स्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेली अनेक शतके मुलींना “परक्याचे धन” म्हणून दुय्यम स्थान दिले जात होते. मुलीला डोक्यावरचा भार समजून तिचे लवकरात लवकर लग्न करून टाकून जबाबदारीतून एकदाचे मोकळे होणे ह्यामुळे बालविवाह होऊ लागले. लहान मुलींचे दुप्पट वयाच्या विधुराशी लग्न होऊ लागले.
हुंडा द्यावा लागतो म्हणून कित्येक मुलींची गर्भातच हत्या होऊ लागली. अजूनही बंदी असताना देखील अवैधरित्या भ्रूणाची तपासणी करून स्त्रीभ्रूणहत्या होतात.
वंशाच्या दिव्यासाठी वंशाच्या ज्योतीच विझवून टाकल्या जातात. आता मात्र परिस्थिती थोडी का होईना बदलते आहे. मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत आणि त्या सुद्धा आईवडिलांचे नाव रोशन करू शकतात.
माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही घरे उजळून टाकू शकतात हे लोकांना पटू लागले आहे. प्रसंगी मुली सुद्धा घराला आणि आईवडिलांना भक्कम आधार देतात ह्याची तर अनेक उदाहरणे समाजात सापडतील.
मुली आणि वडिलांचे नाते तर खूप खास असते. मुलगी म्हणजे वडिलांचे काळीजच असते आणि काही अपवाद सोडल्यास प्रत्येक वडिलांना आपली मुलगी ही एखाद्या परी किंवा राजकन्येसारखीच राहावी, आपण तिचे खूप लाड करावेत आणि तिच्या आयुष्यात कायम सुख नांदावे अशीच इच्छा असते.
मुली सुद्धा आपल्या वडिलांपासून लांब जाताना प्रचंड दुःखी असतात आणि आपल्या वडिलांचे छत्र कायम आपल्या डोक्यावर राहावे, त्यांचा मायेचा हात कायम आपल्या डोक्यावर असावा अशीच इच्छा करतात. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तर सगळेच मानतात पण वडील म्हणजे आपल्या कुटुंबाचा कणा असतात.
त्यांच्याशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच आपले वडील कायम छान असावेत, त्यांना कसलाही त्रास होऊ नये अशीच प्रार्थना आपण करत असतो.
कोलकाताच्या राखी दत्तालाही आपल्या वडिलांची माया कायम आपल्याबरोबर राहावी हीच इच्छा होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. राखीच्या वडिलांना यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासले.
यकृत हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे. यकृताशिवाय शरीराचे चक्र व्यवस्थित चालू शकत नाही.
शरीराच्या विविध क्रिया म्हणजेच साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणे, तसेच लोह, क्षार, जीवनसत्वे ह्यांचा साठा करणे, पित्त रस तयार करून स्निग्ध पदार्थांचे पचन, शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिन निर्माण करणे, निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे, आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंचा नाश करणे इतकी महत्वाची कार्ये आपले यकृत पार पाडत असते.
तसेच सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शरीरातील अनावश्यक गोष्टींचा आणि विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारी सुद्धा यकृतावरच असते.
त्यामुळे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी यकृताचे आरोग्य उत्तम ठेवणे अतिशय आवश्यक असते. विविध प्रकारची विषद्रव्ये, अनैसर्गिक पदार्थ आणि रासायनिक पदार्थ ह्यांचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्यच धोक्यात येते.
यकृतासंदर्भात असाच गंभीर त्रास राखीच्या वडिलांना होत होता आणि त्यांचा त्रास बघून राखीचा जीव कासावीस होत असे. म्हणूनच तिने आपल्या यकृताचा काही भाग वडिलांना दान देण्याचे ठरवले.
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तिने हा अतिशय मोठा आणि जोखमीचा निर्णय घेतला आणि तिच्या यकृताचा ६५ टक्के भाग तिच्या वडिलांच्या शरीरात बसवण्यात आला.
आपल्या शरीरात यकृत हा एकच असा अवयव आहे ज्याची परत वाढ होऊ शकते. यकृताचा फक्त २५ % भाग जरी व्यवस्थित असेल तरी काही काळात त्याची संपूर्ण वाढ होऊन यकृत पूर्ववत करण्याची क्षमता आपल्या शरीरात असते.
अर्थात ह्याला आपण ह्याला खरे रिजनरेशन म्हणू शकत नाही कारण ही सस्तन प्राण्यांमध्ये होणारी कॉम्पन्सेटरी ग्रोथ म्हटले जाते. यकृताच्या लोब्स काढल्या असतील तर त्या परत तयार होत नाहीत पण यकृताचे कार्य मात्र व्यवस्थित सुरू राहते. पण यकृताचा आकार मात्र बदलतो.
लिव्हर ट्रान्सप्लांट द्वारे ज्याचे यकृत निकामी होऊन जीवाला धोका निर्माण झाला आहे त्याचा जीव वाचू शकतो. दात्याच्या यकृताचा काही भाग काढून तो रुग्णाच्या शरीरात बसवला जातो आणि त्याचे खराब झालेले यकृत पूर्णपणे काढून टाकण्यात येते.
परंतु ही अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. सगळे जर व्यवस्थित झाले तर रुग्ण व दाता दोघांच्याही शरीरात यकृताची वाढ होऊन शरीराचे चक्र पूर्ववत सुरु राहते. ह्यात मोठी शस्त्रक्रिया दात्याच्या शरीरावर करावी लागते.
ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असते आणि त्यात दात्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कधी कधी ब्लड ट्रान्सफ्युजनची वेळ सुद्धा येऊ शकते.
ह्या शस्त्रक्रियेत ब्लीडींग, इन्फेक्शन, वेदनादायी इन्सिजन, ब्लड क्लॉट होणे ह्यांची शक्यता असते व बरे होण्यासाठी मोठा कालावधी लागतो.
हे सगळे लक्षात घेऊन सुद्धा केवळ वडिलांचा त्रास बघवत नाही म्हणून आणि त्यांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून राखीने हा निर्णय घेतला.
अगदी ख्यातनाम डॉक्टरांनी सुद्धा ह्या केस मध्ये असमर्थता दर्शवली तेव्हा राखी व तिची बहीण अश्या दोघींनीच त्यांच्या वडिलांना AIG हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ही सगळी प्रोसेस सुरु केली. आणि वडील व राखी ह्या दोघांचेही ऑपरेशन व्यवस्थित पार पडून दोघांचीही प्रकृती आता सुधारते आहे.
सोशल मीडियावर राखी व तिच्या वडिलांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक लोक राखीचे कौतूक करीत आहेत. तिच्या ह्या निर्णयासाठी तिची प्रशंसा करीत आहेत.
अनेक लोकांनी असेही म्हटले आहे की आज राखीने दाखवून दिले की मुली कुठेही कमी नाहीत. जे लोक मुलींना दुय्यम मानतात ,कमी लेखतात त्यांना ही सणसणीत चपराक आहे.
ह्या आधी सुद्धा मुलींनी आपल्या वडिलांचा जीव वाचावा ह्यासाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. २०१७ मध्ये पूजा बिजार्नीया नावाच्या मुलीचा व तिच्या वडिलांचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. तिनेही वडिलांसाठी आपले यकृत दान केले होते.
ह्या आधी २०१६ साली मिरजापूर जिल्ह्यातील बहुआर गावातील वीणाने सुद्धा असाच निर्णय घेतला होता आणि तिच्या सासरच्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत करून तिच्या ह्या धैर्याबद्दल तिचे कौतुकच केले होते.
अजूनही जे लोक मुली म्हणजे परक्याचे धन, डोक्यावरील भार समजतात. त्यांना दुय्यम लेखतात, त्यांनी आपली बुरसटलेली विचारसरणी वेळीच सोडून देण्याची गरज आहे.
इतक्या कमी वयात इतका मोठा निर्णय घेणाऱ्या राखीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.