आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सोमवार म्हटले की डोळ्यापुढे येते ऑफिस! परत तेच ते काम, तो प्रवास, ती गर्दी आणि ऑफिसचे, बॉसचे टेन्शन..
म्हणूनच रविवार संध्याकाळपासूनच सोमवारी ऑफिसला जाण्याचे वेध लागतात आणि रविवारी संध्याकाळपासूनच कंटाळा येऊ लागतो.
सर्वसामान्य माणसाला रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी परत कामावर हजर होण्याची कल्पनाच नको वाटते.
अर्थात “पापी पेट का सवाल” असल्यामुळे कसेबसे रडतखडत आपण सोमवारी मनाची तयारी करत कामाला जातो.
शाळेत असताना जोडून दोन तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या की असेच सोमवारी शाळेत जाण्याचा कंटाळा यायचा. आता ऑफिसलाही जाताना तसेच होते.
एखादा लॉन्ग विकेंड आला तर त्यानंतर येणार सोमवार नको वाटतो.
ह्या “मंडे मॉर्निग ब्ल्यूज”चा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच येतो. ह्या “सुकून के शिकार-सोमवार” वर तर मध्यंतरी एक मस्त गाणं सुद्धा आलं होतं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
“ले..फिर आ गया तू! फेस उठा के.. दम लेगा क्या.. मेरी जान खाके? खून चूसने तू आया खून चुसने।। ब्लडी खुनी मंडे क्यों आया खून चूसने!”
असं ते गाणं होतं आणि ह्यात सगळ्यांच्याच मनातल्या भावना अगदी हुबेहूब उतरल्या आहेत. असा हा खुनी मंडे म्हणजे बहुतांश लोकांना नको नको वाटतो.
पण जगात अशीही काही ऑफिसेस आहेत जिथल्या कर्मचाऱ्यांना सोमवार नकोसा नाही तर हवाहवासा वाटतो. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सुद्धा कामावर जाण्याचा कंटाळा येत नाही.
१. सेलगास कॅनो -माद्रिद
तुम्हाला उत्तम आणि कंफर्टेबल ऑफिस तयार करायचे असेल तर त्यासाठी मोट्ठी जागा असायलाच हवी हा आपला भ्रम माद्रिद येथील सेलगास कॅनोचे हे ऑफिस बघितले तर दूर होईल.
हे ऑफिस तयार करताना इथे काम करणाऱ्या लोकांना चांगल्या आणि कम्फर्टेबल वातावरणात काम करता यावे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ह्याचे डिझाईन करण्यात आले आहे.
इथे काम करताना कर्मचारी नक्कीच रिलॅक्स होत असणार ह्यात शंका नाही. कारण हे ऑफिस अर्धे जमिनीच्या खाली व अर्धे जमिनीच्या वर आहे. आणि आजूबाजूला भरपूर झाडं आणि हिरवळ आहे.
स्पेनमधील माद्रिदजवळच्या एका जंगलातच हे ऑफिस बांधले आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न ठेवून इथले लोक काम करतात.
–
- भारतातील ही १० कॉर्पोरेट ऑफिसेस कोणत्याही पर्यटनस्थळांपेक्षा कमी नाहीत!
- इन्व्हेस्टर्स शिवाय ‘करोडोंचा’ बिझनेस उभा करणाऱ्या “दृढनिश्चयी” उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास!
–
इवान बान ह्याने हे ऑफिस डिझाईन केले आहे. भरपूर प्रकाश, खेळती हवा, आजूबाजूला हिरवळ, रंगेबेरंगी झाडे, ऑफिसमध्ये रंगेबेरंगी डिझाईन, स्वच्छता ह्यामुळे ह्या ऑफिसमध्ये कंटाळा येतच नाही!
असे इथले कर्मचारी म्हणतात.तसेच काम करून शीण आला असेल आणि थोडा ब्रेक हवा असेल तर त्याचीही व्यवस्था ऑफिसमध्येच केलेली आहे.
ह्या ठिकाणी मस्त रुचकर पदार्थ, गेमिंग एरिया आणि लहान मुलांना आवडतात तश्या मोठ्यांसाठी स्लाईड्स आहेत.
म्हणूनच इथे कामावर येताना लोकांना अगदी सोमवारी सुद्धा कंटाळा येत नाही कारण कर्मचाऱ्यांच्या कंफर्टची इथे पूर्ण काळजी घेतली आहे.
२. गुगल ऑफिस -झ्युरिच
गुगलमध्ये काम करायला मिळणे हे अनेकांचे स्वप्न असते. गुगलसारख्या कंपनीचे ऑफिस काहीतरी वेगळे आणि छानच असणार ह्यात काहीच शंका नाही.
गुगलच्या यशामागे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कष्ट तर आहेतच पण त्या कर्मचाऱ्यांना प्रसन्न आणि रिलॅक्स्ड वातावरणात काम करता यावे ह्याची काळजी कंपनी सुद्धा घेते.
कामाच्या ठिकाणचे वातावरण उत्तम राहावे ह्यासाठी गुगल भरपूर वेळ व पैश्यांची गुंतवणूक करते.
कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये मजेत आणि हसतखेळत काम करता यावे म्हणून गुगलने ऑफिसमध्येच व्यवस्था केली आहे.
काम करताना दमल्यावर किंवा कंटाळा आल्यावर ब्रेकमध्ये रिलॅक्स होण्यासाठी गेम झोन बरोबरच तर जागोजागी कॅफेटेरिया आहेत.
गुगल ऑफिसमध्ये असा नियम आहे की कुठलाही कर्मचारी उपाशी राहणार नाही. म्हणूनच सगळीकडे किचन्स तसेच कॅफेटेरिया आहेत.
दिवसातुन कमीत कमी तीन वेळा कर्मचारी ह्या कॅफेटेरियामधील त्यांचे आवडते पदार्थ खाऊन रिलॅक्स होऊ शकतात. त्यांना ह्या कॅफेटेरियातून पदार्थ घेण्यासाठी वेगळे पैसे भरावे लागत नाहीत.
हे ऑफिस खूप मोठे आहे त्यामुळे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तुम्हाला जर लिफ्टचा किंवा पायऱ्यांचा वापर करण्यास तुम्हाला कंटाळा आला असेल इथे मोठमोठ्या घसरगुंड्या आहेत.
त्यांचा वापर करून तुम्ही वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर जाऊ शकता. घसरगुंडीवर खेळायला कुणाला आवडत नाही? काम करता करता थोडीशी मजा अशी घेता येऊ शकते.
तसेच ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी ह्या ऑफिसमध्ये मोठ्ठी लायब्ररी आहे आणि तुम्हाला मन शांत करायचं असेल तर तुम्ही इथल्या सुंदर ऍक्वेरियममध्ये थोडा वेळ घालवू शकता.
फिश टॅंक मधील माश्यांकडे थोड्यावेळ बघत राहिल्यास मन शांत होते असे म्हणतात. त्यामुळे इथे काम करणे हा एक मजेदार आणि छान अनुभव असेल ह्यात शंकाच नाही.
३) रेड बुल ऑफिस- सोहो ,लंडन
लंडन येथे स्थित रेड बुलचे ऑफिस सुद्धा अश्याच प्रकारे डिझाईन केले आहे जेणे करून इथे काम करणाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करताना कंटाळा येऊ नये.
सोहो येथील पाच जुन्या पब्सच्या जागेवरच हे ऑफिस बांधण्यात आले आहे.
ह्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक हे विशीत व तिशीत असणारे तरुण आहेत. त्यांनीच एकत्र येऊन ह्या जागेत काहीतरी वेगळे व खास करण्याचे ठरवून काम सुरु केले आहे.
कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे आपले ऑफिस टिपिकल असू नये हा एकमेव नियम पाळून त्यांनी आपले ऑफिस बनवले. एखाद्या लाउंजसारखे ह्या ऑफिसचे डिझाईन आणि वातावरण असते.
त्यामुळे इथे काम करणारे लोक ऑफिसमध्ये खुश असतात.
४)AOL हेडक्वार्टर्स -पालो अल्टो, कॅलिफोर्निया
AOL आता आधीसारखे राहिले नसले तरी ते टेकक्रंच आणि हफिंगटन पोस्ट सारख्या वेबसाईट्स विकत घेऊन परत उभे राहत आहे आणि कंपनीत व ऑफिसमध्येही बरेचसे चांगले बदल घडवत आहेत.
त्यांचे पूर्वीचे कॉर्पोरेट ऑफिस त्यांनी आता बदलून टाकले आहे आणि गुगलकडून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचे ऑफिस गुगलसारखेच फ्रेश व नव्या डिझाईनचे तयार केले आहे.
ह्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना प्रसन्न मनाने काम करता यावे,
म्हणून हलकेफुकले वातावरण राहावे म्हणून मोठे किचन आणि कॅफेटेरिया, रंगेबेरंगी भिंती, भरपूर मोठा रिलॅक्सेशन एरिया, पूल टेबल्स, गेम रूम्स आणि कम्फर्टेबल वर्क स्पेस ह्या सगळ्याची व्यवस्था केली आहे.
५) पार्लमेंट -पोर्टलॅंड ऑरेगॉन
ह्या कंपनीला माहितेय की जर कंपनीत काम करणाऱ्या माणसांना ऑफिसमध्ये रिलॅक्सिंग, शांत व हलकेफुलके वातावरण मिळाले तर कर्मचारी चांगले काम करतील आणि त्याने कंपनीचा फायदाच होईल.
म्हणून त्यांनी ऑफिस असे डिझाईन केले आहे की जेणे करून कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल.
हे करता करता त्यांनी पर्यावरणाचा देखील विचार केला आहे. त्यांनी बहुतेक सामान हे रिसायकल केलेल्या वस्तूंपासून बनवले आहे.
जुने स्ट्रीट साईन्स , जुना पिझ्झा अवन, जुन्या चर्च आणि गोदामातील लाकूड वगैरे जुन्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून सगळे ऑफिस डिझाईन केले आहे.
सगळ्या वस्तू जुन्या वापरल्या असल्या तरी त्यांचे टाकाऊतून टिकाऊ असे सुंदर डिझाईन बनवण्यात आले आहे.
६. ड्रीमहोस्ट – ला ब्रिआ ,कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियातील ड्रीमहोस्ट ह्या कंपनीचे ऑफिस ज्यांनी डिझाईन केले आहे, त्यांनीच फेसबुक आणि AOL चे ऑफिस डिझाईन केले आहे. मोठ्या मोकळ्या जागेत कर्मचाऱ्यांना काम करता येते.
इथले कर्मचारी लहान लहान पर्सनल क्युबिकल्स मध्ये बंदिस्त नाहीत तर मोकळ्या जागेत काम करतात. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी बोलणे होऊन ताणतणाव कमी होतो.
इथेही मोठ्या मोकळ्या जागेत मिटींग्स होतात. रिलॅक्सेशनसाठी सुद्धा इथे वेगळ्या जागा आहेत. कामातून ब्रेक घेण्यासाठी गेमिंग एरिया आहे.
तसेच पोटपूजा करण्यासाठी सुसज्ज कॅफेटेरिया सुद्धा आहेत.
हवेशीर प्रशस्त जागा, भरपूर प्रकाश ,रंगेबेरंगी भिंती ह्यामुळे इथे काम करण्याचा ताण येत नाही.
७) फेसबुक- पालो अल्टो, कॅलिफोर्निया
फेसबुकने त्यांचे ऑफिस डिझाईन करण्यासाठी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे मत घेतले.
त्यासाठी त्यांनी एक खास सॉफ्टवेअर तयार केले. ह्या सॉफ्टवेअर द्वारे ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले की त्यांना त्यांचे ऑफिस कसे असलेले आवडेल?
त्यावर अनेकांनी आपापले मत दिले आणि सगळ्यांच्या मतांचा विचार करून त्यातील सर्वोत्तम व व्यावहारिक कल्पना वापरून त्यातुन त्यांचे ऑफिस तयार झाले.
म्हणूनच त्यांचे हे ऑफिस एकमेवाद्वितीय आहे असे म्हणायला हरकत नाही.
काम करण्यासाठी मोकळ्या व मोठ्या ओपन स्पेसेस, छान रिलॅक्सेशन एरिया, स्केटिंग करण्यासाठी खास जागा, डीजेची व्यवस्था सुद्धा ह्या ठिकाणी आहे.
संगीतात रुची असणारे व डीजेगिरी करण्याची आवड असणारे लोक इथे त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बूथमध्ये त्यांच्या आवडीचे म्युझिक मिक्सिंग करू शकतात,
आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोरंजन करू शकतात. हे सगळे मॉडर्न आणि आरामदायक बिल्डिंगमध्ये डिझाईन केले आहे.
८) यूट्यूब – सॅन ब्रुनो ,कॅलिफोर्निया
यूट्यूब गुगलने विकत घेतले आणि त्यांचेही ऑफिस मस्त चकाचक डिझाईन करण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. ह्या ऑफिसमध्येही काम करण्यासाठी मोकळी मोठी जागा आहे.
पर्सनल क्युबिकल्सचे जेल इथेही नाही. आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा आहेत.
स्विमिंग पूल, अद्यावत जिम, इनडोअर गोल्फ, सगळीकडे मोकळेपणाने फिरता येण्यासाठी सेगवे, सुसज्ज कॅफेटेरिया, गेम झोन अश्या सोयी या ऑफिसमध्ये आहेत.
येथील कर्मचाऱ्यांना काम करता करता मजा सुद्धा करता येते. म्हणूनच त्यांना ह्या ऑफिसचा कंटाळा येत नाही. आणि कामाचा ताण सुद्धा कमी जाणवतो.
९) कॉमव्हर्ट -मिलान , इटली
कॉमव्हर्ट त्यांच्या हेडक्वार्टर्ससाठी नव्या जागेच्या शोधात होते. आणि योगायोगाने त्यांना एक जागा मिळाली. ते एक जुने सिनेमा थिएटर होते.
त्यांना अशीच मोठी जागा हवी होती आणि त्यांनी ती लगेच विकत घेऊन तिचा कायापालट केला.
इतक्या मोठ्या जागेत त्यांचे वेअरहाऊस, ऑफिसेस तर झालेच शिवाय समोरच्या बाजूला एक दुकान सुद्धा त्यांना काढता आले.
त्यांनी वेअरहाऊसच्या वरती आधी जिथे प्रेक्षकांची बसायची जागा होती तिथे एक इनडोअर स्केटिंगची जागा सुद्धा तयार केली.
त्यांनी त्या जागेचा अगदी वेगळ्या प्रकारे पुरेपूर उपयोग केलेला दिसून येतो.
१०) लेगो -डेन्मार्क
लहानपणी वेगवेगळे ठोकळे जोडून त्यापासून विविध आकार, घरे, गाड्या सगळ्यांनीच बनवल्या असतील. त्याचेच ब्रँडेड स्वरूप म्हणजे लेगो हा खेळ होय.
लेगो हा खेळ लहान मुलांमध्ये तर लोकप्रिय आहेच शिवाय अनेक मोठ्या माणसांनाही अतिशय आवडतो.
लेगोच्या ह्याच ऑफिसमध्ये चहूबाजूला रंगेबेरंगी लेगो असतात आणि कर्मचारी काम करून कंटाळले की त्याच लेगोपासून विविध प्रकार बनवत असतात.
हे ऑफिस सुद्धा रंगेबेरंगी लेगोसारखे आहे. ह्यांच्या मिटिंग रूम्स सुद्धा मोकळ्या आणि विविधरंगी असतात. ह्या ऑफिसमधील सगळेच त्यांना वाटेल तेव्हा लेगो खेळू शकतात!
आणि नवनव्या कल्पना शोधून काढू शकतात. म्हणजेच खेळत खेळत काम करणे असा प्रकार इथे आहे असे म्हणायला हरकत नाही.
असे मजेदार ऑफिस असेल तर कोण कशाला ऑफिसला जायचा कंटाळा करेल?
ह्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना सोमवारी सुद्धा कामावर जाण्याचा कंटाळा येत नाही कारण त्यांच्या कंपनीनेच त्यांना कंटाळा येऊ नये अशी व्यवस्था केली आहे.
आता आपल्याकडेही असे कधी होणार ह्याची आपण वाट बघूया..तोवर “Keep calm and survive Monday”
–
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.