुळे इथल्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीवर याचा वाईट परिणाम होतो आहे.

 

The Better India

तेव्हा या  प्लास्टिक समस्येवरही उपाययोजना करण्याचा उद्देशाने इथल्या मुलांना दर आठवड्याला 10 ते 20 निरूपयोगी प्लास्टिकच्या वस्तू फी स्वरूपात जमा करायला लावण्याची अभिनव कल्पना राबवली.

याच विद्यार्थ्यांनी या निरूपयोगी प्लास्टिक पासून इको विटा बनविण्याचा प्रयोग केला आणि त्या इको विटांची शाळेच्या आवारात असलेल्या झाडांच्या भोवती संरक्षक भिंत तयार केली.

 

News18.com

आता त्यांच्या याच गुणांचा वापर करून त्यांना ठराविक वेळ दिवस देऊन जास्त इको विटा बनविण्यासाठी आव्हान केले ज्याचा योग्य मोबदला त्यांना दिला जाईल जो ते वैयक्तिक खर्चात वापरतील तसेच यांच्या नावाचे एक बँक खाते चालू करून त्यात बचत सुध्दा होईल.

त्याच बरोबर या विटा शाळेतील परिसरात मुलांना वावरण्यासाठी छोटे छोटे रस्ते तसेच शाळे सभोवतालच्या भिंतीच्या बांधकामा करता वापरल्या जाणार  आहेत.

अक्षर स्कूल मधे प्रवेशासाठी इतर शाळांसारख्य पारंपारिक पध्दती तसेच वयाची अट वै न ठेवता आम्ही इथली प्रवेशपध्दती थोडी वेगळी ठेवली आहे.

प्रवेश घेताना मुलांची एक छोटी परिक्षा घेतली जाते, त्याव्दारे मुलांच्या काही पात्रता / वर्गवारी ठरवली जाते आणि त्यानुसार मुलांना पुढील शिक्षण दिले जाते.

यामुळे शिक्षणाची पारंपरिक पध्दत मोडून एकाच वेळेला एकाच पध्दतीचे शिक्षण वेगवेगळ्या वयोगटातील मुलं घेऊ शकतील अशी  पध्दत राबवली जाते.

दर आठवड्यात शुक्रवारी या मुलांची एक चाचणी घेतली जाते.ज्या व्दारे मुलांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन स्वतःची प्रगती सिध्द करावी लागते.

 

Ketto

आमच्या शाळेतील मोठी मुलंच लहान मुलांना शिकवतात,यामुळे त्यांना स्वतःचे महत्त्व, किंमत व योग्यता समजते तसेच शाळेलाही कमी शिक्षक लागतात.

अशा रितीने २०१६ साली फक्त २०  मुलांना घेऊन सुरू झालेल्या या अक्षर स्कुल मधे आज १००  पेक्षा जास्त मुले, आठ बांबूच्या खोल्यांचे वर्ग तसेच काही दानशुर व्यक्तीच्या सहाय्याने मिळालेले दोन डीजीटल वर्ग असे सुंदर स्वरूप आले आहे.

आणि इथल्या मुलांना गायन,नृत्य,सुतारकाम,बागकाम,भरतकाम,सोलार पँनेल तयार करणे,इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणे, रासायनिक शेती करणे या सगळ्याचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version