Site icon InMarathi

IPL मध्ये सट्टा बाजार कसा चालतो? चमकत्या दुनियेचा खरा गुन्हेगारी चेहरा..

IPL Betting IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेटमध्ये करोडो रुपयांचा सट्टाबाजार चालतो हे तर उघड सत्य आहे. सट्टयाचा संबंध थेट मॅच फिक्सिंगपर्यंत जातो हे ही आता उघड झाले आहे.

करोडो लोक जीव मुठीत धरून मॅच बघत असतात मात्र काही लोकांनी पैसे घेऊन मॅच आधीच फिक्स करून ठेवली असते हे चित्र आपल्याला आता नवीन नाही.

ह्या क्रिकेटच्या सट्ट्याबद्दल मध्यंतरी “इनसाइड एज” नावाची एक वेबसिरीज सुद्धा येऊन गेली ज्यात ह्या सगळ्याचे हुबेहूब चित्रण केले होते.

असा सट्टा खेळणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. आयपीएल किंवा वर्ल्ड कपच्या वेळेला अनेक ठिकाणी धाडी टाकून सट्टा खेळणाऱ्यांना अटक केली जाते, पैसे जप्त केले जातात.

अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते तरीही लोक सट्टा खेळणे सोडत नाहीत.

 

 

पण इतक्या करोडो रुपयांचा सट्टा नेमका कसा खेळला जातो ह्याचे सामान्य लोकांना कुतूहल असते.

‘सेशन एक पैश्याचे आहे’ ,’डिब्बे की आवाज कितनी है’ ,लाईन को लंबी पारी चाहीये , ‘मैने चवन्नी खा ली’ ,’तुझ्या जवळ किती लाईन आहेत’ ,’आज कोण फेव्हरेट आहे’ ही वाक्ये आपल्याला असंबद्ध वाटत असली तरी सट्टा बाजारात असली वाक्ये म्हणजे कोड लँग्वेज असते आणि ह्या वाक्यांतून करोडोंचे व्यवहार होत असतात.

सध्या आयपीएल सुरु असल्याने सट्टा बाजारात लाखो रुपयांची रोज उलाढाल होत असेल. त्यात अनेक लोक हजारो रुपये कमावत आणि गमावत असतील.

यंदाची आयपीएल यु.ए.इमध्ये होत असल्याने, तेथील पोलिसांचे सुद्धा याकडे बारीक लक्ष असणार आहे.

 

 

हे सट्टाकिंग मेहनत न करता भरपूर पैसे मिळवण्याचे लालूच दाखवून विद्यार्थ्यांना सट्ट्याच्या जाळ्यात ओढत आहेत. ह्यावर्षी तर सट्टा खेळणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यांना ह्या खेळाची विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा शिकवून सट्टा खेळण्यासाठी तयार केले जात आहे.

ह्या सट्ट्याच्या बाजारात सट्टा लावणाऱ्या व्यक्तीला लाईन म्हटले जाते. ही सट्टा लावणारी व्यक्ती एजंट किंवा ज्याला पंटर म्हटले जाते, त्याच्या मार्फत बुकीशी संपर्क साधतो. ह्या बाजारात बुकीला डिब्बा असे म्हटले जाते.

सट्टा खेळण्यासाठी त्या व्यक्तीला सुरुवातीला एजंटला काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून द्यावी लागते. मग त्या व्यक्तीचे अकाउंट उघडले जाते.

ह्या अकाउंटला एक लिमिट असते. त्या त्या दिवसाच्या किंवा मॅचच्या दिवशी सट्ट्याचा जो भाव असेल त्याला ह्या सट्टेबाज लोकांच्या भाषेत डब्याचा आवाज किंवा डिब्बे कि आवाज असे म्हटले जाते.

ह्या सट्टा बाजारात आयपीएल क्रिकेटमधील २० ओव्हर्सना मोठा खेळ किंवा लंबी पारी म्हटले जाते. तसेच दहा ओव्हर्सना सेशन व सहा ओव्हर्स पर्यंत सट्टा लावायचा असल्यास छोटी पारी म्हटले जाते.

 

 

सट्टाबाजारात क्षणाक्षणाला चित्र बदलते, भाव बदलतात. मॅचच्या पहिल्या बॉलपासून ते खेळ संपेपर्यंत भाव कमी जास्त होतात.

१ लाख रुपयांना इथे १ पैसा, ५० हजारांना आठआणे किंवा अठन्नी आणि २५ हजारांना चारआणे किंवा चवन्नी म्हटले जाते. तसेच सव्वा लाख रुपयांना सव्वा रुपया असे म्हणतात.

जर एखाद्याने सट्टा लावला आणि नंतर त्याला जर ती लावलेली रक्कम कमी करायची असेल तर तसे थेट सांगता येत नाही. त्या माणसाला पूर्णपणे कोड लँग्वेजमध्ये सगळे संभाषण करावे लागते.

सट्टा लावलेली रक्कम कमी करून हवी असेल तर त्या व्यक्तीला एजंट किंवा सट्टाबाजाराच्या भाषेत पंटरला फोन करून सांगावे लागते की “मैने चवन्नी खा ली”.

हे सगळे व्यवहार समोरासमोर होत नाहीत तर बहुतांश व्यवहार हे फोनवरच होतात.

जितकी संपर्काची साधने प्रगत होत आहेत तितके ह्या लोकांना पकडणे कठीण होत चालले आहे. कारण सट्टा खेळणारे लोक लॅपटॉप, मोबाईल, व्हॉइस रेकॉर्डर ह्या सगळ्या आधुनिक साधनांचा वापर करून आपले व्यवहार करीत असतात.

 

 

आणि हे सगळे व्यवहार करताना हे लोक इतकी सावधगिरी बाळगतात त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे खूपच अवघड आहे.

हे लोक इतके गुप्तपणे काम करतात की एकदा एखाद्या मोबाईल नंबर वरून संपर्क करून कुठले व्यवहार केले कि नंतर ते सीम काढून फेकून दिले जाते व परत त्या नंबरचा उपयोग दुसऱ्या कुठल्या व्यवहारासाठी केला जात नाही.

सट्टा बाजार हा आकडे परफेक्ट ओळखून पैसे लावण्याचा खेळ असतो. तसाच ह्यात बऱ्याच गोष्टी नशिबावर व लकी आकड्यांवर अवलंबून असतात असेही सट्टा खेळणारे लोक मानतात.

हल्ली तर अनेक मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत ज्यावरून उघड उघड सट्टा खेळता येतो.

इंटरनेटवर अनेक वेबसाईट्स सुद्धा आहेत ज्यावरून लोकांना ऑनलाईन सट्टा खेळता येतो आणि पॉईंट्स जिंकता येतात. हा सगळं पैश्यांचा बाजार आहे. काही साईट्सवर तर बेटिंग कसे खेळावे, नुकसान न होऊ देता पैसे कसे जिंकावे ह्याचे ट्युटोरियल्स आहेत.

त्यासंबंधांत अनेक एक्सपर्ट लोकांनी टिप्स सुद्धा दिल्या आहेत. ह्या साईट्सवर रोजच्या मॅच प्रमाणे बेटिंग टिप्स दिल्या जातात. खरं तर हे एक प्रकारचे व्यसनच आहे, तरी अनेक लोक असे बेटिंगच्या जाळ्यात अडकतात.

 

 

सट्टा ,बेटिंग किंवा जुगार खेळू नये , असा पैसा चांगला नाही. ही लक्ष्मी टिकत नाही असेच आपल्याला वर्षानुवर्षे आपले वाडवडील सांगत आलेत.पण आता मात्र सगळेच चित्र बदलले आहे.

गेमच्या नावाखाली हल्ली सट्टा खेळणे सुद्धा गंमत वाटू लागली आहे आणि विद्यार्थी सुद्धा ह्या सट्ट्याच्या जाळ्यात अडकू लागले आहेत ही चिंतेची बाब आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version