Site icon InMarathi

विमान वाहतुकीत अग्रगण्य, “जेट एअरवेज” दिवाळखोरी मध्ये का गेली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातली अग्रगण्य असलेली “जेट एअरवेज” आर्थिक चणचणीमुळे समस्येच्या गर्तेत अडकली आहे. जेट एअरवेज चे सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील रद्द करण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर देणी थकल्याने आणि व्यवस्थापनातील सावळा गोंधळ याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

जेट एअरवेज ची स्थापना (१९९३) भारतात खाजगी क्षेत्राला १९९१ मध्ये दारे खुली झाली त्यानंतर झाली. तिकीट बुकिंग एजंट ते एका विमान कंपनीचे मालक असा या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांचा प्रवास देखील रंजक आहे.

कर्जाचा बोजा सतत वाढत जाऊन तो आता १ बिलियन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचला आहे. परिणामी आपले दैनंदिन व्यवहार करण्यासाठी देखील पैसा शिल्लक नसल्याने या वाहतूक उद्योगावर विमान फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

….आणि जेट एअरवेज जमिनीवर 

जेट एअरवेज च्या उताराला २०१८ च्या वर्षारंभापासून झाली. पुढे तिमाहीचे आर्थिक अहवाल समोर आले तेव्हा त्यांना १३२३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी याच तिमाहीत जेट फायद्यात होते. त्यांना ५३.५० कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

 

Freepressjournal.com

मात्र २०१८ हे वर्ष त्यांच्यासाठी लाभदायी ठरले नाही. त्यानंतर देखील ही मालिका थांबली नाही आणि प्रत्येक तिमाहीनंतर होणारा तोटा वाढतच चालला होता. त्यावर होणारे उपाय देखील त्यांना यातून सावरू शकले नाही.

२०१८ च्या ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारकपातीला सामोरे जावे लागले. तर सप्टेंबर महिन्यात विमानप्रवासात “इकॉनॉमी क्लास” साठी मोफत जेवण बंद करण्यात आले.

एवढ्यावरच न थांबता ऑक्टोंबर महिन्यात आपल्या ३० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यांत अभियंते, सुरक्षा आणि विक्री विभागातील कर्मचारी तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र तरीही जेटची घसरगुंडी सुरूच राहिली.

हे आहे कारण…  

जेट एअरवेज स्थापनेपासून चांगल्या स्थितीत होती कारण त्या क्षेत्रात पुरेशी स्पर्धा नव्हती मात्र पुढे इंडिगो आणि स्पाईसजेट यांचे आगमन झाले आणि हे क्षेत्र देखील अधिक स्पर्धात्मक झाले. त्यात भर म्हणून इंडिगो आणि स्पाईसजेट हे “बजेट एअरलाईन्स” म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांनी तिकीट दारात मोठी कपात केल्याने जेट एअरवेज साठी तसे करणे भाग होते. पण त्याचवेळी फुल सर्विस देणारी जेट एअरवेज कमी पैशात अधिक सेवा पुरवत होती.

याचा दूरगामी परिणाम अपेक्षित असाच होता. बँकांचे कर्ज वाढत होते आणि तुलनेत पुरेसा नफा होत नव्हता. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले. इंडिगो आणि स्पाईसजेट हे “बजेट एअरलाईन्स” असले तरी जेट च्या तुलनेत त्यांच्या सेवा देखील कमी होत्या. जेट हे संतुलन योग्य रीतीने हाताळू शकले नाही आणि ही आताची परिस्थिती निर्माण झाली.

 

theasianage.com

यासोबत २०१८ मध्ये भडकलेले इंधन दर खर्चाचे आकडे वाढवत होते शिवाय कमजोर रुपयाने देखील यांत भर घातली.

एकाचवेळी संकटांची ही मालिका जेट एअरवेजचे आर्थिक आरोग्य बिघडवायला पुरेशी होती. अशा परिस्थितीत देणेकरी आपले हात दगडाखाली अडकवायला साहजिकच तयार नसतात. त्यातून जेट चे व्यवस्थापन आणि देणेकरी यांच्या बैठकी सुरु झाल्या.

दुसरीकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने रोजचे उड्डाणे देखील रद्द होण्यास सुरुवात झाली. परिणामी पैशांचा स्त्रोत देखील थांबला. जेट एअरवेज चा सर्वात चांगला काळ होता तेव्हा त्यांची १२० विमाने कार्यरत असत. आज हा आकडा १४ वर येऊन ठेपला आहे. यातून परिस्थितीचे पुरेसे गांभीर्य लक्षात यावे.

आता काय होऊ शकते?

२०१३ मध्ये देखील जेट एअरवेज साठी अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. २ बिलियन डॉलर असलेले कर्ज त्यांच्यासाठी डोकेदुखीच ठरले होते. मात्र त्यावेळेस परदेशी विमान वाहतूक उद्योग स्थानिक विमान वाहतूक उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करू शकतील असा केंद्र सरकारचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला.

कर्जाएवढी रक्कम देऊन “इतिहाद एअरलाईन्स” जेट एअरवेज मध्ये २४ टक्के मालकीसह भागीदार झाली. त्यानंतर २०१३-१४ आणि २०१४-१५ ही वर्षे जेट एअरवेज साठी फायद्याची ठरली. मात्र पुन्हा त्यांना ती उंची गाठता आली नाही.

स्टेट बँकेसह २६ जणांनी जेट एअरवेज ला कर्ज दिले आहे आणि बँकांना ते पैसे परत मिळवणे आवश्यक असल्याने नवीन गुंतवणूकदार मिळवणे इतके सोपे नाही.

 

thelogicalindian.com

कारण जेट एअरवेज वर एवढे कर्ज असल्याने त्यांचे विमान धावपट्टी वर आणणे इतके सोपे नाही. याआधी २०१८ मध्ये टाटा समूहाने या व्यवहारात रस दाखवला होता मात्र त्यांच्या “पूर्ण नियंत्रणाची” अट जेट च्या नरेश गोयल यांना मान्य नव्हती.

त्याचप्रमाणे इतिहाद एअरलाईन्स पुन्हा पैसे ओतण्यास तयार होती पण त्यांच्या अटी पूर्ण करणे जेटच्या प्रवर्तकांना अवघड वाटले.

मात्र आता बँकेने जेट एअरवेज चा ताबा घेतला आणि नरेश गोयल आणि त्याच्या पत्नी संचालक मंडळातून पायउतार झाले आहेत. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हताच. आता नवीन गुंतवणूकदार या व्यवहारात किती रस घेतात त्यावर पुढचा रस्ता कसा आहे हे ठरेल. मात्र आधी काही गुंतवणूकदार आपल्या अटींसह तयार होते ती परिस्थिती आता आहे असेही नाही.

कारण आपली देणी वसूल करण्यासाठी अधिक समभाग विकून निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. जे मोठ्या गुंतवणूकदारांना खचितच आवडेल.

अर्थात ५१ टक्के मालकी सध्या बँकांच्या ताब्यात आहे आणि लिलाव होईल तेव्हा कुणीही त्यासाठी पुढे येऊ शकते कुणाला बंदी नाही असे बँकेने स्पष्ट केले आहे. पुढच्या तिमाहीत  म्हणजे जून २०१९ तिमाहीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असा कयास आहे.

२२००० कर्मचारी असलेला जेट एअरवेज चा डोलारा सांभाळण्यासाठी नक्की कोण पुढे येईल ते कळेलच.

प्रवाशांसाठी काय?

आधीच बोईंग ७३७ विमानच्या उड्डाणाला अपघातांच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्पाईसजेट ची काही विमाने जमिनीवर आहेत तर दुसरीकडे जेट एअरवेज ची अनेक उड्डाणे रद्द झाली तर अनेकांचे वेळापत्रक कोलमडले आहेत.

 

india.com

त्यामुळे प्रवाशांसाठी हा दुहेरी मार आहे. परिणामी महाग तिकिटे आणि अनिश्चिततेची टांगती तलवार यामुळे प्रवासी हैराण आहेत. जेट एअरवेज च्या म्हणन्यानुसार एप्रिल च्या शेवटपर्यंत यांतून मार्ग निघून उड्डाणे सुरळीत होतील.

विमान वाहतूक क्षेत्र हे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी नेहमीच जोखमीचे राहिले आहे.

२००३-०४ मध्ये स्थानिक विमान प्रवासात जवळजवळ ४४ टक्के वाटा जेट एअरवेज चा होता आता २०१८-१९ मध्ये तो अवघ्या १० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

यावरूनच हे क्षेत्र किती जोखमीचे आहे ते देखील लक्षात येते. तूर्तास जेट एअरवेज ला “अच्छे दिन” येतील का? हा प्रश्न कायम आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version