' शंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात? – InMarathi

शंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

शंकराचार्यांनी हिंदूंनी दहा मुले जन्माला घालावीत असं विधान करून सगळ्याच पुरोगामी मंडळींच्या हातात तोफखाना दिला. हिंदूंना मध्ययुगीन कालखंडात नेण्याचा चंग अनेक शक्तींनी बांधला आहे. अर्थात इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून हिंदू समाजात हळू हळू का होईना जी प्रगतीची गाडी सुरु झाली ती काही केल्या थांबणार नाही. प्रगतीचीसुद्धा आपली एक नशा असते आणि कोणत्याही नशेत असताना ती नशा हवीहवीशीच वाटते. प्रगतीची नशा उत्तमच.

प्रगत समाजाचा सर्वात उत्तम निकष म्हणजे त्यात स्त्रियांना मिळालेला दर्जा. स्त्रिया एकूण लोकसंख्येच्या साधारण पन्नास टक्के धरल्या तर त्यांना मिळालेली संधी महासत्ता किंवा प्रगत पहिल्या जगातले राज्य घडवत असते. हळूहळू का होईना भारतीय समाज कात टाकतोय. याच पार्श्वभूमीवर शंकराचार्यांच्या विधानाचा विचार करावा लागेल.

shankaracharya-vasudevanand-saraswati-marathipizza

अपत्य प्राप्ती होणार असताना अनेक आधुनिक पुरुष डॉक्टरांना विचारतात, मला तुमच्याबरोबर थांबता येईल काय? डॉक्टर तेवढं सुचवत नाही कारण आपलं माणूस ज्या अवस्थेमध्ये असतं ते बघून पुरुष माणूसच चक्कर येऊन पडतो. त्यालाच सांभाळणं मुश्किल होऊन जातं.

जगातलं पहिलं सीझर ज्यूलियसच्या आईचं पार पडलं. दोन स्तनांच्या मध्यभागापासून ते थेट योनीच्या वरच्या भागापर्यंत छेद दिला. माउली त्यात मरण पावली.

birth_of_the_julius_caesar-marathipizza

स्रोत

नैसर्गिक प्रसूती ही अजून वेदनादायी असते. इतकी की योनीचा भाग फाटला असेल तर तोही समजत नाही, त्यात टाके पडलेले कळतही नाहीत. आणि बाकी दुसरं तिसरं काही नाही, नर आणि मादीच्या एका रात्रीच्या मजेची ही अल्टिमेट परिणीती असते. भोग शेवटी बाईच्याच नशिबी असतो. पुरुष सहज नामनिराळा राहू शकतो. आणि या भोगातून बिचारीची सुटका नसते कारण शरीराचे काही भाग वापरले गेले नाहीत तर नवीन गुंतागुंत होत असते. शरीर बदलतं, मन बदलतं प्रोफेशनल कारकीर्द बदलून जाते, स्वप्न आणि बाकी काय काय कुर्बान होतं. बाकी पुरुष मनात आलं की पाऊण चड्डी घालून ट्रेकिंगला जाऊ शकतो किंवा रात्री साडे अकराला गोतावळा जमवून मित्र मित्र गप्पा छाटू शकतात.

जगातल्या प्रत्येक बापाने हा विचार करावा. दोन आणि बस्स तेवढंच.

र. धो. कर्व्यांसारखे लोक जेंव्हा लोकांना संतती नियमनाचं, महत्व पटवून सांगत होते, त्याची कंडोमसारखी साधने लोकांमध्ये वाटत होते, तेंव्हा भोपटकरांसारखे हिंदुत्ववादी “नका वापरू ती साधने, त्या रबरी टोप्यांमधून कित्येक राम आणि कृष्ण वाया जातायत” असला निलाजरा प्रचार करत होते.

या लोकांनीच आपल्या नशिबी लोकसंख्यावाढीसारखा शाप मारलेला आहे. याचे दुष्परिणाम बाजूला सारून जर कोणी याचं “हिंदूंची वाढ” म्हणून कौतुक करणार असेल तर अवघड आहे. या देशात मुसलमान धर्म तलवारीच्या बळावर फोफावला. ख्रिस्ती धर्म अस्पृश्यासाठी प्रेम, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय सुविधांच्या बळावर पाय रोवता झाला.

christian-missionaries-marathipizza

स्रोत

हिंदू त्यावेळी काय करत होता हे बघायचं असेल तर दोन सिनेमे बघा. एक ‘पिंजर’ ज्यात मुसलमानाने मुलगी पळवून नेल्यावर तिला घरात प्रवेश नाकारतात आणि दुसरा ‘गदर’ ज्यात शीख माणसाशी लग्न झालेल्या मुसलमान मुलीला वाजत गाजत मुसलमान मुलाशी लग्न करायला लावत असतात. हिंदू धर्मातल्या याच विचित्रपणावर आणि विरोधाभासावर सावरकरांनी बोट ठेवलं होतं.

देवळात मुसलमान आला की देऊळ बाटलं आणि मशिदीत किंवा चर्च हिंदू गेला की हिंदू बाटला. या असल्या सामाजिक बहिष्काराची वेळ लोकमान्य टिळकांना चुकली नाही तिकडे सामान्य माणसाची काय कथा?

“मला मागे टाकून एखादा समाज पुढे गेला” या रडगाण्यापेक्षा आपण त्या धर्माला तोंड द्यायला काय केलं हे जास्त महत्वाचं. भारतीय समाजात समुद्र उल्लंघन पाप मानलं जात होतं. १८५७ च्या युद्धात सैनिकांच्या असलेल्या सहभागाला हेही एक कारण होतं.

बाजीरावांना “नर्मदा ओलांडून दिग्विजय करून आल्यावर स्नान संध्या केलीत काय?” असा निर्लज्ज उफराटा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तण्ड करीत. आपल्याच तलवारीवर धर्मासकट सुरक्षित राहून वर आपल्यालाच “धर्म का नाही पाळत?” असा शहाजोग प्रश्न करणारे धर्ममार्तंड बाजीरावांचं आयुष्य कमी करून गेले. हिंदू धर्म भारत वगळता कुठेच फोफावला नाही याचं हे एक प्रमुख कारण.

लोकसंख्या आणि प्रगती यांचा संबंध असता तर महाराष्ट्रात ब्राह्मण समाज सर्वात दरिद्री राहिला असता. आणि जगभरात ज्यू समाज सर्वात मागास, किंवा एव्हाना संपून गेला असता. इस्रायल, ज्यू आणि त्या अनुषंगाने अमेरिका या विषयाचा जरा जरी कोणी अभ्यास केला तर हादरून जायला होईल. या ज्यू समाजाचं अमेरिकेत लोकसंख्या प्रमाण दोन टक्के आहे.

village-woman-with-children-marathipizza

स्रोत

हे सगळं दुर्लक्षित करून धर्मगुरू म्हणाले, धर्म वाचवायला दहा मुलं जन्माला घाला…! हा कोणत्याही पुरुषाच्या पत्नीचा, मुलीचा आणि बहिणीचा मोठा अपमान आहे. आणि हे करणाऱ्या कोणत्याही दाढीवाल्या धर्मगुरूंचा मान ठेवायची गरज नाही. यांनी लग्न केली नाहीत. पुढच्या जन्मी देव यांना स्त्री बनवो. किमान अक्कल येईल.

आपली प्रगती साधायची असेल तर भारतीय समाजाने “धर्मगुरू धर्मगुरू” म्हणून कोणालाही मान देण्याची गरज नाही. एका असल्याच मोठ्या व्यक्तीने उत्तराखंड प्रलय आल्यावर “तुम्ही ही भूमी हनिमून स्पॉट बनवल्यावर हे होणारच” असले तारे तोडले होते. देवांना काय लैगिक आयुष्य नसतं काय? याचाच “मोदी पंतप्रधान होणार यावर तुमचं मत काय?” असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या मुस्काटात लगावली होती तेंव्हाचा व्हिडीओ आहे. एक शंकराचार्य खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली आत जाऊन आले आणि निर्दोष सुटले. (आनंदच आहे). धर्माचं अवडंबर माजवून कोणी महासत्ता बनत नसतं.

जाता जाता एक – “मुसलमानांना हे सांगाल का ?” हा प्रश्न विचारायची तसदी घेऊ नये. स्वतःची तुलना मुसलमानांशी करायची की ज्यू आणि ख्रिस्ती लोकांशी हे हिंदूंनी ठरवायला हवं.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?