Site icon InMarathi

“बाळासाहेब, पंधरा टक्के मतांवर कोणते उमेदवार निवडून येतात?”: प्रकाश आंबेडकरांना खडा सवाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : नितीन भरत वाघ

===

अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची एकूण भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. ते काही जिग्नेश मेवानी, चंद्रशेखर आझाद ‘रावण’ नाहीत किंवा कन्हैया कुमारही नाहीत की अगदी कालपरवा राजकारणात आले आहेत.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर तीनदा ते खासदार राहिले आहेत. तेव्हा काँग्रेसमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता.

गेल्या किमान पस्तीस वर्षांच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांची उपलब्धी काय आहे? रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण व्हावे यासाठी इतर प्रयत्न करीत असताना यांनी कायम त्यातून बाजूला रहायची भूमिका घेतली.

त्यांच्या नेतृत्वाखाली एकीकृत आरपीआय चालवण्याची विनंती करून सुद्धा त्यांनी एकीकरणात भाग घेतला नाही.

इतक्या वर्षाच्या राजकारणात त्यांनी संघटनाच्या पातळीवर काही काम केलं असल्याचं दिसत नाही. आपला पक्ष एका जिल्ह्याच्या बाहेर नेऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी, सगळा समाज एका छत्राखाली आणावा म्हणून काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

 

nagpurtoday.in

असे असताना एकदम ते बार्गेनिंग पॉवर पोजिशनमध्ये येतात आणि थेट राज्यातील बहुतेक सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करतात? जिथे कॅडर बेस्ड पक्ष, जे काही दशकं सत्तेत आहेत, ज्यांना जनाधार आहे असे पक्ष सुद्धा सगळ्या जागा लढण्याचा निर्धार करत नाही.

मात्र यांना हुक्की येते आणि अठ्ठेचाळीस जागांवर वंबआचे उमेदवार उभे करण्याची घोषणा करतात.

आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणा या प्रमुख मागणीसह काही इतर अटी काँग्रेस आघाडीसोबत जाण्यासाठी ठेवल्या होत्या.

आता संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी काय करावं लागेल याचा आराखडा, मसूदा प्रकाश आंबेडकरांना मागितला तर तो तुम्हीच तयार करा, असं खुस्पट काढलं.

चार, सहा, बारा असं करत करत जागांची मागणी मुद्दाम वाढवत नेली. काँग्रेसने सहाही जागा निवडून आणण्याचं आश्वासन आणि खात्री दिली होती. पण तेही प्रकाश आंबेडकरांना मान्य झालं नाही.

थोडक्यात त्यांना आघाडीसोबत जायचं नव्हतं. ते त्यांनी खूप आधीपासून ठरवून टाकलं होतं. ते कशाच्या जोरावर फक्त त्यांचं त्यांनाच माहीत.

स्पष्टच विचारायचं झालं तर प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला मत का द्यावं? असा कोणता ठोस, ठाम आधार आणि संस्थात्मक काम आहे, जे बघून त्यांना मत द्यावं?

 

national.com

जाहिरनामा म्हणे काय तर घटनेचा सरनामा हाच आमचा जाहिरनामा? हे काय गंभीर आणि परिपक्व राजकारण आहे का? ही सरळ सरळ लोकांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. तरी यांना मत द्यायचं?

वंचितांना सत्ता मिळाली नाही हे अर्धसत्य आहे. प्रत्येक जातसमूहासाठी आरक्षण दिलेलं आहे. त्या जागांवर निवडून गेलेल्यांनी फक्त खुर्च्या उबवल्या हे सुद्धा वास्तवच आहे.

ज्या बहुजन समाजातल्या वंचितांची गोष्ट प्रकाश आंबेडकर करतायत त्यात खरोखरच वंचित असणारे किती जात समूह आहेत?

सगळ्या दलित, वंचित समूहाने आपल्या बळावर सहकार उभा केला नाही, संघटन उभं केलं नाही की पर्यायी व्यवस्था शोधून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला नाही.

सत्तेचं मॉडेल राबवण्यासाठी आजूबाजूला पाहिलं असतं तर दिसलं असतं. स्वतःच्या क्षुल्लक प्रलोभनांसाठी सगळा समाज याच्या त्याच्या दावणीला बांधला जात होता तेव्हा प्रकाश आंबेडकर आपला ‘गड’ सांभाळत बसले होते.

आता सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांची क्षमता इतकी वाढली की ते लोकसभेच्या सगळ्या जागा लढायला निघाले आहेत. हे कसं समजून घ्यायचं?

 

hindustantimes.com

काय आहे ही वंचित बहुजन आघाडी? तर एक व्हर्चुअल बेरीज वजाबाकीचं गणित आहे. ज्यात बेरीज कमी वजाबाकीच जास्त आहे. दलित, मुस्लिम आणि बहुजनातला कुणबी वर्ग या समूहांच्या लोकसंख्येआधारे एक व्हर्चुअल गणित मांडलं आहे, ज्याला वास्तवाचा काहीच आधार नाहीये.

माळी, धनगर, वंजारी आणि इतर एनटी वगैरे समूह यात गृहीत धरलेले आहेत. बरं यात आदिवासींचा समावेश म्हणावा तसा नाहीच!

यांची इतकी मतं, त्यांची तितकी मतं मिळतील अशा बालिश गृहितकावर सगळे कॅलक्युलेशन्स केलेले आहेत, या गणितांना कामांचा, संवादाचा, विश्वासाचा पूर्वाधार लागतो याचा कणमात्र विचार केलेला नाही.

फक्त उमेदवारांच्या जाती जाहीर केल्या म्हणून त्यांना लोकं मतं देतील का? खरंच राजकारण इतकं अपरिपक्व असतं का?

आणि हे प्रकाश आंबेडकर यांना समजत नसेल का? समजतच असेल. जर असं आहे तर प्रकाश आंबेडकरांचा इतके उमेदवार उभे करण्याचा हेतू नक्की काय आहे?

आपण कुठेच निवडून येणार नाही हे त्यांना माहीत आहे, पण फक्त आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करणं आणि वाढवणं हाच एक हेतू आहे. सगळ्यात वाईट हे सगळं द्वेषाधारीत आहे.

मराठा कुणबी समाज साठपासष्ट टक्के आहे, त्यांच्यापैकी एकही मत वंचित बहुजन आघाडीला मिळणार नाही. उरलेल्यात दलित, आदिवासी आणि मुसलमान यांच्या मतांपैकी आदिवासींची मतं मिळणार नाहीत.

पंचवीस टक्के दलित, मुस्लिमांपैकी फार तर पंधरा टक्के मतं वंचित बहुजन आघाडीला मिळतील. पंधरा टक्के मतांवर कोणते उमेदवार निवडून येतात? हा, या मतांच्या आधारे कुणाला तरी फायदा मिळवून देता येऊ शकतो आणि कुणाचं तरी निर्णायक नुकसान करता येऊ शकतं?

 

news24.com

फायदा कुणाचा करून द्यायचा हे निश्चित नसलं तरी नुकसान काँग्रेस आघाडीचं करायचं आहे, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे. यातून काय साध्य होणार ते प्रकाश आंबेडकरांनाच ठाऊक!

मत विभाजना व्यतिरिक्त वंबआला काहीही साध्य होणार नाही असाच अर्थ मात्र याचा होतो.

परवा एकेठिकाणी वाचलं जयभीम जय मिम! जय मिम? पुढे काही विचार करायची हिंमतच झाली नाही. अशा स्लोगन वापरून हे निवडून येणार आहेत का?

हे सामाजिक ध्रुवीकरण केवळ निवडणूकांपुरता मर्यादित राहणार नाहीये तर दीर्घकाळ याचे पडसाद उमटत राहणार आहेत. याचा विचार अर्थात प्रकाश आंबेडकरांनी केलेला नसेलच.

आपल्या कृतीचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा विचार जबाबदार राजकारण्यांनी करायचा असतो. तसे जबाबदार राजकारणी प्रकाश आंबेडकर नाहीत हे त्यांनी भिडे, एकबोटे प्रकरणात दाखवून दिलं आहे.

अगदी शेवटचा मुद्दा. ज्या परिस्थितीतून देश सध्या जातोय तशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेतली असती? याचा विचार वंबआच्या समर्थकांनी करायला हवा.

 

navodayatimes.in

मी वारंवार सांगतो बाबासाहेब आंबेडकर वाचता आले पाहिजेत. मी वंचित बहुजन आघाडीला विरोध करतो कारण या आणीबाणी सदृश्य स्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी काय निर्णय घेतला असता, त्यांची भूमिका काय राहिली असती याची स्पष्ट कल्पना मी करू शकतो.

जर लोकशाही धोक्यात असेल तर ती वाचवण्यासाठी सगळं अस्तित्व पणाला लावून ती वाचवली पाहिजे. अन्यथा ना वंचितांना आवाज उरेल ना बहुजनांना.

ज्या गांधी, नेहरू, काँग्रेसवर आंबेडकरांनी सातत्याने टीका केली, वेळ येताच त्यांच्यासोबत मिळून कामही केले. आपला अहंकार कुरवाळत बसले नाही.

किमान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय कसे घेतले याचा विचार केला तरी अनेक निर्णय देश आणि समाज हिताचे घेता येतील.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला कधीही पाठिंबा दिला नसता, म्हणून माझा वंबआला समर्थन नाही आणि पाठिंबा तर मुळीच नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version