पुण्याच्या या आजीबाई ७५ व्या वर्षी खडतर असा ‘नथू-ला पास’चा ट्रेक करून आल्यात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
प्रत्येक व्यक्ती ही खासच असते. आयुष्याची वाटचाल जशी पुढे सरकत जाते तशी आपल्या अनुभवाची शिदोरी देखील आपसूकच साठत जाते. अर्थात त्यातील प्रत्येक अनुभव सुखदच असेल असे अजिबात नाही. मात्र प्रत्येकाकडे दुसऱ्यांना सांगण्यासारखी आपली अशी एक गोष्ट असतेच.
“द बेटर इंडिया” ने हाच धागा पकडत रीना वर्मा यांना बोलतं केलं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या आठवणी अतिशय मनोज्ञ आहेत.
तर कोण आहेत या रीना वर्मा? अगदी आपल्यापैकीच असणाऱ्या एक सामान्य व्यक्ती आहेत. वय फक्त ८७ वर्षे! पण त्यांच्यातील उत्साह पाहता ती केवळ दिशाभूल करणारी संख्या आहे.
ज्येष्ठ नागरिक म्हणून रीना वर्मा आपले आयुष्य पुण्यात आनंदाने व्यतीत करत आहेत.
त्यांच्याकडे अनेक आठवणी आहेत. त्यापैकी काही सांगायच्या म्हणजे पंडित नेहरू, राणी एलिझाबेथ आणि नेपाळच्या राजासारख्या मान्यवरांशी झालेली भेट, भारतातील पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये भाग घेण्याची त्यांना मिळालेली संधी या आठवणी त्या आवर्जून सांगतात.
बालपण
रावळपिंडी (पाकिस्तान) मध्ये १९३२ मध्ये जन्मलेल्या वर्मा म्हणतात की आज जे वातावरण आपण पाहत आहोत त्यापेक्षा तेव्हाचे वातावरण निश्चितपणे वेगळे होते.
रावळपिंडीत त्यांनी जी काही वर्षे व्यतीत केली तेव्हा “सांप्रदायिक मतभेद असल्याचे मला आठवत नाही. तेव्हा सर्व काही खूपच सौहार्दपूर्ण होते आणि आम्ही सर्व शांतपणे जगलो” रीना वर्मा आठवण सांगतात.
“माझे आईवडील विचाराने पुढारलेले होते. त्यांनी आम्हा बहिणींनाही व्यवस्थित शिकवले. मला आठवते माझी मोठी बहीण आमच्या पासून दूर वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करीत होती.
ही साधारण ३० च्या नंतरच्या दशकातील गोष्ट आहे. मुलींना शिकवलेच पाहिजे अशा मताचे माझे वडील होते” याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.
त्यांचे वडील “मूरी” या हिल स्टेशन च्या ठिकाणी वास्तव्यास होते. हे ठिकाण रावळपिंडी पासून जवळच आहे. तिथे त्यांच्या आजूबाजूला अनेक ब्रिटिश कुटुंबांचे वास्तव्य होते. म्हणूनच की काय रीना वर्मा यांचे बालपण अतिशय खुल्या वातावरणात व्यतीत झाले.
त्यांच्या बालपणाच्या आठवणी त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
“तेव्हा मी भविष्यात काय करेल याविषयी फार काही विचार केला नव्हता आणि आजवर जे काही केलं असं काही करेल हे पण माहीत नव्हतं”, त्या सहज सांगतात.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात त्या एका कार्यक्रमाच्या सहभागी म्हणून आपल्या अनुभवाचे वर्णन करताना वर्मा म्हणतात, “मी दिल्लीत महाविद्यालयात शिकत होते.
काही पंजाबी रंगभूमीवरील कलाकार कार्यक्रमाच्या संदर्भात एका विशिष्ट भागासाठी कलाकार शोधत आहेत याची मला माहिती मिळाले आणि मी त्यात भाग घेण्यास उत्सुक होते”.
त्यांनी लवकरच त्या चमूशी संपर्क साधला आणि त्या सहभागी झाल्या. “भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत असल्याने अंगावर शहारे उभे राहिले होते. तो अनुभव रोमांचित करणारा असाच होता.
आम्ही एका पंजाबी गाण्यावर नृत्य सादर केले होते”. “निक्का मोटा बाजरा” असे त्या गाण्याचे बोल आजही त्यांच्या लक्षात आहेत. “मी नेहमी गायन आणि नाचण्याचा आनंद नेहमीच घेतला आहे आणि ती एक परिपूर्ण संधी होती.”
रीना वर्मांच्या जीवनात संगीताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्या म्हणतात की “त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या आठवणी घरच्या ग्रामोफोनवर वाजणाऱ्या रेकॉर्डस् च्या अवतीभोवतीच आहेत”.
तुमचे आवडते गाणे कुठले? असे विचारले असता त्या लगेचच संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव के एल सैगल यांच्या . .बबुल मोरा नाहर छोटो हाय जाय. हे गाणे गुणगुणतात.
नेपाळच्या राजाशी भेट
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर रीना वर्मा यांचा विवाह झाला आणि त्या बेंगलुरूला स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी कावेरी एम्पोरियममध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.
स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंचे विक्रेता म्हणून या एम्पोरियमने चांगले बस्तान बसवले होते. आजही शहरातील नागरिक तसेच पर्यटकांना स्थानिक कारागिरांनी बनविलेल्या उत्तमोत्तम कलाकृती मिळण्याचे ते अव्वल दर्जाचे ठिकाण आहे.
नेपाळच्या राजाच्या भेटीच्या घटनेचा उल्लेख केल्याबद्दल त्या म्हणतात, “राजा एम्पोरियमला भेट देत असल्याने तो सर्वसामान्य लोकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.”
“नेपाळचे नरेश माझ्या काउंटरवर आले आणि डिस्प्लेवर काही वस्तू शोधत होते हे मला आठवतं आणि यामुळे मला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.”
“ही एक स्मृती आहे जी मी जपली आणि नेहमी लक्षात ठेवते.” रीना वर्मा सांगतात.
पंडित नेहरूंशी भेट
पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या केवळ एकदा नाही तर तब्बल पाच वेळेस भेटलेल्या आहेत. पहिल्यांदा भेट झाले तेव्हा त्या वयाने लहान होत्या. रावळपिंडी मध्ये पंडित नेहरूंचे भाषण झाले होते आणि तेथे त्या उपस्थित होत्या.
दुसऱ्यांदा भेट झाली ती जेव्हा रीना वर्मा यांचे बंधू राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथून उत्तीर्ण झाले त्यावेळेस रात्री विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे रीना वर्मा आणि पंडित नेहरू यांची भेट झाली आणि थोडे बोलणे देखील झाले.
रीना वर्मा आणि त्यांचे वडील दोन्ही यावेळी उपस्थित होते. “तेव्हा माझ्या वडिलांनी रावळपिंडीमधील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे रीना वर्मा आठवून सांगतात.
अजून एक ऐतिहासिक प्रसंग आहे जो अनेक भारतीयांना माहीत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी “ए मेरे वतन के लोगों ” हे गीत गायले तेव्हा पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनी उभे राहून या गाण्याला दाद दिली होती.
या भावूक प्रसंगाच्या रीना वर्मा एक साक्षीदार आहेत. त्या पंडित नेहरूंच्या मागील रांगेतच बसल्या होत्या आणि हा प्रसंग अगदी जवळून पाहिल्याचे त्या सांगतात.
आयुष्यातील संघर्ष
जपून ठेवण्यासारख्या खूप साऱ्या आठवणी त्यांच्याजवळ असल्या तरी काही दुःखद आठवणी देखील त्यांनी उरी बाळगल्या आहेत. त्यांचे पती हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड येथे कार्यरत होते.
मात्र निवृत्त होण्यापूर्वी त्यांना पॅरालीसीसचा झटका आला. हा प्रसंग अनेक अर्थाने गंभीर होता. यामुळे त्यांचे आरोग्य तर बिघडलेच शिवाय घराची आर्थिक गणित देखील विस्कटले.
ते दिवस कठीण असल्याचे त्या सांगतात. मुले शिकत होती अशावेळेस त्यांनी यावर कशी काय मात केली याबद्दल विचारले असता त्या सांगतात की,
“माझ्याजवळ प्रचंड आंतरिक शक्ती आहे आणि मी कधीही आयुष्यात कोणाकडी काहीही मागू इच्छित नाही.” हा गुणविशेष माझ्याकडे माझ्या आईवडिलांकडून आल्याचे त्या नमूद करतात.
पुढे देखील वाटचाल सोपी नव्हती. पुढच्या काळात त्यांनी आपला मुलगा देखील गमावला आणि त्यांच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. मात्र इथे देखील त्यांच्यात असलेली आंतरिक शक्ती त्यांना बळ देऊन गेली.
वयाची पंच्याहत्तरी….
“मी एक लढणारी स्त्री आहे. मी हार मानत नाही आणि माझ्या मार्गावर जाण्यासाठी मी नेहमीच तयार असते, “असे ८७ वर्षीय वर्मा म्हणतात.
मला पर्वतराजी नेहमीच प्रेरणा देत आल्या आहेत ज्यामुळे रीना वर्मा नथुला पासच्या मार्गावर जाण्याची योजना बनवत होत्या. “तेव्हा मी सिलीगुरी येथे होते, आणि माझ्यासोबत कोणालाही यायला वेळ नव्हता, म्हणून मी साहसाने एकटीने जाण्याचा निर्णय घेतला. मी बस पकडली आणि मी तिथवर गेले”, वयाच्या ७५ व्या वर्षी केलेले हे साहस नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारे आहे.
“जेव्हा लोकांनी माझे अभिनंदन केले तेव्हा मला कळले की मी ज्या उंचीवर गेली होती ती जास्त होती.”
“हे पर्वतांकरिता माझे प्रेम आणि साहस करण्याची भावना होती ज्यामुळे मला तसे करण्यास प्रेरित करते.” त्यांच्या बोलण्यातून त्यांचा निखळ स्वभाव दिसून येतो.
आज ८७ वर्षांच्या वयाचा, रीना वर्मा सक्रियपणे वॉकाथॉनमध्ये सहभागी होतात. त्या म्हणाल्या, “मी ज्या ३ स्पर्धांमध्ये सहभागी होते त्या शेवटच्या तीन वॉकाथॉन्स मी जिंकल्या आहेत,” त्यांना याचा प्रचंड अभिमान वाटतो.
सुखी आयुष्याचा मंत्र
१. आत्मनिर्भर व्हा
“आत्मनिर्भर बनण्यासाठी शक्य तितके जास्त प्रयत्न करा. अशा स्वातंत्र्यामुळे तुम्हाला किती आनंद मिळतो हे तुम्हाला आपोआप दिसेल”. त्या आवर्जून सांगतात.
२. एक छंद हवाच
आपण आनंद घेऊ शकत असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये व्यग्र रहा; तो आपला एक छंद किंवा नोकरी असेल. आपल्यासाठी ‘काहीतरी’ करणे आवश्यक आहे. आपण त्यामध्ये व्यग्र असल्यास, ते आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देईल.
३. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
इतर सर्वकाही करण्याआधी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. जर काहीच नसेल तर किमान दररोज चालत जा, जे आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेईलच शिवाय मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास देखील मदत करेल.
स्वतः वर असलेला दृढ विश्वास आणि आनंदाने आयुष्य जगण्याची मिळालेली गुरुकिल्ली रीना वर्मा यांना गवसली त्यांचे हे आयुष्य आपल्याला देखील चांगले आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.