' उद्या औरंगाबाद MIM च्या हिरव्या रंगात न्हाऊन निघणार? की खैरे शिवसेनेचा गड वाचवणार? – InMarathi

उद्या औरंगाबाद MIM च्या हिरव्या रंगात न्हाऊन निघणार? की खैरे शिवसेनेचा गड वाचवणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

औरंगाबाद… औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याची कबर या जिल्ह्यात बांधली त्यावरून या शहराला पडलेलं हे नाव आता परत चर्चेत आलंय ते लोकसभा निवडणुकीमुळे.

औरंगाबादेत कोणाचं वर्चस्व राहणार हे विचारण्याची औरंगाबादेत एक खास पद्धत आहे. ती म्हणजे खान हवा कि बाण हवा?

यंदा देखील तोच प्रश्न विचारला जात आहे… मात्र यंदा बाणाला केशरी पाठींबा कमी पडून खान लागेल कि काय अशी चिन्ह मतदार संघात दिसत आहेत.

आता पर्यंत कॉंग्रेस विरुध्द शिवसेना अशी लढत या मतदार संघात चालत आलेली असतांना

“१५ मिनिट पुलिस हटादो किसमे हिम्मत है बता देंगे”

असें फुत्कार काढणाऱ्या ओवेसी चा MIM पक्ष देखील यंदा औरंगाबाद लोकसभेच्या रिंगणात आहे आणि त्यांच्या सभांना, मिरवणुकीला MIM चे हिरवे झेंडे मिरवत होणारी गर्दी शिवसेनेला धडकी भरविणारी ठरत असली तरी शिवसेनेला खरी भीती हर्षवर्धन जाधव यांना होणारे मतदान हीच आहे.

 

india.com

कारण, हर्षवर्धन जाधव ह्यांची बूथ लेव्हल ला नसणारी यंत्रणा, अपक्ष म्हणून असणार्या मर्यादा, निवडून आले तर खासदार म्हणून लोकसभेचं कामकाज कसं असतं याचा नसलेला अनुभव या सर्व गोष्टी पाहता ते निवडून येण्याची शक्यता कमी दिसत असली तरी ते खैरेंची किती मतं खातात यावर MIM च्या हिरव्या गुलालाचे ट्रक हैद्राबाद वरुन येणार कि नाही ते ठरेल असं चित्र औरंगाबादेत पाहायला मिळतंय.

MIM च्या औरंगाबादेतील ताकदीचा विचार केल्यास महापालिकेत तब्बल २४ नगरसेवक असणार्या MIM चा एक आमदार सुद्धा या शहरात आहे.

गेल्या विधानसभेला इम्तियाज जलील निवडून आल्या नंतर त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण शहरभर केलेल्या हिरव्या गुलालाच्या उधळणी नंतर प्रचंड हुल्लडबाजीचे घडलेले प्रकार अख्या औरंगाबादने अनुभवले होते.

 

jaleel inmarathi
theindianexpress.com

चौरंगी लढत

औरंगाबादेत होणार्या चौरंगी लढतीत कॉंग्रेस कडून सुभाष झांबड, शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, MIM कडून इम्तियाज जलील तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

काय आहे औरंगाबादेतील सध्याची राजकीय स्थिती –

सध्याच्या परिस्थितीत हिंदू-मुस्लीम मतदारांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असलं तरी हर्षवर्धन जाधव हेच इम्तियाज जलील यांच्या विजयाचे शिल्पकार ठरतील असं बोलल्या जातंय.

मुस्लीम-दलित समाजाचं बर्यापैकी प्राबल्य असणार्या औरंगाबादेत मराठा समाजाची मतं देखील निर्णायक ठरू शकतील अशी परिस्थिती आहे.

 

news24.com

अब्दुल सत्तार यांची चतुर खेळी-

कॉंग्रेस मधून बाहेर पडलेल्या अब्दुल सत्तार यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला आहे.

खैरेंची मते हर्षवर्धन यांच्याकडे फुटावीत, जेणेकरून केशरी मतांच्या विभागणीचा फायदा इम्तियाज जलील यांना होईल यासाठी सत्तारांनी ही खेळलेली खेळी असावी असं देखील आता औरंगाबाद मध्ये बोलल्या जातंय.

 

abdul sattar inmarathi
freepressjournal.in

मराठा समाज ठरणार निर्णायक-

खैरे आणि हर्षवर्धन ह्यांच्या लढतीत इम्तियाज जलील लागण्याच्या शक्यतेने जोर धरला असतांना मात्र मराठा समाजाने हर्षवर्धन यांना केलेलं मतदान हर्षवर्धन ह्यांना फायद्याचं ठरतं की या मत विभागणीचा फायदा होऊन इम्तियाज जलील निवडून येतील..

हे देखील येत्या २३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?