' जिथे कुणीही जिवंत राहू शकत नाही त्या सहारा वाळवंटात तग धरून राहणाऱ्या बर्बर जमातीविषयी जाणून घ्या – InMarathi

जिथे कुणीही जिवंत राहू शकत नाही त्या सहारा वाळवंटात तग धरून राहणाऱ्या बर्बर जमातीविषयी जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : वैदेही  जोशी 

===

जगातील सर्वात मोठे असलेले सहारा वाळवंट हे प्राचीन काळी हिरवेगार होते. परंतु बदलते वातावरण आणि निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप ह्यामुळे ह्या हिरव्यागार भूमीचे प्रचंड वाळवंटात रूपांतर झाले.

त्यामुळे येथे राहणे हळूहळू कठीण होऊ लागले आणि इथे राहणारे लोक स्थलांतर करू लागले पण बर्बर लोकांनी मात्र येथेच राहणे पसंत केले.

पृथ्वीवर काही अश्याही जागा आहेत जिथे माणूस राहू शकत नाही, पण काही लोक मात्र इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरून राहतात इतकी त्यांची इच्छाशक्ती पक्की असते.

उत्तर आफ्रिकेतील मूलनिवासी लोक म्हणजेच बर्बर ह्या जमातीने असेच सहारा वाळवंटातील कठीण परिस्थितीत सुद्धा जगण्याचा मार्ग शोधून काढला.

सहारा वाळवंटात वास्तव्याला असणारे हे लोक आपली एक वेगळीच संस्कृती अजूनही जोपासून आहेत.

बर्बर लोकांची संस्कृती ही मानवी इतिहासातील आगळ्यावेगळ्या आणि विलक्षण संस्कृतींपैकी एक आहे. आज त्यांच्यापुढे जगण्यास कठीण असे वातावरण ही समस्या तर आहेच त्याशिवाय आधुनिकतेचे प्रेशर आणि इतर जगाकडून होणाऱ्या दडपशाहीला सुद्धा त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 

berbers tribe inmarathi
adventureclassroom.org

सहारा हे जगातील सर्वात मोठे व उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिकेचा जवळजवळ पूर्णच भाग सहाराने व्यापला आहे. ९० लाख वर्ग इतके मोठे क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट जवळपास तीस लाख वर्षांपूर्वी तयार झाले असे म्हणतात. दर ४१००० वर्षांनी सहारा वाळवंट पृथ्वीच्या अक्षामुळे बदलते. आता पुढील बदल आणखी १५००० वर्षांनी होणार आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बर्बर लोक पश्चिम इजिप्तपासून मोरोक्को पर्यंत तसेच तूआरेग भागात आढळतात. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र आणि ऍटलास पर्वतरांगा तसेच माघरेब हा प्रदेश , दक्षिणेला साहेल पट्टा व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ह्या वैराण भागात केवळ वाळू आणि खडक आढळतात. त्यामुळे इथे राहणे जवजवळ अशक्य आहे. पूर्वी गवताचे मोठे कुरण असलेला हा प्रदेश आता मात्र इतका कोरडा आहे की येथे पाण्याचा अंशदेखील नाही. येथील वातावरणात इतका मोठा बदल झाला म्हणून लोकांनी हळूहळू इथून स्थलांतर करून दुसरीकडे वस्ती केली. परंतु बर्बर लोकांचे जे अरबांच्या आधीचे पूर्वज होते, त्यांना मात्र ही जागा सोडून दुसरीकडे जायचे नव्हते. त्यांनी सहारा सोडून जाण्याऐवजी तिथे वास्तव्य कसे करता येईल ह्याचा मार्ग शोधून काढला. जे इतरांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले.

बर्बर जमातीचा इतिहास खूप प्राचीन आहे. ते अश्मयुगीन काळापासून अस्तित्वात आहेत. इसवी सन पूर्व पाच हजार सालापासून त्यांचे पूर्वज उत्तर आफ्रिकेच्या किनारी भागात राहत होते. ह्या भागातील लोक सारख्याच प्रकारची भाषा बोलत असल्याने ते एकत्र आले आणि त्यांनी एकत्र वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. येथेच बर्बर संस्कृतीचा पाया रचला गेला. बर्बर ह्या नावाचा अर्थ ईजिप्शियन भाषेत “आउटसायडर” म्हणजेच बाहेरून आलेला असा होतो असे अभ्यासक मानतात. हाच शब्द नंतर ग्रीक लोकांनी स्वीकारून त्याचा अपभ्रंश बार्बरी असा झाला आणि नंतर पाश्चिमात्य भाषेत ह्याचे रूपांतर बार्बरीयन असे झाले. ईजिप्शियन लोकांप्रमाणेच ग्रीकांनी सुद्धा हा शब्द बाहेरून आलेले म्हणजे स्थलांतरित किंवा विदेशी ह्या अर्थाने वापरला पण बर्बर लोक मात्र स्वतःला “Amazigh’ म्हणजेच “स्वतंत्र लोक” म्हणवून घेतात.

हे लोक कायमच उत्तर आफ्रिकेतील इतर प्रमुख जमातींबरोबर शतकानुशतके संपर्क ठेवून आहेत. त्यापैकी प्रामुख्याने हे लोक फिनिशियन्स व कार्थजिनियन्स ह्या दोन मोठ्या मेडिटेरेनियन जमातींच्या व विविध अरब शासकांच्या अधिपत्याखाली राहत होते. काही काळ त्यांनीही उत्तर आफ्रिकेत आपले राज्य प्रस्थापित केले होते. त्यांचे राज्य न्यूमिडीया नावाने ओळखले जात होते. इसवी सन पहिल्या शतकापर्यंत न्यूमिडीया हे एक शक्तिशाली साम्राज्य होते.आणि त्यानंतर ते रोमचे क्लायंट स्टेट बनले. रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर बर्बर लोकांनी वायव्य आफ्रिकेवर राज्य केले. बर्बर सल्तनतीतील काही शासक तर स्पेनच्या काही प्रदेशावर सुद्धा ताबा मिळवण्यासाठी आले होते. बर्बर लोकांच्या संस्कृतीत अशीच भर पडत गेली. त्यांनी ज्या जा प्रदेशावर ताबा मिळवला तेथील काही गोष्टी आत्मसात केल्या तसेच त्यांच्यावर ज्यांनी शासन केले त्यांच्याही संस्कृतीतील काही गोष्टी बर्बर लोकांनी स्वीकारल्या. तरीही त्यांनी आपली खास संस्कृती जतन करून ठेवली. त्यांच्या ह्याच संस्कृतीच्या जोरावरच तर ते ह्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरून राहू शकले. म्हणूनच ते इतिहासातील सर्वात विलक्षण लोकांपैकी एक गणले जातात.

बर्बर लोक शेतीपासून कायमच लांब राहिले आहेत. सहाराच्या वैराण आणि कोरड्या वातावरणात शेती करणे अशक्यच असल्यामुळे हे लोक कधी शेतीकडे वळूच शकले नाहीत. म्हणूनच एका जागी राहून शेती व पशुपालन करण्यापेक्षा त्यांनी भटके जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांची ही सतत फिरत राहण्याची “मोबाईल” जीवनशैली हाच त्यांच्या संस्कृतीचा मोठा भाग आहे. फिरती जीवनशैली त्यांच्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी असल्यामुळेच ते स्वतःला :फ्री मेन” म्हणजेच “मुक्त लोक” म्हणवून घेतात.

हे लोक चरणारे प्राणी पाळतात. व त्या कळपांना इकडून तिकडे नेत त्या प्राण्यांच्या भरवशावर आयुष्य जगतात. पशुपालन करणे आणि प्राण्यांना चरायला नेणे हे ह्यांच्या समूहातील पुरुषांचे काम होते तर स्त्रिया त्यांच्या घरात थांबून त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण निळ्या रंगाचे कपडे विणत असत. हे लोक घोडे व इतर प्राणी सुद्धा पाळतात पण त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी त्यांना उंट हा प्राणी खूप उपयोगी आहे. घोडे पाण्याशिवाय राहू शकत नाहीत पण उंट अनेक दिवस पाण्याविना जगू शकतात. उंटाच्या ह्याच गुणामुळे व सहनशक्तीमुळे हे लोक इतक्या मोठ्या व कोरड्या वाळवंटात इकडून तिकडे प्रवास करू शकतात.

पारंपरिकरित्या हे लोक सहारा वाळवंटात प्रवास करण्याची त्यांची खास क्षमता वापरून उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व प्रदेशात जो व्यापार चालतो त्यात महत्वाची भूमिका बजावतात. आजही बर्बर लोक वाळवंटात प्रवास करण्यासाठी त्यांच्या caravan वापरून त्यांचा चरितार्थ चालवतात.त्यांच्या तग धरून राहण्याचे दुसरे रहस्य म्हणजे नॅव्हिगेशन होय. खरे तर समुद्राप्रमाणेच वाळवंटात सुद्धा नेमके कुठल्या दिशेला काय आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे मार्ग शोधणे अत्यंत अवघड आहे. नुसती चहूबाजूला वाळू आणि वाळूच्या टेकड्यांव्यतिरिक्त वाळवंटात काहीही नाही त्यामुळे रस्ता कसा शोधायचा? प्राचीन काळी खलाशी जसे आकाशातील ताऱ्यांवरून मार्ग शोधायचे आणि दिशा ठरवायचे, त्याप्रमाणे हे लोक सुद्धा आकाशातील ताऱ्यांवरूनच आपला मार्ग शोधतात.

इतकेच नव्हे तर ह्या लोकांकडे लहान पाण्याचे झरे कसे शोधायचे आणि वाळवंटातील लँडमार्क कसे ओळखायचे ह्यासाठी अनेक युक्त्या आहेत व ते त्यांच्या कथा व गाण्यांमधून ह्या युक्त्या सांगतात. बहुतांश बर्बर लोक हे मुसलमान आहेत आणि ते त्यांच्या धर्माचे अनेक शतकांपासून पालन करीत आहेत. पण त्यांच्या संस्कृतीचे एक महत्वाचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या जमातीत स्त्रियांना दिली जाणारी वागणूक! त्या प्रदेशातील इतर मुस्लिम लोकांमध्ये स्त्रियांना फारशी सूट नसते तसेच हिजाब घालणे त्यांना अनिवार्य असते. पण बर्बर बायका हिजाब घालत नाहीत तसेच त्यांना आपल्या नवऱ्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. ह्या लोकांच्या टोळ्या असतात आणि अनेक परिवार मिळून एक टोळी असते. प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असतो जो प्रेषित मोहम्मदांचा वंशज असल्याचे सांगतो. ह्या टोळीप्रमुखावर सर्व मुख्य व महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी असते तसेच काही समस्या निर्माण झाल्यास न्याय करणे व भांडणतंटे सोडवणे ह्या जबाबदाऱ्या सुद्धा असतात.

इतर भटक्या लोकांप्रमाणेच हे लोक सुद्धा पोर्टेबल तंबूंत राहतात. त्यांच्या प्राण्यांना चरण्यास योग्य अशी जमीन दिसल्यास ते तिथे तंबू ठोकून वास्तव्य करतात. हे लोक आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात. एखाद्या व्यक्तीने त्यांच्याकडून जर पाणी किंवा जेवण घेतले तर ती व्यक्ती बर्बर लोकांची पाहुणी असते आणि त्या पाहुण्याच्या सुरक्षेची जबाबदारी यजमान घेतो. इतक्या कठीण परिस्थितीत जिथे पाणी व अन्न मिळणे सुद्धा अगदी जीवनमरणाचा प्रश्न असतो तिथेही हे लोक आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे अगदी यथायोग्य आदरातिथ्य करतात.

आता मात्र आधुनिक वातावरणात त्यांना आपली प्राचीन संस्कृती टिकवून ठेवणे कठीण जात आहे. टोळ्यांमधील तरुण लोक मोठ्या शहरांमध्ये जाऊन काम शोधून कुटुंबाचा चरितार्थ चालवू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची आगळीवेगळी संस्कृती संकटात सापडली आहे. एका जागी काम करावे लागल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी राहावे लागते आहे त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा कणा असलेले त्यांचे भटके जीवन सुरु ठेवणे त्यांना कठीण झाले आहे. त्यांना फक्त इतकीच समस्या नाहीये. गेली अनेक शतके उत्तर आफ्रिकेतील अरब लोक त्यांचा छळ करत आहेत त्यांच्या बाबतीत दडपशाहीचे धोरण बाळगून आहेत. लिबियामध्ये मुअम्मर गद्दाफीने सगळे लिबियन्स हे अरब आहेत असे जाहीर करून बर्बर लोकांची ओळखच त्यांच्यापासून हिरावून घेतली. त्यांना त्यांची भटकी जीवनशैली सोडून देण्यासाठी व अरेबिक भाषा बोलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ज्या लहान मुलांना बर्बर नावे दिली होती त्यांची नावे जबरदस्तीने बदलून अरेबिक करण्यात आली.

 

 

मोरोक्कोमध्येही हे लोक जास्त संख्येत असून देखील त्यांच्यावर अरेबिक बोलण्याची सक्ती केली जाते. ते फक्त आपापसात बोलताना त्यांची बर्बर भाषा वापरतात.

ह्या सगळ्या आक्रमण व दडपशाहीमुळे बर्बर लोकांना त्यांची संस्कृती व ओळख जतन करून ठेवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

त्यांच्या अरब शेजाऱ्यांकडून त्यांच्यावर सतत दबाव टाकला जात आहे. परंतु हे लोक मात्र आपली संस्कृती व भाषा जपण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत.

ह्या लोकांनी वर्षानुवर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतक्या अडचणींचा सामना केला आहे की ह्या लोकांना रोजच अस्तित्वासाठी लढा देण्याची सवय झाली आहे.

त्यांच्या ह्याच चिकाटी व तग धरून राहण्याच्या वृत्तीमुळे ते पुढची हजार वर्षे सुद्धा रुक्ष वाळवंटात फुललेली आपली संस्कृती जतन करून ठेवतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?